Monday, March 16, 2026

Book Review : लेखकाची गोष्ट (विश्राम गुप्ते)


मराठी साहित्यातील नामांकित चार-दोन पुस्तकं वाचून आपण फार मोठे वाचक आहोत असं आपल्याला वाटत असतं.अस्सल वाचक इतका मर्यादित असू शकत नाही. वाचन ही लेखक होण्यासाठीची अनिवार्य पायाभरणी आहे. वाचन म्हणजे पेरणी तर लिखाण म्हणजे त्यावर आलेलं पिक. पेरणीशिवाय पिक येणं अशक्य. त्यामुळे भरभरून वाचल्यानंतरच लिहिता येतं. लेखक होणं म्हणजे काय? लेखक कसा धडपडतो? ह्या धडपडीतून कसा घडतो? ह्याचे मिश्किल आणि प्रवाही भाषेत शब्दबद्ध केलेले अनुभव म्हणजे 'लेखकाची गोष्ट' हे विश्राम गुप्ते यांचे पुस्तक. ही केवळ लेखक होण्यासाठीची मार्गदर्शन पुस्तिका नाही, तर लेखक होण्याआधी वाचक कसा घडतो आणि वाचनातून लेखक कसा घडतो याचं वास्तववादी वर्णन यात आहे. वाचकांच्या कोर्टात लेखकाने पारदर्शकपणे त्याचं आयुष्य खुलं केलं आहे. तसं पाहिलं तर हे लेखकाचं आत्मचरित्र वाटू शकतं, फक्त हे आत्मचरित्र लेखकाचा लेखक म्हणून प्रवास कसा झाला यावर भर देतं. लेखक होताना आधी वाचक म्हणून सुरु केलेला प्रवास. वाचन करताना इंग्रजी साहित्याची चव चाखून मराठी साहित्याचा आस्वाद घेताना इंग्रजी व मराठी साहित्याची होणारी तुलना असो किंवा वाचलेल्या विविध पुस्तकातील कथा सांगून त्यातून मिळालेला धडा असो. अतिशय विविधांगी असं अफलातून काहीतरी यात आहे हे पुस्तक वाचायला सुरु करताच लक्षात येतं. पुस्तक आपल्याला गुंतवून ठेवतं. लेखकाच्या वाचनाचं टप्पेनिहाय प्रवासवर्णन यात दिलेलं आहे. ते वाचून आपणही लेखकाचे सहप्रवासी होऊ लागतो. शेक्सपियर, लिओ टॉलस्टॉय, फियोदोर डोस्टोवस्की, म्युगल सर्वांटिस, अंतोन चेकॉव्ह, ही इंग्रजी लेखकं वाचल्यावर लेखक इंग्रजी व मराठी साहित्याची तुलना करतो व आपले काही निष्कर्ष नोंदवतो. इंग्रजी किंवा पाश्चात्य साहित्यव्यवहार वैश्विक आहे तर मराठी साहित्यव्यवहार कौटुंबिक आहे, हा महत्त्वाचा निष्कर्ष यात अधोरेखित करण्यासारखा आहे. वाचक म्हणून वाचलेल्या महत्वाच्या लेखकांच्या कलाकृतींबद्दल प्रसंगानुरूप सविस्तर लिहिलं आहे. मधल्या टप्प्यावर बाबा आमटे यांच्या संपर्कात येऊन समाजसेवेचे प्रयोग करण्याचे प्रयत्न, तसेच त्यानंतर कामगारांचा वकील म्हणून आलेले अनुभव देखील मांडले आहेत. त्यानंतर लेखक वाचकाकडून लेखकाकडचा प्रवास करु लागतो. लेखकाच्या प्रवासातील टप्पे, लेखक म्हणून तयार होताना वाट्याला येणारे सांगता ही येत नाही अन सहन ही होत नाही असे प्रसंग, लिखाण करताना करावी लागणारी कसरत, एखादं लिखाण केल्यावर त्याला दाद मिळण्याची अपेक्षा असताना मिळणारी उपेक्षा, हे सारं अतिशय बारकाईने अन ओघवत्या भाषेत मांडलेलं आहे. पुस्तक मराठी लेखकांसाठी जगण्याची मार्गदर्शक पुस्तिकाच आहे. लेखकाच्या भाषेत सांगायचं तर, लेखक होणं म्हणजे भानात येणं. लेखक होणं म्हणजे केवळ भाषा कमावणं नाही. लेखक होणं म्हणजे पर्सनल ओळखीपाळखी वाढवणं नाही. लेखक होणं म्हणजे सुहास्य वदनाने साहित्य क्षेत्रातल्या ज्येष्ठांना वंदन करणं नाही. लेखक होणं म्हणजे भोळ्याभाबड्या वाचकांमध्ये मिरवणं तर अजिबातच नाही. लेखक होणं म्हणजे स्वतःची जगण्याची व्हिजन शोधणं. स्वतःची दुर्बीण किंवा टेलिस्कोप तयार करणं. अनुभवांचं निरीक्षण करण्यासाठी स्वतःचं एक सूक्ष्मदर्शक यंत्र, म्हणजेच मायक्रोस्कोप शोधून काढणं. लेखक होणं म्हणजे सतत अस्वस्थ राहणं. लेखक होणं म्हणजे कुठेही, कधीच सुखी न वाटणं. एकंदरीत फक्त लेखक होण्यासाठीच नव्हे तर भानात येण्यासाठी आपल्यातल्या वाचकाला समृद्ध करण्यासाठी आवर्जून वाचावं असं पुस्तक. नक्की वाचा.

#असंच_काहीतरी 
#Book_Review 

Sunday, March 15, 2026

Book Review : सगळं उलथवून टाकलं पाहिजे (देवा झिंजाड)


जागतिकीकरणात माणसाच्या झालेल्या अगतिकीकरणाची गाथा, भाकरीलाच राम मानणाऱ्यांची व्यथा आणि हरवलेल्या हिरव्या बांगड्यांची कथा सांगणारे पुस्तक म्हणजे 'सगळं उलथवून टाकलं पाहिजे' हा देवा झिंझाड यांचा कवितासंग्रह. ह्या कविता संग्रहातील कविता तीन भागात विभागलेल्या आहेत. अगतिकिकरण, भाकरायण आणि हरवलेल्या हिरव्या बांगड्या. संग्रहातील पहिल्याच कवितेचं नाव फार रंजक आहे - टायघाल्या. हे वाचून गावाकडे सहज ओठांवर येणारी शिवी आठवते. 

अगतिक बळीराजाची तडफड कधीच कळत नाही, 

टायघाल्या लोकांना एसीत बसल्यावर, 

असं म्हणत कवि इथल्या व्यवस्थेला सणसणीत चपराक मारतो तेंव्हा 'टायघाल्या' ही फाटक्या कपड्यातल्या गावाने चकाकणाऱ्या शहराला घासाडलेली शिवीच वाटते आपल्याला.


सगळं उलथून टाकलं पाहिजे या कवितेत कवी, 

मध्यमवर्गीयांना वेळ नाही 

श्रीमंतांना गरज नाही 

गरिबाला भीती वाटते 

ज्याच्याकडे सगळं आहे त्याला लाज वाटते

कशी करणार आहे क्रांती 

अशा मन:स्थितीतला समाज?

असा प्रश्नही विचारतो अन स्वतः पासूनच आधी क्रांती झाली पाहिजे असं उत्तरही देतो. फक्त वेदनेचा बाजार नव्हे तर बाजाराची वेदना मांडण्याचे काम या संग्रहातील कवितेतून केलं गेलंय. 


गड्या आपला गाव बरा असं कितीही म्हटलं तरी गावात सगळं चांगलंच असतं असंही नाही. भावाभावाच्या वाटण्याचे वास्तव आपल्या 'वाटण्या' कवितेत मांडताना कवी म्हणतो, 

एक आईवर गेला एक बापावर गेला 

वाटणीच्या टायमाला लेक बायकोवर गेला


अशा वाटण्या वाटण्या होत आल्यात केवढ्या 

काही दिसांनी जमिनी होतील वाटाण्याएवढ्या 


कवीची नजर वास्तवावर आहे. म्हणूनच कवी फक्त शब्दाचे बुडबुडे न दाखवता सांगतो, 


कवितेत असून चालत नाही 

लेखात असून भागत नाही 

पाऊस नुसता मनात बरसून चालत नाही 

तो रानात पड़ावा लागतो


ऋतुंनी नुसतंच कवितेत

पानोपानी डोकावलं म्हणजे 

होत नसतात पिकं हिरवी


असा हा कवी या आधी कधी वाचला नाही. फेसबुकवरती बऱ्याच दिवसापासून ह्या संग्रहाबद्दल वाचत होतो. मात्र थेट संग्रह विकत घेऊन वाचला तेंव्हा पहिल्याच वाचनात हा माणूस आपला वाटला. बारीकसारीक गोष्टीचे सूक्ष्म निरीक्षण, अनुभवाचे बोल अन शब्दांना अंतरीची ओल याचा प्रत्यय देणारा असा हा कवितासंग्रह सर्वांनी आवर्जून वाचावा.

#असंच_काहीतरी 
#BookReview
 

Monday, January 19, 2026

प्रिय मास्तर


 प्रिय मास्तर,


बोबडं बोलत तो शाळेत आलाय. काही दिवसांनी तो स्पष्ट सुध्दा बोलु लागेलच. त्याला बोलणं आपोआप येईल तसं काय, कधी आणि कसं बोलावं हे आपोआप समजणार नाही. ते मात्र तुम्हालाच शिकवावं लागेल.

आज तो पहिल्यांदा शाळेत आलाय. त्याला शाळा म्हणजे काय हे सुद्धा नीट माहित नाही. तुम्ही 'तिला' शाळा म्हणालात म्हणून तो 'तिला' शाळा म्हणेल. आजपासून तुम्ही जे जे शिकवाल ते ते तो शिकेल. त्यामुळं आता खरी शाळा तुमची सुरु झालीये, असं म्हणायला हरकत नाही. मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही त्याला योग्य तेच शिकवाल. फक्त बाप म्हणून काही गोष्टी तुम्ही त्याला नक्की शिकवाव्यात असं वाटतं.


मास्तर,

त्याला शिकवा की माणूस बोलायला शिकला म्हणजे तो ओव्या ही शिकतो अन शिव्या ही, मात्र कधी काय बोलावं याचं ज्ञान आणि भान दोन्ही असावं माणसाकडे. जगातल्या मोठमोठ्या युद्धातल्या शस्त्रापेक्षाही शब्दाची धार जास्त असते त्यामुळे जमेल तेवढे जपवूनच वापरावेत शब्द.


त्याला सांगा, वायफळ बडबडीपेक्षा निश्चितच श्रेष्ठ असते मौन, पण म्हणून सदासर्वकाळ मौनच पाळावं, असंही नाही. कारण, विद्यावंतांचे मौन ही मुर्खांना मुकसंमती ठरते. तेंव्हा मौनाचे धडे देताना, एवढं ध्यानात नक्की असु द्या. 


त्याला हे समजवा की, काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा असला तरी भावनांचं कोडं उलगडत नाही कॉम्प्युटरच्या कुठल्याच कोडला. त्यासाठी त्यानं नैसर्गिक भावनिकता जपावी अन दुसऱ्याची व्यथा ही त्याला आपली वाटावी.


बाहेरच्या झगमगाटात एवढं लक्षात ठेव म्हणावं की, नेटवर्किंगच्या जमान्यात फेक सुद्धा असतं डीप, केवळ आपल्या आतला दिवाच असतो अस्सल दीप. बाहेर दिवे लावताना आतला दिवा तेवत ठेवण्याचं कसब त्याच्या अंगी नक्की रुजवा.


त्याला गणितातला काटकोन, लघुकोन, विशालकोन समजेलच हळू हळू. मात्र जगण्याचा दृष्टिकोन देखील त्याला समजला पाहीजे वाढत्या वयातच. तो नक्की समजून सांगा.


त्याला यश साजरं करायला शिकवा तसं शिकवा अपयश पचवायलाही, कारण यश-अपयश हे असतं भरती-ओहटी सारखं. आपण मात्र रहावं किनाऱ्यासारखं.


त्याला आवर्जून सांगा, रस्ते वेडेवाकडे असले तरी चालणं मात्र सरळमार्गीच असावं. त्यासाठी त्याला यशस्वीतांच्या सोबतच ऐकवा अपयशी माणसांच्या सुद्धा कथा.


मास्तर, 

नावावरून जात अन पोशाखावरून धर्म ओळखणं सोपं असतं. त्याला तुम्ही आतला माणूस ओळखायला शिकवा.


हे सगळं शिकताना, तो बरेच प्रश्न विचारेल तुम्हाला अन हैराण करेल, तेंव्हा तुम्हाला तो येडपटही वाटेल, मात्र वेड्यासारखे प्रश्न पडल्याशिवाय माणूस शहाणाही होत नाही. म्हणून, त्याला प्रश्न विचारायला ही शिकवा अन उत्तर शोधायला ही.


मास्तर,

मला विश्वास आहे, तुम्ही त्याला नक्की शहाणा कराल. तोही तसा हुशार आहेच. शिकेल सगळंच हळू हळू.


तुमचाच,

एक बाप

Saturday, January 17, 2026

मारेगाव (22/8/2024 ते 24/12/2025)


21 ऑगस्ट 2024 रोजी ऑन फिल्ड ट्रेनिंग स्वरूपात नियुक्तीचा आदेश आला अन मारेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार सांभाळण्यास कळवण्यात आले. हा आदेश आल्यावर सर्वप्रथम मारेगाव आहे कुठे? हाच प्रश्न पडला. नंतर माहिती घेतल्यावर लक्षात आलं की नगरपंचायत असली तरी प्रशासकीय इमारत चांगली आहे, अन थोडं हायसं वाटलं. 22 तारखेला तिथे रुजू झालो. स्वतंत्र कार्यभार सांभाळण्याची ही सुरवात असल्याने प्रत्येक गोष्ट नीट पाहून, तपासूनच करावी लागणार होती हे निश्चित. पहिल्याची दिवशी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन चालू कामांचा आढावा घेतला. त्यादिवशी समजलं की बऱ्याच वर्षानंतर येथे पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाला आहे. त्यामुळे साहजिकच कर्मचाऱ्यांसह नागरिक व लोकप्रतिनिधी सर्वांच्याच आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. ह्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सर्व यंत्रणा नीट समजून घेणे, अभ्यास करून प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करणे गरजेचे होते, मात्र हे सगळं करण्यासाठी हाताशी कर्मचारी मोजकेच. अशा सगळ्या परिस्थितीत कार्य करणे तितके सोपे नव्हतेच. नावाला नगरपंचायत असली तरी जन मानसिकता मात्र ग्रामपंचायतीचीच आहे, हे लक्षात आले. अधिकारी होण्याआधी आपल्याला अधिकाऱ्यांकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या अधिकारी झाल्यावर आपण लोकांच्या पूर्ण करायच्या हे ध्यानात ठेवूनच कामाला सुरवात केली. जॉईन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच शहरातून फेरफटका मारला अन कचरा संकलन व वाहतूक, तसेच इतर साफसफाई कशी चालते ते बघितले. साफसफाई योग्य पद्धतीने व ठरलेल्या वेळेत व्हावी यासाठी आवश्यक सूचना देखील दिल्या.


कार्यभार घेतल्यानंतर सर्वप्रथम कार्यालयीन शिस्त लावणे आणि उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळ पाळण्यासाठी तयार करणे, हे खरे पहिले काम होते. कर्मचारी मोजके आणि त्यातही मुख्यालयी थांबणारे अगदीच कमी. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्यासाठी कधी प्रेमाने सांगून तर कधी वेळप्रसंगी कारवाई करून तयार केले. बऱ्याचदा नियमापेक्षा सवयी आणि परंपरा या फार जवळच्या असतात. नियम मोडण्यापेक्षा परंपरा मोडणे तसं कठीण काम परंतु प्रशासकीय शिस्त लागण्यासाठी, योग्य परंपरा निर्माण करण्यासाठी, वाईट पद्धती, परंपरा आणि सवयींना मोडणे आवश्यक होते. हे करताना कुठेही कर्मचाऱ्यांमध्ये द्वेष किंवा राग उत्पन्न होणार नाही याची देखील पुरेशी काळजी घेतली. कार्यालयीन शिस्त जेवढी महत्त्वाची तेवढेच कार्यालयातील वातावरण सौहार्द पूर्ण राहील याकडेही जातीने लक्ष दिले. कर्मचाऱ्यांचा मित्र मित्र बनून सर्वांच्या साथीने काम सुरू केले. नेमकं जॉईन केल्यानंतर एका महिन्यातच पीआयएल (PIL) 155 नावाचं वादळ सगळ्याच नगरपालिकांमध्ये घोंगावत होतं. पीआयएल (PIL) 155 म्हणजे अनधिकृत बॅनर, होर्डिंग यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांनी कार्यवाही करावी, यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेली जनहित याचिका. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे सर्व यंत्रणा अतिशय दक्ष आहे. त्यातच नगरपरिषद संचालनालयाकडून याविषयी वारंवार आढावा घेतला जाणे, कारवाईसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देणे चालू होते. खरंतर अनधिकृत बॅनर, होर्डिंग हे शहराचे विद्रूपीकरण करतातच त्यासोबतच यातून अप्रिय घटना/अपघात घडण्याच्या शक्यता पण वाढीस लागतात. हे सर्व लक्षात घेता शहरात अनधिकृत बॅनर, होर्डिंग लागू नये, याकडे विशेष लक्ष दिले. आरोग्य निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून अनधिकृत बॅनर, होर्डिंग वरती कारवाई केली. हे करताना सर्वप्रथम विश्वासात घेतले ते सर्व लोकप्रतिनिधींना. बॅनर, होर्डिंग लावण्यासाठी नगरपालिकेच्या विहित केलेल्या शुल्काचा भरणा करून विहित केलेल्या जागीच बॅनर, होर्डिंग लागले पाहिजेत याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांना समजावून सांगितले. याआधी अतिशय किरकोळ रक्कम भरून बॅनर लावण्याची परवानगी दिली जात होती. त्यात वाढ करण्यात आली . विनापरवानगी बॅनर लावल्यास ते बॅनर दुसऱ्या दिवशी काढले जाते, ही भीती निर्माण झाल्याने अनधिकृत बॅनर लागणे कमी झाले. लोक परवानगी घ्यायला तयार झाले. हे करताना काही लोकांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागेल. परंतु प्रशासनात आपण सर्वकाळ सर्वांना समाधानी करू शकत नाही. योग्य गोष्ट केल्यानंतर सुद्धा सर्वांचे समाधान होते असं नाही त्यामुळे केवळ लोक समाधान हाच उद्देश न ठेवता योग्य व समाधानकारक असा मध्यम मार्ग प्रशासकांना निवडावा लागतो. 



स्वच्छता ही शहराची मूलभूत गरज असते. त्यासाठी शहराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित केले. केवळ सांगून करून घेणे नाही तर स्वतः करून दाखवणे या मार्गाचा अवलंब करत शहर स्वच्छतेसाठी स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी स्वतः सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबवली.

स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत सायकल रॅली, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मॅरेथॉन अशा विविध स्पर्धांचे स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले. ह्या विविध उपक्रमात नागरिकांचा अपेक्षित सहभाग लाभला नाही परंतु अपेक्षा ठेवणं थांबणार नव्हतं आणि काम करणंही. माझी वसुंधरा 4.0 अभियानात नगरपंचायतीस विभाग स्तरावरील द्वितीय पारितोषिक मिळाले. या बक्षीस रकमेचा विनियोग करून शहर अधिक स्वच्छ सुंदर आणि समृद्ध करण्याचा निर्धार करण्यात आला. 


मधल्या काळात विधानसभा निवडणूक 2024 मध्ये वणी मतदारसंघासाठी निवडणूक कार्यात सहभाग घेण्याचा व काम करण्याचा अनुभव मिळाला. नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी विविधांगी व नावीन्यपूर्ण काम करण्याची इच्छा मनात होतीच. त्यातच राज्य शासनाचा शंभर दिवसाचा अजेंडा घोषित झाला आणि त्या अंतर्गत विविध पैलुंवरती काम करण्याचे शासनाने निर्देशित केले. शासनाच्या निर्देशाला आपल्या कल्पकतेची जोड देत विविध अभिनव उपक्रम यशस्वीरित्या राबवले. 

परिविक्षाधीन कालावधी असल्याने येथे कमी कालावधी मिळणार हे निश्चित होते, तरीदेखील आपल्या अल्प कालावधीत अनेक महत्वाची कामे पार पडल्याचे समाधान निश्चित आहे. काही कामांचा उल्लेख करण्याचे टाळता येत नाहीये;
1) प्रभाग क्रमांक 17 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर उद्यान व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वाचनालयाचे रखडलेले काम पूर्ण झाले. अभ्यासिकेसाठी स्वसंकल्पनेतून प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला.
2) स्ट्रीट लाईट पोल बसवण्याचे तब्बल पाच कोटी रुपयांचे दोन वर्षांपासून रखडलेले काम सुरू करून अंतिम टप्प्यात आणले.
3) माझी वसुंधरा अभियानात नगरपंचायतीस विभाग स्तरावरील 50 लक्ष रुपयाचे द्वितीय बक्षीस प्राप्त झाले.
4) नगरपंचायतकालीन प्रथम कर आकारणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली, ज्यामुळे नगरपंचायतीच्या कर मागणीत दुप्पटीची वाढ झाली.
5) खापरी येथे घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी ओल्या कचऱ्याच्या प्रक्रियेकरिता बावीस लाख रुपयाचे काम चालू आहे.
6) खापरी येथील घनकचरा व्यवस्थापनाच्या जागेला सुरक्षारक्षक भिंत बांधण्यासाठी 75 लाख रुपयेचे काम चालू आहे.
7) शहरातील मोकाट जनावरांचा त्रास कमी करण्यासाठी कोंडवाडा सुरू करून जनावरांना कोंडवाड्यात टाकण्यात आले.
8) मोकाट कुत्र्यांचा त्रास कमी करण्यासाठी कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले.
9) महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
10) हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या श्रीनगर येथील सैनिकांना पाठवल्या.

राबवलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम :
1) मुख्याधिकारी आपल्या दारी : नागरिकांशी थेट संवाद व त्यांच्या समस्याचे तातडीने समाधान शोधण्याचा प्रयत्न,
2) मुख्याधिकारी यांचा वर्ग : शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच शालेय प्रशासनाच्या अडचणी समजून घेतल्या,
3) "कर भरणा करा व ध्वजारोहणाचे मानकरी व्हा" उपक्रम : कर वसुलीत वाढ झाली तसेच सामान्य नागरिकास ध्वजारोहणाचा मान मिळाला,
4) मासिक उत्कृष्ट कर्मचारी : कार्यालयीन कामात गतिमानता आली तसेच कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले व 
5) एक दिवसीय मुख्याधिकारी : महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यास मुख्याधिकारी पदी विराजमान केले.
  
हे सर्व करताना आवर्जून उल्लेख करायला हवा तो म्हणजे माझे सर्व सहकारी कर्मचारी यांचा. त्या सर्वांनी माझ्या प्रत्येक संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी अत्यंत मेहनत घेतली. एक वर्षापूर्वीची मारेगाव नगरपंचायत आणि आजची नगरपंचायत, यात जो काही बदल दिसतोय, तो केवळ सर्वांच्या संघभावनेने काम करण्यामुळेच. यासोबतच लोकप्रतिनिधींची साथ देखील अतिशय महत्वाची होती. चांगल्या सवयीची बीजं पेरून ती अंकुरली तितक्यात निघालोय, मात्र अपेक्षा आहे, ही रोपे जोपासली जातील आणि यांचा लवकरच वटवृक्ष होईल. त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 


बा. भ. बोरकरांच्या शब्दात शेवटी एवढेच,
हलके काढून कंटक पायींचे
स्वरांत विणिले सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.

होय, मी आनंदयात्री! हा प्रवास असाच चालू राहील. ह्या घरातून त्या घराकडे. मात्र, जिथे राहू तिथे उजेड देऊ. एक शायर म्हणतोच ना,
जहां रहेगा वहीं रोशनी लुटाएगा 
चिराग का अपना मका नहीं होता !!

पुढील स्टेशन - अकोट 

#असंच_काहीतरी 
#मारेगाव

नाव


 

माणुस बरा की किडा ?


 

आणीबाणी