कविता म्हणजे फक्त यमकांची जुळवाजुळव इतकंच नसते मुळी, कविता म्हणजे भावनांचा उस्फूर्त उद्रेक असतो ...मग त्यासाठी शब्दांचा यमक जुळेलच असे नाही....तरुण पिढीच्या मनातला कोलाहल हल्ली कवितेच्या माध्यमातुन कागदावर येतो आहे..अन् त्या कोलाहलाला बाहेर आणताना मुक्तछंद हे सर्वात जवळचे माध्यम वापरले जाते... अशाच प्रकारे मुक्तछंदातील कवितांचा संग्रह म्हणजे विशाखा विश्वनाथ यांचा २०२३ सालचा साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कारप्राप्त 'स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना' हा कवितासंग्रह...संग्रहाच्या प्रस्तावनेतच कवयिञीने सांगितलय की धडपडण्याच्या प्रवासात पुन्हा पुन्हा उठून उभं राहता आलं ते कवितेमुळे ! म्हणुनच संग्रहाचं नाव स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना ठेवलय....संग्रहातील सर्व कविता ह्या मुक्तछंदातील आहेत...त्या शहरयार, बाहुल्यांची देवी, दूरचा पल्ला गाठताना, स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना आणि प्रिय... या पाच गटात विभागलेल्या आहेत...
'शहरयार' गटातील पहिल्या कविते आधीच कवयिञी सांगते,
"शहराच्या गर्भाशयातलं पाणी संपत आलं
तेंव्हाचा जन्म असलेले आपण
साहजिकच आहे
ओल शोधत फिरावंच लागेल आपल्याला"
आपल्या पिढीचं अगदी समर्पक वर्णन यात केलय...शहरात राहणारा तरुण शहराकडं ज्या भुमिकेतून पाहतो, त्या भुमिकेतुन केलेल्या कवितांचा ह्या भागात समावेश आहे...शहरात राहणारा बॅचलर, बेरोजगार युवक असो वा शहरातली बाई या सगळ्यांच्या मनातला कोलाहल शब्दबद्ध करुन ह्या कवितांची निर्मिती झालेली आहे याची प्रचिती शब्दागणिक येत राहते...'बाहुल्यांची देवी' ह्या भागात लहानपणीच्या बाहुल्यांची देवी चा आधार घेऊन मुलींच्या, स्ञियांच्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम या भागातील कवितेतुन केलं गेलंय...या भागातील एका कवितेत कवियित्री म्हणते,
"उगाळून उगाळून गंधगोळी संपते
तसंच दुःखही सरुन जाईल
विरुन जाईल या वेड्या आशेने
गंधगोळी उगाळत राहावी
तशी दुःखं उगाळत राहतात माणसं"
मानवी स्वभावाचं हे वर्णन अतिशय योग्य तर आहेच पण हे वाचुन आपण ही असंच करत असु तर आपणही माणुस आहोत याची जाणिव ओली होते...दुःखं गंधगोळी नाही हे कळण्याइतकी हुशारी जवळ असली तरी उगाळत न बसण्याइतकं शहाणपण माञ नसतंच आपल्याकडे किंवा असलं तरी त्याचा वापर करता येत नसावा म्हणुनच आपणही उगाळत बसतोच दुःख.....माणसाच्या दुःखाचं वर्णन करण्यासोबत बाईच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम ही कविता करते..."बाईला पाठ असते, भाकरीलाही पाठ असते" हे सांगताना कडक भाकरी करणारी बाई मऊ असते.. मऊच राहते..हेही कवियित्री आवर्जुन सांगते...
दूरचा पल्ला गाठताना ह्या भागात मनातला कोलाहल आहे, मनाची अस्वस्थतता आहे अन् स्वतः चा स्वतःशी संवाद आहे...'स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना' ह्या भागात कविता अधिक वैश्विक होत जाते...कविता आपल्याला अंतर्मुख करते...वाचताना हे आपल्याच भावनांचं शाब्दिक रुप आहे असंही वाटत राहतं...ह्या भागाच्या सुरवातीलाच कवयित्री सांगते की रक्तातल्या शांततेची ओढ मनाला पसायदानापर्यंत नेऊन सोडते..अशी रक्तातली शांततेची ओढ प्रत्येकाच्या आता असते, म्हणुन ही कविता देखील प्रत्येकाची आहे...आतल्या कोलाहलाला ज्याला ऐकता येतं, ज्याला आरशाशिवाय स्वतःला पाहता येतं अन् ज्याला संदर्भाशिवाय घटनांची वैश्विकता समजते अशा प्रत्येकाला ही कविता आपली वाटते...या भागात एके ठिकाणी कवयिञी म्हणते,
"ओटीपोटातली वादळं सोसत धावत राहणाऱ्या बायका
आणि आतली खदखद सांभाळत
सतत फिरत राहणारी ही पृथ्वी
सृजनाचा विस्तार एवढा वैश्विक असतो"
पृथ्वी अन् बाई यांच्यातलं साम्य अधोरेखित करताना बाई म्हणजे सृजन हे वैश्विक सत्य आपल्या समोर मांडलेले आहे..पृथ्वीवर भुकंप होतात.. आतली खदखद बाहेर येते..तशीच बाईची खदखद देखील बाहेर आली पाहिजे..अगदी प्राचीन काळापासुन आधुनिक काळापर्यंत बाई कायम सहन करत आली...तिच्या सहनशिलतेमुळे तिला देवत्व प्रदान केलं गेलं पण तिचं माणुस असणं स्विकारायचं असेल तर तिला तिच्या आतली खदखद बाहेर काढायला मदत करायलाच हवी..अन् हेच काम कविता करत राहते... कायम...शेवटचा भाग आहे प्रिय....यातल्या कविता म्हणजे जणू पञव्यवहारच... कधी बाहेरच्याशी केलेला तर कधी स्वतःशीच....एखाद्या तरुणीने आपल्या मिञ मैञिणीशी संवाद करावा इतक्याच सहज रचलेल्या ह्या रचना...ह्या संग्रहातील सर्वच कविता वाचनीय तर आहेतच पण अंतर्मुख करायला लावणाऱ्या अन् मुख्य म्हणजे आपल्या पिढीचं गाणं गाणाऱ्या आहेत त्यामुळे त्या अधिक जवळच्या वाटतात... विशेषतः तरुण पिढीने अवश्य वाचाव्यात अशा ह्या कविता....आपण नक्की वाचाल अशी अपेक्षा... शेवटी, या संग्रहाच्या मलपृष्ठावर प्रार्थनेचं महत्व अगदी समर्पक शब्दात व्यक्त केलय, त्या ओळी माझ्या मनात अगदी घर करुन बसल्यात...तेवढ्या इथे उद्धृत करतो अन् थांबतो....
"प्रतारणांना उत्तर म्हणून
वेदनांवर मलम म्हणुन नसते प्रार्थना
स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना
पाठीशी असावं कुणी
म्हणून म्हणायची असते प्रार्थना"
#असंच_काहितरी
#Book_Review
No comments:
Post a Comment