विदर्भाची लेक , मराठवाड्याची सुन अन् पश्चिम महाराष्ट्राची रणरागिणी
आदर्श मातृत्व , कर्तृत्व , नेतृत्व
एक नव्हे तर दोन नव्हे तर तीन तीन छाञपती घडवणार्या
अशा या राष्ट्रमाता , राजमाता ,
माँसाहेब जिजाऊंच्या चरणी विनम्र अभिवादन...
माँ साहेब
राजे पुन्हा येतील की नाही सांगता येणार नाही पण एकदा तुम्ही परत याच. नवा शिवाजी घडवण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच आहे , नाहीतर इथे कित्येक राडा करणारी , धुरळा करणारी, मिञांची लाडकी, रोज रस्तोरस्ती घडतायत , फक्त उणीव आहे ती या मातीवर नाही तर यवनांच्या छातीवर नाच करत रयतेच्या मनावर राज्य करणार्या शिवरायांची ..... आणि ते आपल्याशिवाय शक्य होईल असं वाटत नाही . तुम्ही दांडपट्टा , तलवार बाजी , घोडेस्वारी , सारंच शिकुन घेतलं होतं , तेंव्हा तु मुलगी आहेस जिजे तु हे शिकुन काय करणार ? असा प्रश्न नाही उभा केला आपल्या पिताजींनी . इथे सारं उलटं होतंय आता. मुलींना सातच्या आत घरात, अन् इथे नावासमोर राजे लावुन फिरणारे करतायत राडा अगदी मध्यराञीही.
माँसाहेब, आपण महाराष्ट्राच्या छाताडातली अंधश्रद्धेची पहार उखडुन फेकली होतीत, पण अंधश्रद्धा अजुनही डोक्यातुन जात नाहीय आमच्या. " शिवबा , जर तुम्हाला काही झालंच तर ही जिजाऊ समजेल की आपण निपुञिक होतो म्हणुन " , असं म्हणत शञुशी दोन हात करायला पाठवण्याचं सामर्थ्य म्हणजे धैर्याचा सर्वोच्च कळसच की. आता आता काल परवा दंगल झाली , यांनी त्यांना मारले म्हणे, पण दोनशे वर्षानंतरही आपण त्याच गोष्टींसाठी आपापसात लढलो यापेक्षा वेगळं काही घडलं नाही. तेंव्हा वाटलं महाराष्ट्र तुमचे संस्कार विसरालय बहुतेक. " मरानांती वैरानी " म्हणत अफजलखानाची कबर बांधायला लावली होती तुम्ही हे इथल्या आताच्या मावळ्यांना केंव्हा कळणार कुणास ठाऊक ? तुम्ही मावळ्यांना जातीसाठी नाहीतर मातीसाठी लढायला लावलंत पण इथे आम्ही बर्याचदा जातीसाठी माती खात असतो हल्ली. मागच्या चारशे वर्षात बरंच काही बदललय आता, आधी लग्न कोंढाण्याचं , म्हणणारा तानाजी आता दिसत नाही , घोडखिंडीत शञुला अडवुन , " राजे , तुम्ही जा . लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ", म्हणत आपल्या रक्ताने खिंड पावन करणारा बाजी आता भेटत नाही. "माझ्या शिवबाचं स्वराज्य म्हणजे इथल्या रयतेचं स्वराज्य ", असं म्हणायचात तुम्ही पण आता तीच रयत लोकशाहीच्या मंदिरासमोर लटकुन संपवतेय स्वतःला , तेंव्हा स्वराज्य मिळालं होतं हे खरं पण ते कुठपर्यंत राहिल याची शाश्वती देता येणार नाही. काय तर म्हणे आम्ही लोकशाही स्विकारलीय पण लोकशाहीचा नेमका अर्थ तरी काय ? हा प्रश्न अर्ध्याअधिक भारताला अजुन उमजलाच नाही, असो. आणि हो तसा विकासही झालाय ( वेडा ? ) बराच. मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला होता , आता तर अगदी चंद्रावर , मंगळावरही तिरंगा रोवलाय आम्ही, अजुनही आमच्या नशिबी चांदणं आलंच नाही अन् आपच्या राशीतला मंगळ अजुनही टंगळमंगळ करत का होईना आडवा येतोच आम्हाला..असो. बर्याच गोष्टी आहेत. सारं काही मीच सांगणं बरं वाटणार नाही , ( नाहीतर काही तरी सस्पेंस हवा की नाही ? ) तुम्ही आल्यावर बघालंच की. तेंव्हा इथल्या भरकटलेल्या मावळ्यांना पुन्हा एकदा सह्याद्रीचा वारसा सांगण्यासाठी, अन् इथे नवा शिवबा घडवण्यासाठी याच ..... आम्ही आपली वाट बघतोय....
......... आपलेच वारसदार.......
www.shashichyamanatale.blogspot.com
No comments:
Post a Comment