Thursday, April 25, 2019

असंच काहितरी.... #निरोप समारंभ....#क्षितिज 2k19

Foundation अन् Geotech शिकवणारे बाबा
काय शिकवतात तोबा तोबा....
नजरेमधुनच नुसत्या
सार्या वर्गावर ठेवत असतात ताबा........

एक मास्तर अजुन बाबासारखाच बाप आहे
लेकरांना वाटते उगाच डोक्याला ताप आहे......
कधी कधी वाटते, हेही त्यांचेच चले आहेत
ते काही असो, माणुस तसे भले आहेत....

Water resource शिकवणार्या बाई
प्रेम अन् मायेचाही Source आहेत......
कुठले विद्यापीठ अन् कुठले महाविद्यालय
सांगा कुठे अशा बाई अन् असा Course आहे......

एक आमुचे सर, त्यांची कुणालाच नाही सर
त्यांच्यामुळेच वाटते आम्हाला College जणु घर...
ना कुठलाच आडकाठी, ना कुठला अडथळा
रस्त्यावर सुद्धा सहज करता येते विचारपुस.....
कुणाबद्दल बोलतोय काय विचारता..?
अहो, असा एकंच आहे आपल्याकडे देवमाणुस....

त्यांनीच आम्हाला
Concrete, Steel सारं सारं शिकवलं.....
माणसानं‌ माणसाशी माणसासारखं राहायचं,
मनावर आमच्या गिरवलं.....

आपल्या सगळ्यांकडुन जे शिकलो, जे घेतलं ते आयुष्यभर पुरेल इतकं आहे..... खरंच आपल्यासारखे शिक्षक भेटले हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल....
नाहीतरी,
"कोणती पुण्य अशी
येती फळाला...
जोंधळ्याला चांदणे
लखडुन जावे...."

आपल्यासर्वांच्या कायम ऋणात राहायलाच मला आवडेल...
तरी‌ आपल्या सर्वांचे काळजाच्या कातळापासुन आभार.......

Saturday, March 23, 2019

प्रिय भुषण.....





आपण जन्मलो यात आपले कसलेच मोठेपण नाही , तरी आपण एवढे मोठमोठे वाढदिवस का साजरे करतो...? हा प्रश्न बर्याचदा पडतो मला. पण वाढदिवस साजरा करणं , म्हणजे आपला जन्म झालाय अन् आपल्या जन्माची आपल्याला जाणिव व्हावी , अन् आपण का जन्मलो हे आपण सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हावं , म्हणुन साजरा करत असावेत. मुळात जन्मदिवस म्हणजे काय ? हे सांगताना भारताचे भुतपुर्व राष्ट्रपति भारतरत्न डाॅ. अब्दुल कलाम म्हणतात जन्मदिवस म्हणजे असा एकमेव दिवस ज्या दिवशी तुम्ही रडत असता अन् तुमची आई हसत असते, बाकी आयुष्यात तुम्हाला ठेच जरी लागली तरी तिच्या डोळ्यात पाणी येते. बरं हे सर्व ठिक आहे , पण हे असं अचानक जन्म , जन्मदिवस या सगळ्या बद्दल का बोलतोय म्हणुन आश्चर्य वाटलं का....? नाही , ते कसं आहे ... आत्ता नुकताच एका मिञाचा वाढदिवस साजरा केला. बरं , ज्याचा वाढदिवस साजरा केला त्याच्याबद्दलंच खरं तरं लिहणार होतो , पण हे असं विषयानंतर होतंच बरं का...असो.

तर विषय आहे भुषण.... नाही भुषणाचा काही विषय आहे का..? असं कितीही म्हटलं तरी माझ्या आजच्या लिहिण्याचा विषय माञ भुषणंच आहे. बरं भुषण बद्दल सांगावं तरी काय..? तो काही फार कुणी प्रसिद्धही नाही , किंवा फार स्टार ही नाहिये..... तो आहे यश मिळवण्यासाठी सिद्ध झालेला स्टार....मला आवडणार्या काही निवडक व्यक्तींपैकी एक , ज्याच्या साध्या पण प्रॅक्टीकल राहण्याचा आपण जबरदस्त फॅन आहोत... एखादी गोष्ट करायची म्हटलं की त्यात सर्वस्व ओतुन जिव लावुन काम करण्याची तयारी असणारा मुलगा.... एखादी गोष्ट जमत नसेल तर नाही येत हे ही तितक्याच मोकळेपणाने सांगणारा अन् खाञीशीर असेल अशाच गोष्टी सांगणारा .... अभ्यास , हुशारी , शैक्षणिक प्रगती या सगळ्या गोष्टीत तर पुढे आहेच , पण याबरोबरच नाटक , विडंबन इत्यादीच्या माध्यमाने रंगमंचावर अवतरणारा कलाकार.... जे येत नाही ते शिकण्याचा ध्यास घेत प्रयत्नपुर्वक शिकणारा.... विनोद , चेष्टा सारंच अगदी मर्यादेत..... जगणं बिनधास्त असावं पण भविष्याची जरा धास्तीही असायलाच हवी नाही का..? अशा पद्धतीने अमर्याद वागण्याला मर्यादा घालणारा..... माणुस म्हणुन खुप छान वाटणारा... अन् आयुष्यात ज्याची सोबत मला कायम लाभावी असे वाटते अशा मिञांपैकी एक.... नव्हे कदाचित एकमेवही म्हणता येईल.....
भुषण , तुझी नुकतीच L&T कंपनी मार्फत पदव्युत्तर शिक्षणासाठी घेण्यात येणार्या मुलाखतीसाठी निवड झाली आहे... तु GATE मध्येही चांगल्या गुणांसह पास झाला आहेस... अजुन इतरही दिलेल्या बर्याच परिक्षांचे निकाल बाकी आहेत , त्यातही तु बाजी मारशील यात शंका नाही...
या सगळ्याबद्दल तुझे खुप खुप अभिनंदन अन् हे सगळं करताना तुझ्यातल्या ज्या साधेपणावर मी कायमच फिदा आहे त्या साध्या , मनमोकळेपणाचे खुप कौतुकही वाटते.....
आता पदवी शिक्षण झाल्यावर पुढच्या तिन महिन्यानंतर आपण सगळेच आपापल्या ध्येयमार्गावर मार्गस्थ होऊ पण या सगळ्यात आपली मैञी कायम राहिल......
तु खुप मोठा माणुस होशील यात शंकाच नाही , त्यासाठी तुला मनापासुन खुप खुप शुभेच्छा......
आणि हो , कधीही , कुठेही मी तुझ्या मदतीला आलो तर मला नक्कीच आनंद होईल....
सुखाच्या क्षणी नाही बोलवलं तरी चालेल... दुःखात नक्की बोलवं , मी नक्कीच उभा असेन कायम तुझ्यासाठी....

हे , बघं या सगळ्यात तुला वाढदिवसाच्या शुभेच्छाच दिल्या नाहित वाटतं ... असो.
तुला वाढदिवसाच्या आभाळभर नव्हे त्यापेक्षाही जास्त शुभेच्छा.......
खुप मोठा हो.....



तुझाच....

Saturday, January 26, 2019

ग्रेट भेट.....# सन्मान कवितेचा # अभिमान माझा


आज शासकीय विश्रामगृह(अजिंठा विश्रामगृह , जळगाव) येथे अनाथांची‌ माय डाॅ. सिंधुताई सपकाळ यांची भेट घेण्याचे भाग्य लाभले.... माई सागर पार्क येथे पार पडत असलेल्या बहिणाबाई महोत्सवात बोलण्यासाठी आलेल्या असताना श्री संदिप महाजन सरांनी कळवल्यानंतर लगेच भेटायला निघालो. केवळ महाजन सरांमुळे माईंना भेटता आले हेही खरे. माईंना भेटल्यानंतर महाजन सरांनी ओळख करुन दिली व मी माईंवरती एक कविता केली असल्याचे त्यांना सांगितले. माईंनी लगेच म्हटले ," ऐकव की लवकर मग " अन् मी कविता ऐकवली. एका एका शब्दानंतर मिळणारी माईंची दाद मला कित्येक पुरस्कारांपेक्षाही जास्त आनंद देत होती. कविता ऐकताना काही शब्दांची पुनरावृत्ती झालीय  असं वाटल्यानंतर माईंनी लगेच सांगितले , " बाळ‌ सगळं कसं चौकटीत पाहिजे , मग ते जगणं असेल नाही तर कविता असेल. माणसानं एका चौकटीत असावं." मध्येच एका ओळीत मी ताई हा शब्द वापरलेला होता . ते ऐकल्यावर माई म्हणाल्या , " ताई नको माई म्हण , अरे आई म्हणताना सुद्धा ओठाला ओठ लागत नाहीत ,पण ओठाला ओठ भिडल्याशिवाय माई म्हणताच येत नाही. माई म्हण....." पुढे सगळी कविता ऐकल्यावर माई‌‌ म्हणाल्या ," काय लिहतोस तु ! तु हाडाचा कवि आहेस. तुझी ही कविता मला पाठव . मी ही कविता माझ्या संस्थेत फ्रेम करुन लावेल. तुझा नंबर दे. आणि हो , कधीपुण्याला‌ आलास..? नाही...? " अन् महाजन सरांना सांगितले ," याला घेऊन ये...
अवघ्या काही मिनिटांची ती भेट , पण अमुल्य असा ठेवा ठरावी असे ते क्षण होते....
माई बोलत होत्या अन् मी भारावुन जात होता. आपले शब्द आज धन्य झाले असं‌ आतुन वाटत होते. माझ्यासाठी हा कवितेचा सर्वोच्च सन्मान आहे.....
कविते हे सारं तुझ्यामुळेच....
सारं काही तुझंच आहे.....मी फक्त निमित्त माञ...

माईंनी पुस्तकात लिहिलेल्या ओळी ,
*" शशिकांत , तु आग पितोस . शब्दात ती ओततोस आणि कवितेची धग पेटती ठेवतोस. "*

माईंचा संदेश‌ ( जो आजन्म स्मरणात राहिल असा )
*" आयुष्याच्या झळा ,  झेलत रहा बाळा...."*

#अनाथांची माय .....
#वेदनेचा बाजार नव्हे बाजाराची वेदना मांडता आली पाहिजे......

मी अद्याप काय कमावले असे कुणी विचारले तर ही अन् अशा मोठ्या माणसांच्या कौतुकाच्या थापा हिच माझी कमाई आहे , एवढेच मी सांगु शकेल....... अजुन खुप काही करायचंय अन् खुप दुर जायचंय.... ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी ही सारी माझी प्रेरणास्थानं‌ आहेत......

🖋 शशिकांत शांताबाई मारोती बाबर....
(लिड इंडिया २०२०, जळगाव)

Wednesday, January 23, 2019

महानायक नेताजी



स्वातंञ्य पेनाच्या शाईने नव्हे रक्तानेच मिळेल....
तेंव्हा स्वराज्यासाठी रक्त मागणारा....
ध्येयाची एकनिष्ठ असलेला....
एक समाजवादी लढवय्या योद्धा....
स्वतःचे सरकार स्थापन करुन ब्रिटिश साम्राज्याला हादरवणारा.....
स्वातंञ्यलढ्यासाठी स्वतःची फौज तयार करणारा
अन् स्वतःच एका फौजेसमान असणारा....
मृत्युपश्चात इग्रजांची झोप उडवणारा....
ब्रिटिशांसाठी खलनायक असणारा
महानायक म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस....

नेताजी आपल्या नावात जरी चंद्र असला तरी आपण सुर्य होतात हेच खरे......

Tuesday, January 22, 2019

मराठी साहित्य (UPSC optional) संदर्भ ग्रंथ

Section wise Reference books (Read selectively and smartly)

Paper – I

Answers must be written in Marathi.

भाषा आणि लोकसाहित्य (Language and Folk - Lore)

A) Nature and Functions of Language (With reference to Marathi)

Language as a Signifying System:

आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)

Langue and Parole:

आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)

Basic Function : साहित्य विचार – दत्तात्रेय पुंडे आणि स्नेहल तावरे (स्नेहवर्धन प्रकाशन )

Poetic language; Standard Language and dialect; Linguistic features of Marathi in 13th and 17th Century: प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स (सर्वाधिक सटीक माहिती), राहुल कर्डिले नोट्स, इंटरनेटचा वापर करावा.

Language variations according to social parameters; प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)

B) Dialects of Marathi: -

i) अहिराणी:

१) इंटरनेटवरील विविध लेख,

२) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स,

३) अहिराणी मधील साहित्य - उदा. बहिणाबाईंच्या कविता (उत्तरात नेहमी वापरा) (मौलीवूड गाणे)

४) अहिराणी भाषेचा अभ्यास (कोणतेही प्रकाशन चालेल)

ii) वैदर्भी:

१) वैदर्भी भाषेचा अभ्यास (कुठल्याही प्रकाशनाचे बेसिक पुस्तक)

२) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.

iii) डांगी

१) ‘डांग्ज’ – लेखक: रणधीर बीट (पद्मगंधा प्रकाशन)

२) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.

C) मराठी व्याकरण (महत्वाचे: कोणतीही दोनच पुस्तके वापरा)

Parts of Speech; Case-system; Prayog-vichar (Voice)

मराठी व्याकरण – प्रकाश परब

मराठी व्याकरणाचा अभ्यास – लीला गोविलकर

मो. रा. वाळिंबे

अर्जुनवाडकर

Nature and kinds of Folk-lore (लोकसाहित्य)

(with special reference to Marathi)

लोकगीत, लोककथा, लोकनाट्य

१) विश्वनाथ शिंदे – लोकसाहित्य - भाग १ (अति महत्वाचे)

२) विश्वनाथ शिंदे – लोकसाहित्य - भाग २ (अति महत्वाचे)

३) रां. चि. ढेरे यांच्या विविध लोकसाहित्यावरील पुस्तकाचा निवडक अभ्यास

४) प्रभाकर मांडे – लोकसाहित्याचा अभ्यास (निवडक)

Section – B

मराठी साहित्याचा इतिहास

१) प्रारंभ ते १८१८ पर्यंत

अ) महानुभाव लेखक – स्थानिक बाजारपेठेतील कोणतेही पुस्तक जे तुम्हाला आवडेल.

आ) वारकरी कवी – इंटरनेट वरून प्रत्येक संताचा अभ्यास करा (उदा. तुकाराम, ज्ञान्नेश्वर, नामदेव, एकनाथ)

इ) पंडित कवी – यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके ( स्थानिक जिल्ह्यातील पुस्तक म्हणजे इतरांपेक्षा वेगळे उत्तर लिहिता येईल)

ई) शाहीर - यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके ( स्थानिक जिल्ह्यातील पुस्तक म्हणजे इतरांपेक्षा वेगळे उत्तर लिहिता येईल)

उ) बखर – हेरवाडकर यांचे पुस्तक, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके

२) १८५० ते १९९०

काव्य, नाटक, कथा, लघुकथा, कादंबरी; प्रदक्षिणा खंड १ आणि प्रदक्षिणा खंड २ (विशेष तयारी आवश्यक आहे), चर्चेतील कवी, नाटककार, कादंबरीकार, कथाकार यांचा विशेष अभ्यास करा.

Romantic, Realist, Modernist. (कमी महत्वाचा भाग) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, संदर्भ क्लासेस चे गाईड.

दलित साहित्य - यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके (निवडक), वामन निंबाळकर यांचे पुस्तक, मराठी काव्य, मराठी नाटक, मराठी कादंबरी, मराठी कथा यांचा विभागवार अभ्यास.

ग्रामीण साहित्य – ग्रामीण साहित्याचा अभ्यास. (यात रा.र.बोराडे, वासुदेव मुलाटे व इतर लेखक), यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके

फेमिनिस्ट - प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके

साहित्य समिक्षा (Literary Criticism) : रा.भा. पाटणकर, राहुल कर्डिले यांच्या नोट्स, प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.

साहित्याचे मूल्यमापन, साहित्य समाज आणि संस्कृती – याच शीर्षकाचे स्थानिकस्तरावरील दर्जेदार पुस्तक,

महत्वाचे: दर रविवारी पुण्यनगरी, सामना,महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, लोकमत या वृत्तपत्रात मराठीची माहिती येते ती गोळा करा, त्यामुळे महितेचे विशिष्टीकरण जपल्या जावून गुण उत्तम मिळतात.

Sunday, January 13, 2019

आक्षेप



तो तसा
ती तशी
ते तसे......
हा असा
ही अशी
हे असे.....
हे पाहताना वाटते
आपली किती मोठी झेप आहे...
पण ,
तो , ती , ते...
हा , ही , हे ...
हे सगळं पाहताना....
माझा मी कधी पाहिलाच नाही
हा माझाच माझ्यावर आक्षेप आहे.....

# असंच काहितरी......

Saturday, January 12, 2019

इतिहासातील पुस्तके व लेखक

  • पुस्तके – लेखक
  • होली संगम – विजयलक्ष्मी पंडीत
  • द इंडियन स्ट्रगल – आचार्य कृपालानी
  • इंडियन विन्स फ्रिडम – मौलाना आझाद
  • पाकिस्तान और पार्टीशन ऑफ इंडिया – मौलाना आझाद
  • गुबारे खातीर (पत्रसंग्रह) – मौलाना आझाद
  • अ नेशन इन द मेकींग – सुरेंद्रनाथ बॅनर्जी
  • आय. एम.ए. सोशलिस्ट – विवेकानंद
  • व्हिलेजिअस प्रोब्लम इन इंडिया – अॅनी बेझंट
  • इंडिया ए नेशन, हाऊ इंडिया फॉट फॉर इट्स फ्रिडम – अॅनी बेझंट
  • द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स – अॅनी बेझंट
  • इंडिया अँड दी एम्पायर – अॅनी बेझंट
  • ग्लिम्पसेस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी – पं. जवाहरलाल नेहरू
  • हू लिव्हज, इफ इंडिया डाइज – पं. जवाहरलाल नेहरू
  • अॅट द फिट ऑफ महात्मा गांधी – डॉ. राजेंद्र प्रसाद
  • आनंदमठ, दुर्गेश नंदिनी – बकीमचंद्र चटर्जी
  • व्हाय. आय. एम. अॅन अॅथीस्ट – भगतसिंग
  • प्रिझन डायरी, समाजवादच का? – जयप्रकाश नारायण
  • अस्वाब-ए-बगावत – सय्यद अहमद खान
  • प्रेझेंट स्टेट ऑफ इंडियन पॉलिटिक्स – सय्यद अहमद खान
  • राष्ट्रीय सभेचा अधिकृत इतिहास –पट्टाभिसितारामय्या
  • द व्हील ऑफ हिस्टरी – राम मनोहर लोहिया
  • पाव्हर्टी अँड अनब्रिटीश रूल इन इंडिया –दादाभाई नौरोजी
  • बंदीजीवन – सचिन्द्रनाथ संन्याल
  • ब्रोकन विंग्ज, बर्ड ऑफ टाइम, गोल्डन थ्रेशहोल्ड – सरोजिनी नायडू
  • नील दर्पण – दीनबंधू मित्र
  • भारत दुर्दशा – भारतेन्द्रू हरिश्चंद्र
  • माय एक्सपेरीमेंट विथ टूथ, हिंद स्वराज –महात्मा गांधी
  • साऊथ आफ्रिकाज फ्रिडम स्ट्रगल – युसूफ मोहम्मद दादु
  • अनहॅपी इंडिया, इंडियन इन्फोर्मेशन ब्युरो, यंग इंडिया, इंग्ल ड्ज डेट टू इंडिया – लाला लजपतराय
  • द स्टोरी ऑफ माय डिपोर्टेशन – लाला लजपतराय
  • द पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया – लाला लजपतराय
  • भवानी मंदिर – बारिन्द्र घोष
  • गीतांजली – रविंद्रनाथ टागोर
  • आय फॉलो द महात्मा – के.एस. मुन्शी
  • विधवा विवाह (विडो मॅरेज) – ईश्वरचंद्र विद्यासागर
  • इंडियन पॉलिटिक्स सिन्स म्युटिनी – सी.वाय. चिंतामणी
  • आय.एन.ए. अँड इट्स नेताजी – शहानवाज खान
  • रिव्हाव्हायिंग अवर डायिंग प्लॅनेट – सरला बेन
  • माय इंडियन इयर्स – लॉर्ड हर्डिंग्ज
  • अखंड हिंदुस्थान – कन्हैयालाल मुन्शी
  • निहिलीस्ट रहस्य स्वदेशी रंग – रामप्रसाद बिस्मील
  • वर्तमान रणनीती – अविनाश भट्टाचार्य
  • बॉम्ब पोथी – सेनापती बापट
  • गांधीइझम:अॅन अॅनालिसिस – फिलीप स्प्रेट
  • द अवेकनिंग ऑफ इंडिया – रॅम्से मॅकडोनाल्ड
  • काँग्रेस मिनिस्ट्रीज अॅट वर्क – आचार्य जुगलकिशोर
  • दी वे आऊट, 1943 – सी. राजगोपालाचारी
  • इंट्रोडक्शन टू इंडियन पॉलिटिक्स – डब्ल्यू. सी. बॅनर्जी
  • मेमॉयर्स ऑफ माय लाईफ अँड टाइम – बी.सी. पाल
  • गव्हर्नमेंट ऑफ इंडिया – सी.पी. इल्बर्ट
  • इंडियन अनरेस्ट – व्हॅलंटीन चिरोल
  • इंडिया अॅज आय नो इट – मायकेल ओडवायर
  • भारतीय मुसलमान, इंडिया अंडर ड क्वीन –विल्यम हंटर
  • हू वेअर दी शुद्रास?, बुद्ध अँड हिस धम्म – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
साभार:- Mpsc world (यशाचा राजमार्ग)

Thursday, January 10, 2019

असंच काहितरी.......#दारुबंदी

कशाला हवी दारु
घरी उपाशी मरते पारु.....।।
-----------------------------------
दारुपायी दादला मह्या
पार गेला वाया.....
मायबाप सरकार
दाखवा की जरा दया...।।
-----------------------------------
जागोजागी सरकार
दुकान थाटा म्हणते
रस्त्याच्या कडेला
दारु वाटा म्हणते......।।
------------------------------------
एक दिली नोट
की मिळते दोन घोट
नाचु लागतो राजा
करुन वर बोट...
राणी असते घरी
रिकामे तिचे पोट
तुम्हीच सांगा सरकार
द्यायचं का मग वोट.....।।
--------------------------------------
महादेवाच्या पिंडीला
घालीत होते पाणी.....
जागोजागी वाजतीया
दारुचीच गाणी.....।।
--------------------------------------
इवल्या इवल्या झाडांचीबी
पानं झडलेली........
कोवळ्या कोवळ्या वयात
त्यांनाबी चढलेली......।।
---------------------------------------
इवले इवले हरीण
त्याचे इवले इवले पाय
ऐकलंत काय ऐकलंत काय
दारुबंदी आता होणार हाय.......।।
---------------------------------------

#असंच काहितरी.....
शशिकांत शांताबाई मारोती बाबर