Saturday, February 15, 2025

Book Review : नेमका हात कुणाचा (सागर काकडे)


दिली सुपारी त्यांनी माझ्या देहाची दलालांना,

माझ्या कवितेचा खून त्यांना परवडणारा नव्हता !  

अशा शब्दात आपली कविता ही किती अपरवडनीय आहे असे सांगणारा कवी म्हणजे सागर रामचंद्र काकडे. या कवीचा कवितासंग्रह - नेमका हात कोणाचा ? नुकताच वाचनात आला. या कवितासंग्रहातील कविता ह्या मुक्तछंदातील आहेत. कविता मुक्त असतील मात्र त्यातील शब्द आपल्याला बांधून ठेवतात, विचार करायला लावतात. अगदी थोडक्यात सांगायचं तर कवितासंग्रहातील कविता प्रेम, प्रणय, निषेध, विरह, विरोध आणि विद्रोह इथपर्यंत जाऊन पोहचतात आणि फक्त त्या पोहोचत नाहीत तर आपल्यालाही घेऊन जातात. 'बांगडी' ह्या कवितेत कवी म्हणतो,

बांगडी नसते गर्विष्ठ 

नसते जरा ही तकलादु 

बांगडी जाहीरपणे बोलत नाही काही 

तिच्यातच सामावलेली असते 

अख्खी बाई 

बाईच्या बांगडीचा इतका खोलवर विचार या कवितेत आपल्याला सापडतो. कवी फक्त प्रेमाची गाणी गात नाही तर व्यवस्थेने दिलेला त्रास सुद्धा त्याच्या ध्यानी आहे आणि म्हणूनच 'जाहिरात' या कवितेत कवी शेवट करताना असे म्हणतो,

बटव्यात शेवटची उरलेली

तंबाखू मळत 

सारी स्वप्न तळहातावर चोळत 

तो घराकडे निघतो 

रोज माणसांना 

चुना लावणाऱ्या व्यवस्थेला शिव्या देत

यात फक्त अगतिकता नाही व्यवस्थेविरुद्धचा विरोध आहे, विद्रोह आहे. इंडिया आणि भारत यातल्या अंतरावर चर्चा होत राहते मात्र फक्त चर्चेतून प्रश्न सुटला नाही म्हणूनच त्यावर वारंवार लिहिलं जातं, बोललं जातं. त्याच अंतरावर इंडिया आणि भारत ही कशी दोन भिन्न टोकं आहेत आणि त्या दोन टोकावर असणाऱ्या माणसांचं जग सुद्धा वेगवेगळं आहे, हे मांडताना 'भिन्न टोक' नावाच्या कवितेत कवी असं म्हणतो,

पब मधल्या चांदण्या 

कितीही सुंदर भासत असल्या तरी 

अप्सरा वगैरे नकली असतो इंद्र 

नोकरी टिकवण्यासाठी

प्रत्येकाच्या मानेला सुरा लावून 

उभा असतो लाचार चंद्र 

आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाताना काही गोष्टी आपल्या सोबतच घडतात असं जेव्हा वाटतं तेव्हा लेखक, कवी त्यांच्या कलाकृतीत असं काही लिहून जातात की असं जाणवतं, आपण एकटे नाही, हे दुःख, ह्या वेदना, हा त्रास आपल्यासारखाच कित्येकांच्या वाट्याला आलेला असतो किंवा येणार असतो आणि हे वास्तव आहे हे आपण स्वीकारायला लागतो कारण वास्तवाच्या विस्तवाचा कितीही त्रास होत असला तरी ते स्वीकारण्याशिवाय माणसाच्या जवळ दुसरा उपाय नाही. अशाच सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना रेखाटताना 'किती भयानक असतं ना' या कवितेत कवी म्हणतो,

ज्यांच्यासाठी आपण 

मरून गेलेलो असतो 

त्यांच्यासाठीच आपल्याला 

जगावसं वाटतं 

कीती भयानक असतं ना 

मानवी जीवनाची ही वास्तव बाजू मांडताना कवी आयुष्याकडे किती परखड भूमिकेतून बघतो हे समजतं. सामाजिक बाबींकडे लक्ष वेधताना बाईला उंबऱ्याच्या आत राहायला शिकवणाऱ्या संस्कृतीचा कवी आपल्या कवितेत वेध घेतो आणि 'चेला' या कवितेत असे म्हणतो,

बाई बाई असते सांगणारा उंबरा 

संस्कृतीचा चेला 

उंबऱ्याला संस्कृतीचा चेला मानतो कवी.

समाजातील परिस्थितीच भान असणं हे कुठल्याही साहित्य कृतीसाठी अत्यंत आवश्यक असतं तेच समाज भान ठेवून समाजातील दुर्लक्षित, नजरेआड राहिलेल्या बाबींकडे लक्ष वेधण्याचे काम साहित्यिक करत असतात. या कवितासंग्रहातील 'देणं घेणं' या कवितेत कवीने इंद्रायणीच्या पाण्यात डुबकी मारून भक्तांनी देवाच्या नावाने टाकलेले किंवा कोणीतरी सरणाची राख पाण्यात सोडताना टाकलेले पैसे जमा करणाऱ्या पोराचं लक्ष हे जागतिकीकरणावर किंवा इतर कुठल्याही गोष्टीवर नसतं तर ते त्याच्या भुकेवर असतं हे ठासून सांगितले आहे. जगभर वाढत जाणारी कट्टरता, धर्मांधता, पसरणारा आतंकवाद, दहशतवाद या बाबींचे वर्णन करून कवी थांबत नाही तर त्यावर उपाय सुद्धा सुचवण्याचं काम तो करतो. 'कट्टरता' या कवितेत कवी म्हणतो,

माणूस सिरयात मरू दे 

नाहीतर तुझ्या एरियात 

मालेगावात मरू दे 

किंवा भीमा कोरेगावात 

जात पात धर्म यापेक्षा 

एका माणसाचा जीव सुद्धा मोलाचा असतो

मित्रा त्या जीवासाठी आपण 

समतेचा वारं पसरवायला हवं 

हेच समतेचे वार पसरवण्याचं काम कवी आपल्या कवितेतून करतो आहे. हे काम इतकं सोपं नाही. शब्दांचे शिलेदार राजरोस मारले जातायत, शब्द शस्त्रापेक्षाही असहनीय होतायत आणि म्हणूनच शब्दांची पालखी वाहणाऱ्या व्यक्तींना गोळ्या घातल्या जातायत. कदाचित हीच भीती या ही कवीच्या मनात असावी मात्र त्या भीतीने घाबरून न जाता उलट कवी आपल्या कवितेत असं म्हणतो,

अरे धार लावली आता होऊ द्या ना घनघोर युद्ध 

तुमच्या गोळ्या आणि माझे शब्द 

म्हणजेच शत्रूच्या, धर्मांधांच्या गोळ्यांपेक्षाही आपले शब्द धारदार आहेत, शक्तिमान आहेत, याची खात्री कवीला पटलेली आहे आणि म्हणूनच कवी आव्हान देतो की,

माझ्यातला छत्रपती एकदा अजमावूनच बघा

नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा.

अशाप्रकारे , या कवितासंग्रहात विविध कविता विविध अंगी विचारांना जाग करणाऱ्या आहेत. तेव्हा आपल्याला जाग यायला हवी असं वाटणाऱ्या प्रत्येकानं हा कवितासंग्रह वाचायला हवा. समाजातील नको असणाऱ्या घटनांमागे नेमका हात कोणाचा याचा विचार करायला हवा. इतकी उत्तम कलाकृती वाचकांना उपलब्ध करून देण्यामागे असणाऱ्या नेमक्या हाताचे म्हणजेच कवीचे विशेष आभार.

No comments: