Tuesday, January 23, 2018

खिडकी

*खिडकी.....*

दमल्या भागल्या जिवाला या
असा मिळावा विसावा
थकुन बसावे खिडकीपाशी
अन् खिडकीतुन तुझाच चेहरा दिसावा ।।

खिडकीजवळ नुसतंच मग
उगाच बसुन रहावं
इवल्याश्या फटीमधुन तुझ्या
ओल्याचिंब केसांकडे पहावं ।।

तुझी ओलिचिंब पाठ
अन् पाहुन त्यावर तरळणारे पाणी
तुच सांग कशी येणार नाहीत
मग माझ्या तोंडी गाणी ।।

तु तोंड फिरवताच
मी लपुन जावं .....
का...?
कारण चोरुन पाहण्यात काय मजा असते
तुला कसं सांगावं ।।

तु केसांना पिळतेस तेंव्हा
एकडे काळजाला पिळ पडत जातो
अन् तुझ्या प्रेमाचा पुन्हा पुन्हा
रोग मला जडत जातो ...।।

*🖊 शशि....( तिला पाहताना....)*

Tuesday, January 16, 2018

बदल

*बदल......*


नाही कसं म्हणु मी
झालायच म्हणा बदल
आदर्शांना धरुन चालणारी
आता दिसत नाहीत दल ।।

बळ वाढायचं पुर्वी
कुणी म्हटलं की दल
हरवलय ते बळ सारं
आता दल म्हणजे फक्त दलदल ।।

ह्याच दलदलीत
रुतुन बसतात कित्येकांचे पाय
सारं बळ लावुनही
मग निघता निघत नाय ।।

पायाला हल्ली तशी
कमी बोचतात काटे
क्राँक्रीटच्या जंगलात
पसरतील कशी बोरी, बाभळीचे फाटे ।।

कातडी राहतायत सुरक्षित
पण काळजात आहेच की सल
मग कसं म्हणता येईल
झालाच नाही बदल ।।

सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा
अन् रातच्याला पडतो पाऊस
क्षणातच हल्ली इथे
ऋतु बदलतायत कुस ।।

माणसांचे संदर्भ अन् मातीचा गर्भ
बदलता येत नाही असं वाटायच पुर्वी
पण आता सारंच बदलुन टाकालय आम्ही
खरय जगण्याचा बदलला कल
की जगात अनिवार्यच ठरतो बदल....।।

*🖊शशि....( बदल बघताना )*
www.shashichyamanatale.blogspot.com

Friday, January 12, 2018

जिजाऊस पञ

विदर्भाची लेक , मराठवाड्याची सुन अन् पश्चिम महाराष्ट्राची रणरागिणी
आदर्श मातृत्व , कर्तृत्व , नेतृत्व
एक नव्हे तर दोन  नव्हे तर तीन तीन छाञपती घडवणार्या
अशा या राष्ट्रमाता , राजमाता ,
माँसाहेब जिजाऊंच्या चरणी विनम्र अभिवादन...

माँ साहेब
राजे पुन्हा येतील की नाही सांगता येणार नाही पण एकदा तुम्ही परत याच. नवा शिवाजी घडवण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच आहे , नाहीतर इथे कित्येक राडा करणारी , धुरळा करणारी, मिञांची लाडकी, रोज रस्तोरस्ती घडतायत ,‌ फक्त उणीव आहे ती या मातीवर नाही तर यवनांच्या छातीवर नाच करत रयतेच्या मनावर राज्य करणार्या शिवरायांची ..... आणि ते आपल्याशिवाय शक्य होईल असं वाटत नाही . तुम्ही दांडपट्टा , तलवार बाजी , घोडेस्वारी , सारंच शिकुन घेतलं होतं , तेंव्हा तु मुलगी आहेस जिजे तु हे शिकुन काय करणार ? असा प्रश्न नाही उभा केला आपल्या पिताजींनी . इथे सारं उलटं होतंय आता. मुलींना सातच्या आत घरात, अन् इथे नावासमोर राजे लावुन फिरणारे करतायत राडा अगदी मध्यराञीही. 
माँसाहेब, आपण महाराष्ट्राच्या छाताडातली अंधश्रद्धेची पहार उखडुन फेकली होतीत, पण अंधश्रद्धा अजुनही डोक्यातुन जात नाहीय आमच्या. " शिवबा , जर तुम्हाला काही झालंच तर ही जिजाऊ समजेल की आपण निपुञिक होतो म्हणुन " , असं म्हणत शञुशी दोन हात करायला पाठवण्याचं सामर्थ्य म्हणजे धैर्याचा सर्वोच्च कळसच की. आता आता काल परवा दंगल झाली , यांनी त्यांना मारले म्हणे, पण दोनशे वर्षानंतरही आपण त्याच गोष्टींसाठी आपापसात लढलो यापेक्षा वेगळं काही घडलं नाही. तेंव्हा वाटलं महाराष्ट्र तुमचे संस्कार विसरालय बहुतेक. " मरानांती वैरानी " म्हणत अफजलखानाची कबर बांधायला लावली होती तुम्ही हे इथल्या आताच्या मावळ्यांना केंव्हा कळणार कुणास ठाऊक ? तुम्ही मावळ्यांना जातीसाठी नाहीतर मातीसाठी लढायला लावलंत पण इथे आम्ही बर्याचदा जातीसाठी माती खात असतो हल्ली. मागच्या चारशे वर्षात बरंच काही बदललय आता, आधी लग्न कोंढाण्याचं  , म्हणणारा तानाजी आता दिसत नाही , घोडखिंडीत शञुला अडवुन , " राजे , तुम्ही जा . लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ", म्हणत आपल्या रक्ताने खिंड पावन करणारा बाजी आता भेटत नाही. "माझ्या शिवबाचं स्वराज्य म्हणजे इथल्या रयतेचं स्वराज्य ", असं म्हणायचात तुम्ही पण आता तीच रयत लोकशाहीच्या मंदिरासमोर लटकुन संपवतेय स्वतःला , तेंव्हा स्वराज्य मिळालं होतं हे खरं पण ते कुठपर्यंत राहिल याची शाश्वती देता येणार नाही. काय तर म्हणे आम्ही लोकशाही स्विकारलीय पण लोकशाहीचा नेमका अर्थ तरी काय ? हा प्रश्न अर्ध्याअधिक भारताला अजुन उमजलाच नाही, असो. आणि हो तसा विकासही झालाय ( वेडा ? ) बराच. मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला होता , आता तर अगदी चंद्रावर , मंगळावरही तिरंगा रोवलाय आम्ही, अजुनही आमच्या नशिबी चांदणं आलंच नाही अन् आपच्या राशीतला मंगळ अजुनही टंगळमंगळ करत का होईना आडवा येतोच आम्हाला..असो. बर्याच गोष्टी आहेत. सारं काही मीच सांगणं बरं वाटणार नाही , ( नाहीतर काही तरी सस्पेंस हवा की नाही ? ) तुम्ही आल्यावर बघालंच की. तेंव्हा इथल्या भरकटलेल्या मावळ्यांना पुन्हा एकदा  सह्याद्रीचा वारसा सांगण्यासाठी, अन् इथे नवा शिवबा घडवण्यासाठी याच ..... आम्ही आपली वाट बघतोय....

......... आपलेच वारसदार.......

www.shashichyamanatale.blogspot.com

Friday, October 20, 2017

बळीराजा

*बळीराजा....*

माझ्या लेखणीला दिसत नाही
प्रियसीच्या गालावरली खळी
फुलणारी गुलाबाची कळी
तिला दिसतो राबणारा बळी

म्हणुनच ती होते अस्वस्थ
विचारते लाखो प्रश्न
जेंव्हा बघते
सरकारचा लटका हर्ष
अन् बळीराजाच्या मयतावरचं लोणी खाण्यासाठी
होणारा नंतरचा संघर्ष ।।

बळीचाच कुठवर जाणार बळी
कुणीतरी त्याला मिळेल का वाली
राब राब राबुन , मर मर मरणेच
कुठवर त्याच्या भाळी ।।

ञेतायुग असो अथवा कलियुग
बळीनं अजुनही देणं सोडल नाही
अन् सरकारी वामनानं
अजुनही घेणं सोडलं नाही ।।

घेऊन घेऊन किती घेशील वामना
पहिल्या सारखा तु आता
पाऊल मागत नाहीस
अन् सारं लुटून नेलं तरी
त्याला चाहुल लागत नाही ।।

बळीराजा आता थोडा शहाणा हो
वामनासारखा कपट
तुही शिकुन घे ।
तुझी पृथ्वी मागणार्याचा
तुच स्वर्ग विकुन ये ।।

*🖊 शशि.....*
*📞९१३०६२०८३४*
www.shashichyamanatale.blogspot.com

Tuesday, October 17, 2017

भुकेचं राष्ट्रगीत

आजही ऎकु येतंय
भुकेचं राष्ट्रगीत
दिसतेय इथे...
कष्टाची हार
वशिल्याची जीत
ज्यांच्या हाती सत्ता
त्यांचच हित...
तरी सारेच शांत
जगणार भीत भीत
कशाला काय बोलावं
ही तर आहेच रीत...

अशा माझ्या देशात
कुणी जेंव्हा म्हणतं
सत्ता कुबेराची रखेल आहे
अन् इथली संसद रंडीखाना आहे
तेंव्हा तोंडदेखल्या देशभक्तांना
तुम्ही त्यांना काय
देशद्रोही म्हणणार काय..

खर तर आपण काहीच करणार नाही
याची जाणिव आहे मला
ज्याचा मोर्चा त्याची चर्चा
करणारा माझा युवक
सहज दुर्लक्षित करु शकतो
इथले लाखोंप्रश्न..
अन् करेल साजरा जश्न...

पण कानावर राष्ट्रगीतापेक्षाही
भुकेचं मधुर संगीत पडतं
तेंव्हा बधिर होऊन चालेल का..?
अन् ज्यांना जमेल त्यांनी
बधीर व्हावं खुशाल

स्वातंञ्याचा रस पिता पिता
खुशाल कराव्यात न्यु इंडीया वर कविता
तुर्तास एव'ढं'च....

🖊 शशि.....

नशिब

तो दिवसभर मर मर करत राहिला..
आलेल्या अडचणींवर मात देत
चालत राहिला पाऊलन् पाऊल
ठेचाळलेल्या पाऊलांनी उधळली धुळ..
सार्या अशक्यतांना त्यानं..
शक्य करुन दाखवलं....
तरी त्याला,
मिळाला नाहीच तो मान...


माना खाली घालुन लोकं
म्हणत होते, साल्याचं नशिबच छान...

........ " खरच लेकांनो,
जोपर्यंत हे संपणार नाही वाण
नशिबालाच मिळेल ,
प्रयत्नांचा मान......"

*🖊शशि.......*

पाऊस

*पाऊस.....*

भर पावसात गळक्या छताखाली
चिलंपिलं निवांत निजत होती ।
पदरानं झाकुन लेकरांना
माय मातर रातभर भिजत होती ।।

रातभर पाऊस
अधाशावाणी पडायचा
चुलीवरती गळायचा
अन् मायला नेहमीच नडायचा.....

लेकरांसाठी सारी रात
पाऊस कुठंच नसायचा....
सकाळच्याला उठल्यावर
मायच्या डोळ्यात दिसायचा....

म्हणुनच आजही,
सोसाट्याचा सुटला वारा
अन् बरसायला लागल्या धारा ।
की आठवतो भुतकाळ सारा
अन् जीव होतो कावराबावरा ।।

*🖊शशि....( भुतकाळ मांडताना....)*
_*www.shashichyamanatale.blogspot.com*_

लाज

*लाज......*

लेका तु शिकला सवरलास
आता तुले लाज वाटणं साहजिकच आहे म्हणा

तु रोज अत्तर अंगावर शिंपडुन घेतोस
इथल्या भिंतींना माञ अजुनही
शेणाचाच वास आहे
तुह्या जेवणात काय काय ते असतं
इकडं आमच्या तोंडी अजुनही
चटणी भाकरीचाच घास आहे

तु तिकडं दोन चाकी चार चाकी
फिरत असशिल घेऊन
आणखी काय काय
इकडं मातर पांदीत
गरगरा फसतात पाय

तिकडं कशा टापटीप
गोर्यापान पोरीसोरी
इकडं कशी रानपाखरं
मातीमध्ये मळलेली सारी

म्हणुन तुला इकडं
वंगाळ वाटत असण
आता कुठं तुला हे जगणं
जाळ वाटत असण

पण खर सांगु पोरा
आमी हे असंच जगत आलोत
अंधार पिऊन तुह्यासाठी
उजेड मागत आलोत

म्हणुन तु आता आमची
लाज वाटु देऊ नकोस
चमचमणारी दुनिया फसवी
तिच खरा साज , वाटु देऊ नकोस

कारण तु ज्याला भारी म्हणतोस
त्या तुह्या शहरात....
भिंती सांधलेल्या अन्
मनाला तडे आहेत
इकडं आमच्या घराच्या
भिंती जरी कच्च्या आहेत
मनं माञ पक्के आहेत
म्हणुनच सारवलेल्या अंगात
आनंदाचे सडे आहेत....

*🖊शशि.....*
*www.shashichyamanatale.blogspot.com*