Monday, March 23, 2026

Book Review : थैमान (रामचंद्र नलावडे)


नैसर्गिक आपत्ती येते तेंव्हा प्रशासनासह सर्वच आपापल्या स्तरावर आपत्तीतून सुटका करण्यासाठी धडपडत असतात. मात्र प्रशासनाचे कार्य फक्त आपत्ती काळात नसते, तर आपत्तीपूर्व तयारी, आपत्ती काळात मदत आणि आपत्तीनंतर पुनर्वसन अशा सर्व आघाडीवर प्रशासनास कसरत करावी लागते. महसूल विभागाची यात महत्वाची जबाबदारी असते. इतर विभागासोबत समन्वय साधत महसूल अधिकाऱ्यांना अनेक अनियोजित प्रसंगांना धाडसाने सामोरे जावे लागते. याच विषयाची मध्यवर्ती संकल्पना ठेवून रचलेली कादंबरी म्हणजे रामचंद्र नलावडे लिखित थैमान. 

लेखक स्वतः तलाठी होते. मी नायब तहसीलदार झाल्यावर महसूल प्रशासन अधिक कळावं म्हणून त्यांची 'एका अस्वस्थ तलाठ्याची डायरी' वाचलेलं होतं. ते वाचून बऱ्याच गोष्टींबद्दलचे प्रशासकीय वास्तव समजले होते. मी स्वतः वाचल्यावर बऱ्याच महसूल विभागातील अधिकारी मित्र-मैत्रिणींना हे वाचायला देखील सांगितलं होतं. कदाचित ते जुनं आवडलं म्हणूनच नवीन पुस्तकावर रामचंद्र नलावडे नाव दिसताच विकत घेतलं. बरीच पुस्तकं विकत घेतल्यावर देखील कित्येक दिवस बुकशेल्फ मध्येच आपली वाट पाहत असतात. घेतलेलं सगळं लगेच वाचून होत नाहीत, तरी पुस्तकं विकत घेण्याची हौस काही कमी होत नाही. ते असो. तर नाशिकला मैत्रिणीच्या लग्नाला गेल्यावर तिला पुस्तक भेट देण्यासाठी पुस्तक विकत घ्यायला गेलो अन तिथेच स्वतः साठीही पुस्तकं घेत बसलो. तिथेच हे 'थैमान' नावाचं पुस्तक लेखकाचं नाव बघूनच घेऊन टाकलं. 

पुस्तक वाचायला हाती घेतलं अन दोन दिवसात वाचून झालं देखील. पुस्तक प्रशासनातील अनुभव असणाऱ्या व्यक्तीने लिहिलेलं असल्याने ते अधिक वास्तववादी वाटतं. मान्सूनपूर्व तयारी पासून कादंबरी सुरु होते. यात तहसीलदार, नायब तहसीलदार, प्रांत अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, बिडीओ, नगरपालिका मुख्याधिकारी अशा सर्वांचा उल्लेख येतो. आयएएस अधिकारी प्रांत म्हणून असल्यावर तहसीलदारासह महसूल प्रशासनातील सर्वांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो अशी परिस्थिती होते. हे अधिकारी अधिक शिस्तप्रिय, अधिक हेकेखोर, अधिक धाडसी असतात, असा पूर्वापार समज. ते फारसे कुणाला जुमानत नाहीत. राज्यसेवेतील अधिकारी तुलनेने नमतं घेणारे, राजकीय गणितांचा विचार करणारे असतात. असेच चित्र कादंबरीत देखील दाखवलेलं आहे. 

मान्सूनपूर्व नैसर्गिक आपत्तीच्या बैठकीला गैरहजर राहिला म्हणून तलाठ्यास निलंबित करणारे प्रांत यात आपल्याला भेटतात. अनुभव संपन्न असणारे मात्र सेवेतील शिल्लक राहिलेले शेवटचे काही वर्षे शांततेत व निर्विघ्न काढावेत या दृष्टीने कार्य करणारे तहसीलदार भेटतात. प्रशासनात अनुभवापेक्षा पदाला महत्व आहे. वरिष्ठ हा आपल्यापेक्षा कमी वयाचा आहे म्हणून काही त्याला आपण मनात आलं तसं बोलु शकत नाही. यात देखील तहसीलदार यांचा अनुभव हा प्रांतांच्या वयापेक्षा अधिक पण प्रांत चार चौघात तहसीलदारांचा पानउतारा करतात तेंव्हा तहसीलदार काहीच बोलु शकत नाही. हे आपल्या प्रशासकीय व्यवस्थेतलं वास्तव इथे लेखकाने दाखवून दिलं आहे. 

पावसाळा सुरु झाल्यावर दैनिक घडामोडीची व पावसाची नोंद घेण्यासाठी तहसीलला नियंत्रण कक्ष सुरु होतो. ह्या नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना एके दिवशी रात्री महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याची बातमी कळते. सकाळी उजाडल्या बरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता घटना स्थळी जाऊन अत्यंत चोख पद्धतीने रस्ता मोकळा करून देतात. एखादा अधिकारी परिस्थिती कशी हाताळतो यावर सर्व अवलंबून असते. काम करणं आणि टाळणं दोन्ही शक्य असतं तेंव्हा खरा अधिकारी काम करण्याला प्राधान्य देतो. हे इथे अधोरेखित होतं. 

यानंतर शहरात अतिवृष्टी होते. नदीला पूर येतो. पुरात अनेक बाका प्रसंग उद्भवतात. अशावेळी संकट समयी प्रशासनाची त्रेधातिरपीट उडते तेंव्हा मदतीला अनेक संघटना, उदयमी तरुण पुढे येतात. मात्र अशा प्रसंगी स्व स्वार्थ साध्य करण्यासाठी धडपडणारे देखील असतात. नैसर्गिक आपत्ती वेळी मदतीला धावून येणारे असतात तसेच आपत्तीवेळी आपला फायदा साधून घेणारे देखील असतात. लेखकाने यात मानवी मूल्यांचा विसर पडून स्वार्थासाठी काम करणारे सरकारी बाबू, सामान्य माणूस आणि धूर्त राजकारणी यांच्या ढोंगीपणाकडे नेमकं बोट दाखवलं आहे. 

प्रशासकीय चुकांना पकडून वेठीस धरणारा लोकशाहीचा चौथा खांब, वरातीमागून घोडे यावे तसे आपत्तीनंतर होणारे पुढाऱ्यांचे दौरे, आपत्तीतही स्वार्थ साधू इच्छिणारे संधी साधू लोभार्थी (लाभार्थी नव्हे), अन या सगळ्यात भरीसभर म्हणजे आपत्ती काळात माया जमवणारे नोटसेवक (लोकसेवक नव्हे) या सगळ्यांचं उत्तम चित्रण यात लेखकानं केलं आहे. कादंबरी छोटी मात्र त्यातील छोटे छोटे प्रसंगही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्याला बरंच काही शिकवून जातात. योगायोग म्हणजे ही कादंबरी जिच्या लग्नाच्यावेळी विकत घेतली, ती मैत्रीण देखील उपजिल्हाधिकारी आहे. आता कादंबरी वाचून झाल्यावर तिच्यासह महसूल, ग्रामविकास व नगरविकास विभागातील अधिकारी मित्रांनी विशेषतः आवर्जून ही कादंबरी वाचावी असं वाटतं.

#असंच_काहीतरी 
#Book_Review

No comments: