Sunday, April 2, 2017

माय

कडा लेकरु तिच्या रे
माथी तिच्या रे घागरं ।
पायी रुततो काटा तरी
चाले मिळवाया भाकरं ॥

असा कसा देव वैरी
कसे करतो रे हाल ।
लेक काढतो काटा
सांभाळाया तिचा ताल ॥

सारी तुझीच लेकरे तरी
का वेगवेगळे भाळ ।
कुणा नशिबी थंड गार
कुणाच्या वाट्याला जाळ ॥

उघड्या डोळ्यांनी पाहती
लेकं मायचे हे हालं ।
पाणावती डोळे त्यांचे
पाझरती दोन्ही गालं ॥

*✍शशि..(माय मांडताना)*

फूल

*फूल...........*

बाप महा सरकार
बनतच आलाय फूल ।
जाण्यासाठी वावरात तेव
सोडतो पहाटच खाट
सर्ज्याराज्या दावणीला तिथं
पाहती त्याची वाट
करुस्तोर चारापाणी त्याह्यची
लाईट काय टिकत नाय
टिकलीच तर फ्युजाचे
खटके उडत राह्य
तीचं हे ठरलेलच असतं
जाणंयेणं सारं मनावरच असतं
सांगताच येत नाही
कधी होईल गूल
बाप महा सरकार
बनतच आलाय फूल.....

लाईटासारखच पावसाचबी
लहरीवरचच असते काम
कधी कोरड्या ठन्न इहिरी
कधी वैताग आणते जाम
गरजेच्या वक्ताला तेवबी
देतो नेहमीच हूल ...
बाप महा सरकार
बनतच आलाय फूल......

दुष्काळातबी आश्वासनांचा
पाडता राव तुम्ही पाऊस
देवापुढचा नीवद खाणारे
तुम्ही तर वाटता मले माऊस
मला तं दिसते फक्त
गरमलेली मातीची कूस
अन् त्याच मातीवर पेटवलेला
बा नं उभ्या उभ्या ऊस
का बरं सरकार अशी लटकी
पांघरता कैवार्याची झूल
बाप महा सरकार
बनतच आलाय फूल......

खर खर विचारतो तुम्हाले
नेमकी चुक कोणाची
कुणाचं पोट मोठं अन्
मोठी भुक कोणाची
त्याची नेहमीच सरकार
पडते तुम्हाले भुल
म्हणुन तर म्हणतो
बाप महा सरकार
बनतच आलाय फूल.....

एकच मागणे तुम्हाकडे
शेतकरी बा ची कधी,
बंद राहु नये चुल
त्याचेच रिकामे पोट
अन् तुमची ढेरी फुल
हे काही बरं नाही...
तुमचं हे वागणं खरं नाही ...

म्हणुन नका मी का हे सांगतो
कारण मी आहे त्याचेच मुल
तेंव्हा आतातरी त्याला
नकाच बनवू फूल......

बाप महा सरकार
बनतच आलाय फूल.....

*✍ शशिकांत मा. बाबर*
*📞९१३०६२०८३४*

*www.shashichyamanatale.blogspot.com*

Saturday, March 25, 2017

थेट काळजातून

लुटले ज्यांनी मजला, ते माझेच यार होते ।
समजले ज्यांना ईमानदार, तेच बेईमान फार होते ॥

यारहो अद्याप तरी, सोडली ना मी ईमानी ।
माझ्याच तत्वांशी मी, केली ना बेईमानी ॥

आजही तसाच आहे , जसा होतो मी काल ।
चालतो तसाच अजुनी, ना बदलली मी चाल ॥

# वास्तव.....
*✍शशि........*

शशिच्या लेखणीतून

*✍ शशिच्या लेखनीतुन...*

आज एखादी गोष्ट हातुन निसटली म्हणुन वाईट वाटु देऊ नका, कदाचित उद्या काही अप्रतिम मिळणार असेल म्हणुन आज हे चांगलं तुमच्या हातुन गेलं आहे......
-------------------------------------
आज नियतिनं काही दिलं नाही म्हणजे तुम्ही त्या लायकीचे नाही असं नाही कदाचित तुमची लायकी त्यापेक्षा जास्त असेल म्हणुन तुम्हाला ती साधी गोष्ट मिळाली नाही...
-------------------------------------
माणुस कालही तोच होता आजही  तोच आहे , आपल्या गरजा बदलल्या की आपलं त्याच्याविषयीचं मत बदलतं.... खरच माणसाची भुक बदलली की भुमिका बदलते....
--------------------------------------
एखाद्या बद्दल चांगलं वा वाईट मत बनवण्या अगोदर त्या पुर्णपणे समजुन घ्या... केवळ तुमच्या उपयोगितेवर एखाद्याला चांगलं वा वाईट घोषित करु नका...
--------------------------------------
माणुस सिंहासनावर बसला काय किंवा जमिनीवर त्याच्या विचारांनी आकाश भेदलं पाहिजे... नाहीतर केवळ तुमच्या पदाशी प्रेम करणारेच तुम्हाला जास्त भेटतील ... विचारांशी ईमान राखणारे नाही....
------------------------------------
एखादी गोष्ट दिसते तितकी सोपी नसते अन् वाटते तितकी अवघडही.... ती कशी आहे ते अनुभवातुनच कळते...
-------------------------------------
तुमच्या असण्याने फरक नाही पडला तरी नसण्याने माञ नक्कीच फरक पडायला हवा...
-------------------------------------
वस्तु असो अथवा व्यक्ति किंमत गरज पडल्यावरच कळते...
-------------------------------------
जे समजायला अवघड जातं ना ... तेच अर्थपूर्ण असतं मग ते पुस्तक असो किंवा मस्तक....
-------------------------------------
एखाद्या लेखकाची वाक्ये समजायला जेवढा वेळ लागतो ना त्यापेक्षा जास्त वेळ विचार करुन त्यानं ती मांडलेली असतात......

*# असच काहितरी ......*
*# शशिच्या मनातले.....*

असच काहितरी

खर तर माणसाचही असच असतं काही सुंदर प्रसूत होणार असलं की वेदना होतातच, अगदी असह्य अशा वेदना पण म्हणुन वाईट वाटु द्यायचं नाही. थकायचं नाही ... मला होणारा ञास इतरांना होत नाही, सारे जग सुखात आहे माझ्याच वाट्याला ह्या वेदना का आल्यात असही वाटतं बर्याचदा पण सुंदर, पविञ्य मांगल्याचा उदयही आपल्याच कुशीत होणार आहे हे विसरून कसं चालेल .... म्हणुन आपल्या वाट्याला आलेली दुःख ही क्षणाची आहे थोड्या वेळापुरतं ती भांबावुन सोडतील आपल्याला , अगदी नको वाटेल तो ञास , पण ते सहन केलं तर उद्याची सुंदर उत्पति आपल्यापोटीच होणार हे नक्की.....

शेवटी काय तर सोन्यासारखं पिक जेंव्हा मातीतुन वर येतं तेंव्हा ते मातीला काही कमी ञास देतं असेल का.... तिचं पोट फाडुन ते वर डोकावतं तेंव्हा ते पाहुन आपण आनंदाने डोलावत असतो पण ती वेदना फक्त मातीनेच सहन केलेली असते .... म्हणुन सार्या जगाला न होणार्या वेदना फक्त मातीच सहन करते कारण सोनं प्रसुत करण्याची ताकद फक्त तिच्यातच आहे.....

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही चांगल्या गोष्टी आपल्या हातुन घडणार असल्या की तत्पुर्वी वेदना होणारच, ञास सहन करावा लागणारच .... एकदा का यशाचा मोती बाहेर आला कि शिंपल्याच्या वेदना गोड वाटायला लागतात ....

म्हणुन माणसात सहनशीलता असावी वेदना सहन करण्याची मग ती आतली असो की बाहेरची ...

*वेदनेची माय झाल्याशिवाय प्रसुत होणार्या यशाच्या बाळाचा बाप कसं होता येईल....*

*✍शशि.....*

समाजसेवा

त्याने समोरच्या भिकार्याचा हात झिडकारला जोरात
चल हो बाजुला मला घाई आहे
खेकसुन त्याच्यावर तो पुढे निघाला
स्टेशनच्या बाहेर फाटक्या कपड्यातलं भारताच भविष्य त्याच्या समोर हात पसरवतं होतं
त्यान तिकडतर लक्षच दिलं नाही
कारण तो घाईत होता....
मामु जल्दी करो म्हणत रिक्षावाल्या आजोबा वरही तो जोरातच बोलला जरा
कारण तो आज तोर्यातच होता
कारण आज त्याची मुलाखत होती
मुलाखतीतला पहिला प्रश्न,
आपल्याला अधिकारी का व्हायचय...
मला समाजसेवा करायचीय, याचं पाठ केलेलं उत्तर...
पॅनेलही खुष झालं, त्याच सलेक्शनही केलं
परतीच्या वाटेवर त्याला दिवसभराचा प्रवास आठवत होता
तो त्याला परत पाठवत होता
पण तो भिकारी , ते पोर, तो बाबा
परत परत सारं सांगत होता
तुझी समाजसेवेची व्याख्या काय?
एवढेच उत्तर मागत होता......

# होय असही घडतं बर्याचदा.....

✍शशि...( मनातले मांडताना...)

शिवजयंतीविशेष

राजे तुमच्याच महाराष्ट्रात हल्ली तुम्ही दोन दोनदा जन्माला येता.... पण फक्त जयंतीपुरतेच.....
तुम्हाला उरावर घेऊन मिरवणारे मी पाहतो उघड्या डोळ्यांनी पण तुम्हाला उरात ठेऊन जगताना नाही दिसत कुणी...
तुमचा अभिमान आहेच इथल्या प्रत्येकाला कारण प्रत्येक जण वारसदार आहे नात्याने पण विचाराने माञ नाही म्हणता येणार ....
आजही तुमच्या नावावर फक्त इथे राजकारणच छान जमतं कारण जातीवादाला तुमच नाव पुरुन ऊरतं.... पण राजे जातीपलिकडे अजुन आम्हाला जाता येत नाही....
आम्ही तुम्हाला तसबिरीत पाहुन थोडे झुकतो खरे पण तुमच्या विचारापासुन हुकतोच थोडे...
नाही नाही वाटत लाज आम्हाला आमच्या वागण्याची कारण आम्ही तुमचे भक्त ....
खर तर इथच चुकलो आम्ही  .. तुम्हाला केले देव अन् झालो  तुमचे भक्त ... सळसळते आमुचे रक्त पण डाॅल्बीच्या समोरच फक्त , राजे खरच,

एकदा या हो फिरुन, आणि हो आता थोडे होऊन या सक्त
तेवढेच उरलय आता फक्त....

आणि हो प्रश्न तुमच्या जयंतीचा ति कितीदा ही केली तरी काहीच फरक पडणार नाही कारण .... गांधीची देवाणघेवाण करुन सह्याद्रीची माती अंगावर घेणारा गुलाल अंगावर घेतोय हल्ली ....
जो पर्यंत तुम्ही इथल्या प्रत्येकाच्या काळजात जन्म घेत नाहित तोपर्यंत तुमची जयंती फक्त वर्तमानपञातिल बातमीच बनुन राहिल ........

मी सत्य बोलतो म्हणुन काहींना हे झोंबेलही पण माझ्या लेखनीने ही तुमचाच वारसा घेतला तिला बेईमानी कशी करता येईल .... अगदी स्वतःच्या चुकांही भिडस्तपणे मांडते ती अन् जाब विचारते मलाही.....

राजे ऊरात पेरतोय जिजाऊंचे संस्कार ... आता शिवबा जन्मेलच काळजात
तेंव्हा तोपर्यंत अभिवादन नंतर मीच तुमचा अंश असेल........

*✍शशि.....*

होळी

होळी.....🎨

सण होळीचा होळीचा
लावू ऐकमेका रंग ।
प्रेमरंगात सारेच
आज होऊया रं दंग ॥

नको घाबरु कशाला
गाठ यशाचा कळसं ।
भर उन्हाळ्यात कसा
बघं फुलतो पळसं ॥

बेरंग ज्यांची जिंदगानी
तया करुया रंगीत ।
बोलु तयांशी ही थोडे
ऐकु त्यांचेही संगीत ॥

जाळु अंहकार आज
करु दुर्गुणांची होळी ।
करु उधळण प्रेमाची
भरु आनंदाने झोळी ॥

अशा न्यार्याच पद्धती
असे करुनं उत्सव ।
जगु असेकाही जणु
आयुष्यच महोत्सव ॥

*✍शशिकांत मा. बाबर*
*📞९१३०६२०८३४*