Tuesday, August 15, 2023

प्रिय पुनम.. छे ..पुनव


स्वातंञ्यदिनासारख्या पविञ दिवशी जन्मास आलेल्या....'यशोमती'च्या सर्वेसर्वा.....मुलाखतीची पण तयारी करायची असते अन् ती किती जास्त करायची असते हे ज्यांच्याकडे पाहुन कळलं त्या ग्रुपच्या संस्थापक-संचालक....शिक्षकाची मुलगी असल्याने शिकवणे हा गुण अगदी रक्तातच असलेल्या...शिकवण्यासोबतच शिकण्यावरही तितकाच भर असणाऱ्या .... महाविद्यालयीन जीवनापासुनच वाचण व लिखाणाची आवड असणाऱ्या .... वाचण, लिखाण याच्या जोडीला आवाजही तितकाच दमदार लाभलेल्या... काहींचा आवाज ऐकुन झोप लागते तर काहींचा आवाज ऐकुन जाग येते, यापैकी दुसऱ्या गटात बसणाऱ्या अन् कित्येक स्पर्धा-परिक्षार्थींना आपल्या आयुष्याच्या डायरीतल्या एका एका पानातुन जागं करणाऱ्या .... अभियांञिकी शिकल्यावर समाजशास्ञाचे धडे घेऊन समाजासाठी चार गोष्टी करण्याची संधी देणाऱ्या क्षेञात म्हणजे प्रशासकीय सेवेत येण्याचा धाडसी निर्णय घेऊन यशस्वीपणे निर्णयास योग्य ठरवणाऱ्या .... पहिल्या टप्प्यात मंञालयात कक्ष अधिकारी तर दुसऱ्या टप्प्यात थेट प्रांताधिकारी/उपजिल्हाधिकारी पदी मजल मारणाऱ्या .... मिळेल ते काम करायला तयार आहे असं म्हणत आपल्याला हवं तेच काम मिळवण्यात पटाईत असणाऱ्या .... महसुल विभागात येण्याआधीच महसुल विभागात कक्ष अधिकारी म्हणुन कामाचा अनुभव घेणाऱ्या .... नंतर जीवाचं महसुल करुन घेण्याआधी जीवाची मुंबई करुन घेणाऱ्या ... ट्रेनिंगच्या परिक्षांचाही एमपीएससीच्या अभ्यासासारखा अभ्यास करणाऱ्या .... फार जास्त कुठे फिरायला न जाता निरंतर अवांतर वाचणावरच लक्ष असणाऱ्या.... कदम कदम जपुन टाकायला हवा, असा विचार करत यशाच्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या.....सगळं असुनही काहीच नाही असं सांगण्यात पारंगत असणाऱ्या.... नाशिकची कन्या अन् अहिराणीवर विशेष प्रेम असणाऱ्या .... 'महसुल प्रशासन असं काही नसतं, प्रशासन म्हणजेच महसुल' अन् 'सबसे भारी दंडाधिकारी', या अशा माझ्या विधानांशी शतप्रतिशत सहमत असणाऱ्या .... माझ्या शब्दांना सतत प्रोत्साहीत करणाऱ्या.... एमपीएससी विश्वातील कित्येकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या .... #DC_Punam मॅडम, आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.... 🎂🎂🎂🎂💐💐💐💐


पुनवेच्या शलाका निरंतर चमकत राहो....महसुल प्रशासनात तुम्हाला तुमची स्वप्न पुर्ण करता येवोत ह्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.... प्रांत होणं हा अंत नाही तर सुरवात आहे, एका प्रशांत महासागरासमान पसरलेल्या प्रशासकीय कारकीर्दीची....ह्या प्रवासाठीही खुप खुप शुभेच्छा......💐💐💐💐


#DC_Punam
#असंच_काहितरी

Sunday, July 30, 2023

परिक्षा अन् प्रशासन

 


परिक्षा हे प्रशासनात येण्याचं फार मोठं द्वार जरी असलं तरी शितावरुन भाताची परिक्षा किंवा घराची कळा अंगण सांगते अशा म्हणीनुसार परिक्षेवरुन प्रशासनाची परिक्षा होत नाही किंवा परिक्षा प्रशासनाची कळाही सांगत नाही...खरंतर प्रशासनात कळा आहेत आणि ह्या कळांना जो कलेने हाताळतो तो खरा प्रशासक...निकाल लागला, कागदाच्या तुकड्याने आपल्या नावाच्या मागे एखादे पदनाम चिटकवले की आपण अधिकारी होऊ, मग सगळे प्रश्न मिटतील, अगदी फुलांच्या पायघड्याच पायवाटेवर अंथरल्या जातील अशा काहीशा कविकल्पना आपल्या डोक्यात तयारीच्या दरम्यान होऊही शकतात, पण ह्या कल्पनाच आहेत हे माञ तंतोतंत सत्य आहे. याचा अर्थ प्रशासन म्हणजे अगदीच ञासदायक आहे असा अर्थ काढण्याची घाई करु नका...प्रशासन अवघड नाहीतर आव्हानात्मक आहे...त्यातही सामान्य जनतेच्या संपर्कात असणारे विभाग जसे महसुल, ग्रामविकास, नगरविकास, व इतर यांना हा अनुभव तर येतोच....महसुल विभाग हा जसे प्रशासनाचा कणा आहे असं अभिमानानं सांगितलं जातं, तितकंच ह्या कण्यावर त्याच्या धन्याचं (लोकशाहीत खरा धनी जनताच) लक्षही बारकाईनं असतं...अगदी गावातली भांडणं असो नाहितर शेताच्या बांदावरुन होणारे वाद... कुणी पाणी अडवलं असो नाहितर कुणी पाणी जिरवलं असो.... घरात पाणी घुसलं काय किंवा विहीरीतुन पाणी गेलं काय ..पुर असो नाहितर दुष्काळ, शासनाची कुठलीही मदत मिळणं असो नाहितर इतर शासकीय विभागांबद्दलची गाऱ्हाणी असो...आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारं मशिन म्हणजे महसुल प्रशासन अशी किमान बऱ्याच जणांची समजुत आहे. ह्या समजुतीमागे बराच प्रदीर्घ इतिहासही आहे, त्याबद्दल तुर्तास इथे चर्चा टाळुया...तर आपण म्हणत होतो की, मुळात प्रशासन हे आव्हानात्मक आहे....मग जर प्रशासन आव्हानात्मक असेल तर प्रशासनाचा भाग होऊ पाहणारे आपण सर्व भावी अधिकाऱ्यांनी ह्या आव्हानांना सामोरं जाण्याचं कसब आपल्यात भिनवायलाच हवं ना....एखाद्या विषयाचा आवाका लक्षात घेणं, त्यासाठी अधिकची माहिती मिळवणं....आपल्या आजुबाजुच्या चालुघडामोडींना फक्त लक्षात ठेवण्याबरोबरच असं का घडतय ? यावर काय उत्तर असु शकतं याचा विचार करणं...परिक्षेचा अभ्यास एकट्याने जरी अभ्यास करत असु तरी एकलकोंड्यासारखा अभ्यास न करणं...आपल्या सामुहिक वर्तवणुकीवर लक्ष देणं....आपल्या चालण्या-बोलण्यावर लक्ष देणं....एखाद्या बाबीवर विचार कसा करायचा अन् आपण कसा करतो यावर देखील विचार करणं...परिक्षेची तयारी करताना ह्या इतर अनुषांगिक बाबी ज्या आपल्या स्वभावात आणणे गरजेचे आहे...ज्या आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग असणं गरजेच्या आहेत, त्या सर्व गोष्टींचाही विचार झाला पाहिजे...नाहितर मी अन् माझी पुस्तकं एवढच केलं तर कदाचित आपण अधिकारी होऊ पण एक उत्तम प्रशासक होणं कठीण होईल....आता हे सगळं करायचं म्हणजे अभ्यासाच्या क्लास मध्ये भरीस भर म्हणुन व्यक्तिमत्व विकासाचे पण क्लास लावायचे का ? तर मुळीच नाही....ह्या गोष्टी स्वतःहुन शिकता येतात...ठरवुन काही गोष्टी अंगवळणी पाडुन घेता येतात...व्यसनं कशी न कळत लागतात, तसं चांगुलपणाचं...सदवर्तवणुकीचं व्यसन लागत नाही, ते लावुन घ्यावं लागतं...फक्त तसा प्रयत्न करणं...जाणिवपुर्वक काही गोष्टी करणं अन् काही गोष्टी टाळणं...हे जमायला हवं...एवढंच कशाला अगदी उपलब्ध वेळेचं नियोजन योग्य प्रकारे करणं अन् ते काटेकोरपणे पाळणं ही गोष्ट देखील पुढे प्रशासनात आपल्याला फार जास्त उपयोगी ठरणारी आहे...त्यामुळे असा सर्वांगिक अभ्यास करण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे....नाहीतर परिक्षा, निकाल अन् सत्कार यातुन बाहेर आल्यावर जेंव्हा आपण काम करायला सुरवात करु तेंव्हा लक्षात येते की मी फक्त प्रशासनाचा अर्धचंद्रच बघितला होता, चंद्राची अशीही एक बाजु आहे जी तयारीच्या काळात आपल्या लक्षातच आली नाही....ह्या दुर्लक्षित बाजुसाठी आपल्याला अजुन बरेच काही शिकावे लागणार आहे.


#असंच_काहितरी

Friday, June 23, 2023

अ(प्रिय) राहुल


(RFO दर्शना पवारची तिचा मिञ राहुल कडुन हत्या.....ह्या दुर्दैवी घटनेनंतर मनातले 👇)

(अ)प्रिय राहुल.....


प्रेम प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं‌ असं पाडगावकर म्हणतात....पण राहुल आमचं प्रेम तुझ्यासारखं नाही..असुच शकत नाही...प्रेम‌ मी ही केलं होतं...पण कधी तिला बांधुन‌ ठेवलं नाही रे...प्रेम म्हणजे मुक्त करणं...प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला‌ तिचं आकाश देणं, कुठल्याही बरसातीची अपेक्षा न ठेवता....मला मान्य आहे, तुझा राग...तुझा मनस्ताप...मान्य तिच्या एका नकारात आयुष्य उद्ध्वस्त करणारा सुरुंग होता, पण आता तुझ्या नशिबीही तुरूंग आहे...ह्याची जराशी जाणिव तुला आधी कशी झाली नाही ?..आई सोडुन‌ गेलेल्या लेकराला जगताय पाहिलय आपण...गाय निर्वतलेल्या वासराला हंबरुन‌ हंबरुन का होईना गोठ्यात मोठं होताना पाहिलंय आपण...थोडक्यात आई जाण्याचं दुःखही आपण पचवु शकतो...सोपं नसतंच ना रे ते ही...पण‌ जमतंच ना...जमवावंच लागतं....जशी आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती एका वेळेवर येते, तशी एका वेळेवर ती निघुनही जाणारच असते.... आई जाण्याच्या दुःखापेक्षाही हा बाई सोडुन‌‌ जाण्याचा ञास इतका असहनीय व्हावा अन्‌ त्यातुन तुझ्या हातुन एवढा मोठा घात व्हावा हे अनाकलनीय आहे...मी काही बाबा तुला उपदेश द्यायला पञ लिहीलं नाही...माझ्या मनाची‌ घालमेल कागदावर उतरवणं हेच खरे पञास कारण. नाहीतर तु आधीच‌ एवढा रागात त्यात हे पञ हाती पडल्यावर तिथं जवळपास असणाऱ्याचाच जीव घ्यायचा तु....फक्त एक लक्षात ठेव मिञा, तुझ्या एका कृतीनं आकाशात भरारी मारु पाहणाऱ्या कित्येक चिमण्यांची पंखच छाटली जातील आता....त्याचं काय ? पोरींना पाखरु म्हणतो‌ आपण....पण‌ ह्या पाखरांची शिकार जर आपणच गेली‌ तर आकाशात पाखरांचे थवे दिसतील कसे...जर आकाशात हवे असतील‌ थवे, तर पाखराला कशाला पिंजऱ्यात न्यावे ? आणि तु तर पिंजऱ्यात नाहीतर पाखराला‌ मातीत घातलेस रे.... लाज वाटतेय तुझी...मनात नुसती विचारांची उलथापालथ होतेय..डोकं सुन्न झालय...कालपर्यंत मला वाटायचं की कुठल्या तरी जंगली प्राण्यानं हल्ला केला असावा, पण तुच एवढा जंगली झाला असशील असं वाटलं नव्हतं रे.... परिक्षा पास होऊन अधिकारी होऊन तु ही इंतकाम घेऊ शकला असतास ना...पण तु स्विकारलेला पर्याय काही योग्य नाही.... तो कधीच कुणाला योग्य वाटणारही नाही...होकार आणि नकार याचा तितक्याच शांतपणे स्विकार करतं ते खरं प्रेम... पण आता सगळ्याच चर्चा वायफळ...चर्चांची गुऱ्हाळं सुरु झालीत जागोजागी...पण त्यातुन हाती काय येईल ? फक्त चोथा..... चार दिवस गप्पा रंगतील...लोकं हळहळ करतील....परत जैसे थे ..... तसेही‌‌ आम्हीही काय करु शकतो म्हणा...फार‌ फार तर चार‌ अश्रु ढाळु...मेणबत्त्या जाळु...परत आपापल्या कामाकडे वळु....मग कोण दर्शना कोण राहुल सारेच विसरुन जाऊ हळू हळू.... पण मिञा, तु एकट्या दर्शनाची हत्या नाही केलीस....तु मुलांवर विश्वास ठेवुन त्याच्याशी जवळीक करणाऱ्या मुलींच्या मुलांवरच्या विश्वासाची हत्या केलीस...आपली मुलगी दुर शहरात एकटी देखील सुरक्षित आहे, असा विश्वास असणाऱ्या पालकांच्या विश्वासाची हत्या केलीस...प्रेम म्हणजे लफडं नाही, असा प्रेमावर विश्वास असणाऱ्यांच्या विश्वासाचीही तु हत्या केलीस..... तुला सजा काय व्हायची ती होईल, पण ती फक्त दर्शनाच्या हत्येसाठी असेल... बाकी गुन्ह्यांची सजा कोण अन् कशी देणार ? आता कदाचित उद्या तुला पश्चाताप होईलही तुझ्या एका क्षणात घेतलेल्या टोकाच्या निर्णयाचा.... तेंव्हा फक्त एक कर, उद्या दुसरा राहुल तयार होऊ नये म्हणुन तुझ्या मनातले नक्कीच ओरडुन जगाला‌ सांग...सांग त्यांना की नकार पचवणं कठीण असतं, पण‌ अशक्य नसतं....तो एक क्षण‌ सावरला तर उभं आयुष्य सावरता येतं....बघ तुला‌ जमतय का ? तुझ्यातल्या टनभर दुर्गुणांची चर्चा होताना, तुझ्यातल्या कणभर चांगुलपणावर मला विश्वास वाटतो म्हणुन तुला पश्चाताप होईल, अशी आशा बाळगतो... 

[दुसरा राहुल आपल्या आसपास घडु न देणे, हिच तुला आमची खरी श्रद्धांजली असेल दर्शना...तोपर्यंत आमच्या ह्या शाब्दिक श्रद्धांजलीचाच स्विकार कर..]



#असंच_काहितरी

Saturday, June 3, 2023

"एमपीएससी, क्लास आणि आपण..."



"एमपीएससी, क्लास आणि आपण..."


नमस्कार मिञ-मैञिणींनो,

MPSC & UPSC परिक्षांचे निकाल लागले की "जिकडे तिकडे चोहिकडे, शुभेच्छांचे, सत्काराचे सडे" असे काहीसे वातावरण तयार होते..निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे मोटिवेशनल व्हिडिओ हळू हळू पसरु लागतात...कित्येकांच्या कर्मकहाण्या कळत न कळत कानावर येऊ लागतात... एकच टाॅपर सगळ्या क्लासवाल्यांच्या बॅनरवर दिसु लागतात...प्रत्येकजण आपल्या क्लासचे एवढे निवडले गेले, तेवढे निवडले गेले असे सर्वदूर सांगत असतो...नक्की कळत नाही की, नेमकं हा एक व्यक्ती किती ठिकाणी होता..कुणाकुणाचे मार्गदर्शन घेत होता...या सगळ्यांच्या पलिकडे आमच्या सारखे काही असतात, जे सांगतात मी कोणताच क्लास लावला नव्हता, घरीच अभ्यास केला, वगैरे वगैरे...मग या सगळ्यात भांबावून जातो तो या क्षेञाकडे नुकताच वळलेला किंवा नव्याने वळू पाहणारा परिक्षार्थींचा गट...नक्की कोण खरं सांगतय..? नक्की आपण या परिक्षा पास करण्यासाठी काय करावं ? क्लास लावावा की नाही ? पुण्याला जावं की नाही ? एकट्याने अभ्यासाने होईल का ? एवढ्या लाखात आपण कसे सलेक्ट होऊ ? असे एक ना अनेक प्रश्न अनेकांना पडत आलेले आहेत...आताही पडत असणारच.....तर याबाबतीत मी माझ्या तयारीबद्दल आपल्याशी बोलतो, त्यातुन बरीच प्रश्न सुटतील अशी आहे..

तर मी माझी राज्यसेवेची तयारी जुलै 2019 मध्ये सुरु केली....तत्पुर्वी मी 2019 ची पुर्व परीक्षा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना देऊन पास झालो होतो, पण मेन्सचा सिलॅबस देखील मी प्रीचा निकाल लागे पर्यंत बघितलेला नव्हता...मग जून मध्ये पदवीचा लास्ट ईयरचा निकाल लागला अन् जूलै मध्ये मी 2019 ची मुख्य परिक्षा झाल्यावर खरा अभ्यास सुरु केला...त्याअर्थाने माझी 2020 ची परिक्षा ही माझ्या साठी पहिलाच प्रयत्न ! मग राज्यसेवा करायची तर करायचं काय ? हा प्रश्न होता, पण कुठे क्लास लावू का ? हा प्रश्नच माझ्यासाठी नव्हता, कारण क्लासची ५०-६० हजार फिस मी भरूच शकणार नव्हतो... म्हणुन हा प्रश्न निकाली काढुन मी माझी डिगरी जिथे पुर्ण झाली तिथेच म्हणजे जळगावलाच (खान्देश) सेल्फ स्टडी म्हणजे आपण आपला अभ्यास करायचे ठरवले... योगायोगाने मोठा भाऊ जून 2019 मध्ये जाॅबसाठी जळगावला आला, मग दोघांनी मिळून रुम केली अन् अभ्यासाला सुरवात केली..माझ्या अभ्यासाचा पहिला टप्पा होता, मुख्य परिक्षेचा अभ्यासक्रम नीट बघणे...बऱ्याच UPSC Toppers ला ऐकलेले होते, त्यांचे म्हणणे असायचे की मुख्य परिक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला पाठच असला पाहिजे...मग मी तसा प्रयत्न करायला सुरवात केली...जुने पेपर बघुन 360° अभ्यासक्रमाचे डिकोडींग  करायला सुरवात केली...एक महिना फक्त अभ्यासक्रम, जुने पेपर बघणे अन् प्रश्न नक्की कशातुन विचारले जातात हे स्वतः शोधणे (उदा. लक्ष्मिकांत मधुन प्रश्न येतात हे ऐकलेले होते, पण तरीही GS2 चा पेपर घेऊन खरच प्रश्न ह्या पुस्तकातून येतात का ? हे स्वतः बघायला सुरवात केली) हाच उपक्रम चालू होता. ह्यातुन सगळ्यात मोठा फायदा झाला तो म्हणजे मला परिक्षा बहुतांशाने कळली...नक्की काय विचारले जाते ? का विचारले जाते ? अन् कुठून विचारले जाते ? ह्या प्रश्नांची खाञीशीर उत्तरे स्वतःच स्वतःला भेटत गेली...स्वतःवरचा विश्वास वाढत गेला...आपण हे करू शकतो, हा विश्वास बळावत गेला...अन् एकटा असूनही कधी फारसा सेल्फ डाऊट वाटला नाही....

एक महिन्याच्या ह्या विश्लेषणानंतर मी माझी बुकलिस्ट फायनल केली....बुकलिस्ट फायनल करताना अजुन एका गोष्टींची मला फार मदत झाली, ते म्हणजे श्री. सदाशिव नांदे (ACST) सरांचे 2018 च्या मेन्सच्या पेपरचे सविस्तर विश्लेषण (हे युट्युबवर फ्री उपलब्ध होते)...एकदा ही बुकलिस्ट फायनल झाली की मग तन-मन-धन अगदी परिक्षेसाठीच असा विचार करुन अभ्यास करायला‌ सुरवात झाली...2020 ची पुर्वपरिक्षा 5 एप्रिल 2020 ला नियोजीत होती, त्यानुसार जुलै - डिसेंबर 2019 मेन्सचा अभ्यास अन् जानेवारी पासुन पुर्वच्या विचाराने अभ्यास असे ठरवले....मग मेन्सचा अभ्यास करताना 6 महिने फक्त आणि फक्त अभ्यासच....हा सहा महिन्यांचा काळ माझ्या आतापर्यंतच्या पुर्ण तयारीतील सर्वाधिक अभ्यासाचा काळ होता...साधारण 12-14 तास अभ्यास होत होता...अर्थात कधीतरी दिवसभर टाईमपास ही होत असायचा, पण राञी झोपताना पश्चाताप व्हायचा...ह्या पश्चातापातून मग अजुन आग पेटायची...मनोमन निश्चय करत परत नव्या जोमाने दुसऱ्यादिवशी अभ्यास....एकंदरीतच ह्या काळात पुस्तकं वाचणे, एकदा पुर्ण त्या पेपरचा अभ्यास झाला की जुने पेपर सोडवणे..अन् परत पुढच्या पेपरचे वाचणे असा क्रम चालु होता.. जुने पेपर, काही प्रॅक्टीस प्रश्न ह्या सगळ्यांमधून Facts लक्षात राहत गेले...अभ्यास वाढला...मग प्री च्या अभ्यासासाठी टेस्ट सिरीज लावून अभ्यास सुरु केला....पण ठरल्या नुसार सारे होईल कसे?...नियतीच्या मनात एका वर्षात पास होऊ देणे नव्हतेच बहुधा...कोरोना आला, लाॅकडाऊन लागले...सगळे नियोजन बारगळले..कसेतरी स्वतःला सावरत अभ्यास चालु ठेवला..बरेच चढ उतार आले, पण अभ्यास बंद केला नाही....

त्याचेच फळ म्हणजे परिक्षा जेंव्हा झाली तेंव्हा प्री पासुन पोस्ट पर्यंत चांगलेच मार्क मिळत गेले अन् नीट अभ्यास करुन दिलेल्या ह्या अटेंप्ट मध्ये राज्यात 16 व्या क्रमांकाने पास झालो...एवढेच नाही तर ह्या जवळपास एक-दिड वर्षाच्या पुर्ण एकाग्रतेने केलेल्या अभ्यासाच्या जीवावर 2020,2021 & 2022 ह्या तिन्ही वर्षीच्या राज्यसेवेच्या पुर्व व मुख्य परिक्षा पास करता आल्या.....थोडक्यात काय तर एक वेळ ईमानदारीने परिक्षेला पुर्ण समजुन नीट नियोजन करुन अभ्यास केला, बाकी गोष्टींपासुन दूर राहिलो, तर नक्कीच आपण ही परिक्षा आपण आपल्यापरीने पास होऊ शकतो...ते ही चांगल्या रँकने....तेंव्हा ह्यावरुन एक गोष्टतर नक्कीच मी स्वानुभवातून सांगू शकतो, ती म्हणजे तुम्ही जर अभ्यासात बरे असाल (अर्थात बरे म्हणजे एखादी गोष्ट वाचून समजुन घेता येते असे) तर निश्चितच शून्य रुपयात आपण तयारी करु शकतो....पुण्यात मी 2020 च्या मुलाखतीसाठी म्हणुन पहिल्यांदा गेलो, त्याआधी पुर्ण तयारी जळगावला रुमवरच झाली होती...त्यामुळे पुण्यात गेलेच पाहिजे का ? असा प्रश्न विचारताना पुण्यात नक्की कशाला जायचे ? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे...पुणे स्पर्धापरिक्षांची (विशेषतः एमपीएससीची) पंढरीच आहे, पण ह्या पंढरीत गेल्यावर आपल्याला खरंच पांडूरंग भेटेल का ? की फक्त मंदिराच्या कळसाचेच दर्शन होईल ह्याचा अंदाज आधीच घेतला पाहिजे...बाकी आॅनलाईन माध्यमामुळे पुणे आपल्या मोबाईलमध्ये आले आहे...तरीही फक्त वातावरण हवे, म्हणुन पुण्यात जातो म्हणणारे बरेच आहेत...तिथे नक्की कोणते वातावरण मिळते हे देव जाणे... मलाही सुरवातीला वाटायचे की पुण्याला जावे वगैरे...पण माझ्या पुण्यात तयारी करणाऱ्या मिञाने मला कायम रोखले अन् सांगितले की तुला वाटते तसे इथे फार काही दिव्यवलय नाहीये...(विरोधाभास असा होता की तो स्वतः तिथे गेला होता, पण मला रोखत होता...कदाचित मेल्यावर स्वर्ग दिसतो तसा त्याला दिसला असावा, म्हणुन तो मला आत्महत्येपासून रोखत होता...) ह्या सगळ्याचा अर्थ मुळीच असा नाहिये की पुण्यात तयारी करुच नये...ज्यांना परवडते त्यांनी अवश्य करावी...आपला एखादा २-३ मिञांचा ग्रुप असेल, आपण तिथे जाऊन क्लास वगैरे करणार असु तर पुण्यात जायला हरकत नाही...पण फक्त अभ्यास करायचा आहे, मग तिथे जातो, तिथे जाऊन रिडींग लावतो अन् सेल्फ स्टिडी करतो असं नियोजन असेल तर मग यावर पुनर्विचार करायला हवा..असो..ह्याबाबतीत विचार करुन निर्णय घेऊनच आपण सगळे अभ्यास करत आहात...किंवा करायचा ठरवत आहात..आता जो मुळ प्रश्न होता की मी सेल्फ स्टडी करुन अभ्यास केला वगैरे ठिक ..पण याचा अर्थ मी कुणाचीच मदत घेतली नाही असा नाही...माझ्या तयारी दरम्यान मी खुप वेगवेगळ्या ठिकाणाहून मदत घेतली, अर्थात हे सर्व परवडणारे होते म्हणुन...मी तयारी दरम्यान कोणती पुस्तकं वाचली याची यादी स्वतंञ बुकलिस्ट म्हणुन आधीच शेयर केलेली आहे..पुस्तकांशिवाय इतर मदत खालीलप्रमाणे मिळाली....


१) MPSC2020 Prelims Test Series - पृथ्वी अकॅडमी, डेक्कन आय ए एस (Both were online) आणि भुषण धूत अकॅडमी (दिपस्तंभ, जळगाव येथे offline)

२) MPSC2020 Mains Test Series - Deccan IAS (Online, माञ PDF डाऊनलोड करुन प्रिंट करुन वेळ लावून सोडवायचो) & Unacademy (MPSC Combat मधून Unacademy Plus Subscription फ्री मिळवले होते, त्यामुळे Unacademy च्या टेस्ट सिरीज त्यांच्या App मधुन सोडवल्या....विशेष म्हणजे डेक्कनची टेस्ट सिरीज लावण्यासाठी पैसे नव्हते, Unacademy ने Mains साठी Test series competition ठेवली होती, त्यामध्ये 3000/- Amazon voucher जिंकलो, अन् त्यातून डेक्कनची टेस्ट सिरीज लावली....Thanks to Unacademy)

3) MPSC2020 Mock Interview - (हे फ्री असतात) कोलंबे सर व मनोहर भोळे सर यांच्या कडे one to one Mock दिला, दिपस्तंभ व इतर अतिप्रसिद्ध नसलेल्या ३ ठिकाणी पॅनेलसमोर माॅक दिला)

MPSC2021 च्या पुर्व व मुख्य साठी कुठलीही Paid Test Series लावली नाही. 

MPSC2021 साठी माॅक Interview - कोलंबे सर (भगिरथ अकॅडमी), संकल्प देशमुख सर (अध्ययन अकॅडमी) [दोघेही अतिशय सविस्तर आणि सखोल मुलाखत घेतात] आणि मनोहर भोळे सर (राजमुद्रा अकॅडमी)

या सगळ्यांशिवाय YouTube च्या माध्यमातुन ज्यांचा मला फायदा झाला ते :

१)Some Channels like Bhatner IAS, Genius Maths and WiFi Study (For CSAT) (सचिन ढवळे सर आणि आरगडे सर यांचे CSAT साठीचे Videos)

२) सचिन भस्के सरांचे व्हिडीओ (सामान्य विज्ञानासाठी)

३) मृणाल सर/तेच ते UPSC वाले (For Economy's Concept)

४) Study IQ & Sushil's Spotlight - (For Current affairs)

थोडक्यात मी टेस्ट सिरीज वगळता बाकी कुठलीही बॅच किंवा क्लास कोणत्याही क्लासेसचा लावलेली किंवा लावलेला नव्हता.....जे फ्री मध्ये उपलब्ध होते ते निश्चितच वापरले, पण तेही फार Selectively...

त्यामुळे माझ्या मते तरी MPSC ची तयारी कमीत कमी पैशात आणि कमीत कमी वेळेत करणे शक्य आहे, फक्त गरज आहे ती आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची ! एक ते दोन वर्षाच्या प्रामाणिक प्रयत्नांत परिक्षा पास होणे शक्य आहे...(अपवादात्मक परिस्थितीत 3-4 वर्ष लागू शकतात..किंवा जाॅब करत असु तर कदाचित अजुन जास्त) जर कुठे काही कमी जास्त वाटत असेल तर क्लासेसची मदत नक्कीच घेऊ शकता, अन्यथा साधारणपणे आपला अभ्यास व्यवस्थित असेल आणि योग्य दिशा असेल तर निश्चितच ध्येयप्राप्ती अवघड नाही...हे मान्य करायला हवे.

हे सगळे एवढे सविस्तर लिहीण्याचा उद्देश्य एवढाच की मी असे केले ... तुम्हीही कदाचित माझ्यासारख्याच परिस्थितीत असाल तर तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं यातुन मिळाली असतील...टाॅपर सगळीकडे कसे दिसतात याचे मुख्य कारण माॅक interview असते...मुख्य परिक्षेनंतर Mock interview free घेतले जातात, त्यामुळे सर्वच जण सर्वच ठिकाणी माॅक देण्याचा प्रयत्न करतात...त्यामुळे कुठल्या एखाद्या बॅनरवर टाॅपरची गर्दी दिसली म्हणजे ते सगळे त्या क्लास मध्ये शिकूनच अधिकारी झाले, असा गैरसमज मुळीच करुन घेऊ नये....आता सोशल मिडीया मुळे निवडलेल्यांशी सुद्धा सहज संपर्क होऊ शकतो ...राहिला प्रश्न क्लासचा तर मी एवढच सांगेल की क्लास लावला म्हणजे आपण पासच होऊ हा मोठा गैरसमज आहे..तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या जीवावरच पास होणार आहात...नदीत उडी मारली म्हणजे आपोआप किनारा गाठता येईल असे नाही, त्यासाठी हात पाय मारावे लागतील...तसेच इकडे क्लास लावणे म्हणजे उडी मारणे...नुसती उडी मारू‌न भागत नाही..असो....क्लासला विरोध करणे हा‌ माझा उद्देश्य नाहीये...ती‌ काही जणांची गरज देखील आहे....आणि क्लास मधून परिक्षाभिमुख कंटेंट देणारे पण क्लास आहेत...फक्त गर्दीचा भाग बनुन, इतरांकडे बघून क्लास लावण्यात अर्थ नाही..नुकतेच मागच्या आठवड्यात एका आईसक्रीमचा गाडा चालवणाऱ्या काकांशी बोलणे झाले, त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी BSC 2nd year la आहे आणि तिने सहा महिन्यापुर्वी एका नामांकीत अकॅडमीचा 1 लाख 15 हजार रुपयाचा क्लास लावला आहे (पैकी 60 हजार‌ यांनी भरलेले आहेत)...सहा महिने झाल्यावर तिला कळले‌ की तिथे अपेक्षे प्रमाणे शिकवले जात नाही...आता तिला परत क्लास बदलायचा आहे तर‌ कोणता क्लास लावू ? त्यांचे म्हणणे होते की मी एकवेळच जेवतो पण मला मुलीला शिकवायचेय, अधिकारी करायचेय ..हे ऐकल्यावर त्यांचे प्रश्नाचे थेट उत्तर मी देऊ शकलो नाही उलट मलाच अनेक प्रश्न पडले..एवढ्या हलाखीच्या परिस्थितीतल्या व्यक्ती जीवाचं रान करुन पैसे भरतात, मुला-मुलींना क्लासला पाठवतात..जर त्यांना तिथे हवे ते मिळत नसेल तर क्लास का लावायचा ?...यात क्लासेसचीच चुक आहे असेही मी म्हणणार नाही...आपली परिस्थिती नसेल तर एवढे महागडे क्लासेस लावण्याची खरच गरज आहे का ? आपल्याला मदत होईल असे अनेक क्वाॅलिटी कोर्सेस युट्युब वर फुकट उपलब्ध आहेत, आपल्या मदतीला शासनाच्या सारथीसारख्या संस्था आहेत...आपण त्याचा फायदा करुन घ्यायलाच हवा...हा विचार मुला-मुलींनी देखील करण्याची गरज आहे...असो. त्यादिवशी काकांशी बोलल्यापासुन मनात होते की याबाबत थोडे सविस्तर बोलावे, आपण नक्की काय केले ? कोणता क्लास लावला का ? कुणाची मदत घेतली ? हे सांगावे....कोण जाणे यातून बऱ्याच जणांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडतील....! सामान्य कुटूंबातल्या मुलांनो, अधिकारी व्हायचे स्वप्न पाहा, पण त्यासाठी लगेच पुण्याला जातो अन् क्लास लावतो असं करु नका...आधी परिक्षेला पुर्ण समजुन घ्या, अभ्यासक्रम काय आहे ? जुने पेपर बघा...काय काय वाचायचे ह्याबाबत पेपर बघुन, टाॅपरच्या मार्गदर्शनातुन अंदाज घ्या अन् अभ्यासाला लागा...आपल्या परिक्षेत न कळण्यासारखे असे फार जास्त काही नसते..वाचुन लक्षात येण्यासारखे बरेच असते...त्यामुळे वाचत रहा...मोफत उपलब्ध स्रोतातून माहिती मिळवा...फारच कठीण वाटत असेल अशा एखाद्या विषयाचा तेवढ्यापुरता क्लाॅस किंवा एखादी बॅच जाॅईन करा...पण पहिल्यांदा परिक्षा समजुन घेऊन वाचत रहा...नक्कीच शुन्य रुपयात तुम्ही ही परिक्षा पास होऊ शकता...आपली परिस्थीती बदलण्यासाठी आपल्याला ही परिक्षा नक्कीच मदत करते, पण ह्या परिक्षेत वारंवार अपयश आल्यावर स्वतःच्या क्षमतांवर विचार करा...प्रत्येक जण मोठा माणुस होऊ शकतो, पण प्रत्येक जण अधिकारी नाही होऊ शकत...त्यामुळे अधिकारी होणं म्हणजेच मोठं होणं असंही नाहीये, हेही ध्यानात ठेवा...तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा...!


#असंच_काहितरी

शशिकांत बाबर
(मुख्याधिकारी, गट-अ, MPSC2021)
(नायब तहसिलदार, MPSC2020)