सीतेला सासुरवास केला ग केसी केसी
वाटून दिला तिने सयांना देसोदेशी
किंवा
सीतेला सासुरवास झाला ग परोपरी
वाटून दिला तिने सयांना घरोघरी
सीतेला सासुरवास झाला ग बहु बहू
वाटून दिला तिने सयांना गहू गहू
अशाप्रकारे जात्यावरच्या ओव्यांमध्ये सीता उमटते. सीतेचा त्रास, वनवास बघून भारतीय स्त्री मन आपलं दुःख हलकं करतं. रामाने तिला वनवासाला पाठवलं. असं असलं तरी रामाचं देवपण खुजं न करता स्त्रिया सीतेचं दुःख मांडताना म्हणतात,
सीता नारीला वनवास, तुमची आमची काय कथा
देव माणसाच्या घरी कलियुग शिरला होता
रामाचं देवपण खुजं न करता लोकरामायणातली सीता प्रत्येक स्त्रीच्या जीवाची सखी झाली आहे. सीतेच स्थान रामापेक्षा या स्त्रियांना काकणभर उंचावरचं वाटतं आणि म्हणूनच त्या म्हणतात,
राम म्हणू राम, न्हाई सीताच्या तोलाचा
हिरकणी सीतामाई, राम हालक्या दिलाचा
या पुस्तकात लेखिकेच्या भाव विश्वातील राम, लोक मानसातील राम, सीतेचे दोन वनवास, रामाची अ-काल दुर्गापूजा, स्फूटओवितील सीतायन, अंकुश पुराण, मूळ कन्नडातील चित्रपट रामायण, (बंगालीतील) चंद्रावती रामायण, दशरथ जातक आणि आदिवासींचे सीतायन, असे विविध लेख आहेत. विविध लोककथांमध्ये कमी अधिक फरकाने रामकथेत सीतेचा वनवास आलेला आहे. सीता ही नक्की कोण होती तिचे माता-पिता कोण होते या प्रश्नांची उत्तरं अजूनही स्पष्टपणे कुणाकडे सापडत नाहीत. याचं कारणच हे आहे की वाल्मिकी रामायण व इतर सर्व रामायणं यांच्यात एकवाक्यता नाही. काही लोककथांमध्ये सीता रावणाची मुलगी, तर काही लोककथांमध्ये सीता रामाची बहिण असाही उल्लेख सापडतो अर्थात हे सर्व ऐकायला बरं वाटत नसलं तरी तत्कालीन परिस्थितीचा विचार केल्यास काही बाबी पटायला सोप्या जातात. मुळात रामायण हा आपल्या सबंध भारतीय जनांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, मात्र रामायणाची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा रामायण सीतेमुळे घडलं असंच आपण ऐकतो, पण या पुस्तकातलं विवेचन वाचल्यानंतर आपण विचार करू लागतो की खरंच रामायण सीतेमुळे घडलं की आपली बुद्धी न चालवता दुसऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्या रामा मुळं ? खरंतर रामायण कुणामुळे घडलं हा मूळ प्रश्न नाहीच. खरा प्रश्न हा आहे की भारतीय सीतेचा वनवास कधी संपणार ? भारतातील सीतांची वेदना कधी संपणार ? "नुसता रावण संपून चालणार नाही तर निष्करूण पद्धतीने सीतेचा विचार करणारा रामही संपला पाहिजे आणि भवभूतीच्या उत्तर रामचरितामधला करुणांकित राम जागा झाला पाहिजे",असं जे डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे म्हणतात ते अगदी योग्य असल्याचं आपल्याही मनाला पटतं. पुस्तकाच्या शेवटी बंगालीतील चंद्रावती रामायणाच्या संहितेचा मराठी अनुवाद देखील आपल्याला वाचायला मिळतो. पुस्तकात भरपूर वैचारिक मंथन आहे. प्रत्येक बाब वाचताना आपण विचार मग्न होतो. नवीन काहीतरी सापडल्याचा आनंद होतो, मात्र सीतेचं सनातन दुःख संपत नसल्याखंत ही वाटू लागते. प्रत्येक विचारी माणसानं वाचायलाच हवं असं डॉ. तारा भवाळकर यांचं 'सीतायन' हे पुस्तक वाचून समृद्ध झाल्याची भावना मनात येते. सीता-राम कथेचे विविध कंगोरे जाणून घेण्यासाठी आणि लोककथांमधील रामायण समजून घेण्यासाठी हे 'सीतायन' नक्की वाचा.
पुस्तकाचे नाव : सीतायन
लेखिका : डॉ. तारा भवाळकर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
#असंच_काहीतरी
#Book_Review