#असंच_काहितरी
Friday, October 20, 2023
Wednesday, October 18, 2023
Book Review : काळेकरडे स्ट्रोक्स (प्रणव सखदेव)
महाविद्यालयीन जीवन म्हणजे आयुष्यातले सोनेरी दिवस पण ह्याच सोनेरी दिवसांना काळी करडी किनार लाभली तर आयुष्यात एक उदासीच भरुन राहील हे निश्चितच...अशीच उदासी घेऊन जगणाऱ्या.... आयुष्यात सर्व छान चालु आहे असं वाटत असताना वेळोवेळी ज्याचं आयुष्य वळणं घेत जातं अशा व्यक्तीची...तिच्या आयुष्यातल्या घटना, प्रसंग अन् व्यक्तींची अगदी खुलेपणाने मांडणी करणारे अंतरंगातील बोल्ड काळेकरडे स्ट्रोक्स म्हणजे प्रणव सखदेव यांची साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त काळेकरडे स्ट्रोक्स ही कादंबरी....
Monday, October 9, 2023
Monday, October 2, 2023
माझी महसुल डायरी....
तहसिलदार म्हणवत मिरवणं...जिल्हा संलग्नतेदरम्यान विविध कार्यालयात गेलं की नायब तहसिलदार आलोय, असं सांगणं...सबसे भारी, दंडाधिकारी म्हणणं असो नाहीतर महसुल प्रशासन असं काही नसतं, प्रशासन म्हणजेच महसुल प्रशासन असं अभिमानानं सांगणं असो....मागच्या वर्षभरात महसुल विभागात परिविक्षाधिन म्हणुन का होईना पण बरंच काही बघता आलं, शिकता आलं याचा आनंद आहे...प्रशासनात आपल्याला मिळणारी प्रतिष्ठा ही आपल्यावरची जबाबदारी अधोरेखीत करत असते, याची प्रकर्षाने जाणिव झाली... जिल्हा संलग्नतेमध्ये इतर कार्यालयासही भेटी व्हायच्या त्यामुळे शासनाच्या विविध विभागाच्या कामकाजाबद्दल व त्यांचा महसुल विभागाशी असणारा संबंध याची माहीती मिळायची...यातुन महसुल विभागाकडे समन्वयाची जबाबदारी जरा जास्तच आहे...शासनाचा कांकणभर अधिक विश्वास अजुनही महसुल विभागावरच आहे, हे लक्षात आलं...पण ह्या विविध कार्यालयांच्या दोन चार दिवसांच्या संलग्नतेपेक्षा खरा महत्वाचा टप्पा होता, तहसिल कार्यालयात एक स्तर खाली काम करणं...जळगाव-जामोद सारख्या दुर्गम भागात काम करावं लागणार म्हणुन सुरवातीला नाराजी होती, पण प्रशासनात आव्हानं सतत असणार..पाहिजे तिथं, पाहिजे तसं काम करायला मिळणं हे नाटकात शक्य होईलही, पण जीवनात बहुधा शक्यच नसतं...कारण जीवन हे नाटक असलं तरी ह्या नाटकाच्या दिग्दर्शकाशी आपण अनभिज्ञ असतो...तो देईल ती भुमिका म्हणेल त्या ठिकाणी आपल्याला वठवावी लागते...म्हणुनच मिळालेल्या ठिकाणाची फार तक्रार न करता जळगाव-जामोद येथे रुजु झालो...
सुदैवाने तहसिलदार मॅडम ला नवीन पदावर निवड झाल्याचं सांगितल्याने महसुलचा पाहुणा म्हणुनच तिथे वागणुक मिळाली...आठवड्यात एक दोन वेळेस जाऊन भेटलो तरी पुरे, असा अलिखित करार मॅडम सोबत मी करवुन घेतला...पण पहिल्या आठवड्यानंतर लगेच तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं अन् ह्या अशा नैसर्गिक आपत्तीवेळी सगळे करार आपोआप तुटतच असतात...तसा आमचाही करार तुटला..अन् मग माञ सलग आठवडाभर कार्यालयात उपस्थित रहावं लागलं..या दरम्यान पंचनामा काय प्रकार असतो याचा अनुभव आला ...स्वतः जाऊन पंचनामा करावा लागला...लोकांच्या ढिगभर अपेक्षा अन् आपल्याकडे असणारे कणभर अधिकार यामुळे कित्येकदा फक्त हळहळ करण्यापलिकडे आपल्याकडे पर्याय राहत नाही, याचाही अनुभव आला...रास्ता रोको काय असतो ? मोर्चा, उपोषण काय असतं ? याचाही अनुभव आला...अशावेळी लोकांशी काय बोलावं ? कसं लोकांना समजुन सांगावं हे मॅडम सोबत राहुन शिकता आलं...नैसर्गिक आपत्तीप्रसंगी अवेळी काम करणं असो किंवा इतर विभागांशी समन्वय साधुन तातडीने कामं करणं असो...कार्यलयातील अधिक काम करणारे कर्मचारी अन् टाळाटाळ करणारे कर्मचारी दोन्ही इथे पाहायला मिळाले..ह्यातल्या काहींकडुन काय करावं हे शिकता आलं तर काहींकडुन काय करु नये हे शिकता आलं...आपल्याकडे प्रश्न घेऊन आलेल्या लोकांना कशी उत्तरं द्यावीत, कुठे काय बोलावं अन् काय टाळावं याचाही धडा इथे काम करताना मिळाला...लोकांना त्यांच्या प्रश्नाची योग्य उत्तरं दिली तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधानही बघता आलं...
रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुक हे महसुल विभागासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे...रेती वाहतुक करणारे वाहन पकडण्यासाठी गेल्यानंतर ते हाती न लागल्याने अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशन ला जाण्याचाही योग आला..एफ आर आय करण्याआधी आपापसात मिटवुन घ्यायला हवं असं सांगणारे भेटले, गुन्हा नोंदवु नये म्हणुन टाळाटाळ करणारे पण दिसले...अन् तरीही महसुल वर्षाच्या शेवटच्या दिवशी राञी 12 वाजेपर्यंत पोलिस स्टेशन ला थांबुन का होईना एकदाचा एफ आर आय करुनच बाहेर पडायचा निर्धारही पुर्ण करता आला...या सगळ्या साधारण, असाधारण प्रकरणानंतर नव्याने महसुल विभागाला मिळालेली जबाबदारी म्हणजे शासन आपल्या दारी कार्यक्रम..या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक म्हणुन जबाबदारी सांभाळावी लागली..त्यासाठी संबंधीत नोडल व सहायक नोडल अधिकारी म्हणुन नेमलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांशी व महा ई सेवा केंद्रचालकांशी तसेच बस डेपोशी समन्वय साधुन कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना घेऊन जाण्याची व परत आणण्याची जबाबदारी यशस्वी पणे पार पाडता आली...अर्थात या कामात सहकाऱ्यांचीच भूमिका महत्वाची होती, त्यांच्याशिवाय ते शक्यच नव्हते...विशेषतः आमचे सर्व नियमित नायब तहसिलदार यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाची फार मदत झाली...ह्या सगळ्या सोबतच अनेक बारीकसारीक अनुभव हाती लागले...प्रशासनातल्या संधी, आव्हानं, अधिकार अन् मर्यादा ह्या सगळ्या गोष्टी कमीजास्त प्रमाणात लक्षात आल्या...
वर्षभरात मिळालेल्या प्रेम, आदर, सन्मान अन् कौतुकासाठी महसुल विभागाचा कायम ऋणी असेल...प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक व्यक्तीने आपुलकीने प्रेमाने सर्व समजुन सांगितले, समजुन घेतले...त्यां सर्वांचा शतशः आभारी आहे...सर्वांचा नामोल्लेख इथे केला नसला तरी सर्वांच्या आठवणी स्मृतीपटलावर कायमच्या कोरल्या गेल्यात..हे सगळे अनुभव खरंतर अधिकारी होणं म्हणजे काय असतं ? याचं प्रात्यक्षिक होतं...वर्गात शिकलेल्या धड्यांपेक्षा वर्गाबाहेर मिळणारे धडेच आपल्याला अधिक शहाणे, अधिक समृद्ध बनवत असतात...मागच्या वर्षभरातील महसुल विभागातील अशा असंख्य अनुभवांनी कित्येक धडे शिकवले..कायद्याच्या अभ्यासापेक्षा माणसांचा अभ्यास या दरम्यान अधिक करता आला...माणसांचं व्यवस्थापन कसं करावं...कुणाला कसं सांभाळावं, याचे धडे मिळत गेले...माञ हे सगळं शिकुन त्याचा प्रत्यक्ष आपल्या अधिकारात आपल्या कार्यालयात वापर करण्याची वेळ येण्याआधीच महसुल विभागाचा निरोप घेण्याची वेळ आलीये...कागदोपञी उद्या सकाळी (शासकीय भाषेत मध्यान्ह पुर्व) महसुल विभागातून कार्यमुक्त होईल अन् नवीन विभागात नवीन पदावर रुजु होईल...महसुल विभागाने व बुलढाण्याने आतापर्यंत दिलेले अनुभव पुढच्या प्रवासासाठी निश्चितच दिशादर्शक ठरतील...तसं बघायला गेलं तर पदाचं अन् विभागाचं नाव तेवढं बदललय, बाकी गाव अजुनही तेच आहे..तेच बुलढाणा, तेच जिल्हाधिकारी कार्यालय, अन् तोच मी...अर्थात् दंडाधिकारी नव्हे तर मुख्याधिकारी पदाचा झबला घालुन तयार.....नव्या प्रवासासाठी... एकच ध्यास, नगरविकास म्हणत....
#असंच_काहितरी #नायब_तहसिलदार #मुख्याधिकारी_गट-अ