Sunday, November 27, 2022

आतले‌ - बाहेरचे.....

प्रशिक्षणाच्या सुरवातीच्या दिवसातच एक छान गोष्ट ऐकण्यात आली होती...गोष्टीचे नाव होते 'आतले-बाहेरचे'....तर गोष्ट अशी होती की समजा एखादी आगगाडी धावतेय...तर त्यातले सगळे प्रवासी म्हणजे आतले...गाडी फलाटावर येते तेंव्हा चढण्या उतरण्याची लगबग सुरु होते..तेंव्हा फलाटावर उभे राहुन गाडीची वाट पाहणारे असतात बाहेरचे...गाडी आली की हे बाहेरचे अगदी ताकदीने आत शिरण्यासाठी धडपडतात...शिरताना ते बाहेरचे असतात, आत आले की हेच बाहेरचे बाहेरच्यांना आत येऊ देत नाहीत, कारण आता हे आतले झालेले असतात... काहीच क्षणाचा अवधी अन् माणसं अशी बदलतात...थोडक्यात हेच प्रशासनातही दिसते...आतले बाहेरचे हे दृश्य इथंही पाहायला मिळतं, बाहेरचे आत आले की आतले होतात अन् बाहेरच्यांना परके होतात....सांगायचा मुद्दा असा की ही कथा जितकी नैसर्गिक आहे, तितकीच आपली व्यथा ही ..बाहेरचे आतले झाल्यावर त्यांची बाहेरच्यांबद्दलची सहानुभूति संपता कामा नये... आपण बाहेरच्यांचा मार्ग अडवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आत आलोत, ह्याचा विसर पडु नये कधीच...हा मोलाचा उपदेश प्रशिक्षणात मिळाला खरा...पण तो अंगिकृत करणं सर्वस्वी आमच्याच हाती आहे...आतले अन् बाहेरचे सारेच आपले, हा एकच मंञ लक्षात ठेवला तर जगण्याचं तंञही सापडेल अन् प्रशासनाचं यंञही कधीच बिघडणार नाही हेही तितकंच खरं....बाहेरच्यांची व्यथा आतल्यांना कळली पाहिजे, हेच ही कथा आपल्याला सांगते... !

आज हे आठवण्याचं कारण म्हणजे ही कथा डोळ्यासमोर घडताना पाहिली...बस मध्ये एका सीटवर मी आणि एक काका दोघे बसलो होतो...एक आजीबाई बसु द्या म्हटल्यानं आम्ही त्यांना जागा करुन दिली...काही अंतरावर काका उतरले मग सीटवर मी अन् आजीबाई दोघेच...थोड्यावेळात एक दुसर्या ताई बसु द्या म्हणुन जागा मागत होत्या, तर ह्या आजीबाई सांगताय, "पोरी जागाच कुठंय इथं..हेव पोर्या अन् मी दोघंच बसलोय..दोघांचीच जागा आहे ना इथे"....अन् अशा तर्हेने आजीबाईने त्या बाईला शिताफीने नकार दिला... तेंव्हा आतले बाहेरच्यांची कथा न कळत आठवली...!! असो. हे सारे अनुभव आपल्याला बरंच काही सांगत असतात, शिकवत असतात...आपण फक्त उघड्या डोळ्यांनी बघितले पाहिजे...अन् ऐकले पाहिजे....प्रशिक्षण काय फक्त संस्थेतच होत असतं का...?

"बिन भितींची उघडी शाळा, 

  लाखो इथले गुरु "

असं निसर्गाचं वर्णन गदिमा करतात ते किती सार्थ आहे याची प्रचिती येत जाते...!! आपल्या आजुबाजुला हे असं घडत असताना आपलं प्रशिक्षणच चालु असतं...फक्त आपण ठरवायचं असतं...घडणार्या प्रसंगातुन काय शिकायचं...जागा द्यायला की कारणं द्यायला...देता दोन्ही ही येतं...फक्त कारणं देणारा लिहीणार्याच्या पानात शिरतो, तर जागा देणारा वाचणार्याच्या मनात ...एवढंच ...!!




#असंच काहितरी...



No comments: