Friday, May 5, 2023

प्रिय सिद्धार्थ



प्रिय सिद्धार्थ,

नेमकं तुला काय म्हणावं ? याचाच विचार करत होतो...सिद्धार्थ म्हणु, तथागत म्हणु की बुद्ध म्हणु... असु दे...काहीही म्हटलं तरी तुला फार फरक पडणारच कुठेय ? तुझं मोठेपण हे नावात नाहीये हेच खरे...तुझं जगणं, तुझा संदेश हिच तुझी खरी ओळख..तु खरंतर माझंच विस्तारीत रुप आणि मी तुझं संकुचित रुप, तसं बघितलं तर हा माझाच माझ्याशी संवाद आहे..मग खरच नावात काय आहे ?

तर सिद्धार्था, ह्या पञास कारण की आज तुझा वाढदिवस...आमच्या भाषेत बर्थ डे..पण नुसतं एवढच नाही..आजचा दिवस हा तुझ्या आयुष्यातला फारच महत्वाचा दिवस...तुझा जन्म आजचा...तुला ज्ञानप्राप्ती झाली तो दिवसही आजचाच...अन् तुझे ह्या मायावी जगातुन महापरिनिर्वाण झाले, तेही आजच्याच दिवशी...आयुष्याची सुरवात अन् शेवट एकाच बिंदुवर, यातुन आपलं आयुष्य एक वर्तुळ आहे हेच जणू तु दाखवुन दिलेस. ह्या वर्तुळाच्या परिघावर भटकण्यात आमचे जीवन निघून जाते...आमच्या सारख्या सामान्य माणसाचं आयुष्य तर खऱ्या अर्थानं परिघावरचे जिणे...ह्या वर्तुळाच्या केंद्रबिंदुचा शोध काही काहींना आयुष्यभर लागत नाही...असो.

सिद्धार्था, तु राजकुमार होतास...कशाचीच कमी नव्हती...तरीही जगातले दुःख पाहुन तुझे हृदय कसे द्रावले ?...इकडे आमच्याकडे तर जरासा पैसा आला की आम्ही तर बाबा मानच खाली वाकवत नाही...मग तुझ्यात धनदौलतीचा उन्माद कसा आला नाही ?...हे काही मला अजुन कळले नाही..तु राजमहाल सहज सोडु शकला, कुठलेच बंधन तुला बांधुन ठेवु शकले नाही...आम्हीतर बाहेरगावी जाताना घराचे कुलूप नीट लागले का याची चारदा खातरजमा करतो...बायको माहेरी पोहचे पर्यंत चारदा काॅल करुन नीट जातेय ना, कुठपर्यंत पोहचली, अशी विचारणा करत असतो...घराचा, घरातल्या माणसांचा कशाचाच मोह तुला कसा अडवु शकला नाही, हे माझ्यासारख्या सामान्यांना न उलगडणारं एक कोडंच आहे...पण खरं सांगायचं तर तु राजमहाल सोडलास तेंव्हाच कुठे तु खरा सम्राट झालास...शांततेचा, विश्वबंधुतेचा संदेश देणारा महासम्राट....तु जगातले दुःख पाहिले, वार्धक्य पाहिले तेंव्हा ह्या जगण्याचा हेतु काय ? असा प्रश्न तुला पडायला लागला अन् मग त्यातुनच तु शोधायला निघालास अशा प्रश्नांची उत्तर जी कधी कोणाला पडलीच नव्हती...धर्म म्हणजे कर्मकांड हेच ज्यांचं गणित होतं, ज्यांच्या धर्मानं इतरांना नाकारलं, त्या नाकारल्यांना तु स्विकारलेस अन् त्यांना नवा धर्म दिलास..जगण्याचा नवा मार्ग दाखवलास...तु शिव्या घालत बसला नाहीस, तु दगडांवर धडकाही घेतल्या नाहीस, तु धर्मांधतेचा डोंगरच पोखरलास...सामान्यांना असामान्य असे ज्ञान देऊन त्यांचं जगणं देखणं केलस...सहा वर्षाच्या भटकंतीनंतर तुला दिव्यज्ञानाची प्राप्ती झाली...जगात दुःख आहे...दुःखाला कारण आहे...अन् हे दुःख दूर देखील करता येते असा सर्वव्यापी संदेश तु दिलास....तृष्णा हे दुःखाचे मुळ कारण आहे, हे किती अचुक सांगितलेस तु...आम्ही कायम दुःखी का ? ह्याचं उत्तर आमची तृष्णा कायम कृष्णामाई सारखी वाहतच असते...आमच्याकडे सायकल नसते तेंव्हा सायकल हवी असते, सायकल आली की मोटारसायकल, मग चारचाकी  गाडी, मग बंगला, मग नुसता बंगला चांगला वाटत नाही, बंगल्याच्या आजुबाजुला बगीचाही हवा, अन् एवढं सगळं असल्यावरही तृष्णा भागत नाही... कधी पैसा, कधी पद, कधी प्रतिष्ठा आम्ही कायम तहानलेलेच...आता ह्या दुःखाला दूर करण्याचा अष्टांग मार्गही तु सांगितलास... आम्ही माञ फार फार तर तुला साष्टांग नमस्कार करु शकतो, पण हा अष्टांग मार्ग स्विकारणे जरा आम्हाला जडच जाते बघ...

सिद्धार्था, तुला कसं जमलं रे इतकं सम्यक जगणं ?...पण खरं सांगु आम्हीही काही वाईट माणसं आहोत असं नाही...आम्हाला फक्त जमत नाही मध्यम मार्गावर चालणं, आम्ही एक तर डावे असतो नाहीतर उजवे...समाजवादी असतो नाहीतर भांडवलवादी...काळे असतो नाहीतर गोरे...आम्ही कायम हो किंवा नाही असाच प्रश्न म्हणुन पाहतो ...आहे रे आणि नाही रे मध्ये विभागणी करणारा एक मार्क्स आमच्याही आत असतोच.. आम्हाला तु सांगितले तसं मध्यम मार्गावर चालणं जमावं अस वाटतं, पण यासाठी कुणीतरी हात धरावा अन् त्यामार्गावर न्यावं यासाठीच आमचा शोध सुरु असतो...सारे धर्म, सारे शोध, साऱ्या प्रार्थना, हे सारेच आम्हाला कुणीतरी, काही तरी हवे असते जगण्यासाठी ...आमच्या अंधारात चाचपडत पडलेल्या जीवांना मार्ग दाखवण्यासाठी...आमच्या‌ वाटेत उजेड पेरण्यासाठी...पण बाबा, तु तर मोकळा झालास अत्त दिप भव: म्हणुन...आता तुच सांग कसा पेटवायचा हा आतला दिप ?...अन् कसा पेरायचा उजेड आपणच आपल्या वाटेवर ?...असु दे..हे तरी तुला का विचारावं, मीच माझं शोधलं पाहिजे ह्याचं उत्तर कारण तुला स्विकारायचे म्हणजे सोपं नाहीच....पण आवश्यक माञ आहे...म्हणुनच साऱ्या धर्म अन धर्मग्रंथांचा अभ्यास करुन भिमराय तुझ्या मार्गावर आला तो काय उगीच..?

सिद्धार्था, बघ काय काय बोललो ना...किती भरकटलो...अरे हे असंच होतं बघ माझं...म्हणुनच तु अन् तुझे शब्द मला परत मार्गावर आणण्यासाठी फार गरजेचे आहेत बघ...मी माझा दिप होईलच ..तु फक्त माझ्या जवळच रहा, माझ्या दिव्याची वात विझू नये म्हणुन....तु लहानपणापासुन शाळेतल्या पुस्तकापासु‌न ते कथा, कादंबरी, सिनेमापर्यंत वारंवार भेटत आलाच आहेस..पुढे पुढे सोशल मिडियात कितीतरी प्रेरणादायी वचनांच्या माध्यमातुन तु भेटला...खरंखोटं सगळं तपासुन पाहायला हवं, हे तुच सांगितलस...पण मी शंका घेऊच शकलो नाही तुझ्यावर...तु कायमच आईसारखा जवळचा वाटलास रे... युद्ध नको बुद्ध हवा असं म्हणत कायमच तू हवाच, अशी मागणी मी करत आलो आहे.... आताही तीच मागणी करतो... कायम सोबत रहा बाबा...कायम...!


तुझाच........

No comments: