Saturday, February 10, 2018

चुक

*चुक....*

आग लागत नाही लावतो आम्ही
आमच्याच हातानं आमचंच सरण रचतो आम्ही
जगणं महाग झालंय इथं
म्हणुन आता मरण मागतोय आम्ही ...

सरकार खरतर चुकतोच आम्ही
उगाच स्वतःला जाळतो आम्ही
अन् तुमच्या पाठी पळतो आम्ही
तुम्हाला खरच कुठं कळतो आम्ही
म्हणुनच तर आम्हाला छळता तुम्ही ...

कापसाला बेपारी घेत नाही
अन् ऊसाला कारखाना नेत नाही
अशावेळेस कापसासारखंच  बापाचं तोंड पांढरं पडतं
अन् जाळलेल्या उसाचं खुनुट चालताना नडतं...

घरात तुर आली की
बाजारात तुरीचे भाव पडतात
अन् आमचा हंगाम सरला की
मग भाव कसे वर वर  चढतात

कांद्याचा कायमच वांदा होऊन जातो
टमाट्याचाबी कधी लाल चिखल करावा लागतो
अन् माणसासाठीचा भाजीपाला
जनावरांच्या तोंडात भरावा लागतो
किमान तेवढं तरी बरं आहे
आमच्या दावणीला जनावरं तरी आहे...

ज्या वाटा शहराकडुन गावाकडे जातात
त्याच गावाकडुन शहराकडे पण जातात
हेच विसरतो आम्ही
तुमच्या चार शब्दांनी
लगेच घसरतो आम्ही
खरंच चुकतोच आम्ही....

म्हणुन आता चुक टाळणार आहे
शेताला सगळ्याबाजुनं कुंपण घालणार आहे
अन् तिथंच चौकीदारी करणार आहे
कारण कुंपणानं शेत खाऊ नये म्हणुन....

*शशि......*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

No comments: