(RFO दर्शना पवारची तिचा मिञ राहुल कडुन हत्या.....ह्या दुर्दैवी घटनेनंतर मनातले 👇)
(अ)प्रिय राहुल.....
प्रेम प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं पाडगावकर म्हणतात....पण राहुल आमचं प्रेम तुझ्यासारखं नाही..असुच शकत नाही...प्रेम मी ही केलं होतं...पण कधी तिला बांधुन ठेवलं नाही रे...प्रेम म्हणजे मुक्त करणं...प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला तिचं आकाश देणं, कुठल्याही बरसातीची अपेक्षा न ठेवता....मला मान्य आहे, तुझा राग...तुझा मनस्ताप...मान्य तिच्या एका नकारात आयुष्य उद्ध्वस्त करणारा सुरुंग होता, पण आता तुझ्या नशिबीही तुरूंग आहे...ह्याची जराशी जाणिव तुला आधी कशी झाली नाही ?..आई सोडुन गेलेल्या लेकराला जगताय पाहिलय आपण...गाय निर्वतलेल्या वासराला हंबरुन हंबरुन का होईना गोठ्यात मोठं होताना पाहिलंय आपण...थोडक्यात आई जाण्याचं दुःखही आपण पचवु शकतो...सोपं नसतंच ना रे ते ही...पण जमतंच ना...जमवावंच लागतं....जशी आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती एका वेळेवर येते, तशी एका वेळेवर ती निघुनही जाणारच असते.... आई जाण्याच्या दुःखापेक्षाही हा बाई सोडुन जाण्याचा ञास इतका असहनीय व्हावा अन् त्यातुन तुझ्या हातुन एवढा मोठा घात व्हावा हे अनाकलनीय आहे...मी काही बाबा तुला उपदेश द्यायला पञ लिहीलं नाही...माझ्या मनाची घालमेल कागदावर उतरवणं हेच खरे पञास कारण. नाहीतर तु आधीच एवढा रागात त्यात हे पञ हाती पडल्यावर तिथं जवळपास असणाऱ्याचाच जीव घ्यायचा तु....फक्त एक लक्षात ठेव मिञा, तुझ्या एका कृतीनं आकाशात भरारी मारु पाहणाऱ्या कित्येक चिमण्यांची पंखच छाटली जातील आता....त्याचं काय ? पोरींना पाखरु म्हणतो आपण....पण ह्या पाखरांची शिकार जर आपणच गेली तर आकाशात पाखरांचे थवे दिसतील कसे...जर आकाशात हवे असतील थवे, तर पाखराला कशाला पिंजऱ्यात न्यावे ? आणि तु तर पिंजऱ्यात नाहीतर पाखराला मातीत घातलेस रे.... लाज वाटतेय तुझी...मनात नुसती विचारांची उलथापालथ होतेय..डोकं सुन्न झालय...कालपर्यंत मला वाटायचं की कुठल्या तरी जंगली प्राण्यानं हल्ला केला असावा, पण तुच एवढा जंगली झाला असशील असं वाटलं नव्हतं रे.... परिक्षा पास होऊन अधिकारी होऊन तु ही इंतकाम घेऊ शकला असतास ना...पण तु स्विकारलेला पर्याय काही योग्य नाही.... तो कधीच कुणाला योग्य वाटणारही नाही...होकार आणि नकार याचा तितक्याच शांतपणे स्विकार करतं ते खरं प्रेम... पण आता सगळ्याच चर्चा वायफळ...चर्चांची गुऱ्हाळं सुरु झालीत जागोजागी...पण त्यातुन हाती काय येईल ? फक्त चोथा..... चार दिवस गप्पा रंगतील...लोकं हळहळ करतील....परत जैसे थे ..... तसेही आम्हीही काय करु शकतो म्हणा...फार फार तर चार अश्रु ढाळु...मेणबत्त्या जाळु...परत आपापल्या कामाकडे वळु....मग कोण दर्शना कोण राहुल सारेच विसरुन जाऊ हळू हळू.... पण मिञा, तु एकट्या दर्शनाची हत्या नाही केलीस....तु मुलांवर विश्वास ठेवुन त्याच्याशी जवळीक करणाऱ्या मुलींच्या मुलांवरच्या विश्वासाची हत्या केलीस...आपली मुलगी दुर शहरात एकटी देखील सुरक्षित आहे, असा विश्वास असणाऱ्या पालकांच्या विश्वासाची हत्या केलीस...प्रेम म्हणजे लफडं नाही, असा प्रेमावर विश्वास असणाऱ्यांच्या विश्वासाचीही तु हत्या केलीस..... तुला सजा काय व्हायची ती होईल, पण ती फक्त दर्शनाच्या हत्येसाठी असेल... बाकी गुन्ह्यांची सजा कोण अन् कशी देणार ? आता कदाचित उद्या तुला पश्चाताप होईलही तुझ्या एका क्षणात घेतलेल्या टोकाच्या निर्णयाचा.... तेंव्हा फक्त एक कर, उद्या दुसरा राहुल तयार होऊ नये म्हणुन तुझ्या मनातले नक्कीच ओरडुन जगाला सांग...सांग त्यांना की नकार पचवणं कठीण असतं, पण अशक्य नसतं....तो एक क्षण सावरला तर उभं आयुष्य सावरता येतं....बघ तुला जमतय का ? तुझ्यातल्या टनभर दुर्गुणांची चर्चा होताना, तुझ्यातल्या कणभर चांगुलपणावर मला विश्वास वाटतो म्हणुन तुला पश्चाताप होईल, अशी आशा बाळगतो...
[दुसरा राहुल आपल्या आसपास घडु न देणे, हिच तुला आमची खरी श्रद्धांजली असेल दर्शना...तोपर्यंत आमच्या ह्या शाब्दिक श्रद्धांजलीचाच स्विकार कर..]
#असंच_काहितरी
No comments:
Post a Comment