Tuesday, October 17, 2017

लाज

*लाज......*

लेका तु शिकला सवरलास
आता तुले लाज वाटणं साहजिकच आहे म्हणा

तु रोज अत्तर अंगावर शिंपडुन घेतोस
इथल्या भिंतींना माञ अजुनही
शेणाचाच वास आहे
तुह्या जेवणात काय काय ते असतं
इकडं आमच्या तोंडी अजुनही
चटणी भाकरीचाच घास आहे

तु तिकडं दोन चाकी चार चाकी
फिरत असशिल घेऊन
आणखी काय काय
इकडं मातर पांदीत
गरगरा फसतात पाय

तिकडं कशा टापटीप
गोर्यापान पोरीसोरी
इकडं कशी रानपाखरं
मातीमध्ये मळलेली सारी

म्हणुन तुला इकडं
वंगाळ वाटत असण
आता कुठं तुला हे जगणं
जाळ वाटत असण

पण खर सांगु पोरा
आमी हे असंच जगत आलोत
अंधार पिऊन तुह्यासाठी
उजेड मागत आलोत

म्हणुन तु आता आमची
लाज वाटु देऊ नकोस
चमचमणारी दुनिया फसवी
तिच खरा साज , वाटु देऊ नकोस

कारण तु ज्याला भारी म्हणतोस
त्या तुह्या शहरात....
भिंती सांधलेल्या अन्
मनाला तडे आहेत
इकडं आमच्या घराच्या
भिंती जरी कच्च्या आहेत
मनं माञ पक्के आहेत
म्हणुनच सारवलेल्या अंगात
आनंदाचे सडे आहेत....

*🖊शशि.....*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

No comments: