आपल्या वसाहतीची नावं भीमनगर, अण्णाभाऊ साठे नगर, फुले नगर अशी ठेवावीत असे शासनाच्या कधीकाळी डोक्यात आले...या नावांमुळे महारवस्ती, मातंगवस्ती, किंवा माळीवाडा अशी जातीवाचक नावं टाळली जातील हे त्या नामांतरामागचं शास्ञ.....पण या नावांमुळे त्या त्या समाजसुधारकांना आपण त्या त्या जातीपुरते बंदीस्त तर करत नाही ना ? हा माञ विचार करण्यासारखा प्रश्न ..पण असे कित्येक प्रश्न जणु निरुत्तरीत राहण्यासाठीच असतात...असो. तर मुळ मुद्दा असा की कितीही नावं बदलली तरी नावावरुन वस्ती कळतेच...अन् वस्तीची जात/धर्म ही कळतो...असेच नावावरुन सहज लक्षात येईल अशा एका शहरातील वस्तीत मागच्या आठवड्यात जाणं झालं ...वस्तीचं नाव इक्बाल नगर...नावावरुन अंदाज आलाच असेल की ही वस्ती मुस्लिम बहुल आहे...शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीसाठी त्या भागात जाणं झालं, नाहीतरी शहरातल्या अशा बऱ्याच वाड्या, वस्त्या असतात जिथं आपण मुद्दाम कधी जातच नाही किंवा तशी काही गरजही पडत नाही....अन् मुळात असं कुणाला तिकडं जाण्याची गरज पडत नाही म्हणुनच त्या वस्त्यांच्या गरजांबद्दल कुणाला मागमुसही लागत नाही....तिथल्या त्यांच्या अडचणींचे स्वरुप आपल्याला आपल्या कार्यालयात बसुन कळणार तरी कसे ? त्यासाठी ह्या भागात जायला हवं, ते तसेच राहतात असं म्हणण्याआधी त्यांना तसं का राहावं लागतं ? याचा विचार करण्याची खरंतर गरज असते....तर ह्या भागातुन फिरताना बरेच काही दिसले...हा भाग म्हणजे जणु शहर सुशोभीकरणाची गंगा जिथे येईपर्यंतच आटली असा भाग...प्रचंड दुर्गंधी, मोडकळीस आलेली घरे, वय झालेल्या म्हाताऱ्यासारखे रस्ते, शाळा, काॅलेजात जाण्याच्या वयात व्यसन करत बसलेली पोरं...तर एकुणच हा परिसर म्हणजे खुला कारावासच वाटावा असा....ह्या भागात नगरपालिकेचे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, हे आरोग्य केंद्र म्हणजे चेहऱ्यावर सुंदरतेचा मुखवटा घातलेल्या माणसासारखं, बाहेरुन रंगरंगोटीचा मुखवटा चढवलेलं...आतुन माञ बंद खोल्या, डाॅक्टर वेळेआधीच फरार झालेले...एक शिपाई तो ही कंटाळवाणा चेहरा करुन बसलेला...आरोग्य केंद्राच्या मागे त्याच्या संरक्षण भिंतीच्या आतच वस्तीतल्या टुकार पोरांनी गँग करुन टाईमपास चालवलेला...भर दिवसा नशा करत बसलेली तरुणाई....हे सगळं चिञ व्यवस्था म्हणुन आपलं अपयश दाखवणारं आहेच, पण नागरीक म्हणुन आपण आपली कर्तव्य विसरत असल्याचंही द्योतक आहे....ही सगळी परिस्थिती बघण्याआधी त्या भागात असणारी माननीय आमदार महोदयांच्या प्रयत्नातुन साकारलेली अतिशय सुंदर अशी स्मशानभुमी बघण्यात आली....स्मशानभुमी इतकी सुंदर व आकर्षक आहे की आपण एखाद्या पर्यटनस्थळी किंवा एखाद्या नयनरम्य उद्यानात आलो आहोत असाच क्षणभर भास व्हावा....ही स्मशानभुमी पाहिल्यावर कुणालाही मरावं वाटेल इतकी सुरेख सोय केलेली आहे...दहन विधी करायला नेण्यासाठी जो मार्ग आहे त्याच्या दुतर्फा जमिनीवर टापटिप ठेवलेले लाॅन व थोड्या उंचीवर संतांचे पुतळे....एका बाजुला महादेवाची भली मोठी आकर्षण मुर्ती.....विशेष म्हणजे स्मशानभुमीची देखभालही अगदी उत्तम ठेवलेली....
स्मशानभुमी अन् तिच्या आजुबाजुची वस्ती ह्या दोन्हीत मात्र जमीन अस्मानचं अंतर.... एकंदरीत जगण्याची गैरसोय अन् मरणानंतरची सोय असं हे चिञ आहे... विशेष म्हणजे ह्या स्मशानभुमीत एक मोठा बॅनर लावलेला आपल्याला दिसेल ज्यावर दहन विधीसाठी जळतण (सरणासाठीची लाकडं) मोफत दिले जातील, असे लिहीलय... घराला घरपण देणारी माणसं असं ऐकलेलं होतं, इथं आल्यावर सरणाला सरपण देणारी व्यवस्था आपण करुन ठेवलेली आहे, याचा जणु क्षणभर अभिमानही वाटला, पण पुढच्याच क्षणी विचार आला की मेल्यानंतरची सोय आपण मोफत केलीय पण जगण्यासाठीच्या सोयींचं काय ? ह्या भागातल्या स्वच्छतेकडे आपलं लक्ष का जात नाही ? ह्या भागातले तरुण असे भर दिवसा नशा करत का फिरतात ? आपण त्यांच्या हाताला काम का देऊ शकलेलो नाहीत ? वस्तीतले रस्ते असो वा रस्त्यांवरची माणसं, यांचं जगणं देखणं व्हावं म्हणुन आपल्याला काय करता येईल ? ज्या स्मशानभुमीची गरज रोज कदाचित एखाद्याला पडत असेल तिथे ईमानेइतबारे काम करणारा स्वच्छता कर्मचारी आहे, माञ ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज रोज कितीतरी लोकांना पडते त्याची माञ हेळसांड होतेय..आरोग्य केंद्रच आजारी पडलेलं अन् डाॅक्टर मात्र वेळेवर उपलब्ध नाही, वस्तीतल्या पोरांचा अड्डा हे केंद्र झालय.. किती मोठ विनोद आहे की जिवंत माणसापेक्षा मेलेल्या माणसाच्या नशिबी अधिक चांगल्या सोयी आहेत... असो..ह्या सगळ्याचा अर्थ स्मशानभुमी चांगल्या असु नयेत का ? तर असंही नाही... अर्थात् त्या चांगल्याच असाव्यात... त्यामुळे मयताची हेळसांड वाचते... ज्यांना आयुष्यभर अशा सुंदर, सुशोभित ठिकाणी जाता आलं नाही, अशांना मेल्यानंतर का होईना तो प्रवास घडतो... मृताचा सन्मान राखला जातो....शेवटचा प्रवास सुखाचा होतो ... पण ह्या सगळ्यां बरोबर आवश्यक आहे ते म्हणजे जगण्यासाठीच्या सोयी सवलती देणं..
आरोग्य केंद्राच्या भिंतींपेक्षा आतले डाॅक्टर अधिक कणखर असणं...नशा करणाऱ्या पोरांना रोजगार देणं, फक्त सरकार किंवा प्रशासनाची सर्व जबाबदारी आहे असं नाही, तर इथं राहणाऱ्या प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखणं... स्वतःला कशाची गरज आहे हे ओळखणं.... मुलां-मुलींना शाळेत पाठवणं... आपल्या आजुबाजुला स्वच्छता राखणं.. रस्ते ही सरकारची मालमत्ता समजुन घर साफ करुन घरातली घाण रस्त्यावर टाकणं हे बंद व्हायला हवं... गटारींच्या स्वच्छतेकडे स्थानिकांनी पुढाकार घेणं...आपल्या समस्या नगरपालिकेच्या लक्षात आणुन देऊन नगरपालिकेला सहकार्य करुन काम करणं...आपलं घर स्वच्छ रहावं म्हणुन जितके प्रयत्न करतो तितकेच प्रयत्न आपला परिसर स्वच्छ राहील यासाठी करणं... तरुणांनी स्वतःला कौशल्य शिक्षण व त्यातुन रोजगार यात स्वतःला गुंतवुन ठेवणं... आरोग्यास घातक असणाऱ्या व्यसनांपासुन दुर राहणं... एक जबाबदार नागरिक बनुन व्यवस्थेला प्रश्न विचारणं.... केवळ तक्रारदार न बनता आपल्या समस्येवर आपणच उपाय सुचवणं...शिक्षण, आरोग्य ह्या मुलभुत क्षेञांकडं लक्ष देणं...आपण स्वतःच स्वतःची माती करुन न घेता सरकार अन् समाज यातील नाती घट्ट करणं.... आरोग्य केंद्रात नशा करत बसुन कुणाचा फायदा होईल का ? उद्या आपल्यापैकीच कुणाला तरी दवाखान्याची गरज पडेल तेंव्हा वेळेवर डाॅक्टर उपलब्ध होतील का ? आपल्या ञासामुळे डाॅक्टर खरच नियमित येतील का ? आले तर पुर्णवेळ केंद्रात थांबतील का ? याचा विचार नक्की करायला हवा...अन्यथा आपणं सरकारला, प्रशासनाला शिव्या श्राप देत राहु माञ स्वतः बेजबाबदारपणे वागत राहु .... तर अशाने आपल्यावर जगणं महाग अन् मरण स्वस्त होत आहे असंच म्हणायची वेळ येईल हे निश्चित... अशी वेळ येऊ नये यासाठी सर्वांनीच आपापल्या शहरातल्या अशा वाड्या, वस्त्यांकडे लक्ष देऊयात....अगदी त्या वस्तीने सुद्धा स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे..अपेक्षा करुयात येत्या काळात विकसित भारताच्या स्वप्नपुर्तीत ह्या अशा भागांचा विकास देखील झालेला असेल... फक्त आर्थिक नाहीतर एकंदरीत मानवी विकास.....सर्वसमावेशक, शाश्वत विकास !
#असंच_काहितरी
No comments:
Post a Comment