Saturday, March 25, 2017

असच काहितरी

खर तर माणसाचही असच असतं काही सुंदर प्रसूत होणार असलं की वेदना होतातच, अगदी असह्य अशा वेदना पण म्हणुन वाईट वाटु द्यायचं नाही. थकायचं नाही ... मला होणारा ञास इतरांना होत नाही, सारे जग सुखात आहे माझ्याच वाट्याला ह्या वेदना का आल्यात असही वाटतं बर्याचदा पण सुंदर, पविञ्य मांगल्याचा उदयही आपल्याच कुशीत होणार आहे हे विसरून कसं चालेल .... म्हणुन आपल्या वाट्याला आलेली दुःख ही क्षणाची आहे थोड्या वेळापुरतं ती भांबावुन सोडतील आपल्याला , अगदी नको वाटेल तो ञास , पण ते सहन केलं तर उद्याची सुंदर उत्पति आपल्यापोटीच होणार हे नक्की.....

शेवटी काय तर सोन्यासारखं पिक जेंव्हा मातीतुन वर येतं तेंव्हा ते मातीला काही कमी ञास देतं असेल का.... तिचं पोट फाडुन ते वर डोकावतं तेंव्हा ते पाहुन आपण आनंदाने डोलावत असतो पण ती वेदना फक्त मातीनेच सहन केलेली असते .... म्हणुन सार्या जगाला न होणार्या वेदना फक्त मातीच सहन करते कारण सोनं प्रसुत करण्याची ताकद फक्त तिच्यातच आहे.....

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही चांगल्या गोष्टी आपल्या हातुन घडणार असल्या की तत्पुर्वी वेदना होणारच, ञास सहन करावा लागणारच .... एकदा का यशाचा मोती बाहेर आला कि शिंपल्याच्या वेदना गोड वाटायला लागतात ....

म्हणुन माणसात सहनशीलता असावी वेदना सहन करण्याची मग ती आतली असो की बाहेरची ...

*वेदनेची माय झाल्याशिवाय प्रसुत होणार्या यशाच्या बाळाचा बाप कसं होता येईल....*

*✍शशि.....*

No comments: