Thursday, March 16, 2023

Book Review : उन्हाच्या कटाविरुद्ध (नागराज मंजुळे)

 


माझ्या हाती 

नसती लेखणी

तर....

तर असती छिन्नी

सतार...बासरी

अथवा कुंचला

मी कशानेही

उपसतच राहिलो असतो

हा अतोनात कोलाहल मनातला


अशा शब्दात अभिव्यक्ति स्वातंञ्याचं महत्व विषद करणारा हा कवि...जो कवी म्हणुन तसा फारसा परिचित नाही...त्याच्या चिञपटांनीच जाळ अन् धुर संगटच करत सगळ्यांना सैराट करुन सोडलेलं आहे...उपेक्षित घटकांचा अनपेक्षित आवाज होण्याचं काम त्याच्या कलाकृती करत असतात...हाती कॅमेरा येण्याआधी त्याच्या हाती लेखणी आली अन् त्याने त्यातुन कविता प्रसवली..नेमकी कविता कशी सुचली ? ह्या प्रश्नावर तो कवितेतुनच उत्तर देतो अन् म्हणतो की, "उजाडताना मी माझ्यावर कवितेनं धरली सावली, कुणास ठाऊक कशी मनात अंकुरली कविता...पृथ्वीला कशी सुचली झाडे ?" थोडक्यात काय तर सर्वसाधारण सर्वच कविंना न सुटणारा गुंता म्हणजे कविता नक्की कशी सुचते ? हा गुंता न सोडवता उलटपक्षी पृथ्वीवर जशी अनपेक्षित आणि नैसर्गिकपणे झाडे  अंकुरतात, तशीच कविता नैसर्गिकपणे कविला सुचत असते असं सांगुन प्रचंड ताकदीने अन् जिवाच्या आकांताने लिहिणारा कवि आहे प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता नागराज मंजुळे....नाव जरी मंजुळ असले तरी तो माञ नागराज नावाला  जास्त जागतो असंच त्याच्या कविता वाचताना वाटते...नागराज अण्णा हा प्रचंड मोठा माणुस झालाय, पण तो कुठे पोहचला यापेक्षा तो कुठुन आला हे बघितल्यावर ह्या माणसावर प्रेम हॊऊन जाते. 

नरेंद्र जाधव म्हणतात की, “नागराज मंजुळे हे २१व्या शतकातील सत्यजित राय आहेत. अस्सल आणि वास्तववादी समाजचित्रण तर ते करतातच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते सामाजिक संदेश देऊन जातात.” हे विधान नागराज अण्णांचा हा कविता सग्रह वाचल्यावर अधिक खरे वाटायला लागते. कविता संग्रहाचे नावच अतिशय परखड व आकर्षक आहे...उगाच समाजाच्या ठरलेल्या साच्यात बसण्याच्या हट्टापायी जेंव्हा आपण सारंकाही गुमानं सहन करत असतो, तेंव्हा आपली घुसमट होते, आपण अस्वस्थ होतो, तरिही कुणीतरी काहीतरी म्हणेल, कुणीतरी नाव ठेवेल ह्या भितीतुन आपण सरधोपट मार्ग स्विकारतो...आपल्याला हवं तसं चालत नाही, हवं तसं बहरत नाही... वटवृक्ष होण्याची ताकद असतानाही कुंडीतलं रोप बनुन राहतो....अशा वेळी आपण कुठल्याही ढगांना न घाबरता आपण आपल्या विस्तिर्ण आकाशात झेपावलं पाहिजे....कितीही अवरोध झाला तरी आपण आपली दिशा अन् आपली गती सोडता कामा नये...असं तो सांगत राहतो...बाहेर कितीही असह्नय ऊन असलं तरी त्याच्या विरुद्ध त्वेषाने फुलायला हवं... हेच सांगण्यासाठी कवि 'उन्हाच्या कटाविरुद्ध' ह्या कवितेत म्हणतो,

या अनैतिक संस्कृतित 

नैतिक होण्याच्या हट्टापायी

का देते आहेस

एका आभाळणाऱ्या

मनस्वी विस्ताराला मूठमाती

का तू

उन्हाच्या कटाविरुद्ध

त्वेषानं फुलत नाहिस.....

असं त्वेषानं फुलणं जमलं तर खरच किती सोपं होईल जगणं अन् समृद्धही, पण नेमकं हेच तर जमत नाही आपल्याला...हिच खंत ह्या कवितेत मांडलेली आपल्याला दिसते. पण खरा कवि फक्त दशा मांडुन शांत बसत नाही, तर दिशा दाखवण्याचंही काम करत असतो..समाजातल्या कायम दुर्लक्षित राहिलेल्या, उपेक्षित घटकांकडे देखील नागराज अण्णांची कविता आपल्याला घेऊन जाते...कष्टकरी, पिचलेल्या, सामान्य माणसाच्या वेदनेची ही कविता आहे. प्रेम, प्रेमभंग, मैञी, झोपडपट्टीतले जगणे, निसर्ग, तृतीयपंथीयांचं अस्तित्व, अशा आपल्या आजुबाजुच्या असंख्य गोष्टीकडे कविचे किती बारकाने लक्ष आहे याची जाणिव या संग्रहातल्या कविता वाचताना होते. अगदी चार सहा ओळीत अगदी ताकदीने मांडली संकल्पना, मांडलेला विचार आपल्याला विचार करायला भाग पाडतो... अगदी छोट्या छोट्या पण खोल अर्थ असलेल्या ह्या सर्व कविता आहेत.. कविता ही फक्त जगाचं रडगाणं गाण्यासाठीच करायची नसते तर ती जगण्याचा आधार असते...ती आपल्याला दुःखात कधी हसवते तर हसताना कधी अलगद आपल्या पापण्या ओलावते...कवितेची आपल्या आयुष्यातली भुमिका मांडताना कविने मिञ ही कविता रचली..ज्यात तो म्हणतो,

"आम्ही दोघे मिञ

एकमेकांचे जिवलग

एकच ध्येय एकच स्वप्न घेऊन जगणारे

पुढे त्याने आत्महत्या केली

आणि मी कविता लिहीली"

थोडक्यात काय तर कविता किती मोठी भुमिका बजावते हेच जणु यात नागराज अण्णांनी मांडलेले आहे. अशा प्रकारच्या जवळपास पन्नासहुन अधिक कविता अगदी छोट्याशा हातात मावेल अशा ह्या संग्रहात दिलेल्या आहेत. प्रत्येक कविता वाचल्याक्षणीच लक्षात राहावी इतकी छोटी पण प्रभावी. दिग्दर्शक म्हणुन प्रसिद्धेच्या शिखरावर पोहचलेले नागराज अण्णा साहित्यातही कवितेचा अप्रतिम नमुना देऊन जातात...त्यामुळे अण्णांचा चिञपट जितका प्रेक्षणीय तितकीच त्यांची कविता वाचनीय आहे.. नागराज मंजुळे यांची 'तुझ्या येण्याअगोदर एक पञ' ही ह्याच संग्रहातील कविता त्यांच्या एका मुलाखतीत टिव्हीवर खुप वर्षाआधी ऐकली होती...तेंव्हाच त्यांच्या 'ऊन्हाच्या कटाविरुद्ध' ह्या कवितासंग्रहाबद्दल ऐकले होते...अन् त्यानंतर हा संग्रह वाचायला मिळावा यासाठी प्रयत्न केला होता..बऱ्याच वर्षानंतर हि इच्छा‌ पुर्ण झाली अन् अपेक्षेपेक्षाही अप्रतिम असा ठेवाच जणु हाती लागला.सर्वांनीच आवर्जुन वाचावा अन् संग्रही ठेवावा‌ असा हा कवितासंग्रह...अवश्य वाचाच.


#असंच_काहितरी #Book_Review

No comments: