Thursday, April 25, 2019

असंच काहितरी.... #निरोप समारंभ....#क्षितिज 2k19

Foundation अन् Geotech शिकवणारे बाबा
काय शिकवतात तोबा तोबा....
नजरेमधुनच नुसत्या
सार्या वर्गावर ठेवत असतात ताबा........

एक मास्तर अजुन बाबासारखाच बाप आहे
लेकरांना वाटते उगाच डोक्याला ताप आहे......
कधी कधी वाटते, हेही त्यांचेच चले आहेत
ते काही असो, माणुस तसे भले आहेत....

Water resource शिकवणार्या बाई
प्रेम अन् मायेचाही Source आहेत......
कुठले विद्यापीठ अन् कुठले महाविद्यालय
सांगा कुठे अशा बाई अन् असा Course आहे......

एक आमुचे सर, त्यांची कुणालाच नाही सर
त्यांच्यामुळेच वाटते आम्हाला College जणु घर...
ना कुठलाच आडकाठी, ना कुठला अडथळा
रस्त्यावर सुद्धा सहज करता येते विचारपुस.....
कुणाबद्दल बोलतोय काय विचारता..?
अहो, असा एकंच आहे आपल्याकडे देवमाणुस....

त्यांनीच आम्हाला
Concrete, Steel सारं सारं शिकवलं.....
माणसानं‌ माणसाशी माणसासारखं राहायचं,
मनावर आमच्या गिरवलं.....

आपल्या सगळ्यांकडुन जे शिकलो, जे घेतलं ते आयुष्यभर पुरेल इतकं आहे..... खरंच आपल्यासारखे शिक्षक भेटले हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल....
नाहीतरी,
"कोणती पुण्य अशी
येती फळाला...
जोंधळ्याला चांदणे
लखडुन जावे...."

आपल्यासर्वांच्या कायम ऋणात राहायलाच मला आवडेल...
तरी‌ आपल्या सर्वांचे काळजाच्या कातळापासुन आभार.......

Saturday, March 23, 2019

प्रिय भुषण.....





आपण जन्मलो यात आपले कसलेच मोठेपण नाही , तरी आपण एवढे मोठमोठे वाढदिवस का साजरे करतो...? हा प्रश्न बर्याचदा पडतो मला. पण वाढदिवस साजरा करणं , म्हणजे आपला जन्म झालाय अन् आपल्या जन्माची आपल्याला जाणिव व्हावी , अन् आपण का जन्मलो हे आपण सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हावं , म्हणुन साजरा करत असावेत. मुळात जन्मदिवस म्हणजे काय ? हे सांगताना भारताचे भुतपुर्व राष्ट्रपति भारतरत्न डाॅ. अब्दुल कलाम म्हणतात जन्मदिवस म्हणजे असा एकमेव दिवस ज्या दिवशी तुम्ही रडत असता अन् तुमची आई हसत असते, बाकी आयुष्यात तुम्हाला ठेच जरी लागली तरी तिच्या डोळ्यात पाणी येते. बरं हे सर्व ठिक आहे , पण हे असं अचानक जन्म , जन्मदिवस या सगळ्या बद्दल का बोलतोय म्हणुन आश्चर्य वाटलं का....? नाही , ते कसं आहे ... आत्ता नुकताच एका मिञाचा वाढदिवस साजरा केला. बरं , ज्याचा वाढदिवस साजरा केला त्याच्याबद्दलंच खरं तरं लिहणार होतो , पण हे असं विषयानंतर होतंच बरं का...असो.

तर विषय आहे भुषण.... नाही भुषणाचा काही विषय आहे का..? असं कितीही म्हटलं तरी माझ्या आजच्या लिहिण्याचा विषय माञ भुषणंच आहे. बरं भुषण बद्दल सांगावं तरी काय..? तो काही फार कुणी प्रसिद्धही नाही , किंवा फार स्टार ही नाहिये..... तो आहे यश मिळवण्यासाठी सिद्ध झालेला स्टार....मला आवडणार्या काही निवडक व्यक्तींपैकी एक , ज्याच्या साध्या पण प्रॅक्टीकल राहण्याचा आपण जबरदस्त फॅन आहोत... एखादी गोष्ट करायची म्हटलं की त्यात सर्वस्व ओतुन जिव लावुन काम करण्याची तयारी असणारा मुलगा.... एखादी गोष्ट जमत नसेल तर नाही येत हे ही तितक्याच मोकळेपणाने सांगणारा अन् खाञीशीर असेल अशाच गोष्टी सांगणारा .... अभ्यास , हुशारी , शैक्षणिक प्रगती या सगळ्या गोष्टीत तर पुढे आहेच , पण याबरोबरच नाटक , विडंबन इत्यादीच्या माध्यमाने रंगमंचावर अवतरणारा कलाकार.... जे येत नाही ते शिकण्याचा ध्यास घेत प्रयत्नपुर्वक शिकणारा.... विनोद , चेष्टा सारंच अगदी मर्यादेत..... जगणं बिनधास्त असावं पण भविष्याची जरा धास्तीही असायलाच हवी नाही का..? अशा पद्धतीने अमर्याद वागण्याला मर्यादा घालणारा..... माणुस म्हणुन खुप छान वाटणारा... अन् आयुष्यात ज्याची सोबत मला कायम लाभावी असे वाटते अशा मिञांपैकी एक.... नव्हे कदाचित एकमेवही म्हणता येईल.....
भुषण , तुझी नुकतीच L&T कंपनी मार्फत पदव्युत्तर शिक्षणासाठी घेण्यात येणार्या मुलाखतीसाठी निवड झाली आहे... तु GATE मध्येही चांगल्या गुणांसह पास झाला आहेस... अजुन इतरही दिलेल्या बर्याच परिक्षांचे निकाल बाकी आहेत , त्यातही तु बाजी मारशील यात शंका नाही...
या सगळ्याबद्दल तुझे खुप खुप अभिनंदन अन् हे सगळं करताना तुझ्यातल्या ज्या साधेपणावर मी कायमच फिदा आहे त्या साध्या , मनमोकळेपणाचे खुप कौतुकही वाटते.....
आता पदवी शिक्षण झाल्यावर पुढच्या तिन महिन्यानंतर आपण सगळेच आपापल्या ध्येयमार्गावर मार्गस्थ होऊ पण या सगळ्यात आपली मैञी कायम राहिल......
तु खुप मोठा माणुस होशील यात शंकाच नाही , त्यासाठी तुला मनापासुन खुप खुप शुभेच्छा......
आणि हो , कधीही , कुठेही मी तुझ्या मदतीला आलो तर मला नक्कीच आनंद होईल....
सुखाच्या क्षणी नाही बोलवलं तरी चालेल... दुःखात नक्की बोलवं , मी नक्कीच उभा असेन कायम तुझ्यासाठी....

हे , बघं या सगळ्यात तुला वाढदिवसाच्या शुभेच्छाच दिल्या नाहित वाटतं ... असो.
तुला वाढदिवसाच्या आभाळभर नव्हे त्यापेक्षाही जास्त शुभेच्छा.......
खुप मोठा हो.....



तुझाच....

Saturday, January 26, 2019

ग्रेट भेट.....# सन्मान कवितेचा # अभिमान माझा


आज शासकीय विश्रामगृह(अजिंठा विश्रामगृह , जळगाव) येथे अनाथांची‌ माय डाॅ. सिंधुताई सपकाळ यांची भेट घेण्याचे भाग्य लाभले.... माई सागर पार्क येथे पार पडत असलेल्या बहिणाबाई महोत्सवात बोलण्यासाठी आलेल्या असताना श्री संदिप महाजन सरांनी कळवल्यानंतर लगेच भेटायला निघालो. केवळ महाजन सरांमुळे माईंना भेटता आले हेही खरे. माईंना भेटल्यानंतर महाजन सरांनी ओळख करुन दिली व मी माईंवरती एक कविता केली असल्याचे त्यांना सांगितले. माईंनी लगेच म्हटले ," ऐकव की लवकर मग " अन् मी कविता ऐकवली. एका एका शब्दानंतर मिळणारी माईंची दाद मला कित्येक पुरस्कारांपेक्षाही जास्त आनंद देत होती. कविता ऐकताना काही शब्दांची पुनरावृत्ती झालीय  असं वाटल्यानंतर माईंनी लगेच सांगितले , " बाळ‌ सगळं कसं चौकटीत पाहिजे , मग ते जगणं असेल नाही तर कविता असेल. माणसानं एका चौकटीत असावं." मध्येच एका ओळीत मी ताई हा शब्द वापरलेला होता . ते ऐकल्यावर माई म्हणाल्या , " ताई नको माई म्हण , अरे आई म्हणताना सुद्धा ओठाला ओठ लागत नाहीत ,पण ओठाला ओठ भिडल्याशिवाय माई म्हणताच येत नाही. माई म्हण....." पुढे सगळी कविता ऐकल्यावर माई‌‌ म्हणाल्या ," काय लिहतोस तु ! तु हाडाचा कवि आहेस. तुझी ही कविता मला पाठव . मी ही कविता माझ्या संस्थेत फ्रेम करुन लावेल. तुझा नंबर दे. आणि हो , कधीपुण्याला‌ आलास..? नाही...? " अन् महाजन सरांना सांगितले ," याला घेऊन ये...
अवघ्या काही मिनिटांची ती भेट , पण अमुल्य असा ठेवा ठरावी असे ते क्षण होते....
माई बोलत होत्या अन् मी भारावुन जात होता. आपले शब्द आज धन्य झाले असं‌ आतुन वाटत होते. माझ्यासाठी हा कवितेचा सर्वोच्च सन्मान आहे.....
कविते हे सारं तुझ्यामुळेच....
सारं काही तुझंच आहे.....मी फक्त निमित्त माञ...

माईंनी पुस्तकात लिहिलेल्या ओळी ,
*" शशिकांत , तु आग पितोस . शब्दात ती ओततोस आणि कवितेची धग पेटती ठेवतोस. "*

माईंचा संदेश‌ ( जो आजन्म स्मरणात राहिल असा )
*" आयुष्याच्या झळा ,  झेलत रहा बाळा...."*

#अनाथांची माय .....
#वेदनेचा बाजार नव्हे बाजाराची वेदना मांडता आली पाहिजे......

मी अद्याप काय कमावले असे कुणी विचारले तर ही अन् अशा मोठ्या माणसांच्या कौतुकाच्या थापा हिच माझी कमाई आहे , एवढेच मी सांगु शकेल....... अजुन खुप काही करायचंय अन् खुप दुर जायचंय.... ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी ही सारी माझी प्रेरणास्थानं‌ आहेत......

🖋 शशिकांत शांताबाई मारोती बाबर....
(लिड इंडिया २०२०, जळगाव)

Wednesday, January 23, 2019

महानायक नेताजी



स्वातंञ्य पेनाच्या शाईने नव्हे रक्तानेच मिळेल....
तेंव्हा स्वराज्यासाठी रक्त मागणारा....
ध्येयाची एकनिष्ठ असलेला....
एक समाजवादी लढवय्या योद्धा....
स्वतःचे सरकार स्थापन करुन ब्रिटिश साम्राज्याला हादरवणारा.....
स्वातंञ्यलढ्यासाठी स्वतःची फौज तयार करणारा
अन् स्वतःच एका फौजेसमान असणारा....
मृत्युपश्चात इग्रजांची झोप उडवणारा....
ब्रिटिशांसाठी खलनायक असणारा
महानायक म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस....

नेताजी आपल्या नावात जरी चंद्र असला तरी आपण सुर्य होतात हेच खरे......