Monday, October 2, 2023

माझी महसुल डायरी....



तहसिलदार म्हणवत मिरवणं...जिल्हा संलग्नतेदरम्यान विविध कार्यालयात गेलं की नायब तहसिलदार आलोय, असं सांगणं...सबसे भारी, दंडाधिकारी म्हणणं असो नाहीतर महसुल प्रशासन असं काही नसतं, प्रशासन म्हणजेच महसुल प्रशासन असं अभिमानानं सांगणं असो....मागच्या वर्षभरात महसुल विभागात परिविक्षाधिन म्हणुन का होईना पण बरंच काही बघता आलं, शिकता आलं याचा आनंद आहे...प्रशासनात आपल्याला मिळणारी प्रतिष्ठा ही आपल्यावरची जबाबदारी अधोरेखीत करत असते, याची प्रकर्षाने जाणिव झाली... जिल्हा संलग्नतेमध्ये इतर कार्यालयासही भेटी व्हायच्या त्यामुळे शासनाच्या विविध विभागाच्या कामकाजाबद्दल व त्यांचा महसुल विभागाशी असणारा संबंध याची माहीती मिळायची...यातुन महसुल विभागाकडे समन्वयाची जबाबदारी जरा जास्तच आहे...शासनाचा कांकणभर अधिक विश्वास अजुनही महसुल विभागावरच आहे, हे लक्षात आलं...पण ह्या विविध कार्यालयांच्या दोन चार दिवसांच्या संलग्नतेपेक्षा खरा महत्वाचा टप्पा होता, तहसिल कार्यालयात एक स्तर खाली काम करणं...जळगाव-जामोद सारख्या दुर्गम भागात काम करावं लागणार म्हणुन सुरवातीला नाराजी होती, पण प्रशासनात आव्हानं सतत असणार..पाहिजे तिथं, पाहिजे तसं काम करायला मिळणं हे नाटकात शक्य होईलही, पण जीवनात बहुधा शक्यच नसतं...कारण जीवन हे नाटक असलं तरी ह्या नाटकाच्या दिग्दर्शकाशी आपण अनभिज्ञ असतो...तो देईल ती भुमिका म्हणेल त्या ठिकाणी आपल्याला वठवावी लागते...म्हणुनच मिळालेल्या ठिकाणाची फार तक्रार न करता जळगाव-जामोद येथे रुजु झालो...

सुदैवाने तहसिलदार मॅडम ला नवीन पदावर निवड झाल्याचं सांगितल्याने महसुलचा पाहुणा‌ म्हणुनच तिथे वागणुक मिळाली...आठवड्यात एक दोन वेळेस जाऊन भेटलो तरी पुरे, असा अलिखित करार मॅडम सोबत मी करवुन घेतला...पण पहिल्या आठवड्यानंतर लगेच तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं अन् ह्या अशा नैसर्गिक आपत्तीवेळी सगळे करार आपोआप तुटतच असतात...तसा आमचाही करार तुटला..अन् मग माञ सलग आठवडाभर कार्यालयात उपस्थित रहावं लागलं..या दरम्यान पंचनामा काय प्रकार असतो याचा अनुभव आला ...स्वतः जाऊन पंचनामा करावा लागला...लोकांच्या ढिगभर अपेक्षा अन् आपल्याकडे असणारे कणभर अधिकार यामुळे कित्येकदा फक्त हळहळ करण्यापलिकडे आपल्याकडे पर्याय राहत नाही, याचाही अनुभव आला...रास्ता रोको काय असतो ? मोर्चा, उपोषण काय असतं ? याचाही अनुभव आला...अशावेळी लोकांशी काय बोलावं ? कसं लोकांना समजुन सांगावं हे मॅडम सोबत राहुन शिकता आलं...नैसर्गिक आपत्तीप्रसंगी अवेळी काम करणं असो किंवा इतर विभागांशी समन्वय साधुन तातडीने कामं करणं असो...कार्यलयातील अधिक काम करणारे कर्मचारी अन् टाळाटाळ करणारे कर्मचारी दोन्ही इथे पाहायला मिळाले..ह्यातल्या काहींकडुन काय करावं हे शिकता आलं तर काहींकडुन काय करु नये हे शिकता आलं...आपल्याकडे प्रश्न घेऊन आलेल्या लोकांना कशी उत्तरं द्यावीत, कुठे काय बोलावं अन् काय टाळावं याचाही धडा इथे काम करताना मिळाला...लोकांना त्यांच्या प्रश्नाची योग्य उत्तरं दिली तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधानही बघता आलं...

रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुक हे महसुल विभागासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे...रेती वाहतुक करणारे वाहन पकडण्यासाठी गेल्यानंतर ते हाती न लागल्याने अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशन ला जाण्याचाही योग आला..एफ आर आय करण्याआधी आपापसात मिटवुन घ्यायला हवं असं सांगणारे भेटले, गुन्हा नोंदवु नये म्हणुन टाळाटाळ करणारे पण दिसले...अन् तरीही महसुल वर्षाच्या शेवटच्या दिवशी राञी 12 वाजेपर्यंत पोलिस स्टेशन ला थांबुन का होईना एकदाचा एफ आर आय करुनच बाहेर पडायचा निर्धारही पुर्ण करता आला...या सगळ्या साधारण, असाधारण प्रकरणानंतर नव्याने महसुल विभागाला मिळालेली जबाबदारी म्हणजे शासन आपल्या दारी कार्यक्रम..या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक म्हणुन जबाबदारी सांभाळावी लागली..त्यासाठी संबंधीत नोडल व सहायक नोडल अधिकारी म्हणुन नेमलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांशी व महा ई सेवा केंद्रचालकांशी तसेच बस डेपोशी समन्वय साधुन कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना घेऊन जाण्याची व परत आणण्याची जबाबदारी यशस्वी पणे पार पाडता आली...अर्थात या कामात सहकाऱ्यांचीच भूमिका महत्वाची होती, त्यांच्याशिवाय ते शक्यच नव्हते...विशेषतः आमचे सर्व नियमित नायब तहसिलदार यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाची फार मदत झाली...ह्या सगळ्या सोबतच अनेक बारीकसारीक अनुभव हाती‌ लागले...प्रशासनातल्या संधी, आव्हानं, अधिकार अन् मर्यादा ह्या सगळ्या गोष्टी कमीजास्त प्रमाणात लक्षात आल्या...

वर्षभरात मिळालेल्या प्रेम, आदर, सन्मान अन् कौतुकासाठी महसुल विभागाचा कायम ऋणी असेल...प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक व्यक्तीने आपुलकीने प्रेमाने सर्व समजुन सांगितले, समजुन घेतले...त्यां सर्वांचा शतशः आभारी आहे...सर्वांचा नामोल्लेख इथे केला नसला तरी सर्वांच्या आठवणी स्मृतीपटलावर कायमच्या कोरल्या गेल्यात..हे सगळे अनुभव खरंतर अधिकारी होणं म्हणजे काय असतं ? याचं प्रात्यक्षिक होतं...वर्गात शिकलेल्या धड्यांपेक्षा वर्गाबाहेर मिळणारे धडेच आपल्याला अधिक शहाणे, अधिक समृद्ध बनवत असतात...मागच्या वर्षभरातील महसुल विभागातील अशा असंख्य अनुभवांनी कित्येक धडे शिकवले..कायद्याच्या अभ्यासापेक्षा माणसांचा अभ्यास या दरम्यान अधिक करता आला...माणसांचं व्यवस्थापन कसं करावं...कुणाला कसं सांभाळावं, याचे धडे मिळत गेले...माञ हे सगळं शिकुन त्याचा प्रत्यक्ष आपल्या अधिकारात आपल्या कार्यालयात वापर करण्याची वेळ येण्याआधीच महसुल विभागाचा निरोप घेण्याची वेळ आलीये...कागदोपञी उद्या सकाळी (शासकीय भाषेत मध्यान्ह पुर्व) महसुल विभागातून कार्यमुक्त होईल अन् नवीन विभागात नवीन पदावर रुजु होईल...महसुल विभागाने व बुलढाण्याने आतापर्यंत दिलेले अनुभव पुढच्या प्रवासासाठी निश्चितच दिशादर्शक ठरतील...तसं बघायला गेलं तर पदाचं अन् विभागाचं नाव तेवढं बदललय, बाकी गाव अजुनही तेच आहे..तेच बुलढाणा, तेच जिल्हाधिकारी कार्यालय, अन् तोच मी...अर्थात् दंडाधिकारी नव्हे तर मुख्याधिकारी पदाचा झबला घालुन तयार.....नव्या प्रवासासाठी... एकच ध्यास, नगरविकास म्हणत....


#असंच_काहितरी #नायब_तहसिलदार #मुख्याधिकारी_गट-अ

Tuesday, August 15, 2023

प्रिय विशाल... छे.. मनोहर


युट्युबवरुन ज्याचा‌ परिचय झाला असा गझलकार..जो युट्युबवरुनच थेट ह्रदयाच्या ट्युब पर्यंत पोहचलेला...नंतर योगायोगाने प्रत्यक्ष भेट झालेला...अन् पहिल्या भेटीनंतर लगेच आपलासा झालेला...त्याच्या गझले इतकाच त्याचा स्वभावही दर्जेदार आहे याची जाणिव झाली अन् ओळख मैञीत परिवर्तित झाली....तो भेटला अन् बुलढाण्यात गझलेचा ढाण्या वाघ भेटला असंच वाटलं....गझल, कविता यासोबतच त्याच्यामुळे बुलढाणा रमणीय वाटला...त्याच्या गझलेने काळजात घर केले होतेच...त्याच्या भेटीने बुलढाणा देखील घरच्यासारखेच झाले....त्याच्या भेटीमुळे पुढे दिग्गज साहित्यकार, कलाकार यांच्याशी परिचय व्हायला सुरवात झाली...मिञ वनव्यात गारव्यासारखा सांगणारे अनंत राऊत यांना फक्त प्रत्यक्ष ऐकणेच नाही तर त्यांच्या सोबत फिरता आले...कुठे फिरायला जाणे असो, नाहितर कुणाला भेटायला जाणे असो....सर्वच ठिकाणी कायम सारथ्य करायला तयार असणारा कृष्ण....'एक राणी गेल्याने डाव संपत नाही', असं म्हणत हरलेल्या मनाला उभारी देणारी त्याची गझल त्याच्या आयुष्याला शोभा आणतेच आहे...पण डावही संपु नये अन् राणीही जाऊ नये, अन् हा आमचा राजा कायम असाच सम्राट बनुन रहावा...ह्याच मनःपुर्वक शुभेच्छा...अशा ह्या मिञ, तत्वज्ञ अन् वाटाड्यास अर्थात ह्या मितवास, गझलसम्राटास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा....
🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐

विशालच्या काही निवडक माझ्या आवडीच्या ओळी :

" लायक आहे मनगट माझे अजुन देवा
  मंदिरात मी म्हणून काही मागत नाही "
----------------
" पेरला गेलाय माझा जन्म येथे
  यामुळे मी वावरावर शेर लिहितो "
-----------------
"कशी पसरते इतकी लाली संध्याकाळी
सुर्य कदाचित हसतो गाली संध्याकाळी

कंटाळा या जगण्याचाही आल्यानंतर
जीव करावा तुझ्या हवाली संध्याकाळी "
-----------------
"दोघांमधल्या दुराव्यास या
कारण ठरली केवळ भाषा
मज ओठांची जमली नाही
तुज डोळ्यांची कळली नाही"
-------------------

#मनोहर
#असंच_काहितरी

प्रिय पुनम.. छे ..पुनव


स्वातंञ्यदिनासारख्या पविञ दिवशी जन्मास आलेल्या....'यशोमती'च्या सर्वेसर्वा.....मुलाखतीची पण तयारी करायची असते अन् ती किती जास्त करायची असते हे ज्यांच्याकडे पाहुन कळलं त्या ग्रुपच्या संस्थापक-संचालक....शिक्षकाची मुलगी असल्याने शिकवणे हा गुण अगदी रक्तातच असलेल्या...शिकवण्यासोबतच शिकण्यावरही तितकाच भर असणाऱ्या .... महाविद्यालयीन जीवनापासुनच वाचण व लिखाणाची आवड असणाऱ्या .... वाचण, लिखाण याच्या जोडीला आवाजही तितकाच दमदार लाभलेल्या... काहींचा आवाज ऐकुन झोप लागते तर काहींचा आवाज ऐकुन जाग येते, यापैकी दुसऱ्या गटात बसणाऱ्या अन् कित्येक स्पर्धा-परिक्षार्थींना आपल्या आयुष्याच्या डायरीतल्या एका एका पानातुन जागं करणाऱ्या .... अभियांञिकी शिकल्यावर समाजशास्ञाचे धडे घेऊन समाजासाठी चार गोष्टी करण्याची संधी देणाऱ्या क्षेञात म्हणजे प्रशासकीय सेवेत येण्याचा धाडसी निर्णय घेऊन यशस्वीपणे निर्णयास योग्य ठरवणाऱ्या .... पहिल्या टप्प्यात मंञालयात कक्ष अधिकारी तर दुसऱ्या टप्प्यात थेट प्रांताधिकारी/उपजिल्हाधिकारी पदी मजल मारणाऱ्या .... मिळेल ते काम करायला तयार आहे असं म्हणत आपल्याला हवं तेच काम मिळवण्यात पटाईत असणाऱ्या .... महसुल विभागात येण्याआधीच महसुल विभागात कक्ष अधिकारी म्हणुन कामाचा अनुभव घेणाऱ्या .... नंतर जीवाचं महसुल करुन घेण्याआधी जीवाची मुंबई करुन घेणाऱ्या ... ट्रेनिंगच्या परिक्षांचाही एमपीएससीच्या अभ्यासासारखा अभ्यास करणाऱ्या .... फार जास्त कुठे फिरायला न जाता निरंतर अवांतर वाचणावरच लक्ष असणाऱ्या.... कदम कदम जपुन टाकायला हवा, असा विचार करत यशाच्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या.....सगळं असुनही काहीच नाही असं सांगण्यात पारंगत असणाऱ्या.... नाशिकची कन्या अन् अहिराणीवर विशेष प्रेम असणाऱ्या .... 'महसुल प्रशासन असं काही नसतं, प्रशासन म्हणजेच महसुल' अन् 'सबसे भारी दंडाधिकारी', या अशा माझ्या विधानांशी शतप्रतिशत सहमत असणाऱ्या .... माझ्या शब्दांना सतत प्रोत्साहीत करणाऱ्या.... एमपीएससी विश्वातील कित्येकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या .... #DC_Punam मॅडम, आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.... 🎂🎂🎂🎂💐💐💐💐


पुनवेच्या शलाका निरंतर चमकत राहो....महसुल प्रशासनात तुम्हाला तुमची स्वप्न पुर्ण करता येवोत ह्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.... प्रांत होणं हा अंत नाही तर सुरवात आहे, एका प्रशांत महासागरासमान पसरलेल्या प्रशासकीय कारकीर्दीची....ह्या प्रवासाठीही खुप खुप शुभेच्छा......💐💐💐💐


#DC_Punam
#असंच_काहितरी

Sunday, July 30, 2023

परिक्षा अन् प्रशासन

 


परिक्षा हे प्रशासनात येण्याचं फार मोठं द्वार जरी असलं तरी शितावरुन भाताची परिक्षा किंवा घराची कळा अंगण सांगते अशा म्हणीनुसार परिक्षेवरुन प्रशासनाची परिक्षा होत नाही किंवा परिक्षा प्रशासनाची कळाही सांगत नाही...खरंतर प्रशासनात कळा आहेत आणि ह्या कळांना जो कलेने हाताळतो तो खरा प्रशासक...निकाल लागला, कागदाच्या तुकड्याने आपल्या नावाच्या मागे एखादे पदनाम चिटकवले की आपण अधिकारी होऊ, मग सगळे प्रश्न मिटतील, अगदी फुलांच्या पायघड्याच पायवाटेवर अंथरल्या जातील अशा काहीशा कविकल्पना आपल्या डोक्यात तयारीच्या दरम्यान होऊही शकतात, पण ह्या कल्पनाच आहेत हे माञ तंतोतंत सत्य आहे. याचा अर्थ प्रशासन म्हणजे अगदीच ञासदायक आहे असा अर्थ काढण्याची घाई करु नका...प्रशासन अवघड नाहीतर आव्हानात्मक आहे...त्यातही सामान्य जनतेच्या संपर्कात असणारे विभाग जसे महसुल, ग्रामविकास, नगरविकास, व इतर यांना हा अनुभव तर येतोच....महसुल विभाग हा जसे प्रशासनाचा कणा आहे असं अभिमानानं सांगितलं जातं, तितकंच ह्या कण्यावर त्याच्या धन्याचं (लोकशाहीत खरा धनी जनताच) लक्षही बारकाईनं असतं...अगदी गावातली भांडणं असो नाहितर शेताच्या बांदावरुन होणारे वाद... कुणी पाणी अडवलं असो नाहितर कुणी पाणी जिरवलं असो.... घरात पाणी घुसलं काय किंवा विहीरीतुन पाणी गेलं काय ..पुर असो नाहितर दुष्काळ, शासनाची कुठलीही मदत मिळणं असो नाहितर इतर शासकीय विभागांबद्दलची गाऱ्हाणी असो...आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारं मशिन म्हणजे महसुल प्रशासन अशी किमान बऱ्याच जणांची समजुत आहे. ह्या समजुतीमागे बराच प्रदीर्घ इतिहासही आहे, त्याबद्दल तुर्तास इथे चर्चा टाळुया...तर आपण म्हणत होतो की, मुळात प्रशासन हे आव्हानात्मक आहे....मग जर प्रशासन आव्हानात्मक असेल तर प्रशासनाचा भाग होऊ पाहणारे आपण सर्व भावी अधिकाऱ्यांनी ह्या आव्हानांना सामोरं जाण्याचं कसब आपल्यात भिनवायलाच हवं ना....एखाद्या विषयाचा आवाका लक्षात घेणं, त्यासाठी अधिकची माहिती मिळवणं....आपल्या आजुबाजुच्या चालुघडामोडींना फक्त लक्षात ठेवण्याबरोबरच असं का घडतय ? यावर काय उत्तर असु शकतं याचा विचार करणं...परिक्षेचा अभ्यास एकट्याने जरी अभ्यास करत असु तरी एकलकोंड्यासारखा अभ्यास न करणं...आपल्या सामुहिक वर्तवणुकीवर लक्ष देणं....आपल्या चालण्या-बोलण्यावर लक्ष देणं....एखाद्या बाबीवर विचार कसा करायचा अन् आपण कसा करतो यावर देखील विचार करणं...परिक्षेची तयारी करताना ह्या इतर अनुषांगिक बाबी ज्या आपल्या स्वभावात आणणे गरजेचे आहे...ज्या आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग असणं गरजेच्या आहेत, त्या सर्व गोष्टींचाही विचार झाला पाहिजे...नाहितर मी अन् माझी पुस्तकं एवढच केलं तर कदाचित आपण अधिकारी होऊ पण एक उत्तम प्रशासक होणं कठीण होईल....आता हे सगळं करायचं म्हणजे अभ्यासाच्या क्लास मध्ये भरीस भर म्हणुन व्यक्तिमत्व विकासाचे पण क्लास लावायचे का ? तर मुळीच नाही....ह्या गोष्टी स्वतःहुन शिकता येतात...ठरवुन काही गोष्टी अंगवळणी पाडुन घेता येतात...व्यसनं कशी न कळत लागतात, तसं चांगुलपणाचं...सदवर्तवणुकीचं व्यसन लागत नाही, ते लावुन घ्यावं लागतं...फक्त तसा प्रयत्न करणं...जाणिवपुर्वक काही गोष्टी करणं अन् काही गोष्टी टाळणं...हे जमायला हवं...एवढंच कशाला अगदी उपलब्ध वेळेचं नियोजन योग्य प्रकारे करणं अन् ते काटेकोरपणे पाळणं ही गोष्ट देखील पुढे प्रशासनात आपल्याला फार जास्त उपयोगी ठरणारी आहे...त्यामुळे असा सर्वांगिक अभ्यास करण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे....नाहीतर परिक्षा, निकाल अन् सत्कार यातुन बाहेर आल्यावर जेंव्हा आपण काम करायला सुरवात करु तेंव्हा लक्षात येते की मी फक्त प्रशासनाचा अर्धचंद्रच बघितला होता, चंद्राची अशीही एक बाजु आहे जी तयारीच्या काळात आपल्या लक्षातच आली नाही....ह्या दुर्लक्षित बाजुसाठी आपल्याला अजुन बरेच काही शिकावे लागणार आहे.


#असंच_काहितरी