Friday, May 25, 2018

असंच काहितरी

काही गोष्टी सांगु कि नको... नाही नको.. राहु दे ... असं म्हणुन ज्या गोष्टी आपण राहु देतो ना... त्या तशाच राहतात... गोष्ट वाटली , पटली , अन् सांगितली की गोष्ट संपते.... माञ ती तशीच राहिली , राहु दिली तर गोष्ट सुरु होते ... आपल्या मनात... असो.

प्रत्येकाच्या मनात बरंच सांगण्यासारखं असतं.. ह्या जगात दुःख कुणाला नाही , हो फक्त ज्यांचं दुःख ऐकायला कुणी नाही ते जास्त दुःखी होतात एवढंच. माणुस अंत आणि एकांत या पेक्षा एकांतालाच जास्त भीतो असं व. पु. काळे म्हणतात.... अगदी खरंय .. का माहीतीय ...? कारण अंत झाला की संपलं सगळं .. कसलीच चिंता नाही ... सारं चितेत जळुन जातं.. पण एकांतात माञ मनात सुरु होतात अनंत प्रश्न .. एकाला उत्तर द्यावं .. त्याचा अंत करावा तर दुसरा समोर.. माणुस खरंच भांबावुन जातो यात... खरंच का एवढा ञासदायक असतो एकांत.. ? माहीत नाही. ते मी सांगुनही तुला थोडंच पटणार आहे... काही गोष्टी ( कशाला सगळ्याच म्हणु देतं .. नको, बुद्ध सांगतात आपल्याला सर्व विश्वाच ज्ञान थोडंच आहे.. म्हणुन आपण एका मर्यादेतंच बोलावं... म्हणुन 'काही'....) अनुभवल्या शिवाय कळत नसतात मुळीच... नदीच्या किनारी लाटांना न्याहाळत बसणं ... तितक्यात हवेच्या मंद झुळकेनं सहस स्पर्श करुन जाणं ( अन् त्यातही प्रियसी सोबत असेल तर ..) किती आनंददायक असतं हे कितीही ऐकलं तरी कळायचं नाही .. ते अनुभवायलाच हवं... तसंच हा एकांत ही....
इथे प्रत्येकाला काही ना काही सांगायचं असतं , बोलायचं असतं.. .. त्यासाठी कुणी ऐकणारं हवं असतं... फक्त कानांनी नव्हे तर मनानंही.... माणुस नेहमी अशा माणसाच्या शोधात असतो...
एक सांगु, आपण अशा काळात जगतोय , जिथे संदेश प्रचंड वाढलेत पण संवाद हरवत चाललेत.. , आपण एकमेंकांच्या संपर्कसुची मध्ये असतो पण संपर्कात नाही , आपण ऐकमेकांना दाद देतो पण साथ नाही , आपण ऐकमेकांच्या समोर असतो पण सोबत नाही , आपण ऐकमेकांच्या जवळ असतो पण जवळचे नाही , आपण दररोज आॅनलाईन असतो पण आपल्यातले नाते आॅफलाईन.... बघ एक सांगता सांगता कित्येक गोष्टी सांगितल्या..... नाही? साला‌ हा माणुस प्राणीच निराळा. बरं ते असु दे ... अद्याप 'तु'च मला समजली नाहीस , माणुस‌ हा त्यापुढचा अभ्यासक्रम...
एक सांगु , ( नाही, आता माझ्यातला लेखक जागा झालाय म्हणुन नाही तर.......) खरा ञास कधी होतो माहितीय ...? जेंव्हा समोरचा चुकला असंही वाटत नाही अन् आपण चुकलो होतो असंही पटत नाही. हा क्षण फार विचिञ.... असे क्षण आयुष्यातुन वजा करता येतील तोच खरा गणितज्ञ..... अद्याप तरी मी त्याच्या शोधात आहे.....

# असंच (?) काहितरी.....

No comments: