Monday, April 3, 2023

Book Review : मोर ओडिशा डायरी (राजेश पाटील-IAS)

 


जळगाव सारख्या जिल्ह्यातुन आय.ए.एस पदी पोहचलेले अन् ओडिशा सारख्या आदिवासीबहुल राज्यातील नक्षलप्रभावित जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणुन कार्य  केलेले 2005 बॅचचे आय.ए.एस. अधिकारी राजेश पाटील हे त्यांच्या 'ताई, मी कलेक्टर व्हयनु' या पुस्तकामुळे आपल्याला परिचित आहेतच. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करुन प्रशासनात येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठीच त्यांचे हे पुस्तक प्रेरणादायी आहे, मात्र प्रशासनात येण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परिक्षेपेक्षा खडतर परिक्षा प्रशासनात आल्यावर प्रत्यक्ष कार्य करताना द्याव्या लागतात.कधी कोणती परिस्थिती उद्भवेल याचा नेम नसतो...सर्वकाळ तयारीत राहावे लागते...कधीही वाट्याला न आलेले अनेक प्रसंग वाट्याला येतात...अशापरिस्थितीत खरी प्रेरणा लागते ती प्रशासनात कार्य करायला. तीच प्रेरणा देणारे...ओडिशा सारख्या राज्यात जवळपास १५ वर्ष अखिल भारतीय सेवेत कार्य करताना आलेल्या अनुभवांचा नुसता लेखाजोखा नव्हे तर त्या विविध‌ प्रसंगातुन आपल्याला शिकवण देणारे ...कोरापुत, कंधमाल व मयुरभंज जिल्ह्यात विविध नवनवे उपक्रम राबवत आदिवासींच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे पुस्तक म्हणजे 'मोर ओडिशा डायरी'

प्रशासनात येण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अन् प्रशासनात आलेल्या, अशा सर्वांनांच प्रशासनातल्या विविध ग्राऊंड रिअॅलिटीज दाखवणारे, हे पुस्तक आहे. कलेक्टर म्हटले की लाल दिव्याची गाडी एवढीच आपली कल्पना असते, पण जितके मोठे पद, तितकीच मोठी जबाबदारी हे नक्की. अशा जबाबदारीच्या पदावर गेल्यावर आपण जे लोककल्याणाचे स्वप्न परिक्षेची तयारी करताना पाहिलेले असते, ते खरेच सत्यात उतरवता येते का ? त्यासाठी नक्की काय अडचणी येतात..? प्रशासन वाटते तितके खरेच आरामदायी आहे का ? आपण प्रशासनात आल्यानंतर वाट्याला येणाऱ्या विविध समस्यांना कसे सामोरे जायचे ? प्रत्येक वेळीच मनासारखे करता येईल असे नाही, अशावेळी काय करायचे ? लोकप्रतिनिधींशी नक्की कसे जुळवून घ्यावे ? अनपेक्षितपणे कधी कुणी काही कारस्थान करुन आपली बदनामी केली तर अशा प्रसंगी संयमी भुमिका कशी घ्यावी ? ह्या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक वाचुन आपल्याला मिळतात. नक्षलवाद, चक्रीवादळासारखे नैसर्गिक संकट, आदिवासींचे जमीनी संबंधीचे वाद, सामान्य नागरिकांचे साधे साधे शिक्षण, आरोग्यासंबंधीचे प्रश्न ह्या सगळ्या बद्दल प्रशासनाने कशा पद्धतीने सकारात्मकपणे बघावे, हे स्वतःच्या उदाहरणावरुन सरांनी सांगितलेले आहे. 

आपल्या जवळपास १५ वर्षाच्या काळात सुरवातीला नवीन वाटणाऱ्या राज्यात 'मु बी पढीबी' (मी पण शिकणार) या व अशा वेगवेगळ्या कार्यांच्या माध्यमातुन सरांनी उमटवेला ठसा पुस्तकाच्या पानापानातुन वाटरमार्क सारखा दिसुन येतो. अगदी प्रामाणिकपणे कार्य करत आपण कशापद्धतीने खरंच सामान्य माणसाचे जगणे सुकर करु शकतो, अन् खुप मोठमोठे बदल छोट्या छोट्या गोष्टींमधून घडवु शकतो हा धडा पुस्तक आपल्याला देऊन जाते. प्रशासनात बऱ्याचदा कटु अनुभव देखील वाट्याला येतात अशावेळी देखील आपण शांत, संयमी व खंबीर राहुन प्रामाणिकपणे कार्य करत राहायचे ही शिकवण देखील आपल्याला पुस्तकातुन मिळते. थोडक्यात, प्रशासनात आल्यावर कसे कार्य करावे यासाठी नव्याने अधिकारी झालेल्यांसाठी हे पुस्तक नक्कीच एका मार्गदर्शिकेसारखे कार्य करते. परिक्षा पास होण्यासाठी प्रेरणा देणारे 'ताई, मी कलेक्टर व्हयनु' अन् परिक्षा पास झाल्यावर प्रशासनात कार्य करण्यासाठी मार्गदर्शन करणारे 'मोर ओडिशा डायरी', ही राजेश पाटिल (आय.ए.एस.) यांची दोन्ही पुस्तके अप्रतिम आहेत. अवश्य वाचा !


#असंच_काहितरी
#Book_Review

No comments: