Sunday, September 16, 2018

असंच काहितरी.... # जगाची भाषा

मिञा, या जगात जगायचं असेल तर जगाची भाषा कळली पाहिजे अन् नुसती कळुन चालणार नाही . आपल्यालाही त्या भाषेत बोलता आलं पाहिजे . इथं अंतरांना अर्थ असतो अन् अर्थांमध्ये देखील अंतर असतं.... इथं नाती तयार होतात ती गरजेनुसार ...इथल्या सगळ्या कल्पनाच भ्रामक , त्या फसव्या आपल्याला फसवत राहणार ..... इथं आपण आपल्यावर प्रेम करावं... इतरांवर प्रेम करावं.... पण इतरांनी आपल्यावर प्रेम करावंच , हा अट्टाहास करण्यासाठी हे जग नाही. जिथे बालहट्ट पुरे होत नाहीत.... तिथे तुझे तारुण्यातले हट्ट कसे पुरे होतात.....

# असंच काहितरी

Tuesday, August 21, 2018

पावसाळी ढग

पावसाळी ढग.......

कालची रिमझिम , तुझ्याही गावात झाली
सकाळ सकाळी गावात ओरडा होता
माञ माझा गाव , अद्यापही कोरडा होता.....

तुझ्यासारखेच ढगानेही , गावाला गाळले माझ्या
वार्याने वावराला , मुद्दाम टाळले माझ्या.....

शेजारच्या गावात , धो धो पाऊस पडतो आहे
माझ्या गावावरुन वाहणार्या वार्याला
तिथे कुठला हिमालय अडतो आहे.....

ढग भरुन येतात , वरुन जातात
गाव सुका सुकाच राहतो
तुझ्या गावातला बोलका पाऊस
माझ्या गावात मुकाच राहतो......

सगळीकडे पाऊस , नदी नाल्यांतुन वाहतो आहे
माझा माञ गाव , ढगाकडेच पाहतो आहे......

तुझ्यासारखेच ढग , आता गावाला छळत असतात
न बोलताच , न थांबताच पळत असतात......

तु नाही आली तरी चालेल
पाऊस आला पाहिजे
मन कोरडं राहिलं तरी चालेल
माती चिंब झाली पाहिजे.......

तुझ्या काय , माझ्या काय
जरी घरावर एकच आभाळ आहे
तुझ्या वेगळ्या ललाट रेषा
माझं वेगळं भाळ आहे......

घर गळेल माझं , एवढा पाऊस पडु दे
काळजातला जाळ जळेल , एवढा पाऊस पडु दे.....

तुझ्या घरावरुन जाणार्या ढगांना
माझ्या घरावर बरसायला सांगुन बघ
माझ्यासाठी किमान एकदा
एवढंच वरदान मागुन बघ......

*www.shashichyamanatale.blogspot.com*

Saturday, August 18, 2018

आयुष्यावर बोलु काही

आयुष्यावर बोलु काही.....


आयुष्य.... खरं तर हा शब्दच पुरे ठरतो सारं काही सांगण्यासाठी. खरं म्हणजे आयुष्य म्हणजे काय...? मी काही कागदी तत्वज्ञान पाजणार नाही. जे मनात आलं ते सहजं इथं उतरलंय....
जन्म आणि मृत्यु यांच्यातलं अंतर म्हणजे आयुष्य की हे अंतर कापण्याचं तंञ म्हणजे आयुष्य ?... नेमकं काय ....? सारं अगदी मनासारखं मिळावं अशी अपेक्षा असेल तर नाहीच येणार आयुष्यात मजा. आयुष्य हे कधी कधी मला झाडासारखं वाटतं ... आपलीच फळ आपल्याला न खाता येण्याजोगं .... म्हणजे आपल्या प्रयत्नावर दुसर्याचीच होते मजा आणि आपण माञ हापापलेलेच आनंदासाठी.... कधी कधी आयुष्य वसुंधरेसारखं वाटतं मला .... अगदी सारं सहन करत राहायचं... कितीही काही झालं तरी स्थिर , अचल....
आयुष्य खरं तर कोडंच आहे .... न सुटणारं.... आयुष्य फार रटाळ वाटतं जर आपण आपलंच पाहिलं... आयुष्य काय हे तुम्हाला आरशासमोर उभा राहुन नाहीच कळणार कधी ते. तसं आयुष्याला जुगारही म्हणतील काही जण. अगदी पुढच्या क्षणी कुठलं पान आपल्या हाती येईल हे माहित नसणार्या त्या खेळासारखं.... पान कसंही येवो ते चांगल्या पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करायचा असतो.... आयुष्य अगदीच काट्यावर चालणंही नव्हे अन् फुलावर झुलणंही नव्हे ... आयुष्याची किंमत कळली त्यांनाच काहितरी किंमत असते.... जाणिवा बोथट झाल्या , विवेक गहाण पडला अन् विचार अशक्त झाले , की आयुष्य म्हणजे काय ? हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडायला लागतो....
अशावेळी जगणं महाग अन् मरण स्वस्त वाटायला लागतं....
का...? हा अद्याप तरी सहन न होणारा गहन प्रश्नच आहे फक्त.....

*www.shashichyamanatale.blogspot.com*