Friday, April 7, 2023

Book Review : मृत्यु जगलेला माणुस (रेखा बैजल)


आत्महत्या आणि इच्छामरण यात फरक असतो...आत्महत्येत पलायन आहे तर इच्छामरणात पराक्रम आहे, मरणाला सामोरं जाण्याचा...अशा प्रस्तावनेनं सुरु होणारी इच्छामरण/जैन धर्मातील संथारा संकल्पनेभोवती फिरणारी एक कथा...आयुष्यभर आपण आपला अहंकार जपत जगत आलो..कधी कुणाची आपल्या गरज पडली नाही, तर आता मरतानाही कुणाची मदत लागु नये असा विचार करणारे..आपण जगलो आपल्या परीने तर मरणार सुद्धा आपल्याच परीने असा निर्धार करणारे कथेतील अप्पा...त्यांची इच्छामरणाची इच्छा..त्या इच्छेमुळे अस्वस्थ झालेली त्यांची मुलं व सुना...पण अशा परिस्थितीतही अप्पांना जगण्याचं तत्वज्ञान शिकवणारी त्यांची मुलगी नेहा, जी प्रेमविवाहामुळे त्यांना दुरावलेली असते...ह्या सगळ्या परिवाराची, खरंतर ह्या सगळ्या परिवारात असुनही एकटेच जगलेल्या अप्पांची ही कथा अन् व्यथा...आपला स्वभाव आपल्या नीट जगुच देत नाही...कितीतरी राग, द्वेष, अहंकार अन् अगदी प्रेमही, अशा विविध शंखृलामध्ये जखडुन जातो आपण...कधीच मोकळे होत नाही...आयुष्यभर नीट जगत नाही...आपण केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागणं अन् आपल्या वाट्याला आलेल्या चांगल्या गोष्टींची कदर करणं हेही जमत नाही सहजासहजी...अशावेळी आपण म्हणतो आयुष्याचं गणित बिघडलय...पण खरतर आयुष्य म्हणजे गणित नसतं अन् माणसं बीजगणिताप्रमाणे अ, ब व क नसतात...तेंव्हा आपल्या आयुष्यात आलेल्या माणसांना आपण ते आहेत तसे स्विकारले पाहिजे...बाभळीच्या झाडाकडून गुलमोहर होण्याची अपेक्षा करु नये...असं निरपेक्ष जगणं...स्वतःचा अहंकार सोडुन जगणं म्हणजे  खरं जगणं...अन् मग असं जगल्यावर सन्यास घेणंही योग्यच कारण सन्यास म्हणजे स्वतःपासुन तुटणं अन् चराचरात रुजणं... असा रुजणारा माणुसच‌ असतो खरा 'मृत्यु जगलेला माणुस'...अशा मृत्यु जगलेल्या माणसाची ही छोटीशी पण तितकीच आशयघन कथा जगण्याचे, मानवी स्वभावाचे अनेक पैलु आपल्याला उलगडुन दाखवते...आपल्यातल्या अनेक भावनांना अलगद हात घालते...विचारमग्न करते अन् आपल्याला ही जगण्याला सामोरे जाण्यासाठी अनेक मोलाचे संदेश देते....
एका बैठकीत वाचुन काढलेल्या काही मोजक्या पुस्तकांपैकी हे एक रेखा बैजल यांचे 'मृत्यु जगलेला माणुस' हे पुस्तक.. मृत्युपुर्वी मनासारखं जगण्यासाठी मनावरची झळमटं झटकण्यासाठी अन् अपराधीपणाची भावना‌ दुर सारुन कागदी होड्या समुद्राच्या पाण्यात सोडाव्या तितक्या सहजपणे भुतकाळ सोडण्यासाठी अशा काही गोष्टी नक्कीच मदत करतात...त्यासाठी एकवेळ अवश्य वाचावे !



#असंच_काहितरी
#Book_Review

No comments: