मी कार्यभार स्विकारल्यानंतर पहिले काम होते, निवडणुकीसाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी नियुक्त करणे, विविध पथके कार्यान्वित करणे. आरओ सरांशी चर्चा करून हे दोन्ही आदेश निर्गमित करण्यात आले. त्यानंतर सर्व नोडल अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना सर्व निवडणूक कार्यक्रमातील आपापल्या जबाबदाऱ्यांबाबत अवगत केले. त्यांनंतर विविध पक्ष प्रतिनिधी यांची बैठक घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेचे पालन करणे व प्रशासनास सहकार्य करणे याबाबत आवाहन करण्यात आले. त्यांच्या शंकाचेही निरसन करण्यात आले. निवडणुकीतील संभाव्य अडचणी बद्दल देखील चर्चा झाली. त्यानंतर त्याच दिवशी माध्यम प्रतिनिधीशी देखील बैठक घेण्यात आली. त्यांना देखील आदर्श आचारसंहिता पालन व जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी जनजागृती करण्यासाठी त्यांच्या स्तरावरून प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. 6 ते 10 नोव्हेंबर हा कालावधी सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी खर्ची गेला. 10 ते 17 नोव्हेंबर हा नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी होता. ह्या निवडणुकीत पूर्णतः ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरून ते प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून सादर करावयाचे होते. एकूण 175 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले. प्राप्त सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी दुसऱ्याच दिवशी म्हणजे 18 नोव्हेंबर रोजी होती, त्यामुळे 17 च्या रात्री उशिरापर्यंत (साधारणत: 12) प्राप्त अर्ज RO, ARO, AARO अन नोडल अधिकारी (श्री. पंकज गावंडे) सर्वांनी व्यवस्थित तपासून घेतले. नेमके रात्री 12 च्या आसपास व्हाट्सअप वर मा. राज्य निवडणूक आयोगाचे एक परिपत्रक आले ज्यात पक्षांकडून अर्ज केलेल्या मात्र पक्षाच्या जोडपत्रात (एबी फॉर्म) पर्यायी उमेदवार म्हणून असलेल्या व्यक्तीला एक सूचक असेल तरी त्याचे नामनिर्देशनपत्र वैध ठरवण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. त्यानुसार परत नामनिर्देशनपत्र तपासून पाहावे लागले. दुसऱ्या दिवशी छाननीच्या वेळी जवळपास निम्म्या नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यावर परत मा. राज्य निवडणूक आयोगाचे दुसरे परिपत्रक आले, ज्यात काल रात्री आलेले परिपत्रक रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अशावेळी रात्रीच्या परिपत्रकानुसार वैध ठरवलेल्या नामनिर्देशनपत्रांना अवैध ठरवावे लागणार होते. इथे काहीसा गोंधळ निर्माण झाला. कारण एकदा वैध ठरवल्यावर परत अवैध कसे ठरवता असा प्रश्न संबंधित उमेदवार विचारू लागले, मात्र आपण निवडणूक आयोगाच्या निर्देशास बांधील असल्याचे सांगत सर्व उमेदवारांना समजावण्यात आले. कुठलाही निर्णय घेताना तो सारासार विचार करूनच घेतलेला असावा. अन एकदा तो घेतला की त्यावर ठाम राहता यायला हवं अन्यथा आपण नाहक रोष निर्माण होतो, हा संदेश या निमित्ताने मिळाला. 18 तारखेच्या छाननीत 110 अर्ज (तर 90 व्यक्ती) वैध ठरले. अर्ज अवैध ठरवण्यात आलेल्यांपैकी 2 व्यक्तींनी दिवाणी जिल्हा न्यायालयात अपील केले. अपीलाचा निर्णय 24 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला व मा. न्यायालयाच्या आदेशाने त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला. अशाप्रकारे एकूण 92 व्यक्ती निवडणुकीत अंतिम उमेदवार होत्या. त्यापैकी 85 उमेदवार हे सदस्य पदासाठी तर 7 उमेदवार अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत होते. आयोगाच्या वेळापत्रकानुसार 26 नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. त्यानंतर केवळ 6 दिवसातच मतदानाचा दिवस (2 डिसेंबर) होता.
प्रचारासाठी पुरेसा वेळ नसल्याने सर्वच उमेदवार हर तर्हेने प्रचार करु लागले, मात्र निवडणूकीत फार मोठी कुठलीही अडचण न येता निवडणूक सुरळीत पार पडणार इतक्यात परत एक दिवस अगोदर राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आले, ज्या ठिकाणी विहित वेळेत मा. जिल्हा न्यायालयाचे अपीलवरील निकाल प्राप्त झाले नाही त्यांची निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहे व ती 20 डिसेंबर रोजी होईल. आमच्याकडे दोन प्रभागातील निवडणूक या निर्देशांमुळे पुढे गेली. उर्वरीत प्रभागातील मतदान 2 डिसेंबरला पार पडले. वाढीव कालावधी मुळे काहीसे काम वाढणार होते. यात सर्वात महत्वाचे काम होते निवडणूक झालेल्या EVM मशिन्स सुस्थितित ठेवणे. यासाठी तब्बल 21 दिवस अधिक पोलिसांचा फौजफाटा सांभाळावा लागणार होता, परंतु त्याही पेक्षा महत्वाची जबाबदारी होती ईव्हीएम सांभाळण्याची. बऱ्याच ठिकाणी उमेदवारांनी अभिरक्षा कक्षाबाहेर स्वतः पाळत ठेवणे, स्वतःचे सिसिटीव्ही लावणे, असे प्रकार बातम्यामध्ये बघायला मिळत होते. सुदैवाने आमच्याकडे असा प्रकार झाला नाही. हा खरंतर उमेदवारांचा निवडणूक प्रक्रियेवर आणि आमच्यावरचा विश्वास होता, ज्याला आम्ही देखील तडा जाऊ दिला नाही. सर्व प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. दोन प्रभागाची निवडणूक 20 डिसेंबर रोजी पार पडली. दुसऱ्या दिवशी मतमोजणी झाली. मतमोजणी दरम्यान जरासा गोंधळ झाला. त्याचे कारण असे की एका पक्षाच्या उमेदवाराने फेर मोजणीची मागणी केली. मात्र मागणीप्रमाणे फेर मोजणी करु दिल्यानंतर एकाच ईव्हीएम ची मोजणी केली अन संबंधित उमेदवाराची शंका दूर झाली. एकंदरीत मतमोजणी देखील व्यवस्थित पार पडली. दोन दिवसाने म्हणजेच 23 डिसेंबर रोजी निवडून आलेल्या उमेदवारांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली अन तात्पुरत्या बदलीचा कार्यकाळ बदली आदेशातील तरतुदीनुसार संपुष्टात आला. 24 डिसेंबर रोजी पुनःश्च हरिओम म्हणत माझ्या मूळ पदस्थापनाच्या ठिकाणी म्हणजेच मारेगाव नगरपंचायत येथे रुजू झालो.
50 दिवसाच्या या कालावधीत देखील आपण तात्पुरते आहोत. फक्त निवडणुकीसाठी आपल्याला इथे पाठवलं आहे, असा विचार न करता पूर्ण कार्यालयीन कामकाज व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. सर्वात पहिली गोष्ट केली ती म्हणजे विभागप्रमुख यांचा एकत्रित आदेश पारित करणे. माझ्या अगोदरच्या पद्धतीनुसार वेळोवेळी स्वतंत्र आदेश पारित करून कारभार दिला गेलेला होता. यामुळे नक्की कुणाकडे कोणता कार्यभार आहे हे बघायचे असेल तर वेगवेगळे आदेश बघावे लागत होते. मी एकच आदेश करून सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी अभ्यास करून, आवश्यक तिथे स्थळ पाहणी करून, तक्रारदार यांच्याशी संवाद साधून कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. पाणीपुरवठा योजनेच्या प्रलंबित कामासाठी दोन वेळा साईट वरून जाऊन संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. नगरपरिषद शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन 'मुख्याधिकारी यांचा वर्ग' उपक्रम मारेगाव प्रमाणेच इथेही राबवला. नगरपालिकेच्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना मार्गदर्शन देखील केले. कार्यालयीन कामकाज असो नाहीतर प्रत्यक्ष फिल्डवरील अडचणी, दोन्ही ठिकाणी सक्रीयतेने काम केले तर प्रश्न सुटू शकतात, हा आत्मविश्वास येथे काम करताना देखील बळावला. एकमात्र लक्षात आले, आपण योग्य मार्गाने काम करत असू म्हणजे आपल्याला सर्व सन्मानितच करतील अशी अपेक्षा आपण ठेवू नये. आपण योग्य मार्गावर असतानाही सर्वांच्या सोयीचे असू, असं नाही. त्यामुळे काहीही केले आणि कसेही केले तरी कुणी ना कुणी दुखावणारच असते. आपण सर्वांना सर्वकाळ आवडते असू, असं नाही. यावर उपाय एकच, आपण आपले काम नाय्य मार्गाने, नैतिकतेला धरून आणि कायदेशीर पद्धतीने करायचे. आपल्या कामाचा उद्देश स्वहीत नाहीतर लोकहीत असावे एवढेच. एकंदरीत, ही तात्पुरती पदस्थापना माझ्या कायमस्वरूपी स्मृतीचा भाग झाली. मारेगाव ला 24 डिसेंबर रोजी सकाळी रुजू झालो, अन त्याच दिवशी दुपार नंतर अंदाजे 4 वाजता अनपेक्षित वेळी अपेक्षित ठिकाणच्या बदलीचा आदेश येऊन धडकला. प्रशासकीय प्रवासातील पुढचे स्टेशन होते - अकोट, जि. अकोला.....
#पांढरकवडा #तात्पुरती_पदस्थापना #निवडणूक #दुसरे_स्टेशन








