Saturday, April 1, 2023

Book Review : माती जागवील त्याला मत (बाबा आमटे)



लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या आपण लहानपणापासुन ऐकत आलो आहोत. अशा लोकशाहीचा महत्वाचा सण म्हणजे निवडणुक. ह्या निवडणुकीच्यावेळी विविध पक्षांद्वारे जाहिर होणारे जाहिरनामे कितीही प्रलोभने देत असली तरी बाबा आमटे मात्र अशा पक्षांना ठणकावुन सांगतात की, "माती जागवील त्याला मत".

'माती जागवील त्याला मत', हा रमेश गुप्ता यांनी शब्दांकन केलेला बाबा आमटे यांचा चिंतनस्वरुप मुक्तछंदात्मक कवितासंग्रह (स्फुट) आहे. ७० पानी छोटेसे पण स्फोटक असे मतदारांचे मत मांडणारे पुस्तक. यातल्या पहिल्याच 'मी एक मतदार' यात कवितेत अगदी स्पष्टपणे, लोकशाहीचे शिल्प घडवणारा शंभर कोट हातांचा मी एक मतदार आहे, अशा शब्दात मतदाराचे‌ महत्व अधोरेखित केले आहे. 'अंतिम लढ्याचे पडघम' या कवितेत, हुकूमशाही आणि लोकशाही यांतले निकराचे अंतिम युद्ध या देशाच्या सीमेवर आणि सीमेच्या आतही लढले जाणार आहे, असे वर्णन करुन देशातील लोकशाहीत घडणाऱ्या प्रमादांविषयी काळजी चिंतली आहे.स्वातंञ्यानंतर सगळे सुरळीत आणि आनंदाने नांदु, अशी आशा असताना वाट्याला आलेली निराशा बघुन बाबा म्हणतात, "राष्ट्र थकलेले व बावरलेले आहे...पक्षांना पक्षाघात झालाय तर मतांची मतलबाशी गाठ पडली आहे".जाहिरनाम्यातुन आश्वासनांची खैरात होताना नोटांसारखा आश्वासनांचाही चलन-फुगवटा झालाय, हे अगदी स्पष्टपणे बाबा आपल्याला सांगतात...बाबा वर्णन करतात ती वेळ आता नसली तरी परिस्थिती अजुनही कमी जास्त तशीच आहे हे आजही वाटते.'वर्तमानाच्या शिल्पकारांनो ! माझ्या कर्णधारांनो !!', यामध्ये विविध पक्षांमधल्या नेत्याला, कार्यकर्त्त्याला एक दिशा दाखवण्याचा, स्वतःच्या कर्मयोगातुन उमगलेले सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

जनसंघ अन् स्वतंञ पक्ष हे स्वातंञ्याच्या सुरवातीच्या काळातील महत्वाचे पक्ष...यापक्षांबाबतीत 'ट्रोजन'चे लाकडी घोडे, या कवितेत बाबांनी भाष्य केले आहे. 'काही विदूषक, काही जिवाणू !', या कवितेत भारताची फाळणी ही तत्कालिन नेतृत्वाकडून झालेली 'स्ट्रॅट्रॅजिकल एरर' होती हे नमूद करुन पुढे याच्या पुढे जाऊन आता माञ याबाबत धर्मातीत विचार करायला हवा याबाबतीत चिंतन आहे.याच कवितेत विकृतीचे आदिम उगमस्थान हे माणसाचे न भरलेले पोट आहे, बिघडलेले मन नव्हे, हा वास्तवादी विचारही मांडलेला आहे. सामान्य माणसासाठी गरीबी, अज्ञान हेच अजुनही मोठे शञू आहेत, त्यापुढे कुठल्याही राजकीय विचारधारेचा आपण फारसा विचार करत नाही...पण बाबांनी माञ 'वटवाघळे' या कवितेत मार्क्स आणि साम्यवाद याविषयावर चिंतन केलेले आहे. काॅग्रेस पक्षाचे वर्णन 'म्हातारा फिनिक्स' असे करुन पक्षासाठी दिलेला मोलाचा सल्ला वाचताना हे चिंतन अगदी समकालिन वाटते. विनोबा भावे व सर्वोदय यावर परखड भाष्य करताना अपक्षांना प्रलयाच्या भरतीला 'रेतीचे बांध' घालण्याचा प्रयोग असे म्हटले आहे.अशाप्रकारे विविध पक्ष, अपक्ष साऱ्यानांच खर कार्य काय ? लोकशाहीची खरी निकड काय ? हे बाबांनी सांगितले आहे.

'माती जागवील त्याला मत', या कवितेत आजुबाजुला कितीही नकारात्मकता, पक्षीय कटकारस्थाने, हवेदावे असले तरी एक मतदार म्हणुन आपण प्रचंड आशावादी आहोत हे बाबांनी अधोरेखित केले आहे. मतावर प्रेम करणाऱ्या पक्षांना मातीवर प्रेम करण्याचे आव्हान करुन मतांची भिक न मागता पक्षांनी आपल्या कृतीतून मतदारांची मनं जिंकावीत, असा संदेश दिला आहे. भिक मागणारे नेतृत्वच भीक मागायला लावते ! हे विधान एक मतदार म्हणुन सदैव लक्षात ठेवण्यासारखे आहे.पक्षांनी जनतेचे पोट भरले तर जनता त्यांची पेटी (मतांची) आपोआप भरलेच, हे खुले सत्य यात मांडले आहे.

अशाप्रकारचे लोकशाही, पक्ष, पक्षीय नेतृत्व अन् मतदार या सर्व विषयांवरचे बाबांचे हे सखोल चिंतन कुणाला काव्य वाटणारही नाही, पण कल्पनेच्या प्रतिमांनी भरलेल्या काव्यापेक्षा विस्तववादी वास्तवाचे चटके देणारे चिंतन ही देखील कविताच...अन् त्यादृष्टीने आपल्याला विचारमग्न करायला लावणारी अन् राजकारणाचे कंगोरे समजावुन देणारी काहीशी क्लिष्ट वाटणारी ही स्फुट कविता...अवश्य वाचा अन् निश्चय करा की मतावर नाहीतर मातीवर प्रेम करणाऱ्याला मत देऊयात !!


#असंच_काहितरी
#Book_Review

No comments: