Tuesday, August 21, 2018

पावसाळी ढग

पावसाळी ढग.......

कालची रिमझिम , तुझ्याही गावात झाली
सकाळ सकाळी गावात ओरडा होता
माञ माझा गाव , अद्यापही कोरडा होता.....

तुझ्यासारखेच ढगानेही , गावाला गाळले माझ्या
वार्याने वावराला , मुद्दाम टाळले माझ्या.....

शेजारच्या गावात , धो धो पाऊस पडतो आहे
माझ्या गावावरुन वाहणार्या वार्याला
तिथे कुठला हिमालय अडतो आहे.....

ढग भरुन येतात , वरुन जातात
गाव सुका सुकाच राहतो
तुझ्या गावातला बोलका पाऊस
माझ्या गावात मुकाच राहतो......

सगळीकडे पाऊस , नदी नाल्यांतुन वाहतो आहे
माझा माञ गाव , ढगाकडेच पाहतो आहे......

तुझ्यासारखेच ढग , आता गावाला छळत असतात
न बोलताच , न थांबताच पळत असतात......

तु नाही आली तरी चालेल
पाऊस आला पाहिजे
मन कोरडं राहिलं तरी चालेल
माती चिंब झाली पाहिजे.......

तुझ्या काय , माझ्या काय
जरी घरावर एकच आभाळ आहे
तुझ्या वेगळ्या ललाट रेषा
माझं वेगळं भाळ आहे......

घर गळेल माझं , एवढा पाऊस पडु दे
काळजातला जाळ जळेल , एवढा पाऊस पडु दे.....

तुझ्या घरावरुन जाणार्या ढगांना
माझ्या घरावर बरसायला सांगुन बघ
माझ्यासाठी किमान एकदा
एवढंच वरदान मागुन बघ......

*www.shashichyamanatale.blogspot.com*

No comments: