Thursday, March 16, 2023

Book Review : उन्हाच्या कटाविरुद्ध (नागराज मंजुळे)

 


माझ्या हाती 

नसती लेखणी

तर....

तर असती छिन्नी

सतार...बासरी

अथवा कुंचला

मी कशानेही

उपसतच राहिलो असतो

हा अतोनात कोलाहल मनातला


अशा शब्दात अभिव्यक्ति स्वातंञ्याचं महत्व विषद करणारा हा कवि...जो कवी म्हणुन तसा फारसा परिचित नाही...त्याच्या चिञपटांनीच जाळ अन् धुर संगटच करत सगळ्यांना सैराट करुन सोडलेलं आहे...उपेक्षित घटकांचा अनपेक्षित आवाज होण्याचं काम त्याच्या कलाकृती करत असतात...हाती कॅमेरा येण्याआधी त्याच्या हाती लेखणी आली अन् त्याने त्यातुन कविता प्रसवली..नेमकी कविता कशी सुचली ? ह्या प्रश्नावर तो कवितेतुनच उत्तर देतो अन् म्हणतो की, "उजाडताना मी माझ्यावर कवितेनं धरली सावली, कुणास ठाऊक कशी मनात अंकुरली कविता...पृथ्वीला कशी सुचली झाडे ?" थोडक्यात काय तर सर्वसाधारण सर्वच कविंना न सुटणारा गुंता म्हणजे कविता नक्की कशी सुचते ? हा गुंता न सोडवता उलटपक्षी पृथ्वीवर जशी अनपेक्षित आणि नैसर्गिकपणे झाडे  अंकुरतात, तशीच कविता नैसर्गिकपणे कविला सुचत असते असं सांगुन प्रचंड ताकदीने अन् जिवाच्या आकांताने लिहिणारा कवि आहे प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता नागराज मंजुळे....नाव जरी मंजुळ असले तरी तो माञ नागराज नावाला  जास्त जागतो असंच त्याच्या कविता वाचताना वाटते...नागराज अण्णा हा प्रचंड मोठा माणुस झालाय, पण तो कुठे पोहचला यापेक्षा तो कुठुन आला हे बघितल्यावर ह्या माणसावर प्रेम हॊऊन जाते. 

नरेंद्र जाधव म्हणतात की, “नागराज मंजुळे हे २१व्या शतकातील सत्यजित राय आहेत. अस्सल आणि वास्तववादी समाजचित्रण तर ते करतातच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते सामाजिक संदेश देऊन जातात.” हे विधान नागराज अण्णांचा हा कविता सग्रह वाचल्यावर अधिक खरे वाटायला लागते. कविता संग्रहाचे नावच अतिशय परखड व आकर्षक आहे...उगाच समाजाच्या ठरलेल्या साच्यात बसण्याच्या हट्टापायी जेंव्हा आपण सारंकाही गुमानं सहन करत असतो, तेंव्हा आपली घुसमट होते, आपण अस्वस्थ होतो, तरिही कुणीतरी काहीतरी म्हणेल, कुणीतरी नाव ठेवेल ह्या भितीतुन आपण सरधोपट मार्ग स्विकारतो...आपल्याला हवं तसं चालत नाही, हवं तसं बहरत नाही... वटवृक्ष होण्याची ताकद असतानाही कुंडीतलं रोप बनुन राहतो....अशा वेळी आपण कुठल्याही ढगांना न घाबरता आपण आपल्या विस्तिर्ण आकाशात झेपावलं पाहिजे....कितीही अवरोध झाला तरी आपण आपली दिशा अन् आपली गती सोडता कामा नये...असं तो सांगत राहतो...बाहेर कितीही असह्नय ऊन असलं तरी त्याच्या विरुद्ध त्वेषाने फुलायला हवं... हेच सांगण्यासाठी कवि 'उन्हाच्या कटाविरुद्ध' ह्या कवितेत म्हणतो,

या अनैतिक संस्कृतित 

नैतिक होण्याच्या हट्टापायी

का देते आहेस

एका आभाळणाऱ्या

मनस्वी विस्ताराला मूठमाती

का तू

उन्हाच्या कटाविरुद्ध

त्वेषानं फुलत नाहिस.....

असं त्वेषानं फुलणं जमलं तर खरच किती सोपं होईल जगणं अन् समृद्धही, पण नेमकं हेच तर जमत नाही आपल्याला...हिच खंत ह्या कवितेत मांडलेली आपल्याला दिसते. पण खरा कवि फक्त दशा मांडुन शांत बसत नाही, तर दिशा दाखवण्याचंही काम करत असतो..समाजातल्या कायम दुर्लक्षित राहिलेल्या, उपेक्षित घटकांकडे देखील नागराज अण्णांची कविता आपल्याला घेऊन जाते...कष्टकरी, पिचलेल्या, सामान्य माणसाच्या वेदनेची ही कविता आहे. प्रेम, प्रेमभंग, मैञी, झोपडपट्टीतले जगणे, निसर्ग, तृतीयपंथीयांचं अस्तित्व, अशा आपल्या आजुबाजुच्या असंख्य गोष्टीकडे कविचे किती बारकाने लक्ष आहे याची जाणिव या संग्रहातल्या कविता वाचताना होते. अगदी चार सहा ओळीत अगदी ताकदीने मांडली संकल्पना, मांडलेला विचार आपल्याला विचार करायला भाग पाडतो... अगदी छोट्या छोट्या पण खोल अर्थ असलेल्या ह्या सर्व कविता आहेत.. कविता ही फक्त जगाचं रडगाणं गाण्यासाठीच करायची नसते तर ती जगण्याचा आधार असते...ती आपल्याला दुःखात कधी हसवते तर हसताना कधी अलगद आपल्या पापण्या ओलावते...कवितेची आपल्या आयुष्यातली भुमिका मांडताना कविने मिञ ही कविता रचली..ज्यात तो म्हणतो,

"आम्ही दोघे मिञ

एकमेकांचे जिवलग

एकच ध्येय एकच स्वप्न घेऊन जगणारे

पुढे त्याने आत्महत्या केली

आणि मी कविता लिहीली"

थोडक्यात काय तर कविता किती मोठी भुमिका बजावते हेच जणु यात नागराज अण्णांनी मांडलेले आहे. अशा प्रकारच्या जवळपास पन्नासहुन अधिक कविता अगदी छोट्याशा हातात मावेल अशा ह्या संग्रहात दिलेल्या आहेत. प्रत्येक कविता वाचल्याक्षणीच लक्षात राहावी इतकी छोटी पण प्रभावी. दिग्दर्शक म्हणुन प्रसिद्धेच्या शिखरावर पोहचलेले नागराज अण्णा साहित्यातही कवितेचा अप्रतिम नमुना देऊन जातात...त्यामुळे अण्णांचा चिञपट जितका प्रेक्षणीय तितकीच त्यांची कविता वाचनीय आहे.. नागराज मंजुळे यांची 'तुझ्या येण्याअगोदर एक पञ' ही ह्याच संग्रहातील कविता त्यांच्या एका मुलाखतीत टिव्हीवर खुप वर्षाआधी ऐकली होती...तेंव्हाच त्यांच्या 'ऊन्हाच्या कटाविरुद्ध' ह्या कवितासंग्रहाबद्दल ऐकले होते...अन् त्यानंतर हा संग्रह वाचायला मिळावा यासाठी प्रयत्न केला होता..बऱ्याच वर्षानंतर हि इच्छा‌ पुर्ण झाली अन् अपेक्षेपेक्षाही अप्रतिम असा ठेवाच जणु हाती लागला.सर्वांनीच आवर्जुन वाचावा अन् संग्रही ठेवावा‌ असा हा कवितासंग्रह...अवश्य वाचाच.


#असंच_काहितरी #Book_Review

Wednesday, March 15, 2023

Book review : न पाठवलेलं पञ (महाञया रा)

 


पुस्तकातले बरेच पॅसेज मोबाईल वर कुठे कुठे कुठे वाचणात आले होते अन् पुस्तकाबद्दलची कुतुहलता वाढत गेली...पुस्तक एकदा वाचायलाच पाहिजे असं वाटत होतं...पण विकत घेण्याचा काही योग आला नाही..मग अचानक एकेदिवशी एका नातेवाईकांकडे जाणं झालं अन् त्यांच्या घरातल्या लायब्ररीत ते पुस्तक दिसलं..दिसलं तसच हातात घेतलं अन् त्यांच्याकडुन वाचायला घेऊन आलो...मध्यंतरी दुसरी पुस्तकं वाचत होतो त्यामुळे हे जरा लांबणीवर पडलं पण काल परत हातात घेतलं अन् आज वाचुन झालं...छोटसं अगदी १८८ पानं असलेलं हे जगप्रसिद्ध पुस्तक...हे तेच पुस्तकं जे छोट्या छोट्या गोष्टिमधुन आयुष्यातल्या कित्येक प्रश्नांना सहज उत्तर देतं...यश मोठ्या गोष्टीत असतं, समाधान छोट्या गोष्टीत असतं..ध्यान शून्यात असतं..ईश्वर सर्व गोष्टीत असतो..हेच जीवन आहे...असा संदेश देणारं हे तेच पुस्तक... प्रत्येक पानात ढासुन भरलेला मोलाचा संदेश अन् जगण्याचं तत्वज्ञान...हे तेच पञ जे पाठवलेलं नाही कधीच, कोणालाच, तरीही सगळ्या जगात पोहचलय....होय मी त्याच जगप्रसिद्ध "न पाठवलेलं पञ" (अर्थात मुळ इंग्रजी पुस्तक : Unposted Letter - महाञया रा) या पुस्तकाबद्दल बोलतोय....

मिञांनो, न पाठवलेलं पञ आज न पाठवता कित्येकांच्या मनात पोहचलय...नुसतं पोहचलं नाही तर मनात घर करुन कायमचं स्थिर स्थावर झालय...काही पुस्तकं फक्त चाळायची असतात....काही पुस्तकं एकदा तरी वाचायची असतात...काही पुस्तकं वारंवार वाचत राहायची असतात...तर काही पुस्तक अगदी रोज उशाला घेऊन बसावं अन् रोज वाचावं वाटावं अशी असतात .... मला वाटतं, हे पुस्तक ह्या शेवटच्या गटातलं ठरेल..हे पुस्तक एकदा दोनदा वाचुन हातावेगळं करण्यासारखं नाहीये..हे कायम आपल्या सोबत ठेवण्याचं अन् जिथे कुठे आपण अडलो .. जिथे एखादा प्रश्न पडला .. तिथे वाट दाखवण्यासाठी, तो प्रश्न सोडवण्यासाठी कामी आणण्याचं शस्ञ आहे हे पुस्तक...

आज आपल्याला भेटलेला एक दिवस हा आपल्याला मिळालेला उपहार आहे त्याचा सदुपयोग करायलाच हवा असं सांगण्यापासुन ते परिवर्तनावर लक्ष ठेवलं तर त्यातुन संस्कृती बनते इथपर्यंत.…विविध मथळ्याखाली आयुष्याला दिशा देतील असे संदेश पानोपानी महाञया रा यांनी या पुस्तकात पेरले आहेत. आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक वस्तुपेक्षा आपण महत्वाचे आहोत हे सांगताना लेखक सांगतो की खरच भाग्यवान आहेत ते लोक ज्यांना उमजलं आहे की प्रेम माणसांवर करायचं असतं अन् वस्तु वापरायच्या असतात, माणसांचा वापर आणि वस्तुंवर प्रेम नाही..आपल्या सभोवताली दिसणारी गर्दी अन् त्या गर्दीतले आपण कधीतरी चुकुन जेंव्हा माणसाचा वापर करु लागतो अन् वस्तुवर प्रेम करु लागतो तेंव्हा आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम हे एक वाक्य करतं..असेच असंख्य संदेश आपल्याला यात वाचायला मिळतील...मी हा, मी तो असे असंख्य लेबलं लावुन जगणाऱ्यांसाठी लेखक सांगतो की हि सगळी लेबलं काढुन टाका, या लेबलांशिवाय नुसते तुम्ही पुरेसे आहात, पुरेशापेक्षाही जास्त. साध्या साध्या गोष्टिंमधुन जगण्यासाठी आवश्यक असणारे कित्येक विचार पुष्प आपल्याला पुस्तकाच्या पानोपानी दिसतात...एकदा वाचुन बघा...हे पुष्प वेचुन बघा..बघा ह्या फुलांचा सुगंध आपल्याही आयुष्याला सुगंधित करुन टाकेल यात शंकाच नाही.

📌 पुस्तकातली मनाला भावलेली काही वाक्ये :

१) वस्तुस्थिती ही आहे की, 'आपण करत नाही'...ही नव्हे की, 'आपण करु शकत नाही'.
२) मुर्ख आणि शहाणा - दोघेही एकच गोष्ट करतात, पण वेगवेगळ्या वेळी. शहाणा ती लगेच करतो तर मुर्ख नंतर करतो. 'उद्या' जणु काही आजच असल्याप्रमाणे वागा.
३) जग कसं वागतं ह्याच्याशी आपला संबंध नाही. आपला अभिमान आपल्या नजरेतुन आपण योग्य वागण्याशी निगडीत आहे. तुमची कितीही कसोटी पाहिली जावो, तुम्ही कुठेही जा, काहीही करत असा..तुमच्या उदात्त स्वभावाचाच आविष्कार तुम्ही केला पाहिजे.
४) ब्रेकवाचुन आपला ब्रेकडाऊन होईल.
५) ज्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं, तिला तोंड द्यावंच लागतं..उशिरा देण्यापेक्षा लवकर द्यावं.
६) एकतर करु नका, किंवा निष्ठापुर्वक करा. मधलंअधलं काही नको.
७) स्वप्न असतं अंतर - तुम्ही जिथे आहात आणि तुम्ही जिथे असणार आहात, त्यांच्यामधलं.
८)  सुखाकडे नेणारा मार्ग नसतो. सुख हाच मार्ग असतो.
९) तुम्ही ज्याची इच्छा करता ते तुम्हाला मिळत नाही. तुम्ही ज्याला पाञ असता ते तुम्हाला मिळतं.
....... असेच बरेच काही ....तुर्तास इतकेच 😊


#असंच_काहितरी
#Book_Review

Saturday, March 11, 2023

MPSC2021 निकालाच्या निमित्ताने...

 




सध्या होत असणारी बरीच चर्चा एका विषया भोवती दिसतेय, तो विषय म्हणजे निकाल लागल्यावर, पोस्ट भेटल्यावर जे भव्यदिव्य आनंद साजरा केला जातोय..ज्या मिरवणुका काढल्या जातात...जे मोठ मोठे बॅनर लावुन विश्वनिर्मितीचे दाखले म्हणुन निकालाला दाखवले जाते हे सगळे खरंच गरजेचे आहे काय ? आनंद सगळ्यांनाच होतो..खरंतर तो झालाच पाहिजे, कारण बरीच वर्षी, बरीच मेहनत सगळं फळाला आल्यासारखं वाटणं हे साहजिकच आहे...पण...इथेच मोठा पण आहे...हे सगळं करताना..हे सगळं होत असताना...एक मोठा अभ्यास करणारा गट म्हणत असतो (किमान मनातल्या मनात तरी...) की बाबांनो, तुमच्या कर्मकहाण्या खुप ऐकल्या आता कामाचं बोला..तुमची मन की बात खुप ऐकली आता आमच्या काम की बात बोला...तुमचे जिद्द, परिश्रम, मेहनत, कष्ट, चिकाटी, सकाळी चार ला ऊठणं, गार पाण्याने अंघोळ, लायब्ररीत जाणारा पहिला मी, अन् बाहेर जाणारा शेवटचा मीच...अशा प्रचंड प्रेरणादायी प्रवासातुन मला मिळणारी उर्मी अन् तुम्हाला यशाची चढलेली गुर्मी दोन्हीही फार काळ टिकत नाही...बोलायचंच असेल तर काहितरी शाश्वत सांगा..अभ्यास कसा करायचा ते सांगा ? कोणत्या पेपरसाठी काय वाचु ते सांगा ? जुन्या पेपरचे विश्लेषण करा, पण नक्की काय करायचे ते सांगा ? अन् सगळ्यात महत्वाचे तुमची प्रेरणा याक्षेञाकडे एखाद्याला आकर्षुण घेण्यासाठी कामी येईल, आम्ही इकडे आलेलो आहोत आता यातुन बाहेर पडण्यासाठी काहीतरी सांगा...प्लिज कामाचं काहितरी सांगा.....

हे असं हल्ली काही वर्षा पुर्वी व्हायचं...मी जेंव्हा अभ्यास सुरु केला (2019) तेंव्हा हे जास्त प्रमाणात चालायचं...पण आता फरक दिसतोय ...काही निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी (अर्थात अधिकारी पण म्हणता येईल त्यांना) हे सगळं या क्षेञात चालणारं बदलुन नवं काहितरी करण्याचं ठरवलं ..अन् बदल जाणवु लागलाय...आता टाॅपर अभ्यासाचं बोलतात...प्रेरणेपेक्षा परिक्षेचं बोलतात...अंगावर गुलाल उधळुन घेण्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही, पण त्याच माखलेल्या गुलालाने काही अधिकारी काम की बात करण्यासाठी परिक्षार्थींना बोलत असतात...आई वडिलांच्या मेहनतीचे पांग फेडले हे सांगतानाच, मागे राहिलेल्या मिञांना सोबत आणण्यासाठी काय करता येईल ह्याचाही विचार ते करतात...ते दिभाभुल करण्यापेक्षा दिशा दाखवण्याचं काम करतात...तुमच्यात अदम्य साहस आहे, तुम्ही करु शकता...नव्हे तुम्ही कराच, असा अट्टाहास धरण्यापेक्षा नसेल जमत तर दुसरा पर्याय बघा...एकडे खरंच खुप काही चांगलच आहे असं नाही, हे स्पष्टपणे सांगण्याचं काम ते करतात...एकदंरीतच आता यशाचं, अपयशाचं फार कौतुक करण्यात रमण्यात व्यस्त असणारे कमी होताय, आपण तर झालो आता मागे राहिल्यांना पुढे आणण्यासाठी शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न ते करत असतात...हा बदल तुम्हाला दिसत असेलही, अन् जाणवत देखील असेल..पण तरीही अजुनही पुर्णपणे जुन्या सर्वच प्रथापरंपरा खंडीत झाल्यात असं मला वाटत नाही.. टाॅपर बोलतात काहितरी..त्यातले दोनचार कामाच्या वाक्याचे व्हिडीओ कट करुन सोशल मिडीया वर टाकायचे अन् प्रेरणेचे पाट वाहु द्यायचे..मग ह्या पाटातुन वाहणारं पाणी स्पर्धापरिक्षा ज्यांची शेती आहे अशांच्या शेताला जावुन मिळतं अन् त्यांचं पिक भरघोस जोमानं उभं राहतं..ह्या पिकाचा हंगाम काही एक नाही, हे बारमाही पिक आहे अन् इथला शेतकरीही हुशार आहे...असो.

हे सगळं होत असताना मला वाटतं निवड झालेल्या लोकांबद्दल जितकं परखड आपण बोलतो, अपेक्षा ठेवतो तितकच तयारी करणाऱ्या लोकांनी पण लक्षात ठेवायला हवे की आपण एक ग्रॅज्युएट झालेले व्यक्ती आहोत...भलबुरं, खरंखोटं सारं समजु शकतो..त्यामुळे आपल्या कामाचं काय हे सहज ओळखता यायला हवं..विजेत्यांच्या झगमगाटातुन आपल्याला वाट दाखवतील असे पथदिवे ओळखुन आपली वाट चालायला हवी..खरंतर एमपीएससी परिक्षेमध्ये फार काही कुणी सांगावं असं नाहिये...कुठल्याही गायडन्सने तुम्ही पास व्हाल, याची शाश्वती नाही... फक्त परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी (परीक्षेसाठी सगळेच करतात, परिक्षेचा अभ्यास केला पाहिजे) थोडी फार मदत नक्कीच होऊ शकते... ती घ्या अन् आपल्या अभ्यासाला लागा...मी स्वतः 2017 पासुन कुठल्याही टाॅपरचे भाषण ऐकले नाहीत....अभ्यासाबाबतीत मार्गदर्शन नक्कीच घेतले पण प्रेरणा म्हणाल तर आपल्याला ती आपल्या परिस्थितीतुनच मिळत असते, आपली परिस्थिती, आपल्या‌ आईवडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवला की आपोआप प्रेरणेचे पाट आपल्या अंतःकरणात वाहु लागतात...त्याच आधारावर आपण आपला अभ्यास करायचा असतो...सतत...सातत्य हाच मुलमंञ आहे आपल्या अभ्यासाचा...एखादी गोष्ट वारंवार केली की आपोआप अवघड गोष्ट सोपी वाटते अन् सोपी गोष्ट सहज जमते..मला वाटते अभ्यास करत राहणे..कुठे काही अडलेच तर YouTube/Google वरुन एखादी संकल्पना समजुन घेणे अन् आपला अभ्यास चालु ठेवणे...एवढेच लागते परिक्षा पास व्हायला...टाॅपरची भाषणं ऐकुन परिक्षा पास झाला असा मला तरी कुणी माहित नाही..आपल्याला खुप खुप शुभेच्छा...👍

Saturday, February 25, 2023

जमले पाहिजे....


    वाट मिळता चालणे जमले पाहिजे

    चालताना काट्यांना टाळणे जमले पाहिजे


    अंधाराला कशाला द्यायच्या उगा शिव्या

    काळजात काजवा पाळणे जमले पाहिजे


    नसतात रे भरायच्या साऱ्याच जागा

    काही जागा गाळणेही जमले पाहिजे


    उजळुन निघेल नाते असे काही, फक्त

    शंका वेळीच जाळणे जमले पाहिजे



     #असंच_काहीतरी 

झाड - माती




Sunday, January 15, 2023

प्रिय आदरणीय आयोग....

 




















शब्दात काय सांगु
माझी करुण कहाणी
कंठात स्वर दाटलेला
अन् ओठी लपली गाणी ।।

स्वायत्त अन् स्वतंञ तु
तु सागरा परी अथांग
पाण्यास पाणी नको
मग काय म्हणु सांग ।।

ग्रंथीस माझ्याही बघ
किती ताण येत आहे
नेमक्या ग्रंथास कोणत्या
सांग तु सन्मान देत आहे ।।

कोणते तज्ञ अन्
कोणता संदर्भ तुझा
सत्यास प्रसवणारा
हैराण गर्भ माझा ।।

मान्य तुझा आम्ही
ठेवला पाहिजे आदर
पण तुही जरा आमची
केली पाहिजे ना कदर ।।

#असंच_काहितरी
📝शशिच्या मनातले

Tuesday, January 3, 2023

साविञीबाई.....


स्ञीला भिञी समजणार्या प्रतिगामी विचारांना काञी लावुन पतित पावन स्ञियांवर शिक्षणाची छञी धरणारी साविञी..

जोतिबाने पेटवलेल्या ज्योतीची क्रांतीने मशाल करणारी क्रांतीज्योती...

मातीत मुळाक्षर लिहुन बाराखडी शिकणारी अन् स्ञीला आघाडीवर नेणारी क्रांतिकारी स्ञी साविञी....

सनातन्यांच्या विरोधाला न जुमानता स्ञी शिक्षणासाठी आयुष्यवेचणारी साविञी.....

चुल अन् मुल ह्यात गुंतुन पडलेल्या स्ञी जातीच्या हाती शिक्षणाचे फुल देणारी साविञी...


जयंतिनिमित्त साविञीबाईंच्या पविञ स्मृतिस विनम्र अभिवादन !!!🙏🙏