"एमपीएससी, क्लास आणि आपण..."
नमस्कार मिञ-मैञिणींनो,
MPSC & UPSC परिक्षांचे निकाल लागले की "जिकडे तिकडे चोहिकडे, शुभेच्छांचे, सत्काराचे सडे" असे काहीसे वातावरण तयार होते..निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे मोटिवेशनल व्हिडिओ हळू हळू पसरु लागतात...कित्येकांच्या कर्मकहाण्या कळत न कळत कानावर येऊ लागतात... एकच टाॅपर सगळ्या क्लासवाल्यांच्या बॅनरवर दिसु लागतात...प्रत्येकजण आपल्या क्लासचे एवढे निवडले गेले, तेवढे निवडले गेले असे सर्वदूर सांगत असतो...नक्की कळत नाही की, नेमकं हा एक व्यक्ती किती ठिकाणी होता..कुणाकुणाचे मार्गदर्शन घेत होता...या सगळ्यांच्या पलिकडे आमच्या सारखे काही असतात, जे सांगतात मी कोणताच क्लास लावला नव्हता, घरीच अभ्यास केला, वगैरे वगैरे...मग या सगळ्यात भांबावून जातो तो या क्षेञाकडे नुकताच वळलेला किंवा नव्याने वळू पाहणारा परिक्षार्थींचा गट...नक्की कोण खरं सांगतय..? नक्की आपण या परिक्षा पास करण्यासाठी काय करावं ? क्लास लावावा की नाही ? पुण्याला जावं की नाही ? एकट्याने अभ्यासाने होईल का ? एवढ्या लाखात आपण कसे सलेक्ट होऊ ? असे एक ना अनेक प्रश्न अनेकांना पडत आलेले आहेत...आताही पडत असणारच.....तर याबाबतीत मी माझ्या तयारीबद्दल आपल्याशी बोलतो, त्यातुन बरीच प्रश्न सुटतील अशी आहे..
तर मी माझी राज्यसेवेची तयारी जुलै 2019 मध्ये सुरु केली....तत्पुर्वी मी 2019 ची पुर्व परीक्षा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना देऊन पास झालो होतो, पण मेन्सचा सिलॅबस देखील मी प्रीचा निकाल लागे पर्यंत बघितलेला नव्हता...मग जून मध्ये पदवीचा लास्ट ईयरचा निकाल लागला अन् जूलै मध्ये मी 2019 ची मुख्य परिक्षा झाल्यावर खरा अभ्यास सुरु केला...त्याअर्थाने माझी 2020 ची परिक्षा ही माझ्या साठी पहिलाच प्रयत्न ! मग राज्यसेवा करायची तर करायचं काय ? हा प्रश्न होता, पण कुठे क्लास लावू का ? हा प्रश्नच माझ्यासाठी नव्हता, कारण क्लासची ५०-६० हजार फिस मी भरूच शकणार नव्हतो... म्हणुन हा प्रश्न निकाली काढुन मी माझी डिगरी जिथे पुर्ण झाली तिथेच म्हणजे जळगावलाच (खान्देश) सेल्फ स्टडी म्हणजे आपण आपला अभ्यास करायचे ठरवले... योगायोगाने मोठा भाऊ जून 2019 मध्ये जाॅबसाठी जळगावला आला, मग दोघांनी मिळून रुम केली अन् अभ्यासाला सुरवात केली..माझ्या अभ्यासाचा पहिला टप्पा होता, मुख्य परिक्षेचा अभ्यासक्रम नीट बघणे...बऱ्याच UPSC Toppers ला ऐकलेले होते, त्यांचे म्हणणे असायचे की मुख्य परिक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला पाठच असला पाहिजे...मग मी तसा प्रयत्न करायला सुरवात केली...जुने पेपर बघुन 360° अभ्यासक्रमाचे डिकोडींग करायला सुरवात केली...एक महिना फक्त अभ्यासक्रम, जुने पेपर बघणे अन् प्रश्न नक्की कशातुन विचारले जातात हे स्वतः शोधणे (उदा. लक्ष्मिकांत मधुन प्रश्न येतात हे ऐकलेले होते, पण तरीही GS2 चा पेपर घेऊन खरच प्रश्न ह्या पुस्तकातून येतात का ? हे स्वतः बघायला सुरवात केली) हाच उपक्रम चालू होता. ह्यातुन सगळ्यात मोठा फायदा झाला तो म्हणजे मला परिक्षा बहुतांशाने कळली...नक्की काय विचारले जाते ? का विचारले जाते ? अन् कुठून विचारले जाते ? ह्या प्रश्नांची खाञीशीर उत्तरे स्वतःच स्वतःला भेटत गेली...स्वतःवरचा विश्वास वाढत गेला...आपण हे करू शकतो, हा विश्वास बळावत गेला...अन् एकटा असूनही कधी फारसा सेल्फ डाऊट वाटला नाही....
एक महिन्याच्या ह्या विश्लेषणानंतर मी माझी बुकलिस्ट फायनल केली....बुकलिस्ट फायनल करताना अजुन एका गोष्टींची मला फार मदत झाली, ते म्हणजे श्री. सदाशिव नांदे (ACST) सरांचे 2018 च्या मेन्सच्या पेपरचे सविस्तर विश्लेषण (हे युट्युबवर फ्री उपलब्ध होते)...एकदा ही बुकलिस्ट फायनल झाली की मग तन-मन-धन अगदी परिक्षेसाठीच असा विचार करुन अभ्यास करायला सुरवात झाली...2020 ची पुर्वपरिक्षा 5 एप्रिल 2020 ला नियोजीत होती, त्यानुसार जुलै - डिसेंबर 2019 मेन्सचा अभ्यास अन् जानेवारी पासुन पुर्वच्या विचाराने अभ्यास असे ठरवले....मग मेन्सचा अभ्यास करताना 6 महिने फक्त आणि फक्त अभ्यासच....हा सहा महिन्यांचा काळ माझ्या आतापर्यंतच्या पुर्ण तयारीतील सर्वाधिक अभ्यासाचा काळ होता...साधारण 12-14 तास अभ्यास होत होता...अर्थात कधीतरी दिवसभर टाईमपास ही होत असायचा, पण राञी झोपताना पश्चाताप व्हायचा...ह्या पश्चातापातून मग अजुन आग पेटायची...मनोमन निश्चय करत परत नव्या जोमाने दुसऱ्यादिवशी अभ्यास....एकंदरीतच ह्या काळात पुस्तकं वाचणे, एकदा पुर्ण त्या पेपरचा अभ्यास झाला की जुने पेपर सोडवणे..अन् परत पुढच्या पेपरचे वाचणे असा क्रम चालु होता.. जुने पेपर, काही प्रॅक्टीस प्रश्न ह्या सगळ्यांमधून Facts लक्षात राहत गेले...अभ्यास वाढला...मग प्री च्या अभ्यासासाठी टेस्ट सिरीज लावून अभ्यास सुरु केला....पण ठरल्या नुसार सारे होईल कसे?...नियतीच्या मनात एका वर्षात पास होऊ देणे नव्हतेच बहुधा...कोरोना आला, लाॅकडाऊन लागले...सगळे नियोजन बारगळले..कसेतरी स्वतःला सावरत अभ्यास चालु ठेवला..बरेच चढ उतार आले, पण अभ्यास बंद केला नाही....
त्याचेच फळ म्हणजे परिक्षा जेंव्हा झाली तेंव्हा प्री पासुन पोस्ट पर्यंत चांगलेच मार्क मिळत गेले अन् नीट अभ्यास करुन दिलेल्या ह्या अटेंप्ट मध्ये राज्यात 16 व्या क्रमांकाने पास झालो...एवढेच नाही तर ह्या जवळपास एक-दिड वर्षाच्या पुर्ण एकाग्रतेने केलेल्या अभ्यासाच्या जीवावर 2020,2021 & 2022 ह्या तिन्ही वर्षीच्या राज्यसेवेच्या पुर्व व मुख्य परिक्षा पास करता आल्या.....थोडक्यात काय तर एक वेळ ईमानदारीने परिक्षेला पुर्ण समजुन नीट नियोजन करुन अभ्यास केला, बाकी गोष्टींपासुन दूर राहिलो, तर नक्कीच आपण ही परिक्षा आपण आपल्यापरीने पास होऊ शकतो...ते ही चांगल्या रँकने....तेंव्हा ह्यावरुन एक गोष्टतर नक्कीच मी स्वानुभवातून सांगू शकतो, ती म्हणजे तुम्ही जर अभ्यासात बरे असाल (अर्थात बरे म्हणजे एखादी गोष्ट वाचून समजुन घेता येते असे) तर निश्चितच शून्य रुपयात आपण तयारी करु शकतो....पुण्यात मी 2020 च्या मुलाखतीसाठी म्हणुन पहिल्यांदा गेलो, त्याआधी पुर्ण तयारी जळगावला रुमवरच झाली होती...त्यामुळे पुण्यात गेलेच पाहिजे का ? असा प्रश्न विचारताना पुण्यात नक्की कशाला जायचे ? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे...पुणे स्पर्धापरिक्षांची (विशेषतः एमपीएससीची) पंढरीच आहे, पण ह्या पंढरीत गेल्यावर आपल्याला खरंच पांडूरंग भेटेल का ? की फक्त मंदिराच्या कळसाचेच दर्शन होईल ह्याचा अंदाज आधीच घेतला पाहिजे...बाकी आॅनलाईन माध्यमामुळे पुणे आपल्या मोबाईलमध्ये आले आहे...तरीही फक्त वातावरण हवे, म्हणुन पुण्यात जातो म्हणणारे बरेच आहेत...तिथे नक्की कोणते वातावरण मिळते हे देव जाणे... मलाही सुरवातीला वाटायचे की पुण्याला जावे वगैरे...पण माझ्या पुण्यात तयारी करणाऱ्या मिञाने मला कायम रोखले अन् सांगितले की तुला वाटते तसे इथे फार काही दिव्यवलय नाहीये...(विरोधाभास असा होता की तो स्वतः तिथे गेला होता, पण मला रोखत होता...कदाचित मेल्यावर स्वर्ग दिसतो तसा त्याला दिसला असावा, म्हणुन तो मला आत्महत्येपासून रोखत होता...) ह्या सगळ्याचा अर्थ मुळीच असा नाहिये की पुण्यात तयारी करुच नये...ज्यांना परवडते त्यांनी अवश्य करावी...आपला एखादा २-३ मिञांचा ग्रुप असेल, आपण तिथे जाऊन क्लास वगैरे करणार असु तर पुण्यात जायला हरकत नाही...पण फक्त अभ्यास करायचा आहे, मग तिथे जातो, तिथे जाऊन रिडींग लावतो अन् सेल्फ स्टिडी करतो असं नियोजन असेल तर मग यावर पुनर्विचार करायला हवा..असो..ह्याबाबतीत विचार करुन निर्णय घेऊनच आपण सगळे अभ्यास करत आहात...किंवा करायचा ठरवत आहात..आता जो मुळ प्रश्न होता की मी सेल्फ स्टडी करुन अभ्यास केला वगैरे ठिक ..पण याचा अर्थ मी कुणाचीच मदत घेतली नाही असा नाही...माझ्या तयारी दरम्यान मी खुप वेगवेगळ्या ठिकाणाहून मदत घेतली, अर्थात हे सर्व परवडणारे होते म्हणुन...मी तयारी दरम्यान कोणती पुस्तकं वाचली याची यादी स्वतंञ बुकलिस्ट म्हणुन आधीच शेयर केलेली आहे..पुस्तकांशिवाय इतर मदत खालीलप्रमाणे मिळाली....
१) MPSC2020 Prelims Test Series - पृथ्वी अकॅडमी, डेक्कन आय ए एस (Both were online) आणि भुषण धूत अकॅडमी (दिपस्तंभ, जळगाव येथे offline)
२) MPSC2020 Mains Test Series - Deccan IAS (Online, माञ PDF डाऊनलोड करुन प्रिंट करुन वेळ लावून सोडवायचो) & Unacademy (MPSC Combat मधून Unacademy Plus Subscription फ्री मिळवले होते, त्यामुळे Unacademy च्या टेस्ट सिरीज त्यांच्या App मधुन सोडवल्या....विशेष म्हणजे डेक्कनची टेस्ट सिरीज लावण्यासाठी पैसे नव्हते, Unacademy ने Mains साठी Test series competition ठेवली होती, त्यामध्ये 3000/- Amazon voucher जिंकलो, अन् त्यातून डेक्कनची टेस्ट सिरीज लावली....Thanks to Unacademy)
3) MPSC2020 Mock Interview - (हे फ्री असतात) कोलंबे सर व मनोहर भोळे सर यांच्या कडे one to one Mock दिला, दिपस्तंभ व इतर अतिप्रसिद्ध नसलेल्या ३ ठिकाणी पॅनेलसमोर माॅक दिला)
MPSC2021 च्या पुर्व व मुख्य साठी कुठलीही Paid Test Series लावली नाही.
MPSC2021 साठी माॅक Interview - कोलंबे सर (भगिरथ अकॅडमी), संकल्प देशमुख सर (अध्ययन अकॅडमी) [दोघेही अतिशय सविस्तर आणि सखोल मुलाखत घेतात] आणि मनोहर भोळे सर (राजमुद्रा अकॅडमी)
या सगळ्यांशिवाय YouTube च्या माध्यमातुन ज्यांचा मला फायदा झाला ते :
१)Some Channels like Bhatner IAS, Genius Maths and WiFi Study (For CSAT) (सचिन ढवळे सर आणि आरगडे सर यांचे CSAT साठीचे Videos)
२) सचिन भस्के सरांचे व्हिडीओ (सामान्य विज्ञानासाठी)
३) मृणाल सर/तेच ते UPSC वाले (For Economy's Concept)
४) Study IQ & Sushil's Spotlight - (For Current affairs)
थोडक्यात मी टेस्ट सिरीज वगळता बाकी कुठलीही बॅच किंवा क्लास कोणत्याही क्लासेसचा लावलेली किंवा लावलेला नव्हता.....जे फ्री मध्ये उपलब्ध होते ते निश्चितच वापरले, पण तेही फार Selectively...
त्यामुळे माझ्या मते तरी MPSC ची तयारी कमीत कमी पैशात आणि कमीत कमी वेळेत करणे शक्य आहे, फक्त गरज आहे ती आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची ! एक ते दोन वर्षाच्या प्रामाणिक प्रयत्नांत परिक्षा पास होणे शक्य आहे...(अपवादात्मक परिस्थितीत 3-4 वर्ष लागू शकतात..किंवा जाॅब करत असु तर कदाचित अजुन जास्त) जर कुठे काही कमी जास्त वाटत असेल तर क्लासेसची मदत नक्कीच घेऊ शकता, अन्यथा साधारणपणे आपला अभ्यास व्यवस्थित असेल आणि योग्य दिशा असेल तर निश्चितच ध्येयप्राप्ती अवघड नाही...हे मान्य करायला हवे.
हे सगळे एवढे सविस्तर लिहीण्याचा उद्देश्य एवढाच की मी असे केले ... तुम्हीही कदाचित माझ्यासारख्याच परिस्थितीत असाल तर तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं यातुन मिळाली असतील...टाॅपर सगळीकडे कसे दिसतात याचे मुख्य कारण माॅक interview असते...मुख्य परिक्षेनंतर Mock interview free घेतले जातात, त्यामुळे सर्वच जण सर्वच ठिकाणी माॅक देण्याचा प्रयत्न करतात...त्यामुळे कुठल्या एखाद्या बॅनरवर टाॅपरची गर्दी दिसली म्हणजे ते सगळे त्या क्लास मध्ये शिकूनच अधिकारी झाले, असा गैरसमज मुळीच करुन घेऊ नये....आता सोशल मिडीया मुळे निवडलेल्यांशी सुद्धा सहज संपर्क होऊ शकतो ...राहिला प्रश्न क्लासचा तर मी एवढच सांगेल की क्लास लावला म्हणजे आपण पासच होऊ हा मोठा गैरसमज आहे..तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या जीवावरच पास होणार आहात...नदीत उडी मारली म्हणजे आपोआप किनारा गाठता येईल असे नाही, त्यासाठी हात पाय मारावे लागतील...तसेच इकडे क्लास लावणे म्हणजे उडी मारणे...नुसती उडी मारून भागत नाही..असो....क्लासला विरोध करणे हा माझा उद्देश्य नाहीये...ती काही जणांची गरज देखील आहे....आणि क्लास मधून परिक्षाभिमुख कंटेंट देणारे पण क्लास आहेत...फक्त गर्दीचा भाग बनुन, इतरांकडे बघून क्लास लावण्यात अर्थ नाही..नुकतेच मागच्या आठवड्यात एका आईसक्रीमचा गाडा चालवणाऱ्या काकांशी बोलणे झाले, त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी BSC 2nd year la आहे आणि तिने सहा महिन्यापुर्वी एका नामांकीत अकॅडमीचा 1 लाख 15 हजार रुपयाचा क्लास लावला आहे (पैकी 60 हजार यांनी भरलेले आहेत)...सहा महिने झाल्यावर तिला कळले की तिथे अपेक्षे प्रमाणे शिकवले जात नाही...आता तिला परत क्लास बदलायचा आहे तर कोणता क्लास लावू ? त्यांचे म्हणणे होते की मी एकवेळच जेवतो पण मला मुलीला शिकवायचेय, अधिकारी करायचेय ..हे ऐकल्यावर त्यांचे प्रश्नाचे थेट उत्तर मी देऊ शकलो नाही उलट मलाच अनेक प्रश्न पडले..एवढ्या हलाखीच्या परिस्थितीतल्या व्यक्ती जीवाचं रान करुन पैसे भरतात, मुला-मुलींना क्लासला पाठवतात..जर त्यांना तिथे हवे ते मिळत नसेल तर क्लास का लावायचा ?...यात क्लासेसचीच चुक आहे असेही मी म्हणणार नाही...आपली परिस्थिती नसेल तर एवढे महागडे क्लासेस लावण्याची खरच गरज आहे का ? आपल्याला मदत होईल असे अनेक क्वाॅलिटी कोर्सेस युट्युब वर फुकट उपलब्ध आहेत, आपल्या मदतीला शासनाच्या सारथीसारख्या संस्था आहेत...आपण त्याचा फायदा करुन घ्यायलाच हवा...हा विचार मुला-मुलींनी देखील करण्याची गरज आहे...असो. त्यादिवशी काकांशी बोलल्यापासुन मनात होते की याबाबत थोडे सविस्तर बोलावे, आपण नक्की काय केले ? कोणता क्लास लावला का ? कुणाची मदत घेतली ? हे सांगावे....कोण जाणे यातून बऱ्याच जणांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडतील....! सामान्य कुटूंबातल्या मुलांनो, अधिकारी व्हायचे स्वप्न पाहा, पण त्यासाठी लगेच पुण्याला जातो अन् क्लास लावतो असं करु नका...आधी परिक्षेला पुर्ण समजुन घ्या, अभ्यासक्रम काय आहे ? जुने पेपर बघा...काय काय वाचायचे ह्याबाबत पेपर बघुन, टाॅपरच्या मार्गदर्शनातुन अंदाज घ्या अन् अभ्यासाला लागा...आपल्या परिक्षेत न कळण्यासारखे असे फार जास्त काही नसते..वाचुन लक्षात येण्यासारखे बरेच असते...त्यामुळे वाचत रहा...मोफत उपलब्ध स्रोतातून माहिती मिळवा...फारच कठीण वाटत असेल अशा एखाद्या विषयाचा तेवढ्यापुरता क्लाॅस किंवा एखादी बॅच जाॅईन करा...पण पहिल्यांदा परिक्षा समजुन घेऊन वाचत रहा...नक्कीच शुन्य रुपयात तुम्ही ही परिक्षा पास होऊ शकता...आपली परिस्थीती बदलण्यासाठी आपल्याला ही परिक्षा नक्कीच मदत करते, पण ह्या परिक्षेत वारंवार अपयश आल्यावर स्वतःच्या क्षमतांवर विचार करा...प्रत्येक जण मोठा माणुस होऊ शकतो, पण प्रत्येक जण अधिकारी नाही होऊ शकत...त्यामुळे अधिकारी होणं म्हणजेच मोठं होणं असंही नाहीये, हेही ध्यानात ठेवा...तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा...!
#असंच_काहितरी
No comments:
Post a Comment