आमच्याकाळात हे असं नव्हतं, ते तसं नव्हतं, असं आपण आपल्या आई वडिलांकडून ऐकत आलोय. कधी कधी वाटतं, खरंच इतकं वेगळं असेल का तेंव्हाच जग ? पण जेंव्हा स्वतःला अनुभव येतो तेंव्हा लक्षात येतं जग खरंच बदललय...बदलत चाललय... आपल्या लहानपणी आपण बघितलेलं जग आता तसं राहिलं नाही. कित्येक गोष्टी बदलल्या आहेत अन बदललेल्या जगात जगणं सुद्धा बदलत चाललय. दूध जसं दूधवाला देतो तसं कपडे दुकानवाला देतो हे सामान्य ज्ञान असलेल्या पिढीला दूधवाला दूध कुठून आणतो आणि दुकानवाला कपडे कुठून आणतो याची माहिती घेण्याची गरजच उरलेली नाही, अशी परिस्थिती. रेडिमेड कपडे वाढले तसे कपडे शिवणारे कमी व्हायला लागले. अगदी शहरातच नाही तर गावातही रेडिमेड कपड्यांचीच चलती आहे. रेडिमेड कपड्यांची फॅशन शिंप्यांचं शोषण करु लागलीये. हाच धागा धरून आपल्या सभोवतालचं वास्तव बघून देवीदास सौदागर यांनी 'उसवण' ही कादंबरी शिवली आहे. कादंबरीचा नायक 'विठू' हा साधा, भोळा, आपलं काम इमाने इतबारे करणारा गावातला टेलर. त्याच्या फाटलेल्या आयुष्याची ही कथा. ही विठू इतकीच बदलत चाललेल्या गावाची सुद्धा कथा आहे. लोकं रेडिमेड कापडं वापरायला लागल्याने कापडं शिवून घालणारे फार कमी झाले. याचाच परिणाम टेलरिंग करणाऱ्यांवर होतो. पहिल्यासारखं उत्पन्न मिळेनासं होतं. घर गरिबीच्या खाईत ढकललं जातं. शेवटी पर्याय नाही म्हणून व्यवसायच बंद करावा लागतो. अशी सगळी ही कहाणी. ह्या कहाणीत फक्त विठू नाही. यात नवऱ्याच्या फाटक्या संसारातही त्याची खंबीरपणे साथ देणाऱ्या बायकांचे प्रतिनिधित्व करणारी 'गंगा' आहे. विद्यार्थ्यांनी गरिबीमुळे मागं राहू नये यासाठी तळमळणाऱ्या गुरुजींचं प्रतिनिधित्व करणारे 'साळुंखे सर' आहेत. वणव्यात गारव्यासारख्या मित्रांचं प्रतिनिधित्व करणारा 'जगू' आहे. गावातल्या धनिक पण बेमूर्वत माणसांचे प्रतिनिधित्व करणारा 'भीमा' आहे. चंगळवादी संस्कृतीचा शिकार ठरलेला 'देवबा' आहे. गावातले वरिष्ठ तात्या, बापू आहेत. एकूणच सारा गाव गोतावळा कहाणीत आहे. या सगळ्यांना घेत कहाणी गावातलं राजकारण, भांडण-तंडे, तरुणांची अवस्था यासारख्या विषयावर सुद्धा भाष्य करते. ग्रामीण जीवनातल्या उसवत चाललेल्या घडीचं अचूक वर्णन यात वाचायला मिळतं. कादंबरी बऱ्याच ठिकाणी आपल्याला विचारमग्न करते.
"अलीकडच्या काळात जगणं चिरडलं गेलं.
सांडलेल्या रक्ताची किंमत उरली नाही.
माणसाला पर्याय उभे राहिले.
ही साधीसुधी गोष्ट नाही.
याचं गांभीर्य तुम्हाला आताच कळणार नाही."
ह्या ओळी कादंबरीत वेड्याच्या नोंदी म्हणून सापडतात मात्र त्या अतिशय समर्पकपणे बदलत्या काळचं वर्णन करत आपल्याला शहाणं करू पाहतात. अतिशय छोटी, ओघवत्या मराठवाडी भाषेतली, फाटलेल्या आयुष्याला मेहनतीच्या धाग्यांनी शिवू पाहणाऱ्या विठोबा शिंप्याची ही साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कहाणी सर्वांनी आवर्जून वाचावी अशी.
___________________________
कादंबरी : उसवण
लेखक : देवीदास सौदागर
#असंच_काहीतरी #Book_Review
No comments:
Post a Comment