Sunday, April 30, 2023
Saturday, April 29, 2023
Book Review : हू मूव्हड् माय चीज (स्पेन्सर जाॅन्सन)
''Change is the only constant in life'' ह्या 'Heraclitus' या ग्रीक तत्वज्ञाच्या विधानाशी आपण सर्व परिचीत आहोत...बदल होत असतो, होणारच असतो ह्याची आपल्या कल्पना असते, तरीही आपल्याला बदल बऱ्याचदा नकोसा असतो...आपण बदलाला घाबरतो...आहे तिथं, आहे तसंच रहावं असंच वाटत राहतं..यातुनच मग बदलाची भिती निर्माण होते...भोवतालच्या बदलाशी जुळवून घेणं न जमल्याने आपण मागे पडु लागतो...निराश होतो, हताश होतो...अशा अवस्थेत असणाऱ्या किंवा अशा अवस्थेत शिरण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या तसेच अशा अवस्थेत आपण जाऊच नये असे वाटणाऱ्या प्रत्येकासाठी छोट्याशा गोष्टीमधून आयुष्यातील व व्यवसायातील बदलांना सामोरे जाण्याचा मार्ग दाखवणारे पुस्तक म्हणजे 'हू मूव्हड् माय चीज' हे स्पेन्सर जाॅन्सन यांचे जगप्रसिद्ध पुस्तक.
हे पुस्तक म्हणजे एक लघुकथा आहे.. चीजच्या शोधात बाहेर पडणाऱ्या 2 उंदरांची व 2 छोट्या माणसांची...ह्या छोट्याशा कथेत आपल्याला अनेक मोलाचे संदेश मिळतात..भिती ही सकारात्मक तथा नकारात्मक दोन्ही प्रकारची असते..एक आपल्याला कार्यप्रवृत्त करते तर दुसरी कार्यापासुन परावृत्त करते....ह्या परावृत्त करणाऱ्या भितीवर विजय मिळवला की आपणे खरे स्वातंञ्य अनुभवतो...हाच कथेचा मुलमंञ आहे...कथा विविध सुविचारांमधुन आपले उद्बोधन करते अन् आपल्याला विचारमग्न करुन आपल्याला बदलांकडे पाहण्याची नवी दृष्टी देते...बदलांकडे पाहण्याची आपली नजर बदलवणाऱ्या या पुस्तकाला वाचुन आपल्या वाचण्याचे चीज झाल्यासारखे वाटते अन् आपण नवनवीन चीजच्या शोधात आपला प्रवास कायम ठेवावा असे मनात पक्के होते. कथेतील चीज प्रमाणेच आपले चीज(हवी असणारी गोष्ट) हे प्रत्येकासाठी वेगळे असते....आपले ऐश्वर्य, आपले आरोग्य, आपली आध्यात्मिक शांती किंवा अजुन काही आपले चीज कुणी हलवले आहे असे वाटल्यावर आपण जैसे थे न राहता कार्यप्रवत्त होऊन बदलणाऱ्या भोवतालाबरोबर स्वतः तही बदल घडवावा असा मोलाचा संदेश ही कथा आपल्याला देते... त्यासाठी अवश्य वाचावे असे हे छोटेसे पुस्तक !
Tuesday, April 25, 2023
Sunday, April 23, 2023
प्रिय नागरी सेवा
प्रिय नागरी सेवा,
तुझी माझी ओळख कधी झाली ? तुला थेट पत्र लिहीण्याचं मी धाडस कसं केलं ? असं तुला लिफाफा हाती पडताच वाटेल ...सुरवातीलाच स्पष्ट सांगतो, मी तुला ओळखतो (किमान मला असं वाटतं तरी...) पण तु पण मला ओळखशीलच अस नाही...मी तुला प्रिय म्हटलो असलो तरी तु फक्त प्रिय नाहीस...तु माझ्यासाठी प्राणप्रिय आहेस...माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे...मुमताज साठी ताजमहाल बांधणाऱ्या शहाजानचं कौतुक कशाला..? मी तर तुझ्यासाठी मनात महाल नाही नगरच वसवलय...अन् तुला हदयाच्या गाभाऱ्यात बसवलय...तु मला हो म्हणावं म्हणुन रातंदिन झुरतोय...कारखान्यातल्या कामगारासारखं न चुकता वेळापत्रक पाळुन मर मर मरतोय...कधी वाचतोय..कधी ऐकतोय..तुझ्यासाठी नको नको ते करतोय... अर्थात तीच कर्मकहाणी तुला सांगावी वाटली म्हणुन...
तसं तुझी ओळख मला शाळेत असतानाच झाली..आमच्या १० वीच्या निकालानंतर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आम्ही एका मोठ्या साहेबांना ऐकलं...त्यांच्या तोंडुन मी तुझं जे कौतुक ऐकलं..तुला काय सांगु...मला तेंव्हाच तु प्रचंड आवडलीस... तु एकदा भेटली की होणारा सन्मान...भेटणारा मानमरातब...तुझ्यापायी येणारी लालदिव्याची गाडी..मोठा बंगला...अन् एकदा तु हाताशी आली की मग जगातली सुंदरातली सुंदर पोरगी सुद्धा आपल्या हातात हात देईल असा वाटणारा विश्वास...माझ्या कुमार अवस्थेत तुझ्याबद्दल अशी अगदीच सुमार माहिती होऊनही मी तुलाच मिळवायचं हे मनोमन ठरवुन टाकलं...
तुझ्या भोवतीचा झगमगाट मला तुझ्याकडे घेऊन आला असला तरी पुढे काॅलेजात गेल्यावर अजुन कळायला लागलं...झगमगाटाबरोबर येणारी जबाबदारी जरा जरा समजायला लागली... पायाखाली वीट आली म्हणुन पांडुरंग होता येत नाही...तसं तु भेटल्यावर सगळेच जनतेचे तारणहार होत नाहीत, हेही नंतर नंतर कळायला लागलं...पण तुझ्या भेटण्यानं आपल्याला तारणहार होण्याची संधी भेटु शकते हे कळलं ...तसं तर लहानपणी काहीही झालं की आज्जी एकच वाक्य बोलायची,"लय नकु बोलुस, तु काय कोण कलेक्टर लागुन गेलास व्हय". तेंव्हा कलेक्टर म्हणजे नागरी सेवा...हे ही माहीत नव्हतं...पण कलेक्टर झाल्यावर तरी आज्जी आपलं ऐकल असं वाटायचं म्हणुन मग कलेक्टर व्हावं असं तेंव्हापासुन वाटायचं..बालमनातल्या माझ्या कल्पनांना पुढे हवा भेटत गेली..अन् मनात आग पेटत गेली...पुढं पुढं अधिकाऱ्यांच्या भाषणांनी ह्या आगीत जणू तेलच ओतलं अन् भडका उडाला...ठरवलं तुला मिळवायचच....
मग ११ वी, १२ वी पास झालो...डिगरी मुक्त विद्यापीठातुन करावी अन् तुझ्यासाठी मेहनत घ्यावी असं वाटलं, पण तु माझीच आहेस असं इथं प्रत्येकाला वाटत असताना तु नक्की कुणा कुणाला भेटणार असंही वाटलं...माझ्या आराधनेत काही कमतरता राहिलीच अन् तु नाही होकार दिला तर काय असं वाटुन मग तुझ्या मागे धावताना मी एक वेगळा रस्ताही तयार ठेवला..तुझ्या मागे धावताना भरकटलो...तुझ्यापर्यंत नाहीच पोहचु शकलो, तर अगदीच विदुर होऊ जगण्यापेक्षा कुणी तरी हवीच आपल्याला म्हणुन तथाकथित प्लान बी चा विचार करुन जसं सगळेच करतात तसं मी बी इंजिनियरिंग केलं..पण डिगरी झाल्यावर तुझं याड उफाळुन आलं अन् सरळ धरला रस्ता तुझ्याकडं येण्याचा...
तुझ्याकडं यायचं म्हणजे सोपं नाहीच बाई, अन् माझ्यासाठी तु एकटी असली तरी तुझ्यासाठी मी एकटा नाहीये...तो कोण शायर म्हणतो तसं,
"वो बेवफा नही, युँही बदनाम था
लाखो चाहने वाले थे, किस किससे वफा करता ?"
तुझेही चाहते लाखो आहेत...मी एकुणातला एक आहे...एकमेव नाही...पण तुला म्हणुन सांगतो..माझ्यासारखा दुसरा सापडायचा नाही तुला... मी एकटाच माझ्यासारखा आहे... तुला मिळवायला मी कुणाही मध्यस्थाकडे गेलो नाही...फुले वाचले होते... जोतिबांच्या विधानाला माझ्या परिने मी बदलवले अन् स्वतःलाच सांगितले,"तुला ही भेटण्यासाठी कुणा मध्यस्थाची जरूरी नाही". मग काय ? भिडलो ना एकटाच...स्वतःच सारी जमवा जमव केली...होतो तिथेच राहिलो...तु जिथुन लवकर भेटते असे म्हणतात, त्या वळणाकडेही वळलो नाही...मी अन् माझी रुम हेच माझे तुझ्या भक्तीचे स्थान होते...रोज ऊठताना अन् झोपताना सारखा तुझाच विचार..मग सुरवात केली...तुला भेटलेल्यांनी मार्ग सांगितला...मी माझे बारकावे शोधले...तुझ्याकडे येण्याच्या काही चोरवाटा शोधल्या अन् चालायला लागलो... पण वाट सोपी नाही...अडखळत आहे...रोज ढेचाळतो...कधीकधी रक्तबंबाळ होतो...पण तरी तुझी ओढ काही कमी होत नाही... आवश्यक ते सारे करण्याची तयारी आहे...हिम्मत हारलो नाही..जिद्द, चिकाटी, परिश्रम, या शब्दांना जगत आलो.... पण खरं सांगु हल्ली मनावर शंकेचे धुके दाटुन येते..चालणे अवघड होऊन जाते... बापाला सांगितले होते, अर्जुनासारखा जातो.. मत्स्यभेद करावा तशी परिक्षा भेदुन जातो ..अन् तुला घेऊनच येतॊ....वर्षामागुन वर्ष सरली... माझ्या डोळ्यासमोरुन तु हटत नाही, पण तु काही केल्या भेटत नाही...
आताशा तर घरात आल्यावरही घरात नसतोच मी.. घरातल्या, घराबाहेरच्या नजरा जणु रोज विचारत असतात, तो सध्या काय करतोय ? तयारी..हा एकच शब्द बोलु शकतो...ते ऐकुन ऐकुन आता त्यांनीही मला वेड्यात काढलय...बस झालं आता सोड तो नाद म्हणत गावातला शेंबडा पोरगा बी मला जगण्याचं तत्वज्ञान शिकवुन जातो आहे... मी काय करु काय नाही काहीच कळत नाही... एक पाऊल पुढे पडते..एखादी पुर्व पास होतो...तुझा चेहरा दिसल्यागत होतो...पण पुढच्याच पावलावर तु भुमिगत होतेस...कळत नाही काय चुकते...माझ्यापेक्षा लहान लेकरं माझ्या मागुन आली...तुला भेटली अन् स्थिरस्थावर झाली देखील...मी अजुनही तळमळतो आहे...तु एकदा सांग ना..तुला मी कळतो आहे का ? बरं तु ही इतकी मोहक आहेस...एकवेळ रंभा, उर्वशी दूर करु शकेल..पण तु हवीच आहेस हा माझा हट्ट आहे की प्रेम काहीच कळत नाही.. आता जरा शांत बसुन विचार करणार आहे..तु मिळवण्याच्या हट्टापायी मी बरेच काही पायी तुडवले आहे...चंद्रच हवा ह्या हट्टापायी चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे कायम दुर्लक्ष करत आलो...आतापर्यंत हुशार होतो आता शहाणा होईल बाई... तुझ्या भेटीपायी नुसतं वय वाढत गेलं असं नाही.. माय बापांच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचं नक्षीकाम देखील वाढलं...बापाच्या डोक्यावरच्या कर्जाच्या डोंगराची उंची वाढली...आयटीतल्या मित्रांचा बँक बॅलेंस वाढला ..साहजिकच ते पुढे सरकले ..मी तिथेच राहिलो...अन् मैञितला बॅलेंस बिघडला...जबाबदाऱ्या वाढत गेल्या..लोकांचे प्रश्न वाढत गेले... वाढणाऱ्या एका एका अटेंम्प्टने फक्त वय वाढतं असं नाही बाई...म्हणुनच आता स्वतःला सावरले पाहिजे... तुझा हट्ट मला ह्या वाटेवर कितीही घट्ट धरून ठेवत असला तरी आयुष्य अजुन जास्त बिघडण्याआधी मीच वळुन माझी वाट बदलणार आहे .... एक शेवटची विनंती...बाई, तु आयुष्याला वेगळं वळण देतेस असं भाषणात ऐकुन आम्ही आयुष्याला अशा वळणावर घेऊन आलो.... तु सुंदर आहेसच...तुझ्यासारखी तुच...तुझ्यापुढे स्वर्गीय अप्सराही फिक्याच...पण मी पृथ्वीवरचा सामान्य जीव...तेंव्हा तुझ्या वाटेवर येणाऱ्या जीवांना वेळीच सावध करत जा... तु नसेल भेटणार तर तुझ्या सख्या सोबती असतीलच ना खाजगीतल्या...त्यांची तर गाठ पाडून दे... तुझी माझी गाठ बांधलीच गेली नव्हती असं समजुन मी माझ्या भळभळणाऱ्या जखमा घेऊन...असंख्य गाठींना पाठीशी घेऊन तुझा निरोप घेईल...आता फक्त एवढा एक शेवटचा प्रयत्न...भेटलीस तरी बेहत्तर नाही भेटलीस तरी बेहत्तर...!
Friday, April 14, 2023
प्रिय भीमा..
प्रिय भीमा
कसा आहेस ? कुठे आहेस ? असे प्रश्न मला विचारायचे नाहीत..मला माहीत आहे की तु इथेच आमच्या आसपास आहेस...फक्त जरासा अस्वस्थ आहेस.. मग कशासाठी हा लेखनप्रपंच..? तर तुझ्या बर्थ डे चे तसे निमित्त...पण तुझ्याशी बोललं पाहिजे असं बरेच दिवस झाले वाटत होते..आज मुहूर्त लागला (अरे साॅरी.. मुहूर्तावर तुझा विश्वास नव्हताच..पण आम्ही अजुन नाही सोडु शकलो पंचांग ...असो.)
तर पञास कारण की, आज तुझी जयंती.. आमच्या भाषेत बर्थ डे, मग काय ? आमच्या नाक्यावरच्या टपोरी मिञाचा जरी बर्थ डे असला तरी 'बर्थ डे आहे भावाचा' म्हणत आम्ही डिजे लावतोच..तु तर राडा बाॅय...कसाला राडा घातलेला आहेस तु...परके असो नाही तर आपले.. सगळ्यांच्याच विरुद्ध तुला वेळोवेळी लढावे लागले अन् तु खंबीरपणे लढलास देखील...आम्ही तर वाचुनच थक्क होतो...तु ते जगला आहेस..मग काय विषय आहे का ? भावा तुझा बर्थ डे पण जोरात डिजे लावुन झालाच पाहिजे ...नाही, तु नाही म्हणु नकोस..आम्ही डिजेही लावणार अन् बेधुंद होऊन नाचणारही भावा... आता नाचणार म्हणजे लगेच दारु पिऊच असं नाही...नाही म्हणजे आमच्यापैकी काहींचे पाय त्याशिवाय हालतच नाहीत मग त्याला ईलाज नसतो बघ....पण मी तुझ्या बावीस प्रतिज्ञा नीट वाचल्यात...अन् माझ्या पक्क लक्षात आहे रे भावा..तु प्रतिज्ञा दिली होतीस आम्हाला मद्यपान न करण्याची..पण तुझ्याच बर्थ डे दिवशी नेमकी तिचा विसर पडतो बघ आम्हाला...जाऊ दे...पण आम्ही तुझा बर्थ डे करणारच ! तु तुझ्या ज्ञानाने साऱ्या जगात ज्ञानाचा झेंडा लावलास..आम्ही ज्ञानाच्या झेंड्याचं बघु नंतर पण तुझा बर्थ डे म्हटल्यावर तुझा झेंडा माञ अवश्य जागोजागी लावुच !
भीमा, तुला जगानं कोणत्या कोणत्या साच्यात बसवुन बघितलं...कुणी तुला दलिताचा कैवारी म्हटलं, कुणी तुला स्ञियांचा तारणहार म्हटलं ... कुणी तुला बहुजनांचा नेता म्हटलं..कुणी तुला राजकारणी...कुणी ज्ञानाचा धनी..कुणी वकील...कुणी अर्थशास्ञज्ञ..कुणी अजुन काही...पण भीमा तु ह्या कुठल्याच एका साच्यात मावला नाहीस..मावणार ही नाहीस रे भावा...तु विस्तीर्ण आभाळ...आम्ही तुला ढग समजण्याची चुक करत आलो...पण आता कुठे उमजाय लागलय बघ जरा जरा... तु म्हणाला होतास 'शिका, संघटीत व्हा अन् संघर्ष करा'...अरे पण इथं आम्हाला शिकताना संघर्ष करावा लागतो...आमच्या संघटना स्थापन झाल्या पण त्याच्यातही अंतर्गतच संघर्ष जास्त... तुझ्या वाक्याचा नीट अर्थ आम्हाला कळलाच नाही रे अजुन...जरा समजावुन सांग ना प्लिज.
भीमा, तु एका सुभेदाराचा मुलगा होतास, मग तुलाही एखादा जहागिरदार, वतनदार व्हावं असं का नाही वाटलं रे ? उलट तु तर म्हणालास, "महारवतन म्हणजे महारांच्या दारावरचा शेवगा". तुला तर आमच्या सारख्या एसी अभ्यासिकाही उपलब्ध नव्हत्या...तरी एवढा अभ्यास कसा काय केलास बाबा ? किती त्या पदव्या ? कित्येकांचा अर्थ तर आम्हाला अजुनही कळत नाही...आम्ही आपलं मुक्त विद्यापीठातुन डिगरी घेतो..मग अधिकारी व्हायचं म्हणुन एमपीएससी/युपीएससी करायला पुण्याला/दिल्लीला जातो...मान्य आमच्या वाट्याला कुठला सयाजीराव किंवा कुठला शाहू महाराज नाही येत, पण आम्ही मायचं सोनंनाणं..वेळ पडली तर कधी आहे तेवढं रान..ज्यात बापानं जीवाचं रान केलेलं असतं, ते गहाण ठेवुन पैसे जमवतो... तु म्हणायचा ना रे, शासनकर्ती जमात व्हा..आम्ही शासनात जायला अजुनही घाबरतो..तो आपला प्रांतच नाही म्हणत शासनाला फार फार तर टपरीवर शिव्या देत बसु शकतो..पण म्हणुन मग आम्ही शासन नाही तर किमान प्रशासनात जाण्यासाठी प्रयत्न करतो...तरी सगळ्यांच्याच नशिबी कुठं असते बाबा सरकारी नोकरी...(नशिबावर तुझा विश्वास नाही हे मला नको सांगुस आता) आम्ही पाच लोकं तयारीला पुण्यात गेलो..पहिल्या वर्षी कुणीच पास झालं नाही...मग आमच्यातले दोन-तीन जण पुढची पुर्व परिक्षा पास झाले, आम्ही काय जल्लोष केला होता म्हणुन सांगु...तुझ्या पीएचडीचा पण तुला तेवढा आनंद नसल झाला बघ..येवढं आम्ही पुर्व पास होऊन झालो होतो...अन् याच जल्लोषात आम्ही आमची मेन्स घातली रे... पुढे आम्ही दरवर्षी पुर्व पास व्हायचो अन् बापाला सांगायचो यंदा कलेक्टर होणारच...असे पाच-सहा वर्ष गेले...आम्ही कलेक्टर तर सोड कंडक्टर पण नाही होऊ शकलो...काय करावं..? आमचं काय चुकतं, भीमा ?
भीमा, तु अभ्यास केला, तु राजकारण केले, तु शोध लावले, तु संविधान लिहिलस, तु माणसांसाठी जगलास..अन् माणसाला माणुस म्हणुन जगण्याचा अधिकारही मिळवुन दिलास... दलित शब्दाला प्रतिशब्द दिला तेंव्हा तु म्हणाला होतास नामांतराने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत...अरे पण सध्यातर आमचे सगळे प्रश्न सोडुन (सोडवुन नाही..) आम्ही खुशाल नामांतर करतोय..सगळीकडेच... असो. तु मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण त्यापेक्षा जास्त तु माणसातल्या माणसाशी माणसासारखे वागण्यासाठी सर्वांना तयार केलेस...संविधानात मुलभूत हक्क बहाल करताना तु कुठलाच भेदभाव केला नाहीस...तेवढं एक बरंच झालं...तरी तु फक्त दलितांचाच कसा झालास रे ? तु तर रिजर्व्ह बँकेची स्थापना साऱ्या देशासाठीच निर्माण करण्याची शिफारस केली होतीस ना. तु संविधान लिहिले ते ही सगळ्या भारतीयांसाठी. तु तर कायम म्हणायचास, " मी प्रथमतः अन् अंतिमतः भारतीय आहे." मग तु तरीही साऱ्या भारतीयांचा कसा नाही झालास भावा ?
भीमा, तु मनुस्मृति जाळलीस, तु ब्राह्मणविरोधी झालास...पण तुझा विरोध ब्राह्मणाला नाही तर ब्राह्मण्याला होता हे काही अजुनही नीट आम्हाला कळत नाहिये बघ.. तु दलितांसाठी लढलास, तु कामगारांसाठी लढलास, तु महिलांच्या हक्कासाठी लढलास, तु संबंध मानवजातीसाठी अन् मानवमुक्तीसाठी लढलास भावा...अरे, भीमा तुझ्या कतृत्वाला सीमा च नाही बाबा. तु कायद्याचं बोलायचास, आमच्या फायद्याचं बोलायचास...आता तुझ्या नावानं मत मागायला पुढारी येतात आमच्या वाडी/वस्तीत ...पण ते ना कायद्याचं बोलत्यात ना आमच्या फायद्याचं... त्यांची बी चुक नाही म्हणा... पावशेर मटण अन् बाटलीसाठी आम्हीच आमचं अमुल्य मत असं शे पन्नास रुपड्याला इकत असतोय बघ..आम्हीच नीट शिकलो नाही...जे शिकले ते परत महारवाड्यात फिरले नाही...शिकुन मोठी झालेली माणसं आम्हाला ईसरुन गेली... तु आरक्षणाचा हात तात्पुरता हात दिला होतास आम्हाला पण आम्ही अजुनही तिथंच आहोत...आम्ही आरक्षणातून बाहेर पडायला हवे होतो, पण उलट अजुन बाहेरचे पण आरक्षणात ओढले गेले...तात्पुरत्या कुबड्यांचा वापर करताना पाय निकामी तर झाले नाहीत ना आमचे ? खरंच काही कळत नाय रे ...? तुच सांग बाबा.
तुला वाटत असेल तुझ्या बर्थ डे जल्लोषात मी हे काय माझं रडगाणं सांगतोय...पण भावा, आमच्या सारख्या कित्येकांच्या मनात अजुनही बरीच खदखद आहे... कधी वाटतं आम्ही चुकलो...कधी वाटतं आपल्याला चुक काय बरोबर काय हेच कळु दिलं नाही कधी कुणी... तुझ्यासारख्या विस्तिर्ण आभाळात मी म्हणजे भरटकलेल्या तारकासमान....ना कुठली दिशा ना कुठला मुक्काम...घडताना भरकटणारा मी...मला दिशा दाखव ...मला ताकद दे, ह्या मानसिकतेतुन बाहेर पडण्याची..आधी मला बदलण्याची अन् मग माझं जग बदलण्याची...!
Sunday, April 9, 2023
Friday, April 7, 2023
Book Review : मृत्यु जगलेला माणुस (रेखा बैजल)
आत्महत्या आणि इच्छामरण यात फरक असतो...आत्महत्येत पलायन आहे तर इच्छामरणात पराक्रम आहे, मरणाला सामोरं जाण्याचा...अशा प्रस्तावनेनं सुरु होणारी इच्छामरण/जैन धर्मातील संथारा संकल्पनेभोवती फिरणारी एक कथा...आयुष्यभर आपण आपला अहंकार जपत जगत आलो..कधी कुणाची आपल्या गरज पडली नाही, तर आता मरतानाही कुणाची मदत लागु नये असा विचार करणारे..आपण जगलो आपल्या परीने तर मरणार सुद्धा आपल्याच परीने असा निर्धार करणारे कथेतील अप्पा...त्यांची इच्छामरणाची इच्छा..त्या इच्छेमुळे अस्वस्थ झालेली त्यांची मुलं व सुना...पण अशा परिस्थितीतही अप्पांना जगण्याचं तत्वज्ञान शिकवणारी त्यांची मुलगी नेहा, जी प्रेमविवाहामुळे त्यांना दुरावलेली असते...ह्या सगळ्या परिवाराची, खरंतर ह्या सगळ्या परिवारात असुनही एकटेच जगलेल्या अप्पांची ही कथा अन् व्यथा...आपला स्वभाव आपल्या नीट जगुच देत नाही...कितीतरी राग, द्वेष, अहंकार अन् अगदी प्रेमही, अशा विविध शंखृलामध्ये जखडुन जातो आपण...कधीच मोकळे होत नाही...आयुष्यभर नीट जगत नाही...आपण केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागणं अन् आपल्या वाट्याला आलेल्या चांगल्या गोष्टींची कदर करणं हेही जमत नाही सहजासहजी...अशावेळी आपण म्हणतो आयुष्याचं गणित बिघडलय...पण खरतर आयुष्य म्हणजे गणित नसतं अन् माणसं बीजगणिताप्रमाणे अ, ब व क नसतात...तेंव्हा आपल्या आयुष्यात आलेल्या माणसांना आपण ते आहेत तसे स्विकारले पाहिजे...बाभळीच्या झाडाकडून गुलमोहर होण्याची अपेक्षा करु नये...असं निरपेक्ष जगणं...स्वतःचा अहंकार सोडुन जगणं म्हणजे खरं जगणं...अन् मग असं जगल्यावर सन्यास घेणंही योग्यच कारण सन्यास म्हणजे स्वतःपासुन तुटणं अन् चराचरात रुजणं... असा रुजणारा माणुसच असतो खरा 'मृत्यु जगलेला माणुस'...अशा मृत्यु जगलेल्या माणसाची ही छोटीशी पण तितकीच आशयघन कथा जगण्याचे, मानवी स्वभावाचे अनेक पैलु आपल्याला उलगडुन दाखवते...आपल्यातल्या अनेक भावनांना अलगद हात घालते...विचारमग्न करते अन् आपल्याला ही जगण्याला सामोरे जाण्यासाठी अनेक मोलाचे संदेश देते....
एका बैठकीत वाचुन काढलेल्या काही मोजक्या पुस्तकांपैकी हे एक रेखा बैजल यांचे 'मृत्यु जगलेला माणुस' हे पुस्तक.. मृत्युपुर्वी मनासारखं जगण्यासाठी मनावरची झळमटं झटकण्यासाठी अन् अपराधीपणाची भावना दुर सारुन कागदी होड्या समुद्राच्या पाण्यात सोडाव्या तितक्या सहजपणे भुतकाळ सोडण्यासाठी अशा काही गोष्टी नक्कीच मदत करतात...त्यासाठी एकवेळ अवश्य वाचावे !
#असंच_काहितरी
#Book_Review
Thursday, April 6, 2023
प्रिय सागर...छे..महासागर ❤
जिथं लोकं गर्दीत हरवुन जातात, अशा स्पर्धा परिक्षेच्या पंढरीत मला सापडलेला गोरागोमटा विठ्ठल....पहिल्याच भेटीत जणु जन्मोजन्मीचे संबंध असावेत अशा आपुलकीने माझ्याशी बोलणारा मित्र...आपला अंदाज कधीच चुकत नाही असं सांगत पहिल्याच भेटीत तुला पोस्ट नक्की भेटेल असं सांगत, माझं भरभरुन कौतुक करणारा अन् इतरांनाही माझ्याबद्दल सांगणारा मित्र... अनपेक्षितपणे भेटलेला अन् पुण्याच्या वातावरणात जिथं लोकं पत्ता विचारला तरी नीट सांगत नाही तिथं पत्ता विचारल्यावर नुसता मार्ग न दाखवता तिथपर्यंत पोहचवणारा वाटसरू....पोलिसाचा मुलगा असुनही न बिघडणाऱ्या अपवादांपैकी एक असणारा अपवाद..पहिल्या भेटीनंतरच काळजात घर करणारा अवलिया.... यशोमतीच्या धुरंधरांमध्ये माझ्यासारख्या सैनिकाची भरती करणारा कप्तान... पायाभूत प्रशिक्षणादरम्यान माझ्यासारख्या कधीच बाहेरचं जग जास्त न बघितलेल्या खेड्यातल्या मुलाला आपल्या सोबत सगळीकडे फिरवणारा जिप्सी...प्रशिक्षण म्हणजे दुसरे काॅलेजच असं सांगून आता नाहीतर कधी फिरणार, असं सांगत बरेच सुरेख बेत अगदी नियोजनपुर्ण आखुन भटकंती करत नवनवीन ठिकाणांना घेऊन जाणारा....वेगवेगळी ठिकाणं, वेगवेगळी माणसं यांना भेटवुन माझा अनुभव अधिक समृद्ध करणारा....पायाभूत प्रशिक्षणादरम्यान घोडी मागं शिंगरू फिरावं तसं सतत मला मागे मागे घेऊन फिरणारा... पुर्ण पायाभुत प्रशिक्षणादरम्यान महानगरीय माॅल, सिनेमागृह, अशा तोपर्यंत महागड्या वाटणाऱ्या अनेक गोष्टींचा अनुभव मला पैशाचं नाव न घेताही देणारा....कधीच कुठला हिशोब न ठेवता तुला जमेल तेंव्हा दे म्हणत कायम मला हवी ती मदत करणारा.....स्वतः जितका सुंदर तितकेच सुंदर फोटो काढुन नैसर्गिक, अनैसर्गिक सौदर्याला आपल्या मोबाईलच्या कॅमऱ्यात कैद करणारा....सर्वांनाच हवाहवासा वाटणारा.... एकापेक्षा एक सुंदर व्लाॅग बनवत प्रशिक्षणाच्या क्षणांना चिरस्मृतीत जतन करुन ठेवणारा....आपल्या सुरेल आवाजाने थेट कानातुन काळजात हात घालणारा गायक.... क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा क्रिडा प्रकारापासुन सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत उत्साहात सहभाग घेणारा....मला सुञसंचालन करता येत नाही म्हणत शिवजयंतीच्या कार्यक्रमात आपल्या सुञसंचालनाने सर्वांचे लाड करणारा, आपल्या आवाजाने प्रक्षेकांना अंकीत करणारा....हे दिवस पुन्हा नाही म्हणत बिंधास्त जगणारा अन् तसेच जगा म्हणणारा....कक्ष अधिकारी हाच कलेक्टर आहे असं सांगत प्रांताधिकाऱ्यांना पण मंञालयातल्या फाईलमधल्या कागदासमान उडवुन लावणारा...बघता बघता आम्ही सचिव होऊन जाऊ असं सांगत कक्ष अधिकारी पदाला एका वेगळ्याच उंची नेऊन ठेवणारा... कुठे गाडी पकडली तर काका आम्ही कक्ष अधिकारी आहोत, या कधी मंञालयात म्हणत सहज आपली सुटका करुन घेणारा...फिटनेसच्या नादापायी अगदीच तोलुन मापुन खाणारा ...तरी खाण्याचा, पिण्याचा, पाहण्याचा, पोहण्याचा अन् अजुन बरेच नाद असलेला नादमयी नाव सागर असलं तरी मैञिच्या दुनियेतला माझ्यासाठी महासागर असलेला....आजचा कक्ष अधिकारी अन् उद्याचा सहसचिव सागर मनोरे यास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.....सागरा महासागरासारखा आहेस असाच रहा...एकच काय तो फरक दोन महासागरात.. तो महासागर जरा खारट आहे, अन् हा निव्वळ गोड.....!!
माझ्या सारख्या चंद्राच्या प्रतिबिंबाला तुझ्या पाण्यात कायम सामावुन घेतलेस.... त्यासाठी अजुन काय बोलणार... बरेच काही सांगायचे राहून गेले...पण असु दे...महासागराचं वर्णन थेंबानं कसं करावं...तुर्तास इतकंच !!! खुप खुप शुभेच्छा मित्रा ❤️
#सागर #महासागर
#वाढदिवस_विशेष
#असंच_काहितरी
Wednesday, April 5, 2023
Monday, April 3, 2023
Book Review : मोर ओडिशा डायरी (राजेश पाटील-IAS)
जळगाव सारख्या जिल्ह्यातुन आय.ए.एस पदी पोहचलेले अन् ओडिशा सारख्या आदिवासीबहुल राज्यातील नक्षलप्रभावित जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणुन कार्य केलेले 2005 बॅचचे आय.ए.एस. अधिकारी राजेश पाटील हे त्यांच्या 'ताई, मी कलेक्टर व्हयनु' या पुस्तकामुळे आपल्याला परिचित आहेतच. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करुन प्रशासनात येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठीच त्यांचे हे पुस्तक प्रेरणादायी आहे, मात्र प्रशासनात येण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परिक्षेपेक्षा खडतर परिक्षा प्रशासनात आल्यावर प्रत्यक्ष कार्य करताना द्याव्या लागतात.कधी कोणती परिस्थिती उद्भवेल याचा नेम नसतो...सर्वकाळ तयारीत राहावे लागते...कधीही वाट्याला न आलेले अनेक प्रसंग वाट्याला येतात...अशापरिस्थितीत खरी प्रेरणा लागते ती प्रशासनात कार्य करायला. तीच प्रेरणा देणारे...ओडिशा सारख्या राज्यात जवळपास १५ वर्ष अखिल भारतीय सेवेत कार्य करताना आलेल्या अनुभवांचा नुसता लेखाजोखा नव्हे तर त्या विविध प्रसंगातुन आपल्याला शिकवण देणारे ...कोरापुत, कंधमाल व मयुरभंज जिल्ह्यात विविध नवनवे उपक्रम राबवत आदिवासींच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे पुस्तक म्हणजे 'मोर ओडिशा डायरी'.
प्रशासनात येण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अन् प्रशासनात आलेल्या, अशा सर्वांनांच प्रशासनातल्या विविध ग्राऊंड रिअॅलिटीज दाखवणारे, हे पुस्तक आहे. कलेक्टर म्हटले की लाल दिव्याची गाडी एवढीच आपली कल्पना असते, पण जितके मोठे पद, तितकीच मोठी जबाबदारी हे नक्की. अशा जबाबदारीच्या पदावर गेल्यावर आपण जे लोककल्याणाचे स्वप्न परिक्षेची तयारी करताना पाहिलेले असते, ते खरेच सत्यात उतरवता येते का ? त्यासाठी नक्की काय अडचणी येतात..? प्रशासन वाटते तितके खरेच आरामदायी आहे का ? आपण प्रशासनात आल्यानंतर वाट्याला येणाऱ्या विविध समस्यांना कसे सामोरे जायचे ? प्रत्येक वेळीच मनासारखे करता येईल असे नाही, अशावेळी काय करायचे ? लोकप्रतिनिधींशी नक्की कसे जुळवून घ्यावे ? अनपेक्षितपणे कधी कुणी काही कारस्थान करुन आपली बदनामी केली तर अशा प्रसंगी संयमी भुमिका कशी घ्यावी ? ह्या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक वाचुन आपल्याला मिळतात. नक्षलवाद, चक्रीवादळासारखे नैसर्गिक संकट, आदिवासींचे जमीनी संबंधीचे वाद, सामान्य नागरिकांचे साधे साधे शिक्षण, आरोग्यासंबंधीचे प्रश्न ह्या सगळ्या बद्दल प्रशासनाने कशा पद्धतीने सकारात्मकपणे बघावे, हे स्वतःच्या उदाहरणावरुन सरांनी सांगितलेले आहे.
आपल्या जवळपास १५ वर्षाच्या काळात सुरवातीला नवीन वाटणाऱ्या राज्यात 'मु बी पढीबी' (मी पण शिकणार) या व अशा वेगवेगळ्या कार्यांच्या माध्यमातुन सरांनी उमटवेला ठसा पुस्तकाच्या पानापानातुन वाटरमार्क सारखा दिसुन येतो. अगदी प्रामाणिकपणे कार्य करत आपण कशापद्धतीने खरंच सामान्य माणसाचे जगणे सुकर करु शकतो, अन् खुप मोठमोठे बदल छोट्या छोट्या गोष्टींमधून घडवु शकतो हा धडा पुस्तक आपल्याला देऊन जाते. प्रशासनात बऱ्याचदा कटु अनुभव देखील वाट्याला येतात अशावेळी देखील आपण शांत, संयमी व खंबीर राहुन प्रामाणिकपणे कार्य करत राहायचे ही शिकवण देखील आपल्याला पुस्तकातुन मिळते. थोडक्यात, प्रशासनात आल्यावर कसे कार्य करावे यासाठी नव्याने अधिकारी झालेल्यांसाठी हे पुस्तक नक्कीच एका मार्गदर्शिकेसारखे कार्य करते. परिक्षा पास होण्यासाठी प्रेरणा देणारे 'ताई, मी कलेक्टर व्हयनु' अन् परिक्षा पास झाल्यावर प्रशासनात कार्य करण्यासाठी मार्गदर्शन करणारे 'मोर ओडिशा डायरी', ही राजेश पाटिल (आय.ए.एस.) यांची दोन्ही पुस्तके अप्रतिम आहेत. अवश्य वाचा !
#असंच_काहितरी
#Book_Review
Saturday, April 1, 2023
Book Review : माती जागवील त्याला मत (बाबा आमटे)
लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या आपण लहानपणापासुन ऐकत आलो आहोत. अशा लोकशाहीचा महत्वाचा सण म्हणजे निवडणुक. ह्या निवडणुकीच्यावेळी विविध पक्षांद्वारे जाहिर होणारे जाहिरनामे कितीही प्रलोभने देत असली तरी बाबा आमटे मात्र अशा पक्षांना ठणकावुन सांगतात की, "माती जागवील त्याला मत".
'माती जागवील त्याला मत', हा रमेश गुप्ता यांनी शब्दांकन केलेला बाबा आमटे यांचा चिंतनस्वरुप मुक्तछंदात्मक कवितासंग्रह (स्फुट) आहे. ७० पानी छोटेसे पण स्फोटक असे मतदारांचे मत मांडणारे पुस्तक. यातल्या पहिल्याच 'मी एक मतदार' यात कवितेत अगदी स्पष्टपणे, लोकशाहीचे शिल्प घडवणारा शंभर कोट हातांचा मी एक मतदार आहे, अशा शब्दात मतदाराचे महत्व अधोरेखित केले आहे. 'अंतिम लढ्याचे पडघम' या कवितेत, हुकूमशाही आणि लोकशाही यांतले निकराचे अंतिम युद्ध या देशाच्या सीमेवर आणि सीमेच्या आतही लढले जाणार आहे, असे वर्णन करुन देशातील लोकशाहीत घडणाऱ्या प्रमादांविषयी काळजी चिंतली आहे.स्वातंञ्यानंतर सगळे सुरळीत आणि आनंदाने नांदु, अशी आशा असताना वाट्याला आलेली निराशा बघुन बाबा म्हणतात, "राष्ट्र थकलेले व बावरलेले आहे...पक्षांना पक्षाघात झालाय तर मतांची मतलबाशी गाठ पडली आहे".जाहिरनाम्यातुन आश्वासनांची खैरात होताना नोटांसारखा आश्वासनांचाही चलन-फुगवटा झालाय, हे अगदी स्पष्टपणे बाबा आपल्याला सांगतात...बाबा वर्णन करतात ती वेळ आता नसली तरी परिस्थिती अजुनही कमी जास्त तशीच आहे हे आजही वाटते.'वर्तमानाच्या शिल्पकारांनो ! माझ्या कर्णधारांनो !!', यामध्ये विविध पक्षांमधल्या नेत्याला, कार्यकर्त्त्याला एक दिशा दाखवण्याचा, स्वतःच्या कर्मयोगातुन उमगलेले सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
जनसंघ अन् स्वतंञ पक्ष हे स्वातंञ्याच्या सुरवातीच्या काळातील महत्वाचे पक्ष...यापक्षांबाबतीत 'ट्रोजन'चे लाकडी घोडे, या कवितेत बाबांनी भाष्य केले आहे. 'काही विदूषक, काही जिवाणू !', या कवितेत भारताची फाळणी ही तत्कालिन नेतृत्वाकडून झालेली 'स्ट्रॅट्रॅजिकल एरर' होती हे नमूद करुन पुढे याच्या पुढे जाऊन आता माञ याबाबत धर्मातीत विचार करायला हवा याबाबतीत चिंतन आहे.याच कवितेत विकृतीचे आदिम उगमस्थान हे माणसाचे न भरलेले पोट आहे, बिघडलेले मन नव्हे, हा वास्तवादी विचारही मांडलेला आहे. सामान्य माणसासाठी गरीबी, अज्ञान हेच अजुनही मोठे शञू आहेत, त्यापुढे कुठल्याही राजकीय विचारधारेचा आपण फारसा विचार करत नाही...पण बाबांनी माञ 'वटवाघळे' या कवितेत मार्क्स आणि साम्यवाद याविषयावर चिंतन केलेले आहे. काॅग्रेस पक्षाचे वर्णन 'म्हातारा फिनिक्स' असे करुन पक्षासाठी दिलेला मोलाचा सल्ला वाचताना हे चिंतन अगदी समकालिन वाटते. विनोबा भावे व सर्वोदय यावर परखड भाष्य करताना अपक्षांना प्रलयाच्या भरतीला 'रेतीचे बांध' घालण्याचा प्रयोग असे म्हटले आहे.अशाप्रकारे विविध पक्ष, अपक्ष साऱ्यानांच खर कार्य काय ? लोकशाहीची खरी निकड काय ? हे बाबांनी सांगितले आहे.
'माती जागवील त्याला मत', या कवितेत आजुबाजुला कितीही नकारात्मकता, पक्षीय कटकारस्थाने, हवेदावे असले तरी एक मतदार म्हणुन आपण प्रचंड आशावादी आहोत हे बाबांनी अधोरेखित केले आहे. मतावर प्रेम करणाऱ्या पक्षांना मातीवर प्रेम करण्याचे आव्हान करुन मतांची भिक न मागता पक्षांनी आपल्या कृतीतून मतदारांची मनं जिंकावीत, असा संदेश दिला आहे. भिक मागणारे नेतृत्वच भीक मागायला लावते ! हे विधान एक मतदार म्हणुन सदैव लक्षात ठेवण्यासारखे आहे.पक्षांनी जनतेचे पोट भरले तर जनता त्यांची पेटी (मतांची) आपोआप भरलेच, हे खुले सत्य यात मांडले आहे.
अशाप्रकारचे लोकशाही, पक्ष, पक्षीय नेतृत्व अन् मतदार या सर्व विषयांवरचे बाबांचे हे सखोल चिंतन कुणाला काव्य वाटणारही नाही, पण कल्पनेच्या प्रतिमांनी भरलेल्या काव्यापेक्षा विस्तववादी वास्तवाचे चटके देणारे चिंतन ही देखील कविताच...अन् त्यादृष्टीने आपल्याला विचारमग्न करायला लावणारी अन् राजकारणाचे कंगोरे समजावुन देणारी काहीशी क्लिष्ट वाटणारी ही स्फुट कविता...अवश्य वाचा अन् निश्चय करा की मतावर नाहीतर मातीवर प्रेम करणाऱ्याला मत देऊयात !!
#असंच_काहितरी
#Book_Review
Subscribe to:
Posts (Atom)