परिक्षा हे प्रशासनात येण्याचं फार मोठं द्वार जरी असलं तरी शितावरुन भाताची परिक्षा किंवा घराची कळा अंगण सांगते अशा म्हणीनुसार परिक्षेवरुन प्रशासनाची परिक्षा होत नाही किंवा परिक्षा प्रशासनाची कळाही सांगत नाही...खरंतर प्रशासनात कळा आहेत आणि ह्या कळांना जो कलेने हाताळतो तो खरा प्रशासक...निकाल लागला, कागदाच्या तुकड्याने आपल्या नावाच्या मागे एखादे पदनाम चिटकवले की आपण अधिकारी होऊ, मग सगळे प्रश्न मिटतील, अगदी फुलांच्या पायघड्याच पायवाटेवर अंथरल्या जातील अशा काहीशा कविकल्पना आपल्या डोक्यात तयारीच्या दरम्यान होऊही शकतात, पण ह्या कल्पनाच आहेत हे माञ तंतोतंत सत्य आहे. याचा अर्थ प्रशासन म्हणजे अगदीच ञासदायक आहे असा अर्थ काढण्याची घाई करु नका...प्रशासन अवघड नाहीतर आव्हानात्मक आहे...त्यातही सामान्य जनतेच्या संपर्कात असणारे विभाग जसे महसुल, ग्रामविकास, नगरविकास, व इतर यांना हा अनुभव तर येतोच....महसुल विभाग हा जसे प्रशासनाचा कणा आहे असं अभिमानानं सांगितलं जातं, तितकंच ह्या कण्यावर त्याच्या धन्याचं (लोकशाहीत खरा धनी जनताच) लक्षही बारकाईनं असतं...अगदी गावातली भांडणं असो नाहितर शेताच्या बांदावरुन होणारे वाद... कुणी पाणी अडवलं असो नाहितर कुणी पाणी जिरवलं असो.... घरात पाणी घुसलं काय किंवा विहीरीतुन पाणी गेलं काय ..पुर असो नाहितर दुष्काळ, शासनाची कुठलीही मदत मिळणं असो नाहितर इतर शासकीय विभागांबद्दलची गाऱ्हाणी असो...आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारं मशिन म्हणजे महसुल प्रशासन अशी किमान बऱ्याच जणांची समजुत आहे. ह्या समजुतीमागे बराच प्रदीर्घ इतिहासही आहे, त्याबद्दल तुर्तास इथे चर्चा टाळुया...तर आपण म्हणत होतो की, मुळात प्रशासन हे आव्हानात्मक आहे....मग जर प्रशासन आव्हानात्मक असेल तर प्रशासनाचा भाग होऊ पाहणारे आपण सर्व भावी अधिकाऱ्यांनी ह्या आव्हानांना सामोरं जाण्याचं कसब आपल्यात भिनवायलाच हवं ना....एखाद्या विषयाचा आवाका लक्षात घेणं, त्यासाठी अधिकची माहिती मिळवणं....आपल्या आजुबाजुच्या चालुघडामोडींना फक्त लक्षात ठेवण्याबरोबरच असं का घडतय ? यावर काय उत्तर असु शकतं याचा विचार करणं...परिक्षेचा अभ्यास एकट्याने जरी अभ्यास करत असु तरी एकलकोंड्यासारखा अभ्यास न करणं...आपल्या सामुहिक वर्तवणुकीवर लक्ष देणं....आपल्या चालण्या-बोलण्यावर लक्ष देणं....एखाद्या बाबीवर विचार कसा करायचा अन् आपण कसा करतो यावर देखील विचार करणं...परिक्षेची तयारी करताना ह्या इतर अनुषांगिक बाबी ज्या आपल्या स्वभावात आणणे गरजेचे आहे...ज्या आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग असणं गरजेच्या आहेत, त्या सर्व गोष्टींचाही विचार झाला पाहिजे...नाहितर मी अन् माझी पुस्तकं एवढच केलं तर कदाचित आपण अधिकारी होऊ पण एक उत्तम प्रशासक होणं कठीण होईल....आता हे सगळं करायचं म्हणजे अभ्यासाच्या क्लास मध्ये भरीस भर म्हणुन व्यक्तिमत्व विकासाचे पण क्लास लावायचे का ? तर मुळीच नाही....ह्या गोष्टी स्वतःहुन शिकता येतात...ठरवुन काही गोष्टी अंगवळणी पाडुन घेता येतात...व्यसनं कशी न कळत लागतात, तसं चांगुलपणाचं...सदवर्तवणुकीचं व्यसन लागत नाही, ते लावुन घ्यावं लागतं...फक्त तसा प्रयत्न करणं...जाणिवपुर्वक काही गोष्टी करणं अन् काही गोष्टी टाळणं...हे जमायला हवं...एवढंच कशाला अगदी उपलब्ध वेळेचं नियोजन योग्य प्रकारे करणं अन् ते काटेकोरपणे पाळणं ही गोष्ट देखील पुढे प्रशासनात आपल्याला फार जास्त उपयोगी ठरणारी आहे...त्यामुळे असा सर्वांगिक अभ्यास करण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे....नाहीतर परिक्षा, निकाल अन् सत्कार यातुन बाहेर आल्यावर जेंव्हा आपण काम करायला सुरवात करु तेंव्हा लक्षात येते की मी फक्त प्रशासनाचा अर्धचंद्रच बघितला होता, चंद्राची अशीही एक बाजु आहे जी तयारीच्या काळात आपल्या लक्षातच आली नाही....ह्या दुर्लक्षित बाजुसाठी आपल्याला अजुन बरेच काही शिकावे लागणार आहे.
#असंच_काहितरी
No comments:
Post a Comment