Saturday, May 19, 2018

चारोळी...... सत्तेची समीकरणं

चारोळी........

इथे सत्तेची समीकरणं आता
पैशाच्या साह्यानं सोडवली जातात
म्हणुनंच लोकशाहीवर संकटं
राजरोस ओढवली जातात......।।

Friday, May 18, 2018

पञ... 'ति'ला

प्रिय.......

              वैशाख नुकताच संपलाय पण तुझ्या विरहात माझ्या काळजात पेटलेला वैशाख वणवा काही केल्या थंड व्हायला तयार नाही , म्हणुन काळजातली हाक कागदावर उतरवुन तुझ्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न म्हणजे हे पञ. थेट कारण सांगुन पञाची सुरवात केली म्हणुन आश्चर्य चकीत होऊ नकोस , नाही तु होणारही नाहीस कारण माझा भिडस्तपणा , थेट विषयाला हात घालणं , हे तुला ज्ञात आहेच. पण तरीही असं थेट विषय सांगणं एखाद्या लेखकाला शोभायचं नाही. लेखकानं कसं गोष्टी फिरुन , शब्दांचा पुरेपुर वापर करुन सांगायला हवी पण माझं तसं नाही. शब्द फुकट मिळतात काय कितीही वापरायला ? , असो. मी तुझ्या दुराव्या बद्दल बोलत होतो. वैशाख संपुन हा अधिक मास लागलाय तो खरच अधिकचाच आहे . तो नकोच होता म्हणजे महिना लगेच कटला असता अन् आपल्याला हा एक महिन्याचा दुरावा सहन करावा लागला नसता. पण ते आपल्या हातात नाही ना , काय करणार. बरं कशी आहेस..? अगं तु सुंदर आहेस हे माहित आहे मला , मी तब्बेतीबद्दल बोलतो. मस्त आहेस ना. माझी आठवण येतेय...? आता लगेच प्रतिप्रश्न करु नकोस.. मला तुझी आठवण येत नाही..( रुसलीस काय ...? अगं आठवण येण्यासाठी आधी विसरावं लागतं अन् मी तुला विसरलेलोच नाही , काय ? ). बरं ते असु दे... काय करतेस...? तब्बेत कशी आहे ...?( वारंवार  तब्बेतीचं काय विचारतोस ? असं म्हणु नकोस .. अगं तुझी तब्बेत ठिक असली की मला ठणठणीत  वाटतं म्हणुन विचारतो... माझ्या स्वतः साठीच की ,फार स्वार्थी आहे मी.. हसु नकोस.. पुढचा प्रश्न वाच...) सुट्यांचा मस्त कुठे फिरण्याचा प्लान आहे का...? नाही माणसानं फिरायला हवं .त्याशिवाय ही दुनिया कळायची नाही. चार भिंतीत आपलं घरंच आपलं विश्व असतं... पण बाहेर पडल्यावरच विश्वाचा पसारा कळतो. बघ माझा शहाणपणा झाला सुरु. तु हे सोड ... पण मस्त फिरुन घे .. कारण हे विश्व माझे घर आहे असं आपली संस्कृति सांगते , आपलं घर हे विश्व आहे असं नाही... असो. बघ कसा भरकटतो मी, मी आपलं‌ साहित्यातंच सारं शोधतो... ही पुस्तकंच मला सारी भ्रमंती करवतात ... ते फिरवात दगडांच्या देशात , प्राण्यांच्या वस्त्यात अन् माणसांच्या कळपात देखील.. बरं बस्स झालं हे पुस्तकपुराण ... तु तुझं सांग... कसे जाताय हे दिवस... इथे मला एक एक दिवस एका युगासारखा वाटतोय... कटता कटत नाहीय. इतक्या दिवसात तु दिसली नाही , मनं आजारी पडलंय.. कसला आजार ....? तुझ्या प्रेमाचा.... आता लवकर भेटुन तुझे उपचार घ्यावेत त्याशिवाय बरं नाही वाटायचं.... मी येतोय ..... तु आराम कर .... ऊन्हाचं लय बाहेर फिरु नकोस.. ऊन्हाचा कडाका जास्त आहे.... तुला ती ऊन्हाची झळ जाणवेल लगेच पण माझ्या काळजातली कळ... ती जाणवेल तेंव्हा माझा ऊन्हाळा संपेल... माझ्या मनाची माती तुझ्या प्रेमाच्या पर्जन्याशिवाय तृप्त व्हायची नाही.... करशील ना तीला तृप्त.... ?
मी वाट पाहतोय..... त्या सरीची...

                                          तुझाच.........

असंच काहितरी.....~ भगतसिंह


असंच काहितरी


अंगाई - निंबोणीच्या झाडामागे

निंबोणीच्या झाडामागे
आता चंद्र लपत नाही ।
DJ ऐकणारे बाळ हे
आता अंगाई ऐकत नाही ।।

Chatting च्या नादात बाळ
चंद्राकडे पाहतंच नाही ।
ती Offline गेल्याशिवाय
बाळ काही झोपतंच नाही ।।

वेदना

वेदना असल्याची
मुळीच खंत नाही ।
असे थोडेच आहे
की वेदनेला अंत नाही ।।

पण वेदनेवरती बोलायलाही
हल्ली उसंत नाही .... ।
नको गाळुस आसवे तु
तुझी आसवे मज पसंत नाही ।।

Tuesday, April 17, 2018

माय अन् माती

माय अन् माती....

माझ्या माय अन् मातीचं
खरंच लय जवळचं नातं हाय
मायच्या घामाच्या धारा
माती पुसू लागते
अन् मातीवरल्या भेगा
मायच्या पायावर दिसू लागते .....

मायनं मातीला संग दिला म्हणुन
अन् मातीनं मायला रंग दिला म्हणुन
मला माय अन् मातीत,
दंग होता आले
अन् माझ्या कवितेला मायच्या तोंडचा ,
अभंग होता आले....

*🖊 शशिकांत मा. बाबर*
*( बोररांजणी , जि. जालना )*
संपर्क:- ९१३०६२०८३४

*www.shashichyamanatale.blogspot.com*

Monday, April 2, 2018

तुला बघताच

तुला बघताच
दाबले जातात कचाकच ब्रेक
माना वर करुन बघु लागतात
मग एका मागुन एक....
एक एक नजर कशी तु
झेल झेल झेलुन घेतेस
चेहर्यावरच्या स्कार्पला
आणखी वर नेतेस...
तु शांत पणे सहन करतेस
इथेच चुकतेस तु..
जगाला भिडण्यापेक्षा
स्वतःला जास्त सावरतेस तु
म्हणुनंच मग,
ही एक एक नजर
आग ओकु लागते ....
अन् बघणारी बांडुगुळं
आणखी सोकु लागते..
आणि हो , उद्या काही बोललीच तु
तर हि औलाद तुझ्यावरच
कुञ्यावाणी भोकु लागते..
ह्या अशा नजरांना
काय ? म्हणुन विचारायला शिक..
अन् वेळेवरती ह्यांच्या नरडीवरती
पाय द्यायला शिक...
ह्यांच्या नजरा लय
विखारी असतात बये
नाक्यानाक्यावर
मौक्यामौक्यावर
ह्या शोधत असतात हिरवळ...
यांची पाहुन ही वळवळ
माझ्या काळजात उडतेच कळ....
नाही म्हणजे मी फार जय वगैरे नाही
पण बाई ला बाईंच समजुन
पहायचं एवढं शिकलोय नक्कीच
म्हणुनंच लेखनीत संचारतं
दहा हत्तीचं बळ...
अन् कविता उभी करते
कागदावर चळवळ...
घेते दखल इथल्या कित्येक
नजरेने होणार्या अत्याचारांची
अन् खडसावते देखील...
वासनेच्या व्यापार्यांनो
नका एवढे हलकट होऊ
नका आपली नीतीमत्ता
अशी गहाण ठेऊ....
संस्कृतीच्या गप्पा मारणार्यांनो
का? कुठे जाते अशा वेळेस तुमची संस्कृति
कुठे जातो त्याग ,
कुठे हरवतो योग
का ? नुसता आठवतो भोग....

*# असंच काहितरी....*

*कवितेला नाव नाही ते द्या अथवा नका देऊ..*
*पण कवितेला प्रतिक्रिया नक्की द्या....*

*नाही म्हणजे तुमची मतं कवितेवर संस्कार करण्यासाठी तेवढीच महत्वाची आहेत...*

*🖊 शशि...( सत्य मांडताना..)*