Monday, January 7, 2019

लोकनिर्माण १(२५ डिसें २०१८- ३ जाने. २०१९)

     

शिबीराची माहिती मिळाली ... शेवटच्या तारखेला फाॅर्म भरला (इंजिनियर आहोत लास्ट नाईटची सवय दुसरं काय...?)... पाच - सहा दिवसांनी यादी लागली... यादीत माझं नाव.... अन् प्रवासासाठी आतुरलेली माझ्या मनात एक नाव... असं काहीसं चिञ माझं शिबीराला जाण्याआधी होतं....
      तब्बल २० - २२ तासांचा रेल्वे+बसचा प्रवास करुन चिखलगावला राञी ८:३० च्या सुमारास पोहचलो. स्डँट वरती जाई ताईला घ्यायला आलेली गाडी... अन् त्यातच बसुन मी व माझा पार्टनर (रमेश) निवासस्थळी आलो. गौतम व प्रदिप गाडीत आलेले .... त्यानंतर सौरभने जेवायला नेले... जेवण झाल्यावरचा प्रसंग कधीही न विसरण्यासारखा.... ताटात अन्न शिल्लक राहिलंय म्हणुन ते‌ पुर्ण खायला लावणारी तेजल आजही समोर दिसते आहे.. मी खाऊन दाखवु म्हणतानाचा तिचा करारीपणा ... आम्ही पहिला धडा येथे घेतला. अन्न वाया न घालवण्याचा. त्यांनंतर झोपण्यासाठी गेलो. आम्ही एक दिवस आधीच ( म्हणजे २४ /१२) पोहचलेलो. म्हणुन दुसर्यादिवशी सकाळी थोडं मनासारखं झोपता आलं पण सेवाधार्यांचा लगेच आवाज , आज झोपा पण उद्यापासु‌न ४:३० ला उठायचं आहे. तेंव्हा खरंतर आपण फार कचाट्यात पडलो असं वाटलं राव.
      दुसर्यादिवशी सकाळपासु‌न शिबिरार्थी यायला सुरवात झाली व हळुहळु गर्दी वाढू लागली. दुपारी ३ पर्यंत आपल्या प्रियजनांशी बोलुन घ्या त्यानंतर मोबाईल जमा केले जातील अशी सुचना फळ्यावर लिहिली गेली. अन् आम्ही थोडे अस्वस्थ झालो होतो. घरी फोन करुन पुढे १० दिवस संपर्क होणार नाही , असे सांगितले. काही संपर्क करता आले नाही , ते झाले नाहीत( असो. ते इथे सांगता येणार नाही ). चार वाजता आपण स्वतः बनवलेल्या कागदी पिशवीमध्ये मोबाईल , पाॅकेट टाकुन जमा केले व नोंदणी केली. खरंतर फाॅर्म भरल्यापासुन , निवड होणं , प्रवासाची तिकिटं काढणं , WhatsAppवरती ग्रुप बनवणं अन् त्या माध्यमातुन वेगवेगळ्या Activities करणं या सगळ्यामधुन शिबीर एक प्रकारे चालुच झालं‌ होतं.... पण ती नोंदणी होती लोकनिर्माण भवनात पुढील १० दिवस चालणार्या साधनेची, तरुणाईच्या निर्माणाची , निर्मितीक्षम तरुणाई घडवण्याची......
      अशाप्रकारे नोंदणी करुन राञी ७ वाजता सगळ्यांना एकञित करण्यात आले. प्रत्येकाने आपली ओळख करु‌न‌ द्यायची होती. पण नाव सांगण्याची पद्धत माञ निराळी होती.... जन्म देणार्या आई वडिलांपेक्षा आडनाव मोठं नाही , म्हणुन आपलं नाव आईचं नाव व वडिलांच नाव अशा पद्दतीने नाव सांगायचे होते. हा आमच्यासाठी एक धडाच होता.
      सगळ्यांची ओळख झाल्यानंतर पुढील दहा दिवसाचा एक साधारण दिनक्रम आम्हाला सांगण्यात आला. सकाळी ४:४५ ते राञी १२ असा साधारण दिनक्रम होता. आम्ही आश्चर्यचकित झालो‌ होतो. फक्त पावणे पाच तास झोप ..? असे डोक्यात आले पण आपण इथे झोपण्यासाठी नव्हे तर जागं होण्यासाठी आलोय असं ठरवुन सारं दुर सारुन झोपायला गेलो. दरम्यान आमच्या टिम तयार केल्या गेल्या होत्या. एकुण ७ टिम. माझी टिम क्रमांक ५(मृदगंध). त्यानंतर टिमनुसार बसुन शिबिर गीत देखील गायले होते. जे ऐकता क्षणीच माझ्या काळजावर कोरले गेले ( विकसीत व्हावे ,  अर्पित होऊनी जावे....)

      दुसर्या दिवशी पासुन सकाळी ४:४५ ला सुंदर गाण्यांनी येणारी जाग एक वेगळं जग उभं करायची अन् प्रत्येक जण तरारुन उठायचा. त्यानंतर मिळणारे गरम पाणी( चहा नाही) , योगा हे सारं माझ्यासाठी तरी नवीनच होतं.... असं कधीही काहीच मी केलेलं नव्हतं.... सकाळी लवकर उठण्याचे कित्येक प्रयोग फसलेले ..... माणसं एवढ्या सकाळी उठतातच कशी ? हा माझ्या घशी न उतरणारा प्रश्न , गरम‌ पाणी काय पिण्यासाठी असते...? मग अंघोळीला काय वापरायचे...? अन् योगा.... ते तर आपल्याला कधि जमलंच नाही.... तेंव्हा सकाळ पासुन सुरु झालेल्या सार्या गोष्टी माझ्यासाठी नविनच होत्या अन् खरतर त्यातुनच जास्त आनंद येत होता.
      त्यानंतर ६ वाजता डाॅ. दांडेकरांचं 'लोकसाधनेचा प्रवास' हे सञ... ज्यात राजाभाऊ अगदी सहजपणे त्यांच्या आयुष्याची एक एक घडी दिवसागणिक उलगडत गेले... असंख्य आठवणी सांगितल्या ... लहानपणी घरी असताना पडलेले संस्कार जसे की जे काम‌ आपल्याला येत नसेल ते इतरांना करायला सांगायचं नाही हा दंडक असेल किंवा जो कष्ट करतो त्यालाच खाण्याचा अधिकार आहे , अन्नाचा एक शितही वाया घालवायचा नाही , त्यांनी आमच्यावरही न कळत केले अन् डाॅ. राजाभाऊ आमचे बाबा झाले.....
      त्यानंतर ७ - ९:२५ पर्यंत श्रमदान असायचं.... ज्यात टिमनुसार काम दिलं जायचं . सारे टिम मेंबर मिळुन काम करण्यासाठी एकमेकांना करत असलेली मदत , तो समन्वय खरंच अप्रतिम होता. त्यातही आमच्या टिम बद्दल काय सांगावे...( टिम ५ समजुन घ्या)
      श्रमदानानंतर आमच्यापैकीच एका टिमने बनवलेला स्वादिष्ट नाश्ता ( कष्ट केल्यावर मिळणार्या भाकरीला‌‌ एक वेगळीच चव असते... याचा अनुभव तेंव्हा काहीसा आला) व नंतर एक तास आराम.(११ वाजेपर्यंत , नव्हे १०:५५ पर्यंतच) वेळेचे भान ठेवणारे सर्वच सेवाधारी अन् तेच भान आपणही राखायला हवं म्हणुन पहिल्या दिवशी पाच मिनीट उशीर झाला तेंव्हा ५×१२०=६०० मिनिट तुम्ही वाया घातलेत असं सांगणारा प्रविण कसा विसरता येईल. आरामासाठी दिलेला हा एक तास खरंतर अंघोळ , G.D. , Creative expression ची तयारी यासाठी देखील उपयोगी यायचा...       त्यांनंतर ११ वाजता पावलांपुरता प्रकाश निर्माण करत आज अनेक पावलांना वाट दाखवणारे काजवे यायचे आमच्या भेटीला, त्यांची मनोगते व त्यावर प्रश्नोत्तरे चांगलीच चालायची... त्यानंतर १२:३० - १:३० हा एक तास दुपारच्या जेवणासाठी असायचा. १:३० - २:०० ही परत आरामाची वेळ. त्यानंतर २- ३:३० या वेळात तज्ञांचे भाषण वा एखादी कृती , त्यानंतर परत पुढे दिड तास दुसरी activitiesचालायच्या. ५ वाजता मिळणारे शरबत किंवा काढा व लगेच सुरु होणारे ग्रुप डिस्कशन (G.D.) ज्यात रोज एका विषयावर एक टिम‌ चर्चा करायची.... त्या अनुषंगाने इतरजण त्यांना प्रश्न देखील विचारायची व त्याला मिळणारी उत्तरं त्या सञाची रंगत वाढवायची....
      यानंतर परत ६:००-७:३० या वेळेत एक वेगळी , छानशी Activity असायची. त्यानंतर राञीचे जेवण ... थोडासा आराम.... व लगेच ९:०० - १०:३० या वेळेत तज्ञांचे भाषण. या सञात माञ जरा गंमत व्हायची . जेवल्यानंतर जवळपास सगळ्यांना झोप यायची ,अन् मग सगळे मस्त डुलक्या द्यायची , पेंगायची.... माञ एक दिवस वकिल साहेबांनी (कैवल्य दादा - बाबाचे चिरंजीव ) यामुळे सगळ्यांना चांगलेच धारेवर धरले. *" इथे आलेला प्रत्येक माणुस हा त्या त्या श्रेञात सर्वस्व वाहुन घेतलेला आहे. तो इथे पोटतिडकेने सांगतोय आणि आपण पेंगतोय हा त्याचा अपमान आहे. मला हे कदापी सहन होणार नाही. आपले शरीर हे आपले शरीर आहे. त्यावर नियंञण मिळवताच आले पाहिजे. आपण जर‌ झोप नियंञीत करु शकत नसु तर कुठल्या समाजसेवेच्या गप्पा आपण मारतोय , हे ज्याचं त्यानं पहावं..."* असे खडे बोल सुनावले अन् तुम्हाला काय शिक्षा हवीये ते तुम्हीच सांगा असं‌ सांगितलं.... यावर एक तास अधिक श्रमदान कराण्याची तयारी सर्वांनी दाखवली.. यात आमच्या टिमला दुसर्यादिवशीचा सकाळ , दुपारचा स्वयंपाक होता म्हणुन श्रमदान नव्हते तेंव्हा आम्ही त्यातुन सुटलो... पण आपल्या शरीरावर आपल्याला नियंञण करता आलं पाहिजे हा धडा कायमचा लक्षात राहिलाय... सगळ्यांच्याच.....

      यानंतर असायचे Creative expression.... १०:३० - ११:०० पर्यंत ... रोज वेगवेगळ्या टिमचे सादरीकरण असायचे. सकाळी ‌एक शब्द दिला जायचा ,त्यावर सादरीकरण करावे लागे. पहिल्याच दिवशी आमच्या टिमचे creative expression होते.…
शब्द होता- Depression....
शब्द वाचुन आम्हीच डिप्रेशन मध्ये जातो की काय असं वाटलं... पण चर्चेतुन एक नाटिका सादरी‌ करायची ठरवली . काहीकारणास्तव पहिल्यादिवशी झाले‌नाही व दुसर्या दिवशी वेळ दिला गेला. तेंव्हा दिलेल्या वेळेत २ मिनिट. जास्त घेत उत्तम पद्धतीने नाटिका सादर केली , ज्यात राहुलचा रोल करणारा रुषी , रुषी नव्हे तर राहुल म्हणुन सगळ्यांना माहित झाला , मी चांगले‌ निवेदन करु शकतो असेही तेंव्हाच मला कळले... खरंतर हेच लोकनिर्माण आहे , स्वतःला स्वतःचा शोध लागण्याचा काळ हा सर्वोत्तम काळ असं‌ मला वाटतं....
      या सांस्कृतिक मेजवानीनंतर सगळ्यांची‌ झोप उडालेली असायची व नंतर असायची राञ भ्रमंती..... पहिल्याच दिवशीची ती गुहेतली activity कित्येक जणांना भावनिक करुन गेली.... प्रविण तुझा शब्द न शब्द फक्त कानात नव्हे तर काळजात उतरत होता म्हणुन पोरं मोकळी झाली , बिनधास्त रडली... शांत गुहा , मंद वारा , शितल चांदणे अन् रातकिड्यांचे गाणे यात कित्येक हुंदके त्या राञी मी ऐकले.... अशा राञी कधी आमच्या आयुष्यात आल्याच नव्हत्या... त्या लोकनिर्माण मुळे व तरुणाई मुळे आल्या....

      दररोज होणार्या एकापेक्षा एक सरस activities, ज्यात confession असेल , J Q K असेल , शादी का लड्डु असेल , आणखी कितितरी ज्या खोल बसल्यात मनात घर करुन. सारेच अगदी भन्नाट , मस्त अन् अप्रतिम.... ज्यागोष्टींवर कधी बोललोच नाही अशा गोष्टींवर बोलतं केलं गेलं , ज्या गोष्टीचा कधीच विचार नाही केला त्याचा विचार केला , आयुष्यात माफी मागता यायला हवी अन् माफही करता यायला हवे हेही धडे या शिबीरानं दिले.

      शिबिरातील सारेच सेवाधारी , वेळेची जाण व भान ठेऊन सार्या  activities नियोजित करणारा प्रविण , जग प्रेमानं‌ जिंकता येतं याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे अभि दादा... एखाद्याला त्याची चुक प्रथमदर्शी न सांगता त्याच्याकडुन ती वदवुन घेणे हे रेड्यामुखी वेद वदवण्यापेक्षाही महाकठीण काम , हे काम अभि दादा सहज करतो.... भारत माता की जय हे घोषणाच ज्याचं घोषवाक्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये असा निसर्गप्रेमी शिवा दादा... असंख्य संकटे झेलत , संघर्ष करत इतरांच्या ओठी सुखाची गाणी यावीत म्हणुन प्रार्थना गाणारा विष्णु (डार्लिंग).... मी कुठला हे ओळखुच येत नाही , मी जिथं जातो तिथला होतो‌ असं म्हणणारा पुष्कराज दादा , शांतपणे आपलं‌ काम करणारा अन् स्वयंपाक घर सांभाळणारा , सर्वांना रुचकर कोंकणी जेवण खाऊ घालणारा विकास दादा , गौतम दादा , प्रविण दादा , प्रदिप , समीर सर , तेजल , धनश्री , प्रतीक्षा , रुपाली , ही सारी तरुणाई खरंच अवलिया आहेत सारेच्या सारे.......

      समाजसेवेसाठी वाहुन घेतलेल्या दांडेकर परिवाराची चौथी पिढी अर्थात कैवल्य दादा व धनश्री ताई हे वेळप्रसंगी कान पिळणारे पण प्रेमाने गोंजारणारे देखील......
एका क्षणात रागावणारे व क्षणात प्रेम जागवणारे ही माणसं म्हणजे अजब रसायन आहेत खरंच.....

      आणी हे सगळे ज्या वटवृक्षाखाली निवांत आहेत ते पाषाणावर पालवी फुलवणारे  राजाभाऊ व रेणुताई हे दांपत्य.....
      ही सगळी लोकसेवेसाठी स्वतःला वाहुन घेत लोकनिर्माणाची शपथ घेतलेले लोकसाधना करणारे लोकसाधक आहेत .... यांच्या साधनेपुढे आपण केवळ नतमस्तक होऊ शकतो एवढेच....
अन् यांचाच वसा अन् वारसा घेत लोकनिर्माण चे हे व्रत आपणही हाती धरु शकतो.....

      आणि हो , माझी टिम (मृदगंध) :-

  1. सिंगर(सिंगल) सोलापुरे, अॅग्री काॅस सबका बाॅस म्हणत मिरवणारी बोलकी चिमणी सिमा , अर्थतज्ञ व टिपिकल गावठी मुलगी (मला वाटणारी) विद्या , वेळेवर माझी डाॅक्टर होऊन मला टॅब्लेट देणारी निकिता , मी स्टेजवर सोडून कुठेही येते म्हणारी जळगावची दिपाली , upsc aspirant सिन्सियर वगैरे म्हणता येईल अशी डोंबिवलीची नमिता , आमचा कवि मिञ प्रशांत , पञकार रुषी , शांत व मितभाषी ऋषभ , मेकॅनिकल इंजिनियर योगेश , परभणीचा अक्षय , कॅमेरामॅन देव , कोल्हापुर गॅंगचा मेंबर ओंमकार आणि सगळ्यात लहान पण मोठमोठी भांडी घासायची , त्यांना माती लावायची त्यानेच मला शिकवले , तो आमचा बारक्या प्रथमेश हे सारेच वेगवेगळे नमुने होते... प्रत्येकाचं वागणं , बोलणं ,जगणं सारंच एकमेवाव्दितीय ....

      यांच्या सोबत जगलेले १० दिवस आयुष्यभरासाठी स्मरणात राहतील... अध्यक्ष ... म्हणणारा सुनिल , महोदय म्हणणारा रुषी , ओ लिडर म्हणत ओरडणारी सिमा अन् सारेच...... यांच्यासोबत घासलेली भांडी , केलेला स्वयंपाक , करपलेल्या चपात्या , डोळ्यातुन पाणी आणणारा धुर , संडास बाथरुमची सफाई , श्रमदान हे अगदी अविस्मरणीयच....

      यात बर्याच गोष्टी अजुनही अनुल्लेखीत राहिल्या आहेत जसे की समुद्र सफर , 31st celebration , ती दिल की दरिया दिली , कॅम्प फायर , सामुहिक नृत्य , कवितांची मैफिल , अन् एक तारखेची ती राञ .... हे सारे शब्दातीत आहे... यांना शब्दात बंदिस्त कसे करावे हाच प्रश्न आहे.... या प्रत्येकाने एक वेगळा कोपरा व्यापलाय माझ्या मनाचा..... खरंच त्याला तसेच राहु देऊ.... बाकी जे शिकलो , जे या १० दिवसात जगलो ते पुन्हा जगता येईल‌ का हाच प्रश्न आहे .....?

      अन् तसे जगता आले अगदी होऊनी निर्मम तर तीच असेल खरी लोकनिर्माणाची नांदी ....
       बाकी वेगवेगळ्या क्षेञातल्या वेगवेगळ्या उंचीवरच्या माणसांच्या सहवासाने व त्यांच्या वेगवेगळ्या विषयावरच्या वेगवेगळ्या चर्चासञांमधुन आपल्याही आयुष्याला एक वेगळे वळण मिळेल या हेतुने या आगळ्या वेगळ्या शिबिराला यायचे होते असे मी शिबीराच्या पहिल्यादिवशी सांगितल्याचे आठवते... अन् आज ते परतल्यानंतर तो हेतु पुर्ण झाल्याचे पुर्ण समाधान तर आहेच त्या बरोबर या शिबीरानं काय शिकवलं ? तर जगणं शिकवलं एवढंच उत्तर देऊ शकेल... कारण नेमकं व मोजकं बोलायलाही यांनीच शिकवलं.
लोकनिर्माण व टिम तरुणाई आपला कायम‌ ऋणी असेल.......


शशिकांत शांताबाई मारोती बाबर
जालना( ह.मु. जळगाव)

No comments: