Wednesday, May 31, 2023

वर्षपुर्ती स्वप्नपुर्तीची !



वर्षपुर्ती स्वप्नपुर्तीची...! #नायब_तहसिलदार


एका वर्षापुर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 31 मे 2022 रोजी राज्यसेवा 2020 चा अंतिम निकाल लागला होता..कोरोनाच्या दोन वर्षांच्या अंधारानंतर हा निकालाचा  काजवा मिणमिणत हाती आला होता...आयुष्यातल्या पहिल्या गोष्टींचा आनंद काही वेगळाच असतो...पहिल्यांदा बोलणं शिकलो तेंव्हाचे बोबडे बोल अन् त्या आठवणी कायम आनंददायी असतात..पुढे मोठमोठी भाषणं करायला शिकतो, पण ते बोबडे बोल माञ अनमोलच...कारण ते पहिले पहिले शब्द असतात..जसं पहिलं प्रेम अन् प्रेमातली पहिली भेट....तशीच पहिली नोकरीही ! तसंही एका बेरोजगार मुलासाठी नोकरी म्हणजे 'ती'च... कधीकधी तिच्यापेक्षाही जास्त महत्वाची, म्हणुनच तर तिच्यापासुन दूर होऊनही 'हि'ला मिळवण्यासाठी धडपडणारी तरुणाई आपल्याला दिसते...पहिल्यांदा मिळणाऱ्या गोष्टींचा आनंद काही औरच असतो...या निकालानंतर मागच्या एका वर्षात दोन निकाल लागले...बेरोजगार ते वर्ग ब अधिकारी अन् पुढे वर्ग अ अधिकारी असा प्रवास करता आला...पण पहिल्यांदा कुठली नोकरी लागली...त्यातही सरकारी अधिकारी झालो...गावाकडच्या भाषेत लोकांसाठी साहेब झालो, ह्या सगळ्या गोष्टी अविस्मरणीय...त्यामुळे 31 मे हा तसा अविस्मरणीयच...प्रवास इथे संपला नाहीच...फक्त मुक्कामाची ठिकाणी अशी वेळेवर भेटत गेली की पावलांना चालायला अजुन बळ मिळतं एवढं नक्की...सरल्या सालाचे आभार 🙏 आता ह्या नव्या सालात पावलांना पुढच्या प्रवासासाठी अधिक बळ मिळो, हिच प्रार्थना !!


#असंच_काहितरी
🖋शशिच्या मनातले

Sunday, May 14, 2023

संभाजी महाराज जयंती


सह्याद्रीच्या खडकांसारखा अभेद्य बाणा असणारा ... शिवछञपती सारख्या वाघाचा छावा ...... बालपणीच मातेचे छञ हरवल्यावर जिजाऊमाँसाहेबांच्या विद्यापीठात तयार झालेला छञपती... शस्ञांसोबत शास्ञांतही पारंगत असणारा.... छळ, कपट अन् अंतर्गत कलहांना स्वाभिमानाने सामोरे जाणारा...मिञासाठी जीव देणारा पण दगाबाजांना तितक्याच कठोरपणे यमसदनी पाठवणारा.... न्याय्यबुद्धीने राज्य करणारा....आपल्या अल्प काळातही काळाच्या भाळावर आपल्या कर्तृत्वाची सोनेरी मुद्रा उमटवणारा....बाप से बेटा सवाई म्हणतात तसे शिवरायांच्या स्वराज्याची उंची अधिक वाढवणारा, तरिही कल्पोकल्पित घटनांच्या आधारे काहींनी 'बढे बाप की बिगडी हुई औलाद' असा ठपका ज्यांच्यावर ठेवला असा, पण या अशा अफवांना भिक न घालता शिवरायांनी निर्मिलेल्या स्वराज्याचा आपल्या कर्तृत्वाने खरा वारसदार ठरलेला.... मरणाला स्वतःची लाज वाटावी इतक्या  निडरपणे मृत्युला सामोरे जाणारा .... स्वराज्याचा धाकला धनी म्हणजे छञपती शंभूराय.....राजे आपल्या जयंतीनिमित्त आपल्या पविञ स्मृतिस विनम्र अभिवादन....🙏

Friday, May 5, 2023

प्रिय सिद्धार्थ



प्रिय सिद्धार्थ,

नेमकं तुला काय म्हणावं ? याचाच विचार करत होतो...सिद्धार्थ म्हणु, तथागत म्हणु की बुद्ध म्हणु... असु दे...काहीही म्हटलं तरी तुला फार फरक पडणारच कुठेय ? तुझं मोठेपण हे नावात नाहीये हेच खरे...तुझं जगणं, तुझा संदेश हिच तुझी खरी ओळख..तु खरंतर माझंच विस्तारीत रुप आणि मी तुझं संकुचित रुप, तसं बघितलं तर हा माझाच माझ्याशी संवाद आहे..मग खरच नावात काय आहे ?

तर सिद्धार्था, ह्या पञास कारण की आज तुझा वाढदिवस...आमच्या भाषेत बर्थ डे..पण नुसतं एवढच नाही..आजचा दिवस हा तुझ्या आयुष्यातला फारच महत्वाचा दिवस...तुझा जन्म आजचा...तुला ज्ञानप्राप्ती झाली तो दिवसही आजचाच...अन् तुझे ह्या मायावी जगातुन महापरिनिर्वाण झाले, तेही आजच्याच दिवशी...आयुष्याची सुरवात अन् शेवट एकाच बिंदुवर, यातुन आपलं आयुष्य एक वर्तुळ आहे हेच जणू तु दाखवुन दिलेस. ह्या वर्तुळाच्या परिघावर भटकण्यात आमचे जीवन निघून जाते...आमच्या सारख्या सामान्य माणसाचं आयुष्य तर खऱ्या अर्थानं परिघावरचे जिणे...ह्या वर्तुळाच्या केंद्रबिंदुचा शोध काही काहींना आयुष्यभर लागत नाही...असो.

सिद्धार्था, तु राजकुमार होतास...कशाचीच कमी नव्हती...तरीही जगातले दुःख पाहुन तुझे हृदय कसे द्रावले ?...इकडे आमच्याकडे तर जरासा पैसा आला की आम्ही तर बाबा मानच खाली वाकवत नाही...मग तुझ्यात धनदौलतीचा उन्माद कसा आला नाही ?...हे काही मला अजुन कळले नाही..तु राजमहाल सहज सोडु शकला, कुठलेच बंधन तुला बांधुन ठेवु शकले नाही...आम्हीतर बाहेरगावी जाताना घराचे कुलूप नीट लागले का याची चारदा खातरजमा करतो...बायको माहेरी पोहचे पर्यंत चारदा काॅल करुन नीट जातेय ना, कुठपर्यंत पोहचली, अशी विचारणा करत असतो...घराचा, घरातल्या माणसांचा कशाचाच मोह तुला कसा अडवु शकला नाही, हे माझ्यासारख्या सामान्यांना न उलगडणारं एक कोडंच आहे...पण खरं सांगायचं तर तु राजमहाल सोडलास तेंव्हाच कुठे तु खरा सम्राट झालास...शांततेचा, विश्वबंधुतेचा संदेश देणारा महासम्राट....तु जगातले दुःख पाहिले, वार्धक्य पाहिले तेंव्हा ह्या जगण्याचा हेतु काय ? असा प्रश्न तुला पडायला लागला अन् मग त्यातुनच तु शोधायला निघालास अशा प्रश्नांची उत्तर जी कधी कोणाला पडलीच नव्हती...धर्म म्हणजे कर्मकांड हेच ज्यांचं गणित होतं, ज्यांच्या धर्मानं इतरांना नाकारलं, त्या नाकारल्यांना तु स्विकारलेस अन् त्यांना नवा धर्म दिलास..जगण्याचा नवा मार्ग दाखवलास...तु शिव्या घालत बसला नाहीस, तु दगडांवर धडकाही घेतल्या नाहीस, तु धर्मांधतेचा डोंगरच पोखरलास...सामान्यांना असामान्य असे ज्ञान देऊन त्यांचं जगणं देखणं केलस...सहा वर्षाच्या भटकंतीनंतर तुला दिव्यज्ञानाची प्राप्ती झाली...जगात दुःख आहे...दुःखाला कारण आहे...अन् हे दुःख दूर देखील करता येते असा सर्वव्यापी संदेश तु दिलास....तृष्णा हे दुःखाचे मुळ कारण आहे, हे किती अचुक सांगितलेस तु...आम्ही कायम दुःखी का ? ह्याचं उत्तर आमची तृष्णा कायम कृष्णामाई सारखी वाहतच असते...आमच्याकडे सायकल नसते तेंव्हा सायकल हवी असते, सायकल आली की मोटारसायकल, मग चारचाकी  गाडी, मग बंगला, मग नुसता बंगला चांगला वाटत नाही, बंगल्याच्या आजुबाजुला बगीचाही हवा, अन् एवढं सगळं असल्यावरही तृष्णा भागत नाही... कधी पैसा, कधी पद, कधी प्रतिष्ठा आम्ही कायम तहानलेलेच...आता ह्या दुःखाला दूर करण्याचा अष्टांग मार्गही तु सांगितलास... आम्ही माञ फार फार तर तुला साष्टांग नमस्कार करु शकतो, पण हा अष्टांग मार्ग स्विकारणे जरा आम्हाला जडच जाते बघ...

सिद्धार्था, तुला कसं जमलं रे इतकं सम्यक जगणं ?...पण खरं सांगु आम्हीही काही वाईट माणसं आहोत असं नाही...आम्हाला फक्त जमत नाही मध्यम मार्गावर चालणं, आम्ही एक तर डावे असतो नाहीतर उजवे...समाजवादी असतो नाहीतर भांडवलवादी...काळे असतो नाहीतर गोरे...आम्ही कायम हो किंवा नाही असाच प्रश्न म्हणुन पाहतो ...आहे रे आणि नाही रे मध्ये विभागणी करणारा एक मार्क्स आमच्याही आत असतोच.. आम्हाला तु सांगितले तसं मध्यम मार्गावर चालणं जमावं अस वाटतं, पण यासाठी कुणीतरी हात धरावा अन् त्यामार्गावर न्यावं यासाठीच आमचा शोध सुरु असतो...सारे धर्म, सारे शोध, साऱ्या प्रार्थना, हे सारेच आम्हाला कुणीतरी, काही तरी हवे असते जगण्यासाठी ...आमच्या अंधारात चाचपडत पडलेल्या जीवांना मार्ग दाखवण्यासाठी...आमच्या‌ वाटेत उजेड पेरण्यासाठी...पण बाबा, तु तर मोकळा झालास अत्त दिप भव: म्हणुन...आता तुच सांग कसा पेटवायचा हा आतला दिप ?...अन् कसा पेरायचा उजेड आपणच आपल्या वाटेवर ?...असु दे..हे तरी तुला का विचारावं, मीच माझं शोधलं पाहिजे ह्याचं उत्तर कारण तुला स्विकारायचे म्हणजे सोपं नाहीच....पण आवश्यक माञ आहे...म्हणुनच साऱ्या धर्म अन धर्मग्रंथांचा अभ्यास करुन भिमराय तुझ्या मार्गावर आला तो काय उगीच..?

सिद्धार्था, बघ काय काय बोललो ना...किती भरकटलो...अरे हे असंच होतं बघ माझं...म्हणुनच तु अन् तुझे शब्द मला परत मार्गावर आणण्यासाठी फार गरजेचे आहेत बघ...मी माझा दिप होईलच ..तु फक्त माझ्या जवळच रहा, माझ्या दिव्याची वात विझू नये म्हणुन....तु लहानपणापासुन शाळेतल्या पुस्तकापासु‌न ते कथा, कादंबरी, सिनेमापर्यंत वारंवार भेटत आलाच आहेस..पुढे पुढे सोशल मिडियात कितीतरी प्रेरणादायी वचनांच्या माध्यमातुन तु भेटला...खरंखोटं सगळं तपासुन पाहायला हवं, हे तुच सांगितलस...पण मी शंका घेऊच शकलो नाही तुझ्यावर...तु कायमच आईसारखा जवळचा वाटलास रे... युद्ध नको बुद्ध हवा असं म्हणत कायमच तू हवाच, अशी मागणी मी करत आलो आहे.... आताही तीच मागणी करतो... कायम सोबत रहा बाबा...कायम...!


तुझाच........

Wednesday, May 3, 2023

Book Review : दोन मने (वि.स.खांडेकर)


माणसाचं मन तसं न उलगडणारं कोडं...बहिणाबाईंनी पिकातल्या ढोराची उपमा दिलेलं मन...न दिसणारं, न दाखवता येणारं..तरीही आपल्या आयुष्याला दिशा देणारं मन...मनामुळे सगळं कळतं, पण मन कळत नाही असं म्हणतात...याच मनावर कित्येकांनी लिहिलं आहे...पण या सगळ्यांनी वर्णिनेलं मन हे एकच..."माणसाच्या आत दोन मनं असतात, एक पशूचं आणि एक देवाचं...पहिलं उपभोगात रमतं, दुसरं त्यागात आनंद मानतं"...हे सांगणारं पुस्तक‌ म्हणजे वि. स. खांडेकर यांची 'दोन मने' ही कादंबरी...


'प्रीती अन् पराक्रम हेच जीवनाचे डोळे आहेत', असं मानणाऱ्या खांडेकरांच्या बहुतेक कादंबऱ्यांचा विषय प्रीती आणि प्रेम हाच आहे..तोच विषय यादेखील कांदबरीचा आहे.. कादंबरीची मुख्य कथा आहे तीन मिञांची..प्राध्यापक असलेले आगटे, वकिली करणारे बाळासाहेब अन् अनाथाश्रम चालवणारा सुबोध..या तिघा मिञांच्या आयुष्याचा पट उलगडणारी ही कथा..काॅलेजात असणारे आपण अन् पुढे आयुष्यात असणारे आपण यात‌ बऱ्याचदा खूप फरक असतो... तेंव्हा समाजवादी असणारे आपण पुढे भांडवलदार देखील होऊ शकतो, हे सत्य यात अगदी साध्या शब्दात मांडलेले आहे.. कथेतील बाळासाहेब म्हणजे उपभोगवादी माणुस...आगटे हा वैचारिक तरिही परिस्थितीसमोर मान तुकवणारा माणुस...तर सुबोध हा सभोवतालचे दुःख, वेदना पाहुन सन्यस्त झालेला तरीही आपल्या दुबलेपणाला आपला सात्विकपणा म्हणुन आपण जगलो अशी खंत वाटणारा... कथा मुख्यतः बाळासाहेबांच्या भोवती फिरते.. बाळासाहेब चपला नावाच्या एका सिनेनटीच्या प्रेमात पडुन तिच्यासोबत पुण्याला जातो..तिथे जुन्या काॅलेज मिञाची भेट होते..तो चपला लाच त्यांची बायको समजतो...बाळासाहेबही हा गैरसमज दुर करत नाहीत...पण काही दिवसांनी बाळासाहेबांची बायको तिथे येते तेंव्हा बाळासाहेबांचे पितळ उघडे पडते...त्यावेळी त्यांच्या बायकोची अवस्था..बाळासाहेबांच्या मनाला होणारा दंश..आपल्या चुकीच्या वागण्याचा होणारा पश्चाताप.. त्यातुन बाळासाहेबांचे स्वतःच्या आयुष्याचे होणारे मुल्यांकन ... हे सगळे मांडताना अनेक जगण्याचे मंञ शब्दाशब्दात सापडतात...त्यानंतर 'चपला'चे बाळासाहेबांपासुन अलगद दुर होणे...आगटेंचा विद्यार्थी असलेल्या एका 'श्री' नावाच्या हरिजन तरुणाशी जवळीक होणे...दलितांसाठी सत्याग्रह करण्याचा निश्चय घेऊन दलितांसाठी जीवन वाहून घेण्याचा निश्चय करणारा हा तरुण...चपलेसारख्या मोहक तरुणीच्या मोहाला बळी न पडणारा...आपल्या कर्तव्याशी प्रतारणा न करणारा...अन् म्हणुनच चपलेला आवडणारा...पुढे जाऊन तर श्री च आपले दुसरे मन जागे करु शकला, असे सांगुन चपला त्याच्यासाठी हरिजनांच्या सत्याग्रहातही भाग घेते..कथेत बरेच बाकी चढ उतार आहेत..अन्य पाञे आहेत..म्हातारपणातही सत्याग्रहासाठी तयार‌ होणारा 'श्री'चा आजोबा..बाळासाहेबांची पत्नी-निर्मला...सुबोधच्या आश्रमातली माई...इत्यादी.

कथेत ठिकठिकाणी माणसाच्या दोन मनांचा उल्लेख येतो...प्रत्येकात दोन मने असतात...एक उपभोगात रमते तर दुसरे त्यागात ...या दोन मनात कायम झगडा असतो...बाळासाहेबांचे पहिले मन वरचढ ठरले तर श्री चे दुसरे मन....माणसाला आयुष्यात ह्या दोन्ही मनांचा समतोल साधतच जगावे लागते...तसे जगले तरच आयुष्य सुखी होते ..जीवनात‌ अनेकदा भरकटलेला कथेचा नायक बाळासाहेबच आपल्याला जीवनाचे खरे सार सांगुन जातो...
तो‌ म्हणतो,
"जीवन ही लढाई आहे.
जीवन हा यज्ञ आहे.
जीवन हा सागर आहे.
जखमांवाचून लढाई नाही.
ज्वालेवाचून यज्ञ नाही.
वादळावाचून‌ सागर नाही."

अशाप्रकारे जीवनाबाबतचे हे असे शाश्वत सत्य सांगणारी ही कादंबरी. कथा आपल्याला खिळवून ठेवणारी..आपल्या आवडीच्या विषयावरची...स्ञी-पुरुष संबंधाबद्दल आपल्याला जागरुक करणारी...प्रेम म्हणजे फक्त मोह नाही, प्रेम म्हणजे नुसता उपभोग नाही...प्रेमात उपभोग असला तरी तो प्रेमाचा मुख्य भाग नाही, उप आहे...हे अधोरेखीत करणारी.. प्रत्येकाच्या आयुष्यात मोहाचे क्षण येतात, ते मोहक क्षण दाहक अनुभव देखील देऊ शकतात, तेंव्हा अशा मोहाच्या क्षणी सावरायला हवे असे सांगुन आपल्या तारुण्याला सावध करणारी..अन् प्रत्येकामधले पशुचे मन वरचढ होऊ पाहते, हे सांगणारी...म्हणुनच आपल्याला दोन मनांचे हे गौडबंगाल कळावे यासाठी ही कादंबरी वाचायला हवी.

कादंबरीतील काही भावलेली विधाने :
१) निसर्ग भविष्याकडे धावत असतो आणि मनुष्य मात्र भूतकाळात गुंतून राहतो.
२) माणसाला कुठलं तरी वेड असावंच लागतं.
३) जिथं माणूस अत्यंत सुखी असतो तेच त्याचे घर.
४) परिचयाचे पहिले धागे रेशमाहूनही नाजुक असतात.
५) पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींपैकी न लिहिलेल्या गोष्टीच आयुष्यात जास्त घडतात.
६) पूजा ही जीवनाचा कळस आहे.
७) जीवन मनातले असते ; जनातले नसते.
८) भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यात मानवी मनाचा खरा पराक्रम आहे.


#असंच_काहितरी
#Book_Review