Monday, March 17, 2025

Book Review : सीतायन (डॉ. तारा भवाळकर)


सीता ही पतिव्रता म्हणून भारतीय स्त्री समोर कायम आदर्श बनून राहिलेली आहे. येथील प्रत्येक अडल्या-नडलेल्या स्त्रीला आजही आपण सीतेची उपमा देत असतो. सीता ही सोशिकतेचं मूर्तीमंत प्रतीक, सहनशील स्त्रीयांची प्रतिनिधी अशी आपण ऐकलेली, वाचलेली आहे. आपल्या लहानपणी आपण बघितलेल्या, ऐकलेल्या रामायणात राम हा केंद्रबिंदू तर सीता ही रामायणाचे कारण अशीच रंगवलेली दिसते. खरंतर वाल्मिकी रामायण व त्यानंतर लोकपरंपरेतील अनेक सीता-राम कथा यात बरेच भेद सापडतात. लोकपरंपरेतील स्त्री रचित रामकथा या खरंतर राम कथा असण्यापेक्षा सीताकथा आहेत आणि म्हणूनच त्यांना रामायण म्हणण्याऐवजी सीतायन म्हणणे जास्त योग्य होईल, अशी भूमिका लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर आपल्या समोर मांडतात. त्यांचे सीतायन हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. हे पुस्तक म्हणजे फक्त सीतेची व्यथा आणि कथा नसून सीतेच्या वेदनेचा आणि विद्रोहाचा वेगवेगळ्या लोक रामायणात सापडलेला सूर आहे. हे पुस्तक एक लेखसंग्रह आहे. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात राम सीता विविध ओव्यातून, गाण्यातून, कथातून वेगवेगळ्या लोकसमूहाने मांडलेल्या आहेत. या सर्व लोकपरंपरेतील सीता-राम कथा व त्यावरील विवेचन, विश्लेषण या पुस्तकातील विविध लेखात आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला माहित असलेल्या रामायणातील तथ्यांशी न जुळणारे बरेच तथ्य यात सापडतात. खरंतर राम कथा ही भारतीय परंपरेतील एक मिथक आहे, असेही म्हटले जाते. मात्र ते मिथक असो वा सत्य त्यातील मानवीमूल्ये जी मानवी जीवनासाठी आवश्यक आहेत ती नक्कीच आपण स्वीकारू शकतो. या पुस्तकात मुख्य चर्चा ही सीतेच्या वनवासाबद्दल आपल्याला वाचायला मिळते . सीतेचा एक वनवास जो रामासोबत तिला भोगाव लागला, तो आपण बघितलेला वाचलेला आणि ऐकलेला आहे, मात्र तिचा दुसरा वनवास जो रामाशिवाय होता तो मात्र आपल्याला फारसा परिचयाचा नाही. त्या दुसऱ्या वनवासाचे कारण वेगवेगळ्या लोककथांमध्ये वेगवेगळे आहे. काही ठिकाणी धोब्याची कथा आहे, तर काही ठिकाणी कैकयीला जबाबदार धरलेय तर काही ठिकाणी सीतेची नणंद व रामाची सावत्र बहिण कुकवा हिला दोषी ठरवण्यात आलेलं आहे. जबाबदार कुणीही असो आणि कारण काहीही असो, मात्र सीतेच्या वाट्याला सदा सर्वदा सासुरवास, छळ आलेला आहे. भारतीय स्त्री मनाला कदाचित सीतेच्या याच व्यथेमुळे सीता जवळची वाटत असावी. त्यामुळे जात्यावरच्या ओव्या गाताना बाया म्हणत राहतात,

सीतेला सासुरवास केला ग केसी केसी

वाटून दिला तिने सयांना देसोदेशी

किंवा 

सीतेला सासुरवास झाला ग परोपरी 

वाटून दिला तिने सयांना घरोघरी 

सीतेला सासुरवास झाला ग बहु बहू 

वाटून दिला तिने सयांना गहू गहू 


अशाप्रकारे जात्यावरच्या ओव्यांमध्ये सीता उमटते. सीतेचा त्रास, वनवास बघून भारतीय स्त्री मन आपलं दुःख हलकं करतं. रामाने तिला वनवासाला पाठवलं. असं असलं तरी रामाचं देवपण खुजं न करता स्त्रिया सीतेचं दुःख मांडताना म्हणतात,

सीता नारीला वनवास, तुमची आमची काय कथा 

देव माणसाच्या घरी कलियुग शिरला होता 


रामाचं देवपण खुजं न करता लोकरामायणातली सीता प्रत्येक स्त्रीच्या जीवाची सखी झाली आहे. सीतेच स्थान रामापेक्षा या स्त्रियांना काकणभर उंचावरचं वाटतं आणि म्हणूनच त्या म्हणतात,

राम म्हणू राम, न्हाई सीताच्या तोलाचा

हिरकणी सीतामाई, राम हालक्या दिलाचा


या पुस्तकात लेखिकेच्या भाव विश्वातील राम, लोक मानसातील राम, सीतेचे दोन वनवास, रामाची अ-काल दुर्गापूजा, स्फूटओवितील सीतायन, अंकुश पुराण, मूळ कन्नडातील चित्रपट रामायण, (बंगालीतील) चंद्रावती रामायण, दशरथ जातक आणि आदिवासींचे सीतायन, असे विविध लेख आहेत. विविध लोककथांमध्ये कमी अधिक फरकाने रामकथेत सीतेचा वनवास आलेला आहे. सीता ही नक्की कोण होती तिचे माता-पिता कोण होते या प्रश्नांची उत्तरं अजूनही स्पष्टपणे कुणाकडे सापडत नाहीत. याचं कारणच हे आहे की वाल्मिकी रामायण व इतर सर्व रामायणं यांच्यात एकवाक्यता नाही. काही लोककथांमध्ये सीता रावणाची मुलगी, तर काही लोककथांमध्ये सीता रामाची बहिण असाही उल्लेख सापडतो अर्थात हे सर्व ऐकायला बरं वाटत नसलं तरी तत्कालीन परिस्थितीचा विचार केल्यास काही बाबी पटायला सोप्या जातात. मुळात रामायण हा आपल्या सबंध भारतीय जनांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, मात्र रामायणाची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा रामायण सीतेमुळे घडलं असंच आपण ऐकतो, पण या पुस्तकातलं विवेचन वाचल्यानंतर आपण विचार करू लागतो की खरंच रामायण सीतेमुळे घडलं की आपली बुद्धी न चालवता दुसऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्या रामा मुळं ? खरंतर रामायण कुणामुळे घडलं हा मूळ प्रश्न नाहीच. खरा प्रश्न हा आहे की भारतीय सीतेचा वनवास कधी संपणार ? भारतातील सीतांची वेदना कधी संपणार ? "नुसता रावण संपून चालणार नाही तर निष्करूण पद्धतीने सीतेचा विचार करणारा रामही संपला पाहिजे आणि भवभूतीच्या उत्तर रामचरितामधला करुणांकित राम जागा झाला पाहिजे",असं जे डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे म्हणतात ते अगदी योग्य असल्याचं आपल्याही मनाला पटतं. पुस्तकाच्या शेवटी बंगालीतील चंद्रावती रामायणाच्या संहितेचा मराठी अनुवाद देखील आपल्याला वाचायला मिळतो. पुस्तकात भरपूर वैचारिक मंथन आहे. प्रत्येक बाब वाचताना आपण विचार मग्न होतो. नवीन काहीतरी सापडल्याचा आनंद होतो, मात्र सीतेचं सनातन दुःख संपत नसल्याखंत ही वाटू लागते. प्रत्येक विचारी माणसानं वाचायलाच हवं असं डॉ. तारा भवाळकर यांचं 'सीतायन' हे पुस्तक वाचून समृद्ध झाल्याची भावना मनात येते. सीता-राम कथेचे विविध कंगोरे जाणून घेण्यासाठी आणि लोककथांमधील रामायण समजून घेण्यासाठी हे 'सीतायन' नक्की वाचा.

पुस्तकाचे नाव : सीतायन 

लेखिका : डॉ. तारा भवाळकर 

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन 


#असंच_काहीतरी 

#Book_Review

No comments: