Tuesday, May 29, 2018

आयुष्यभराची साथ

*आयुष्यभर साथ....*

आजही पाहतो जेंव्हा
हास्य तुझ्या गाली...
मानतो आभार देवाचे
किती नशिब माझे
की तु माझ्या भाळी...।।

सुख दुःख माझे
सारे वाटुन घेतलेस...
मला तुझ्या सुखाचा साक्षीदार
अन् स्वतःला माझ्या दुःखाचा
भागीदार केलेस....।।

आयुष्य नव्हते नेहमीच
झुल्यासारखा झुला...
बोचु नये काटे मला म्हणून
किती जपलेस माझ्या फुला... ।।

अय्या ! जाऊ द्या हो
असं काय बोलता...
मी काय एकटीनंच
सारा गाडा हाकला ?
तुमचा बी कंबरकणा
सांगा किती वाकला..।।

आयुष्य असतेच कुठे
झुल्यावरचा झुला..
अन् त्यावर झुलणं...
आपल्या हाती असतं फक्त
पुढे पुढेच चालणं.......।।

खरंच की....

असेच पुढे चालत राहु
घेऊन हाती हात..
अशीच देऊ एकमेका
आयुष्यभर साथ....।।

*~ शशिकांत मा. बाबर*

*टिप:- कविता तुमचीच फक्त शब्द मला सुचले एवढंच.....*

आजचा तुका वेगळा आहे



असंच काहितरी...... ° बाप °

सुर्य जितका तप्त
तितकाच बाप‌ संतप्त आहे
कदाचित सुर्याच्या प्रकाशाला
असेल कुठे ना कुठे अंत
पण बापाचे प्रेम माञ अनंत....
बाप खरंच सुर्यासारखा
घर नावाच्या आकाशगंगेतला...
तो सुर्य तिकडं तार्यांना प्रकाशीत करतो
बाप इकडं आम्हा सार्यांना प्रकाशीत करतो....
तरीही ,
त्याच्या मनातले कित्येक स्फोट
आम्हाला अनभिज्ञच असतात....
म्हणुनंच की काय ,
भले आमचा बाप‌ आम्हाला
संत वाटत नाही...
पण त्याच्यामुळेच आयुष्यातला
वसंत कधी आटत नाही...

# असंच काहितरी
~ शशिकांत मा. बाबर

 


Friday, May 25, 2018

असंच काहितरी

काही गोष्टी सांगु कि नको... नाही नको.. राहु दे ... असं म्हणुन ज्या गोष्टी आपण राहु देतो ना... त्या तशाच राहतात... गोष्ट वाटली , पटली , अन् सांगितली की गोष्ट संपते.... माञ ती तशीच राहिली , राहु दिली तर गोष्ट सुरु होते ... आपल्या मनात... असो.

प्रत्येकाच्या मनात बरंच सांगण्यासारखं असतं.. ह्या जगात दुःख कुणाला नाही , हो फक्त ज्यांचं दुःख ऐकायला कुणी नाही ते जास्त दुःखी होतात एवढंच. माणुस अंत आणि एकांत या पेक्षा एकांतालाच जास्त भीतो असं व. पु. काळे म्हणतात.... अगदी खरंय .. का माहीतीय ...? कारण अंत झाला की संपलं सगळं .. कसलीच चिंता नाही ... सारं चितेत जळुन जातं.. पण एकांतात माञ मनात सुरु होतात अनंत प्रश्न .. एकाला उत्तर द्यावं .. त्याचा अंत करावा तर दुसरा समोर.. माणुस खरंच भांबावुन जातो यात... खरंच का एवढा ञासदायक असतो एकांत.. ? माहीत नाही. ते मी सांगुनही तुला थोडंच पटणार आहे... काही गोष्टी ( कशाला सगळ्याच म्हणु देतं .. नको, बुद्ध सांगतात आपल्याला सर्व विश्वाच ज्ञान थोडंच आहे.. म्हणुन आपण एका मर्यादेतंच बोलावं... म्हणुन 'काही'....) अनुभवल्या शिवाय कळत नसतात मुळीच... नदीच्या किनारी लाटांना न्याहाळत बसणं ... तितक्यात हवेच्या मंद झुळकेनं सहस स्पर्श करुन जाणं ( अन् त्यातही प्रियसी सोबत असेल तर ..) किती आनंददायक असतं हे कितीही ऐकलं तरी कळायचं नाही .. ते अनुभवायलाच हवं... तसंच हा एकांत ही....
इथे प्रत्येकाला काही ना काही सांगायचं असतं , बोलायचं असतं.. .. त्यासाठी कुणी ऐकणारं हवं असतं... फक्त कानांनी नव्हे तर मनानंही.... माणुस नेहमी अशा माणसाच्या शोधात असतो...
एक सांगु, आपण अशा काळात जगतोय , जिथे संदेश प्रचंड वाढलेत पण संवाद हरवत चाललेत.. , आपण एकमेंकांच्या संपर्कसुची मध्ये असतो पण संपर्कात नाही , आपण ऐकमेकांना दाद देतो पण साथ नाही , आपण ऐकमेकांच्या समोर असतो पण सोबत नाही , आपण ऐकमेकांच्या जवळ असतो पण जवळचे नाही , आपण दररोज आॅनलाईन असतो पण आपल्यातले नाते आॅफलाईन.... बघ एक सांगता सांगता कित्येक गोष्टी सांगितल्या..... नाही? साला‌ हा माणुस प्राणीच निराळा. बरं ते असु दे ... अद्याप 'तु'च मला समजली नाहीस , माणुस‌ हा त्यापुढचा अभ्यासक्रम...
एक सांगु , ( नाही, आता माझ्यातला लेखक जागा झालाय म्हणुन नाही तर.......) खरा ञास कधी होतो माहितीय ...? जेंव्हा समोरचा चुकला असंही वाटत नाही अन् आपण चुकलो होतो असंही पटत नाही. हा क्षण फार विचिञ.... असे क्षण आयुष्यातुन वजा करता येतील तोच खरा गणितज्ञ..... अद्याप तरी मी त्याच्या शोधात आहे.....

# असंच (?) काहितरी.....

Saturday, May 19, 2018

चारोळी...... सत्तेची समीकरणं

चारोळी........

इथे सत्तेची समीकरणं आता
पैशाच्या साह्यानं सोडवली जातात
म्हणुनंच लोकशाहीवर संकटं
राजरोस ओढवली जातात......।।

Friday, May 18, 2018

पञ... 'ति'ला

प्रिय.......

              वैशाख नुकताच संपलाय पण तुझ्या विरहात माझ्या काळजात पेटलेला वैशाख वणवा काही केल्या थंड व्हायला तयार नाही , म्हणुन काळजातली हाक कागदावर उतरवुन तुझ्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न म्हणजे हे पञ. थेट कारण सांगुन पञाची सुरवात केली म्हणुन आश्चर्य चकीत होऊ नकोस , नाही तु होणारही नाहीस कारण माझा भिडस्तपणा , थेट विषयाला हात घालणं , हे तुला ज्ञात आहेच. पण तरीही असं थेट विषय सांगणं एखाद्या लेखकाला शोभायचं नाही. लेखकानं कसं गोष्टी फिरुन , शब्दांचा पुरेपुर वापर करुन सांगायला हवी पण माझं तसं नाही. शब्द फुकट मिळतात काय कितीही वापरायला ? , असो. मी तुझ्या दुराव्या बद्दल बोलत होतो. वैशाख संपुन हा अधिक मास लागलाय तो खरच अधिकचाच आहे . तो नकोच होता म्हणजे महिना लगेच कटला असता अन् आपल्याला हा एक महिन्याचा दुरावा सहन करावा लागला नसता. पण ते आपल्या हातात नाही ना , काय करणार. बरं कशी आहेस..? अगं तु सुंदर आहेस हे माहित आहे मला , मी तब्बेतीबद्दल बोलतो. मस्त आहेस ना. माझी आठवण येतेय...? आता लगेच प्रतिप्रश्न करु नकोस.. मला तुझी आठवण येत नाही..( रुसलीस काय ...? अगं आठवण येण्यासाठी आधी विसरावं लागतं अन् मी तुला विसरलेलोच नाही , काय ? ). बरं ते असु दे... काय करतेस...? तब्बेत कशी आहे ...?( वारंवार  तब्बेतीचं काय विचारतोस ? असं म्हणु नकोस .. अगं तुझी तब्बेत ठिक असली की मला ठणठणीत  वाटतं म्हणुन विचारतो... माझ्या स्वतः साठीच की ,फार स्वार्थी आहे मी.. हसु नकोस.. पुढचा प्रश्न वाच...) सुट्यांचा मस्त कुठे फिरण्याचा प्लान आहे का...? नाही माणसानं फिरायला हवं .त्याशिवाय ही दुनिया कळायची नाही. चार भिंतीत आपलं घरंच आपलं विश्व असतं... पण बाहेर पडल्यावरच विश्वाचा पसारा कळतो. बघ माझा शहाणपणा झाला सुरु. तु हे सोड ... पण मस्त फिरुन घे .. कारण हे विश्व माझे घर आहे असं आपली संस्कृति सांगते , आपलं घर हे विश्व आहे असं नाही... असो. बघ कसा भरकटतो मी, मी आपलं‌ साहित्यातंच सारं शोधतो... ही पुस्तकंच मला सारी भ्रमंती करवतात ... ते फिरवात दगडांच्या देशात , प्राण्यांच्या वस्त्यात अन् माणसांच्या कळपात देखील.. बरं बस्स झालं हे पुस्तकपुराण ... तु तुझं सांग... कसे जाताय हे दिवस... इथे मला एक एक दिवस एका युगासारखा वाटतोय... कटता कटत नाहीय. इतक्या दिवसात तु दिसली नाही , मनं आजारी पडलंय.. कसला आजार ....? तुझ्या प्रेमाचा.... आता लवकर भेटुन तुझे उपचार घ्यावेत त्याशिवाय बरं नाही वाटायचं.... मी येतोय ..... तु आराम कर .... ऊन्हाचं लय बाहेर फिरु नकोस.. ऊन्हाचा कडाका जास्त आहे.... तुला ती ऊन्हाची झळ जाणवेल लगेच पण माझ्या काळजातली कळ... ती जाणवेल तेंव्हा माझा ऊन्हाळा संपेल... माझ्या मनाची माती तुझ्या प्रेमाच्या पर्जन्याशिवाय तृप्त व्हायची नाही.... करशील ना तीला तृप्त.... ?
मी वाट पाहतोय..... त्या सरीची...

                                          तुझाच.........

असंच काहितरी.....~ भगतसिंह


असंच काहितरी


अंगाई - निंबोणीच्या झाडामागे

निंबोणीच्या झाडामागे
आता चंद्र लपत नाही ।
DJ ऐकणारे बाळ हे
आता अंगाई ऐकत नाही ।।

Chatting च्या नादात बाळ
चंद्राकडे पाहतंच नाही ।
ती Offline गेल्याशिवाय
बाळ काही झोपतंच नाही ।।

वेदना

वेदना असल्याची
मुळीच खंत नाही ।
असे थोडेच आहे
की वेदनेला अंत नाही ।।

पण वेदनेवरती बोलायलाही
हल्ली उसंत नाही .... ।
नको गाळुस आसवे तु
तुझी आसवे मज पसंत नाही ।।