Monday, March 18, 2024

क्षितीज नियतकालिक #CPTP9

CPTP9 टिमच्या वतीने प्रकाशित वनामतीचे नियतकालिक क्षितिज प्रकाशित झाले.

असे मॅगझिन असावे अशी संकल्पना पहिल्यांदा वनामतीच्या संचालक डाॅ. मित्ताली सेठी यांनी CPTP8 समोर मांडली. CPTP8 ने ती सत्यात उतरवली अन् पहिले वहिले सीपीटीपीचे नियतकालिक मागीलवर्षी प्रकाशित झाले. यावर्षी प्रकाशित झालेले नियतकालिक हे त्याच मालिकेतील पुढचे पाऊल....


नियतकालिकाच्या पीडीएफ साठी क्लिक करा 👇

https://drive.google.com/file/d/1FLYTdlUYT1iRL3E58go7bPAuMGzumyAw/view?usp=drivesdk

Monday, February 19, 2024

Book Review : सेल्फी (अरविंद जगताप)


आपल्या आजुबाजुला इतकं काही काही चालु असतं, पण आपण मात्र कायम स्वतःत रंगलेले, आत्ममग्न असतो....कदाचित नव्या युगातील वाढत्या सेल्फिशपणाकडे बोट दाखवण्यासाठीच तर सेल्फीचा शोध लागला नसेल ? असेलही कदाचित्... कारण पुर्वी मागच्या कॅमेऱ्याने जगाकडे बघायचो आपण... आता मात्र कॅमेरा समोर आला अन् आपण मात्र समोर बघणं सोडून स्वतःलाच बघत बसू लागलो... अशावेळी आपल्या भोवतालच्या जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघून आत्मचिंतन करायला लावणाऱ्या लेखांचा संग्रह म्हणजे अरविंद जगताप यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक 'सेल्फी'.... हे पुस्तक म्हणजे तरुणाईच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न आहे... वेळोवेळी तरुण पिढीसाठी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे...पुस्तक अगदी छोटेखानी आहे...तसेच पुस्तकातील लेख देखील छोटे छोटे आहेत...एक पानी, दोन पानी असे हे लेख आहेत...काही लेखात एखादी‌ लक्षवेधुन घेणारी कथा आहे, तर एखादा लेख हीच लघुकथा आहे...पुस्तकात बादशाहचा कुत्रा ही छोटीशी कथा आहे...या कथेत बादशाहच्या लाडक्या कुत्र्याच्या अंत्ययात्रेत लाखो लोक सहभागी होतात, मात्र काही काळाने युद्धात राजा राज्य हरतो, कर्जबाजारी होतो अन् एका जुन्या घरात मरण पावतो, कुणाला माहीतही होत नाही...ज्याच्या कुत्र्याच्या अंत्ययात्रेस लाखो जमतात, त्याच्या स्वतःच्या मरणाचा कुणाला सुगावाही लागत नाही.…सत्ता संपते तेंव्हा सारे संपते...त्यामुळे सत्तेत‌ असताना आत्मपरिक्षण आवश्यक आहे हा मोलाचा संदेश कथेतुन लेखक देऊन जातो...सोबतच एकदा आपण कुणाला आपल्या मेंदुचं राजा मानलं की आपल्यावर राज्य आलेलं असतं...हे देखील लेखक स्पष्टपणे सांगतो...पुस्तकात 'कवी' नावाची एक कविता आहे...ह्या कवितेतुन लेखकाने कागदावर कविता करण्यापेक्षा झाडं लावणं गरजेचं आहे हे अगदी निक्षुन सांगितले आहे...कवितेचा कवि झाडाला पुस्तकं म्हणतो अन् हिरव्यागार कवितेसाठी ह्या पुस्तकाची पानं चाळायला हवीत असा संदेश देतो....पुस्तकात राजकीय, सामाजिक विषयांवर लेख आहेत...तरुणाईला सेल्फीश न होता सेल्फ अनॅलिसीस करायला लावणारे हे पुस्तक तरुणाईने नक्कीच वाचायला हवे...आपण आपली काढलेली सेल्फी कुठल्याही फिल्टर शिवाय कदाचित आपल्याला आवडणार नाही, पण लेखकाने लिहीलेली ही सेल्फी पाहायला आणि वाचायलाही आवडेल अन् आपल्या बुक सेल्फ मध्ये कायम ठेवावी वाटेल....


#असंच_काहितरी
#Book_Review

सवाल एकच रोजीरोटी


 

पोळलेला पावसाळा


 

Sunday, February 11, 2024

Book Review : तुकाराम (भालचंद्र नेमाडे)


तुका न उमजलेले कोडे आहे

जितके वाचू तितके थोडे आहे

नेमाडपंथीय शैलीतील तुकाराम म्हणजे तुकारामावरचे अकृत्रिम प्रेम, अन् तुकारामाच्या जीवनाचा त्याच्याच अभंगाच्या आधारे थोडक्यात घेतलेला आढावा...तुकाराम अभंग आहे, म्हणुनच आजही कित्येक शतकांनंतरही सामान्य माणुस त्याच्यात दंग आहे....तुकाराम जितका आपला वाटतो तितकं आपलेपण इतर कुणाबद्दलही क्वचितच् वाटतं...नेमाडेंनी ह्या आपल्या छोट्याशा पुस्तिकेत तुकारामाच्या जीवनाबद्दल व तत्कालिन परिस्थितीबद्दल लिखाण केलेले आहे...तुकारामाच्या कवितेच्या आधारे त्याचे संतत्व अन् कवित्व उलगडले आहे...त्यासोबतच तुकारामाचे साहित्यातील अमुल्य योगदान व मराठी भाषेवरचे उपकार विषद केले आहेत...तुकारामावर त्याच्या अभंगावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकवेळ तरी वाचावे असे पुस्तक म्हणजे भालचंद्र नेमाडे यांचे 'तुकाराम'.

#तुकाराम
#नेमाडे
#असंच_काहितरी
#Book_Review