बुलेट ट्रेनच्या गतिने धावणारे आयुष्य, दोन मिनिटात मॅगिसारखं सगळं काही क्षणात हवं हवं वाटणारी अन् सगळं कसं शाॅर्टकट मध्ये मागणारी पिढी असं आपल्या पिढीचं वर्णन करता येऊ शकेल...अशा या पिढीला जीवनानुभूती देतील अशा छोट्या छोट्या अन् काही मिनीटात चटकन पटकन वाचुन होतील अशा साधारण प्रत्येकी एक पानभर असणाऱ्या एकुण 44 कथांचा संग्रह म्हणजे डाॅ. विक्रम लोखंडे लिखित 'वन पेज स्टोरी'. कथा इतक्या मार्मिक व समर्पक आहेत की मोठ मोठ्या कादंबरीत जे सांगता येणार नाही असं माणसाला अंतर्मुख करणारं जीवनाचं अमोघ तत्वज्ञान या एका एका पानात सामावलेलं आहे...पानभर असणारी प्रत्येक कथा अगदी दोन मिनीटात वाचुन होते, पण पुढचे कित्येक मिनिट मनात रेंगाळत राहते..म्हणुनच या कथा फक्त वाचुन संपवायच्या नाहीत.... तसं करायला गेलं तर तास दोन तासात पुर्ण पुस्तक वाचुन होईल...यातील प्रत्येक कथा वाचल्यावर कित्येक भावतरंग मनात उठतात, त्यावर विचार करायला हवा...अन् नंतरच पुढच्या कथेकडे जायला हवं...थोडक्यात ह्यातील कथा ह्या लिमलेटच्या गोळीसारख्या आहेत, त्या गिळुन घेतल्या तर लवकर संपतील, पण त्याची चव अनुभवता यायची नाही...त्यासाठी या कथा वाचायच्या, मनाच्या अंतरंगात त्यावर घुसळण होऊ द्यायची..कथेतला विचार मनात जपुन ठेवायचा...असे केल्यास त्या नक्कीच अविस्मरणीय ठरतील...लेखक डाॅक्टर असल्याने बऱ्याच कथेतील संदर्भ तसे आहेत, माञ इतरही आयुष्याशी, त्यातल्या माणसांशी, माणसांच्या आपापसातील नात्यांशी निगडीत कथा यात आहेत... कथा साध्या, सोप्या आहेतच सोबत त्या कधीकधी विस्मयकारकही वाटतात... कथेच्या सुरवातीला आपल्याला अपेक्षित असलेला शेवट शेवटी असेलच असे नाही...काही कथेच्या सुरवातीला एखाद्या पाञाबाबत आपल्याला कणव वाटु लागते तर शेवटाकडे गेल्यावर आपण चुकलो असे वाटुन जाते...माञ या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लेखकाने प्रत्येक कथेत मानवी नात्यांवर अचुकपणे भाष्य केले आहे...आपल्या वाट्याला येणाऱ्या सुखदुःखाच्या ह्या कथा आहेत...आपण नक्की कसं जगावं हे सांगणाऱ्या, कधी कुठे कुणाशी कसं वागावं हे सांगणाऱ्या ह्या चतुर कथा (खरंतर सामान्य माणसाच्या आयुष्यातले प्रसंगच म्हणा ना) नक्कीच वाचनीय आहेत....
#असंच_काहितरी
#Book_Review
No comments:
Post a Comment