प्रिय नागरी सेवा,
तुझी माझी ओळख कधी झाली ? तुला थेट पत्र लिहीण्याचं मी धाडस कसं केलं ? असं तुला लिफाफा हाती पडताच वाटेल ...सुरवातीलाच स्पष्ट सांगतो, मी तुला ओळखतो (किमान मला असं वाटतं तरी...) पण तु पण मला ओळखशीलच अस नाही...मी तुला प्रिय म्हटलो असलो तरी तु फक्त प्रिय नाहीस...तु माझ्यासाठी प्राणप्रिय आहेस...माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे...मुमताज साठी ताजमहाल बांधणाऱ्या शहाजानचं कौतुक कशाला..? मी तर तुझ्यासाठी मनात महाल नाही नगरच वसवलय...अन् तुला हदयाच्या गाभाऱ्यात बसवलय...तु मला हो म्हणावं म्हणुन रातंदिन झुरतोय...कारखान्यातल्या कामगारासारखं न चुकता वेळापत्रक पाळुन मर मर मरतोय...कधी वाचतोय..कधी ऐकतोय..तुझ्यासाठी नको नको ते करतोय... अर्थात तीच कर्मकहाणी तुला सांगावी वाटली म्हणुन...
तसं तुझी ओळख मला शाळेत असतानाच झाली..आमच्या १० वीच्या निकालानंतर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आम्ही एका मोठ्या साहेबांना ऐकलं...त्यांच्या तोंडुन मी तुझं जे कौतुक ऐकलं..तुला काय सांगु...मला तेंव्हाच तु प्रचंड आवडलीस... तु एकदा भेटली की होणारा सन्मान...भेटणारा मानमरातब...तुझ्यापायी येणारी लालदिव्याची गाडी..मोठा बंगला...अन् एकदा तु हाताशी आली की मग जगातली सुंदरातली सुंदर पोरगी सुद्धा आपल्या हातात हात देईल असा वाटणारा विश्वास...माझ्या कुमार अवस्थेत तुझ्याबद्दल अशी अगदीच सुमार माहिती होऊनही मी तुलाच मिळवायचं हे मनोमन ठरवुन टाकलं...
तुझ्या भोवतीचा झगमगाट मला तुझ्याकडे घेऊन आला असला तरी पुढे काॅलेजात गेल्यावर अजुन कळायला लागलं...झगमगाटाबरोबर येणारी जबाबदारी जरा जरा समजायला लागली... पायाखाली वीट आली म्हणुन पांडुरंग होता येत नाही...तसं तु भेटल्यावर सगळेच जनतेचे तारणहार होत नाहीत, हेही नंतर नंतर कळायला लागलं...पण तुझ्या भेटण्यानं आपल्याला तारणहार होण्याची संधी भेटु शकते हे कळलं ...तसं तर लहानपणी काहीही झालं की आज्जी एकच वाक्य बोलायची,"लय नकु बोलुस, तु काय कोण कलेक्टर लागुन गेलास व्हय". तेंव्हा कलेक्टर म्हणजे नागरी सेवा...हे ही माहीत नव्हतं...पण कलेक्टर झाल्यावर तरी आज्जी आपलं ऐकल असं वाटायचं म्हणुन मग कलेक्टर व्हावं असं तेंव्हापासुन वाटायचं..बालमनातल्या माझ्या कल्पनांना पुढे हवा भेटत गेली..अन् मनात आग पेटत गेली...पुढं पुढं अधिकाऱ्यांच्या भाषणांनी ह्या आगीत जणू तेलच ओतलं अन् भडका उडाला...ठरवलं तुला मिळवायचच....
मग ११ वी, १२ वी पास झालो...डिगरी मुक्त विद्यापीठातुन करावी अन् तुझ्यासाठी मेहनत घ्यावी असं वाटलं, पण तु माझीच आहेस असं इथं प्रत्येकाला वाटत असताना तु नक्की कुणा कुणाला भेटणार असंही वाटलं...माझ्या आराधनेत काही कमतरता राहिलीच अन् तु नाही होकार दिला तर काय असं वाटुन मग तुझ्या मागे धावताना मी एक वेगळा रस्ताही तयार ठेवला..तुझ्या मागे धावताना भरकटलो...तुझ्यापर्यंत नाहीच पोहचु शकलो, तर अगदीच विदुर होऊ जगण्यापेक्षा कुणी तरी हवीच आपल्याला म्हणुन तथाकथित प्लान बी चा विचार करुन जसं सगळेच करतात तसं मी बी इंजिनियरिंग केलं..पण डिगरी झाल्यावर तुझं याड उफाळुन आलं अन् सरळ धरला रस्ता तुझ्याकडं येण्याचा...
तुझ्याकडं यायचं म्हणजे सोपं नाहीच बाई, अन् माझ्यासाठी तु एकटी असली तरी तुझ्यासाठी मी एकटा नाहीये...तो कोण शायर म्हणतो तसं,
"वो बेवफा नही, युँही बदनाम था
लाखो चाहने वाले थे, किस किससे वफा करता ?"
तुझेही चाहते लाखो आहेत...मी एकुणातला एक आहे...एकमेव नाही...पण तुला म्हणुन सांगतो..माझ्यासारखा दुसरा सापडायचा नाही तुला... मी एकटाच माझ्यासारखा आहे... तुला मिळवायला मी कुणाही मध्यस्थाकडे गेलो नाही...फुले वाचले होते... जोतिबांच्या विधानाला माझ्या परिने मी बदलवले अन् स्वतःलाच सांगितले,"तुला ही भेटण्यासाठी कुणा मध्यस्थाची जरूरी नाही". मग काय ? भिडलो ना एकटाच...स्वतःच सारी जमवा जमव केली...होतो तिथेच राहिलो...तु जिथुन लवकर भेटते असे म्हणतात, त्या वळणाकडेही वळलो नाही...मी अन् माझी रुम हेच माझे तुझ्या भक्तीचे स्थान होते...रोज ऊठताना अन् झोपताना सारखा तुझाच विचार..मग सुरवात केली...तुला भेटलेल्यांनी मार्ग सांगितला...मी माझे बारकावे शोधले...तुझ्याकडे येण्याच्या काही चोरवाटा शोधल्या अन् चालायला लागलो... पण वाट सोपी नाही...अडखळत आहे...रोज ढेचाळतो...कधीकधी रक्तबंबाळ होतो...पण तरी तुझी ओढ काही कमी होत नाही... आवश्यक ते सारे करण्याची तयारी आहे...हिम्मत हारलो नाही..जिद्द, चिकाटी, परिश्रम, या शब्दांना जगत आलो.... पण खरं सांगु हल्ली मनावर शंकेचे धुके दाटुन येते..चालणे अवघड होऊन जाते... बापाला सांगितले होते, अर्जुनासारखा जातो.. मत्स्यभेद करावा तशी परिक्षा भेदुन जातो ..अन् तुला घेऊनच येतॊ....वर्षामागुन वर्ष सरली... माझ्या डोळ्यासमोरुन तु हटत नाही, पण तु काही केल्या भेटत नाही...
आताशा तर घरात आल्यावरही घरात नसतोच मी.. घरातल्या, घराबाहेरच्या नजरा जणु रोज विचारत असतात, तो सध्या काय करतोय ? तयारी..हा एकच शब्द बोलु शकतो...ते ऐकुन ऐकुन आता त्यांनीही मला वेड्यात काढलय...बस झालं आता सोड तो नाद म्हणत गावातला शेंबडा पोरगा बी मला जगण्याचं तत्वज्ञान शिकवुन जातो आहे... मी काय करु काय नाही काहीच कळत नाही... एक पाऊल पुढे पडते..एखादी पुर्व पास होतो...तुझा चेहरा दिसल्यागत होतो...पण पुढच्याच पावलावर तु भुमिगत होतेस...कळत नाही काय चुकते...माझ्यापेक्षा लहान लेकरं माझ्या मागुन आली...तुला भेटली अन् स्थिरस्थावर झाली देखील...मी अजुनही तळमळतो आहे...तु एकदा सांग ना..तुला मी कळतो आहे का ? बरं तु ही इतकी मोहक आहेस...एकवेळ रंभा, उर्वशी दूर करु शकेल..पण तु हवीच आहेस हा माझा हट्ट आहे की प्रेम काहीच कळत नाही.. आता जरा शांत बसुन विचार करणार आहे..तु मिळवण्याच्या हट्टापायी मी बरेच काही पायी तुडवले आहे...चंद्रच हवा ह्या हट्टापायी चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे कायम दुर्लक्ष करत आलो...आतापर्यंत हुशार होतो आता शहाणा होईल बाई... तुझ्या भेटीपायी नुसतं वय वाढत गेलं असं नाही.. माय बापांच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचं नक्षीकाम देखील वाढलं...बापाच्या डोक्यावरच्या कर्जाच्या डोंगराची उंची वाढली...आयटीतल्या मित्रांचा बँक बॅलेंस वाढला ..साहजिकच ते पुढे सरकले ..मी तिथेच राहिलो...अन् मैञितला बॅलेंस बिघडला...जबाबदाऱ्या वाढत गेल्या..लोकांचे प्रश्न वाढत गेले... वाढणाऱ्या एका एका अटेंम्प्टने फक्त वय वाढतं असं नाही बाई...म्हणुनच आता स्वतःला सावरले पाहिजे... तुझा हट्ट मला ह्या वाटेवर कितीही घट्ट धरून ठेवत असला तरी आयुष्य अजुन जास्त बिघडण्याआधी मीच वळुन माझी वाट बदलणार आहे .... एक शेवटची विनंती...बाई, तु आयुष्याला वेगळं वळण देतेस असं भाषणात ऐकुन आम्ही आयुष्याला अशा वळणावर घेऊन आलो.... तु सुंदर आहेसच...तुझ्यासारखी तुच...तुझ्यापुढे स्वर्गीय अप्सराही फिक्याच...पण मी पृथ्वीवरचा सामान्य जीव...तेंव्हा तुझ्या वाटेवर येणाऱ्या जीवांना वेळीच सावध करत जा... तु नसेल भेटणार तर तुझ्या सख्या सोबती असतीलच ना खाजगीतल्या...त्यांची तर गाठ पाडून दे... तुझी माझी गाठ बांधलीच गेली नव्हती असं समजुन मी माझ्या भळभळणाऱ्या जखमा घेऊन...असंख्य गाठींना पाठीशी घेऊन तुझा निरोप घेईल...आता फक्त एवढा एक शेवटचा प्रयत्न...भेटलीस तरी बेहत्तर नाही भेटलीस तरी बेहत्तर...!
1 comment:
अतिसुंदर.... शब्दरचना आणि त्याला भावनांची जोड मन हेलावनारी...!👍
Post a Comment