Saturday, August 23, 2025

प्रिय बैलोबा

 

प्रिय बैलोबा 


असं आश्चर्यचकित काय झालास ? वाघाला वाघोबा म्हटलेलं ऐकलं असेल पण तुला कधी बैलोबा कुणी म्हटलं नाही म्हणून की सतत काठीनं तुझ्याशी बोलणारी माणसं कधी प्रेमाने पत्रातून सुद्धा तुझ्याशी बोलतील असं वाटलं नव्हतं म्हणून ? अरे, जसे सारेच बैल काही मारके नसतात, तसं सारीच माणसंही.... तर ते जाऊ दे.. सर्वप्रथम तुला पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. नाही म्हणजे आजच्याच दिवस तुला पोळी मिळणार हे माहित आहे, पण किमान आजच्या दिवस तरी मिळते ना, म्हणून आनंदी हो बाबा.


तुझा माझा परिचय तसा जुनाच. अगदी लहानपणी तुला गोठ्यात पाहून दई बघ दई, असं म्हणत घरच्यांनी तुझी मला ओळख करून दिली तेंव्हापासून आपण एकमेकांना ओळखतो. त्यानंतर खेळण्यातही तू आलास... कधी लाकडी, तर कधी मातीचा....पोळा जवळ आला की कुंभार कधी बैलं आणून देतो, असं व्हायचं... एकदा ते मिळाले की बाप तुला सजवायचा, तसं मी त्या मातीच्या बैलाला.... तू असा सोबतच राहिलास... पुढे पुढे ही ओळख वाढत गेली...अन जवळीक ही. शाळेत मास्तर म्हणायचे, आपण पूर्वी माकड होतो, आपल्याला पण शेपटी होती, तेंव्हा घरी येऊन तुझ्या शेपटीला वारंवार हात लावून बघायचो. कदाचित तू ही पुढे माणूस होशील, असा मनात विचार करायचो. कधी तूझी शेपटी हाताने पिरगाळत तुला पिटाळण्याचाही प्रयत्न करून पाहिला. तुझ्या खोड्या काढतच बालपण सरलं.


वय वाढलं, शाळा सुटली, पाटी फूटली... अन बघता बघता माझ्या हाती कासरा आला... तुझी वेसण माझ्या हाती आली. तुझ्या मानेवर माझं जू अन माझ्या मानेवर घराचं...तसं आपण दोघेच खरे एकमेकांचे मित्र...दोघांनाही मुकाट्याने भार सोसावा लागतो.. तुला गाडीचा अन मला गाड्याचा... तुझ्याशिवाय बैलगाडी ठप्प अन माझ्याशिवाय घरगाडा.. तरीदेखील आपण इतरांसाठी निर्बुद्धच... आपणच खरे कृषी संस्कृतीचे शिलेदार... पण हल्ली कृषीकडे लक्ष आहेच कुणाचं...? पर्यायाने आपण दोघेही दुर्लक्षितच... मोठ मोठी यंत्र आणून शेतीतून तुला हद्दपार केलं जातंय... तसं शेतमाल परदेशातून आयात करून मलाही... दलाल स्ट्रीट वरील बैलाने उसंडी मारली की शेयर बाजार तेजीत असतो म्हणे...त्या पुतळ्याचं जेवढं कौतुक आहे, तेवढंही आपलं नाही बाबा...कित्येक बैलं इकडं वीज पडून मरतात, पुरात वाहून जातात त्याचं काय ? त्या शेतकऱ्यांचं काय ? पोटच्या लेकरावाणी तुला जपतो रे आम्ही...हा आता एक दिवस कौतुक करायचं अन दुसऱ्यादिवशी पुन्हा तेच जू, तीच गाडी, तोच खेळ. हे बी समजतंय मला... पण हे असंच चालूये, तुझा खेळ अन शेतीचा खेळ खंडोबा... त्यात मी तरी काय करणार...


तू कायम जवळचा का आहेस माहित आहे ? लहानपणी खेळण्यातला बैल, शाळेत गेल्यावर बैल हायीस का रे म्हणत एकमेकांचा उद्धार करताना परत तूच... कधी एखाद्याला निर्बुद्ध म्हणतानाही हमखास बैलबुद्धी शब्द सूचायचा...पुढं लग्न झालेल्यांबाबत बायकोचा बैल असं ऐकताना परत तूच... इतकंच कशाला, आमच्या म्हणीतून देखील तूच डोकावतोस... जसे, "अतिशहाणा त्याचा बैल रिकामा" किंवा "बैल गेला अन झोपा केला", यासारख्या ग्रामीण म्हणीतही तूच...आमच्या यत्र, तत्र, सर्वत्र तूच तू व्यापून राहिलास. ग्रामीण व कृषी संस्कृतीचे खरे वारसदार आपणच...आपला फक्त एक दिवस नसतो... आपलं महत्व इतरांना फक्त एक दिवसच समजतं, हिच आपली शोकांतिका. असो, आपणच एकमेकांना आधार दिला पाहिजे... तूच माझा खरा मित्र आहेस... तुझ्याशिवाय माझ्या शेतीचं काय खरंय ? माझं काय खरंय ? हा जगाचा पोशिंदा तुझ्याशिवाय पोशिंदा कसा होऊ शकेल... कितीही यंत्र आली तरी माझं दुःख ऐकायला सध्या तरी कारभारणी नंतर तूच एकमेव आहेस... त्यामुळे तू माझ्यासाठी फक्त बैल नाहीस... माझ्या दावणीला बांधलेला माझा सच्चा दोस्त...माझा बैलोबा आहेस... बैलोबा... लव्ह यु बैलोबा.


तुझाच आणि फक्त तुझाच,

शेतकरी

No comments: