Friday, October 20, 2017

बळीराजा

*बळीराजा....*

माझ्या लेखणीला दिसत नाही
प्रियसीच्या गालावरली खळी
फुलणारी गुलाबाची कळी
तिला दिसतो राबणारा बळी

म्हणुनच ती होते अस्वस्थ
विचारते लाखो प्रश्न
जेंव्हा बघते
सरकारचा लटका हर्ष
अन् बळीराजाच्या मयतावरचं लोणी खाण्यासाठी
होणारा नंतरचा संघर्ष ।।

बळीचाच कुठवर जाणार बळी
कुणीतरी त्याला मिळेल का वाली
राब राब राबुन , मर मर मरणेच
कुठवर त्याच्या भाळी ।।

ञेतायुग असो अथवा कलियुग
बळीनं अजुनही देणं सोडल नाही
अन् सरकारी वामनानं
अजुनही घेणं सोडलं नाही ।।

घेऊन घेऊन किती घेशील वामना
पहिल्या सारखा तु आता
पाऊल मागत नाहीस
अन् सारं लुटून नेलं तरी
त्याला चाहुल लागत नाही ।।

बळीराजा आता थोडा शहाणा हो
वामनासारखा कपट
तुही शिकुन घे ।
तुझी पृथ्वी मागणार्याचा
तुच स्वर्ग विकुन ये ।।

*🖊 शशि.....*
*📞९१३०६२०८३४*
www.shashichyamanatale.blogspot.com

Tuesday, October 17, 2017

भुकेचं राष्ट्रगीत

आजही ऎकु येतंय
भुकेचं राष्ट्रगीत
दिसतेय इथे...
कष्टाची हार
वशिल्याची जीत
ज्यांच्या हाती सत्ता
त्यांचच हित...
तरी सारेच शांत
जगणार भीत भीत
कशाला काय बोलावं
ही तर आहेच रीत...

अशा माझ्या देशात
कुणी जेंव्हा म्हणतं
सत्ता कुबेराची रखेल आहे
अन् इथली संसद रंडीखाना आहे
तेंव्हा तोंडदेखल्या देशभक्तांना
तुम्ही त्यांना काय
देशद्रोही म्हणणार काय..

खर तर आपण काहीच करणार नाही
याची जाणिव आहे मला
ज्याचा मोर्चा त्याची चर्चा
करणारा माझा युवक
सहज दुर्लक्षित करु शकतो
इथले लाखोंप्रश्न..
अन् करेल साजरा जश्न...

पण कानावर राष्ट्रगीतापेक्षाही
भुकेचं मधुर संगीत पडतं
तेंव्हा बधिर होऊन चालेल का..?
अन् ज्यांना जमेल त्यांनी
बधीर व्हावं खुशाल

स्वातंञ्याचा रस पिता पिता
खुशाल कराव्यात न्यु इंडीया वर कविता
तुर्तास एव'ढं'च....

🖊 शशि.....

नशिब

तो दिवसभर मर मर करत राहिला..
आलेल्या अडचणींवर मात देत
चालत राहिला पाऊलन् पाऊल
ठेचाळलेल्या पाऊलांनी उधळली धुळ..
सार्या अशक्यतांना त्यानं..
शक्य करुन दाखवलं....
तरी त्याला,
मिळाला नाहीच तो मान...


माना खाली घालुन लोकं
म्हणत होते, साल्याचं नशिबच छान...

........ " खरच लेकांनो,
जोपर्यंत हे संपणार नाही वाण
नशिबालाच मिळेल ,
प्रयत्नांचा मान......"

*🖊शशि.......*

पाऊस

*पाऊस.....*

भर पावसात गळक्या छताखाली
चिलंपिलं निवांत निजत होती ।
पदरानं झाकुन लेकरांना
माय मातर रातभर भिजत होती ।।

रातभर पाऊस
अधाशावाणी पडायचा
चुलीवरती गळायचा
अन् मायला नेहमीच नडायचा.....

लेकरांसाठी सारी रात
पाऊस कुठंच नसायचा....
सकाळच्याला उठल्यावर
मायच्या डोळ्यात दिसायचा....

म्हणुनच आजही,
सोसाट्याचा सुटला वारा
अन् बरसायला लागल्या धारा ।
की आठवतो भुतकाळ सारा
अन् जीव होतो कावराबावरा ।।

*🖊शशि....( भुतकाळ मांडताना....)*
_*www.shashichyamanatale.blogspot.com*_

लाज

*लाज......*

लेका तु शिकला सवरलास
आता तुले लाज वाटणं साहजिकच आहे म्हणा

तु रोज अत्तर अंगावर शिंपडुन घेतोस
इथल्या भिंतींना माञ अजुनही
शेणाचाच वास आहे
तुह्या जेवणात काय काय ते असतं
इकडं आमच्या तोंडी अजुनही
चटणी भाकरीचाच घास आहे

तु तिकडं दोन चाकी चार चाकी
फिरत असशिल घेऊन
आणखी काय काय
इकडं मातर पांदीत
गरगरा फसतात पाय

तिकडं कशा टापटीप
गोर्यापान पोरीसोरी
इकडं कशी रानपाखरं
मातीमध्ये मळलेली सारी

म्हणुन तुला इकडं
वंगाळ वाटत असण
आता कुठं तुला हे जगणं
जाळ वाटत असण

पण खर सांगु पोरा
आमी हे असंच जगत आलोत
अंधार पिऊन तुह्यासाठी
उजेड मागत आलोत

म्हणुन तु आता आमची
लाज वाटु देऊ नकोस
चमचमणारी दुनिया फसवी
तिच खरा साज , वाटु देऊ नकोस

कारण तु ज्याला भारी म्हणतोस
त्या तुह्या शहरात....
भिंती सांधलेल्या अन्
मनाला तडे आहेत
इकडं आमच्या घराच्या
भिंती जरी कच्च्या आहेत
मनं माञ पक्के आहेत
म्हणुनच सारवलेल्या अंगात
आनंदाचे सडे आहेत....

*🖊शशि.....*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

चारोळी - गुत्ता

पार तिकडं गुत्त्यावर जवा
बाटलीच्या बुचणाचा आवाज वाजत असतो
मायच्या कानात इकडं तवा
रातच्या कल्लोळाचा आवाज गाजत असतो ।।

# वास्तव तिच्यानशिबातलं ...

*🖊शशि.......*

भारतदेशा

हे भारत देशा
इथल्या कित्येक कानांवर
तुझ्या जयघोषाचे गाण पडत नाही
असं नाही
पण रिकाम्या पोटाला त्यांच्या
त्या गाण्याच्या अर्थाचा
प्रश्नच पडत नाही.....

तु सुजलाम सुफलाम व्हावं
असं त्यांना वाटत नाही
असंही नाही
पण टिचभर पोटात
भुकेच्या मेघांशिवाय काहीच दाटत नाही.....

तुझ्या अंगाखांद्यावर खेळणार्या नद्या
त्यांच्या पायथ्याशी माञ ओसाड असतात
पुर्वेला वाहुन नेणार्या पाऊस धारा
त्यांच्या माञ पापण्याआड दिसतात....

म्हणुन हे देशा ,
जोपर्यंत त्यांच्या भाकरीचा
प्रश्न सुटत नाही
त्यांचही नातं तुझ्याशी
पाहिजे तसं जुटत नाही....

तेंव्हा जोपर्यंत तुला
त्यांच्या भुकेचं गीत कळणार नाही
त्यांनाही तुझं गीत
वळणार नाही

म्हणून फार काही वाईट
वाटुन घेऊ नको
उगाच आहे नाही तेवढं
रगत आटुन घेऊ नको ....

*🖊शशि...( दुर्लक्षित भारतीय मांडताना.....)*

*देशभक्तीच्या गप्पा पोटावरुन हात फिरवताना सुचतात... पोटात काही नसताना नाही....*
*हे कितीही नाही म्हटलं तरी वास्तव आहे...*
*म्हणुन उगाच देशभक्ती भुकेपेक्षा श्रेष्ठ असते असा युक्तीवाद लढवण्याचा प्रयत्न न केलेलाच बरा.... काय..?*

चारोळी - आषाढी

नाम घेता विठ्ठलाचे
जाई सारा शीणं ।
सार्थ होई आयुष्य
होता तया पायी लीनं ।।

#आषाढी एकादशी
🌹🌺🌺💐

 _*🖊शशि......*_

चारोळी - गरज

गरज पडल्यावरच येथे
लागतात पाठी जथ्ये ।
गरजे पोटीही जन्मतात नाती
यातही आहेच म्हणा तथ्ये ।

*🖊शशि...( स्वानुभव )*

चारोळी

ढगाळ आभाळ
घामेजलेले भाळ ।
पायाखाली गाळ
झाडाखाली बाळ ।।

#रानातली माय...
#पेरणीचा काळ...

🖊शशिकांत मा. बाबर