प्रिय 2023,
साल बदललं तसं हाल बदलले की मग सरत्या सालाचं कौतुकही राहतं अन् येत्या सालाचं अप्रुपही वाटतं....तसं तु येण्याआधीच माझे हाल तर बदलले होतेच पण तु आलास अन् माझा काळच बदलुन टाकलास....म्हणुन म्हटलं या शेवटच्या संध्याकाळी एक आभाराचं पञ तुलाच का लिहु नये ? म्हणुन हा प्रपंच....तर हे असं पञास कारण पञास कारण न म्हणताच मी तुला सांगुन टाकलं बघ....असु दे. तर सालाप्रमाणे तुही आलास ठरलेल्या वेळीच पण तु जणु काही खुप काही माझ्यासाठी आपल्या मुठीत घेऊनच आला होतास, अन् जशी जशी वेळ आली तशी तशी मुठ उघडत गेलास....झाकली सव्वालाखाची असते खरी, पण उघडली की लाखमोलाची पण ठरु शकते मुठ हेच तु मला ह्या वर्षभरात दाखवुन दिलं, त्यासाठी खरंतर तुझे आभार....तुझ्या येण्याची चाहुल लागली तेंव्हाच मला दिल्लीचं बोलावणं आलं होतं, दिल्ली बहोत दुर है असं म्हणतात खरं, पण खरच दिल्ली तितकीही दुर नसते म्हणा याची प्रचिती तु दिलीस मला...तुझ्या पहिल्याच महिन्यात अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने का होईना मला दिल्ली जाण्याचं भाग्य लाभलं....भाग्यच म्हणावं लागल बाबा, नाहीतर पुण्या मुंबई ला जरी कुणी बोलावलं तर आमचं कुठं नशीब इतकं असं म्हणावं लागायचंच की आधी...तर असं हे भाग्य लाभलं...त्यात अजुन भर म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच विमानात बसुन प्रवास करता आला...घरावरुन जाणारं विमान दिसेनासं होईस्तोवर बघणारे आम्ही विमानप्रवास हे आमच्यासाठी अप्रुपच की रे...विमानात बसलो...मग दिल्ली अन् तिथुन अजुन पुढं मसुरी जाणं झालं...हिमालय फक्त पुस्तकात पाहिलेला, ह्या सालात तो प्रत्यक्ष देखील पाहता आला....मसुरीवरुन परत येताना ऋषिकेश, हरिद्वार हे पविञ तिर्थक्षेञही पाहण्यात आली...गंगा मैयाच्या पाण्यात हात घालता आला...सगळे पाप धुवुन टाकणारी गंगा....गंगेत डुबकी मारणारे बरेच पाहिले, पण शरीर धुवुन पापं कशी धुवुन जातात कुणास ठावुक ? पाप तर मनात असतं ना ? असो...बरंच काही पाहता, जगता आलं जे येत्या काळात कायम स्मरणात राहील...त्याबद्दलही तुझे आभार....त्यानंतर जानेवारीच्या शेवटाला हा सगळा दिल्ली व मसुरी दौरा आटोपुन प्रशिक्षणासाठी नागपुर गाठलं...दोन महिने नागुपुरात गेले, ह्या प्रशिक्षण काळात महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त डाॅ. प्रकाश आमटे व डाॅ. मंदाकिनी आमटे ह्या आमटे दाम्पत्यास भेटता आले, बाबांनी फुलवलेलं आनंदवन बघता आलं, बरेच अविस्मरणीय अनुभव देणारा हा सर्व काळ होता....मागच्या प्रशिक्षणादरम्यानच पुढचा निकाल लागला, क्लास 2 वरुन क्लास 1 झालो....नव्या पदाच्या ओळखीसह जुन्या पदाच्या जिल्हा संलग्नतेसाठी पुनः श्च रुजु झालो...बुलढाण्यात आलो...एप्रिल ते जुन तीन महिने जिल्हा संलग्नते अंतर्गत विविध कार्यालयीन संलग्नता पार पडल्या..10 जुलै रोजी जळगाव-जामोद तहसिल कार्यालयात रुजु झालो....तेथील अनुभव देखील प्रशासकीय दृष्ट्या समृद्ध करणारा होता...भटकंती ते जबाबदारी असा प्रवास तुझ्या सुरवातीच्या नऊ महिन्यात झाला.... खूप काही शिकवलंस तू.... त्यासाठीही तुझे आभार...3 ऑक्टोबर ला नवीन पदी विराजमान झालो.... परिविक्षाधीन काळ असल्याने ह्या ही काळात शिकतोच आहे...प्रत्येक ठिकाणी अतिशय जबाबदार अन् अतिशय चांगली माणसं भेटली..तु माझ्या मोठ्या स्थित्यंतराचा साक्षीदार म्हणुन तुझे आभार...तु दिलेल्या आठवणी अन् शिकवणी दोन्ही उराशी ठेवुन येत्या सालाचं स्वागत करतोय... मावळतीच्या ह्या सुर्यासारखा तु ही लपुन बसणार आहेस, पण पुन्हा न उगवण्यासाठी ...म्हणुन हे माझं पञ सांभाळुन ठेव...तुझ्यासारखाच पुन्हा न उगवण्यासाठी मी ही जेंव्हा मावळेल तेंव्हा नक्कीच तुला भेटेल अन् ह्याचं उत्तर मागेल...तोपर्यंत वाट पहा....पुनःश्च तुझे आभार....आभार ...आभार...
No comments:
Post a Comment