आपकी जन्मतारीख बतायेगी की आपकी शादी कब होगी ? कौन होगा आपका लाइफ पार्टनर ? कब लगेगी आपको नौकरी ? या व अशा प्रश्नांनी सुरू होणाऱ्या जाहिरातींचं पेव सध्या सोशल मीडिया विशेषतः युट्युबवर फुटलेलं दिसतं. ही आधुनिक अंधश्रद्धा, हा आधुनिक दैववाद, शिकल्या सवरलेल्या आणि समाज माध्यमांवरती वावर असणाऱ्या तरुण-तरुणींना आकर्षित करू पाहतोय. काही प्रसिद्ध कलाकार, काही सोशल मीडिया प्रभावक (इन्फ्लुएन्सर) हे देखील अशा ॲप्लिकेशनची जाहिरात करताना दिसतात. AstroTalk, InstaAstro, Melooha, AstroYogi, AnytimeAstro, AstroSage Kundli ही त्यातली काही नावं. हे सगळे ॲप आपल्याला ज्योतिषाशी मेसेजच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी देतात. यातले बहुतेक ॲप, 'पहिली चॅट फ्री', अशा लोभसवाण्या जाहिरातीतून ग्राहकांना आकर्षित करतात. एकदा ॲप सुरू केले की मग पाच रुपये, दहा रुपये, वीस रुपये किंवा यापेक्षाही अधिक प्रति मिनिट दराने चॅटिंग सुरू होते. एखादा बुवा बाबा जसं दर्शन फुकट देतो परंतु नंतर दक्षिणा गोळा करतो, अगदी तसंच हे आधुनिक मोबाईल बाबा/बाई करतात.
एखाद्या देवी देवतांना नवस बोलणं किंवा बाबाबुवाचा अंगारा लावणं किंवा कोंबडं, बकरं कापणं ह्या प्राचीन अंधश्रद्धेप्रमाणेच या ॲप्लिकेशन सुद्धा अंधश्रद्धाच आहेत. भूतकाळाचा अभिमान आणि भविष्याचं आकर्षण हा मानवी स्वभाव धर्म. आपल्याला आपलं भविष्य माहित नसतं आणि नेमकं त्याच कुतूहलातून आपण आपलं भविष्य सांगणाऱ्या वेगवेगळ्या बाबाबुवांसमोर हात जोडून उभे राहतो. फार पूर्वी हात बघून, कुंडली बघून नशीब सांगणारे, पोपटाद्वारे नशीब सांगणारे, असे ज्योतिषी आजूबाजूला दिसायचे. काळ बदलला. जग विज्ञानवादी झालं. कुंडलीतल्या मंगळाचा विचार न करता आकाशातल्या मंगळाचा विचार करून आपण मंगळयान अवकाशात पाठवलं. तरी सुद्धा आपण भविष्यवाणी सांगणाऱ्या अशा ज्योतिष्यांना मात्र कुठेही पाठवू शकलेलो नाहीत. ते इथेच आहेत, आपल्या आजूबाजूला. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून फक्त ज्योतिषी नव्हे तर एआय ज्योतिषी अशा रूपाने ते आता पुढे येतायत.
आपलं भविष्य, आपला जन्म कधी झाला ? कुठे झाला ? यावर कधीच अवलंबून नसतं. ते पूर्णतः आपल्या कर्मावर अवलंबून असतं. याचं भान जर आपल्याला असेल, तर अशा आधुनिक बुवा बाबांपासून आपण नक्कीच दूर राहू शकतो. ह्या ॲप्लिकेशन मध्ये भविष्य सांगणाऱ्या व्यक्तींना आपलं भविष्य काय आहे ते माहित नाही, पण त्यांचं भविष्य हे अशा भविष्य सांगण्यातच आहे, हे पक्कं माहिती असतं. आपलं भविष्य सांगत सांगत ते त्यांचं भविष्य सुरक्षित करतात. बऱ्याच दिवसांपासून मला ह्यांना तपासायचे होतेच. मग मागील आठवड्यात मी ह्या आधुनिक ज्योतिषांना तपासण्यासाठी माझं लग्न कधी होणार ? असा मेसेज एका ॲपद्वारे केला आणि बघतो तर काय, चक्क या प्रश्नाचं उत्तर क्षणात यांनी 2026 मध्ये आपल्या लग्नाचे योग आहेत, असं देऊन टाकलं. खरंतर माझं लग्न मागीलवर्षीच म्हणजे 2024 मध्येच झालंय. या साध्या प्रश्नातून नक्की कोणत्या प्रकारचं आणि कुणाचं भविष्य हे सगळे सांगतात यावर शंका येते.
ह्या अशा भविष्य सांगणाऱ्यांपासून दूर राहण्यासाठी अगदी संत साहित्यापासून कवी, गझलकार या सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीने समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. भूत-भविष्य सांगणार्या लोकांनी जगरूढीसाठी दुकान घातलेले आहे. बाजार मांडलेला आहे. त्यांच्या आहारी जाणे म्हणजे ईश्वरापासून दूर जाणे होय. तेव्हा भविष्य जाणून घेण्याचा अट्टाहास कशासाठी? जे काही व्हायचे ते प्रारब्धानुरुप होईल. अशा मतितार्थाने तुकोबा आपल्या अभंगात म्हणतात,
भूत भविष्य कळों यावें वर्तमान ।
हें तों भाग्यहीन त्याची जोडी ।।1।।
आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ते ।
होणार ते होते प्रारब्धेंची ।।2।।
जगरूढीसाठी घातले दुकान ।
जातो नारायण अंतरूनि ।।3।।
तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा ।
थोरली ती पीडा रिद्धि सिद्धी ।।4।।
भविष्य हा पोटार्थी धंदा आणि भविष्य सांगून सामान्य माणसांना दैववादी बनविण्याचा हा खोटारडा व्यवसाय तुकारामांना अमान्य आहे.
"हाथों की लकीरों पे मत जा ऐ ग़ालिब,
नसीब उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते ।"
असं म्हणणारा गालिब असो, नाहीतर
"नको नको ज्योतिषा
माझ्या दारी नको येऊ
माझे दैव मला कळे
माझा हात नको पाहू"
असं म्हणणाऱ्या बहिणाबाई असोत. या सर्वांचा उद्देश एकच समाजाला दैववादी न बनवता कर्मवादी बनवण्याचे. आपल्याला कर्मवीर बनवण्याचे.
भारतात दर मिनिटाला अंदाजे 600 बालक जन्माला येतात. आता आपली जन्मतारीख अन वेळ जर आपलं भविष्य ठरवणार असेल, तर ह्या 600 बालकांचं भविष्य सारखंच असलं पाहिजे. असं होतं का ? अर्थातच नाही.... कुणी रस्त्याच्या कडेला जन्म घेतो, कुणी सरकारी दवाखान्यात, कुणी खाजगी दवाखान्यात तर कुणी घरीच. आपल्या जन्माची ठिकाणं जशी वेगवेगळी असतात, तशीच आपली नशीबं देखील. एवढच कशाला, दवाखान्यात आजूबाजूला असलेली दोन बालके सुध्दा भविष्यात सारखीच नसतात. सांगण्याचा उद्देश एवढाच की ह्या अशा ज्योतिष्यांच्या नादी लागण्यात काहीही उपयोग नाही.
मी नववीला असताना एकानं सांगितलं होतं, तू दहावी पास होणार नाही मात्र दहावीला मी पहिल्या क्रमांकाने पास होऊन त्याच व्यक्तीला पेढे द्यायला गेलो. पुढे बारावीला गेल्यानंतर एकाने सांगितलं, दहावीला भरपूर मार्क्स असणारी मुलं बारावीला नीट पास सुद्धा होऊ शकत नाहीत. मी चांगल्या मार्काने पास होऊन, अगदी गणितात 100 पैकी 100 गुण मिळवून त्याचं गणित खोटं ठरवलं. एवढंच कशाला हस्ताक्षरावरून भविष्य सांगणाऱ्या एकाने मी इंजिनिअरिंगला असताना माझं स्वप्न (अधिकारी होण्याचं) गाठण्यासाठी मला पुष्कळ वर्ष लागतील, अशी भविष्यवाणी केली होती. इंजीनियरिंग संपल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होऊन मी त्याचीही भविष्यवाणी खोटी ठरवली. हे सगळं सांगण्याचा उद्देश एकच, हातावरच्या रेषा नव्हे तर हातातले पुस्तक आपले भविष्य घडवत असते, हा माझा स्वानुभव. कदाचित म्हणूनच बशीर बद्र देखील म्हणतात की,
कभी मैं अपने हाथों की
लकीरों से नहीं उलझा
मुझे मालूम है क़िस्मत का
लिक्खा भी बदलता है ||
आपणही असंच ह्या सगळ्या आधुनिक ज्योतिषांमध्ये न अडकता आपल्या कर्मावर, आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं. आपल्या हातातला मोबाईल जाऊन, हातात पुस्तक आलं तर आपल्याला आपलं भविष्य विचारण्याची गरज पडणार नाही, उलट आपलं भविष्य आपणच घडवू शकू. या देशाला भविष्य विचारणाऱ्या नाही, तर भविष्य घडवणाऱ्या पिढीची गरज आहे. त्यासाठी ह्या आपल्या पिढीने अशा आधुनिक टेक-ज्योतिषांपासून दूर राहण्याची गरज आहे. दैववादी नाहीतर कर्मवादी बनण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment