Friday, May 18, 2018

पञ... 'ति'ला

प्रिय.......

              वैशाख नुकताच संपलाय पण तुझ्या विरहात माझ्या काळजात पेटलेला वैशाख वणवा काही केल्या थंड व्हायला तयार नाही , म्हणुन काळजातली हाक कागदावर उतरवुन तुझ्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न म्हणजे हे पञ. थेट कारण सांगुन पञाची सुरवात केली म्हणुन आश्चर्य चकीत होऊ नकोस , नाही तु होणारही नाहीस कारण माझा भिडस्तपणा , थेट विषयाला हात घालणं , हे तुला ज्ञात आहेच. पण तरीही असं थेट विषय सांगणं एखाद्या लेखकाला शोभायचं नाही. लेखकानं कसं गोष्टी फिरुन , शब्दांचा पुरेपुर वापर करुन सांगायला हवी पण माझं तसं नाही. शब्द फुकट मिळतात काय कितीही वापरायला ? , असो. मी तुझ्या दुराव्या बद्दल बोलत होतो. वैशाख संपुन हा अधिक मास लागलाय तो खरच अधिकचाच आहे . तो नकोच होता म्हणजे महिना लगेच कटला असता अन् आपल्याला हा एक महिन्याचा दुरावा सहन करावा लागला नसता. पण ते आपल्या हातात नाही ना , काय करणार. बरं कशी आहेस..? अगं तु सुंदर आहेस हे माहित आहे मला , मी तब्बेतीबद्दल बोलतो. मस्त आहेस ना. माझी आठवण येतेय...? आता लगेच प्रतिप्रश्न करु नकोस.. मला तुझी आठवण येत नाही..( रुसलीस काय ...? अगं आठवण येण्यासाठी आधी विसरावं लागतं अन् मी तुला विसरलेलोच नाही , काय ? ). बरं ते असु दे... काय करतेस...? तब्बेत कशी आहे ...?( वारंवार  तब्बेतीचं काय विचारतोस ? असं म्हणु नकोस .. अगं तुझी तब्बेत ठिक असली की मला ठणठणीत  वाटतं म्हणुन विचारतो... माझ्या स्वतः साठीच की ,फार स्वार्थी आहे मी.. हसु नकोस.. पुढचा प्रश्न वाच...) सुट्यांचा मस्त कुठे फिरण्याचा प्लान आहे का...? नाही माणसानं फिरायला हवं .त्याशिवाय ही दुनिया कळायची नाही. चार भिंतीत आपलं घरंच आपलं विश्व असतं... पण बाहेर पडल्यावरच विश्वाचा पसारा कळतो. बघ माझा शहाणपणा झाला सुरु. तु हे सोड ... पण मस्त फिरुन घे .. कारण हे विश्व माझे घर आहे असं आपली संस्कृति सांगते , आपलं घर हे विश्व आहे असं नाही... असो. बघ कसा भरकटतो मी, मी आपलं‌ साहित्यातंच सारं शोधतो... ही पुस्तकंच मला सारी भ्रमंती करवतात ... ते फिरवात दगडांच्या देशात , प्राण्यांच्या वस्त्यात अन् माणसांच्या कळपात देखील.. बरं बस्स झालं हे पुस्तकपुराण ... तु तुझं सांग... कसे जाताय हे दिवस... इथे मला एक एक दिवस एका युगासारखा वाटतोय... कटता कटत नाहीय. इतक्या दिवसात तु दिसली नाही , मनं आजारी पडलंय.. कसला आजार ....? तुझ्या प्रेमाचा.... आता लवकर भेटुन तुझे उपचार घ्यावेत त्याशिवाय बरं नाही वाटायचं.... मी येतोय ..... तु आराम कर .... ऊन्हाचं लय बाहेर फिरु नकोस.. ऊन्हाचा कडाका जास्त आहे.... तुला ती ऊन्हाची झळ जाणवेल लगेच पण माझ्या काळजातली कळ... ती जाणवेल तेंव्हा माझा ऊन्हाळा संपेल... माझ्या मनाची माती तुझ्या प्रेमाच्या पर्जन्याशिवाय तृप्त व्हायची नाही.... करशील ना तीला तृप्त.... ?
मी वाट पाहतोय..... त्या सरीची...

                                          तुझाच.........

No comments: