आपल्या देशात हिमालया इतक्या उंचीची अन् तितक्याच खोलीची असंख्य माणसं जन्माला आली...सगळीच काही आपल्याला परिचीत असतातच असे नाही, पण आपल्या ऐकण्यात, वाचण्यातही अशी माणसे आली तर त्यांच्याकडुन नक्कीच खुप काही शिकायला मिळतं...जगण्याची नवी दृष्टी मिळते...ह्या माणसांचे आयुष्य, त्यांचे जगणे वाचल्यावर कळते की आयुष्यात किती उंची गाठता येते याला काही मर्यादा नसते....माणुस अमर्याद मोठा होऊ शकतो...फक्त प्रसिद्ध होणं म्हणजे मोठं होणं नाही तर आपल्याला हव्या त्या क्षेत्रात सर्वोत्तम करुन दाखवणं म्हणजे खरंतर मोठं होणं..अशी मोठी माणसं काही सहजासहजी तयार होत नाहीत...परिस्थितीच्या भट्टीत भाजुन निघणारी माणसंच पुढं यशाचा डंका वाजवुन दाखवतात...यशोशिखरावर पोहचल्यावर जो तो कौतुक करु लागतो, पण तिथपर्यंत पोहचताना किती पायवाटा पायाखाली घातल्या, किती काटे रुतले, कितीदा रक्तबंबाळ झालो, कितीदा हताश होऊन क्षणभर थांबलो, अडखळलो, पडलो, रडलो तरी चालत राहिलो, कितीदा उपहास सहन केला हे सगळं कुणाला दिसत नाही...मात्र हे सगळं सहन केल्याशिवाय, लढल्याशिवाय यशोशिखरावर पोहचताही येत नाही....अशा मोठ्या माणसांशी भेटता येणं हे ही भाग्यच...पण जेंव्हा त्यांची भेट अशक्य असते तेंव्हा पुस्तकं घडवतात भेट अशा माणसांची...अन् पुस्तकातुन ही माणसं आपल्याला भेटतात, त्यांचा संघर्ष समजतो, त्यांची लढाई कळते, त्यांच्या वाट्याला आलेल्या खाचखळग्यांना त्यांनी कसं पार केलं, हे सगळं वाचायला मिळतं, तेंव्हा पुस्तकाच्या पानातुन जणु ही माणसंच आपल्याशी बोलत असतात....बरेच काही सांगतात, बरेच काही समजावतात, मनातल्या विचारांना दिशा देण्याचं काम ही करतात...
अशीच तीन मोठी माणसं (लेखकासह चार) लढणाऱ्यांच्या मुलाखती या पुस्तकातुन आपल्याला भेटतात...ह्या देशाला जशी नाथांची परंपरा आहे तशीच अनाथांची पण आहे, अन् त्याच परंपरेतील ज्यांना स्वतःचे नाव, गाव काहीच नव्हते, ज्यांनी स्वतःबद्दल लिहिताना कवितेतही लिहीलय की,
ना घर होते ना गणगोत
चालेल तेवढी पायाखालची जमीन होती
दुकांनाचे आडोसे होते
मोफत नगपालिकेचे फुटपाथ
अशा देण्यात आलेला उठवळ आयुष्याची....
मात्र पुढे ज्यांनी आपले कवितेचे एक गाव नव्हे तर महानगरच वसवले अन् साहित्यक्षेत्रात स्वगःचे नाव अगदी अजरामर करुन ठेवले असे पुस्तकातील पहिले व्यक्ती म्हणजे कविवर्य नारायण गंगाराम सुर्वे...जन्म दिलेले आई, वडील नाही...ज्यांनी सांभाळलं त्यांनीही एका टप्प्यावर आता तु तुझं बघ म्हणुन सोडुन दिलेले..मात्र अशाही परिस्थितीत शिपाई, शिक्षक ते कामगार चळवळीतील लढ्यापर्यंत ते लढत राहिले...कुठलीही तक्रार न करता...लाभलेले आयुष्य मिळालेल्या परिस्थितीत रडत पडत न जगता लढत लढत जगणं त्यांनी मान्य केलं..प्रचंड दर्जेदार लिहिलं, तरीही चांगलं लिहायचं राहुन गेलं इतका विनम्र भाव त्यांच्या ठायी दिसतो...त्यांच्याबद्दल, त्यांच्या कवितेबद्दल, त्यांच्या तत्वप्रणालीबद्दल, कामगार लढ्याबद्दल अन् एकंदरीतच समकालीन परिस्थितीबाबत त्यांना विचारलेले प्रश्न अन् त्याची उत्तरं आपल्याला यात वाचायला मिळतात.
पुस्तकात दुसरी मुलाखत आहे डाॅ. सुनिलकुमार लवटे यांची. सुनिलकुमार लवटे हे देखील कविवर्य नारायण सुर्वे यांच्याच परंपरेतील म्हणजेच अनाथ...पंढरपुरातील बालकाश्रमात वाढलेल्या लवटे यांच्याशी मारलेल्या गप्पा... त्यातुन त्यांचा जीवन संघर्ष व सोबतच त्यांचे अनाथपणा वा अनाथांबद्दलचे विचार, सोबतच कुमारी माता, विवाहपुर्व व विवाहबाह्य संबंध याबाबतचे विचार, हे पुस्तकातील दुसऱ्या टप्प्यावर वाचायला भेटतात.
पुस्तकातील तिसरी मुलाखत आहे डाॅ. रावसाहेब कसबे यांची... फारच वैचारिक व वाचनास प्रवृत्त करणारी....कसबे हे जेष्ठ व श्रेष्ठ साहित्यीक, त्यांचे लिखाण व अभ्यास किती अफाट आहे याची जाणिव ह्या मुलाखतीमधुन होते....बुद्ध ते आंबेडकर व्हाया गांधी असा मुलाखतीचा प्रवाह आहे...मुलाखतीत बरीच वैचारिक चर्चा आहे...सामाजिक न्याय ह्या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवुन अनेक मुद्द्यांवर ह्यात चर्चा केलेली आहे...लोकशाही, समाजवाद, जागतिकीकरण ह्या विषयांची सर्वांगिण चर्चा आहे...वेळोवेळी रावसाहेबांनी दिलेले अनेक दाखले, उदाहरणं आपल्याला त्यांच्या वाचनाची विस्तीर्ण कक्षा तर दाखवतातच सोबतच आपल्याला अजुन खुप काही वाचायचं बाकी आहे, समजुन घ्यायचं बाकी आहे याचीही जाणिव करुन देतात...निम्म्या पुस्तकात कसबे यांची मुलाखत आहे तर उर्वरीत निम्म्या भागात इतर दोघांची मुलाखत व तत्पुर्वी मुलाखतीबाबतची लेखकाने दिलेली सिद्धांतिक माहिती आहे....
पुर्ण पुस्तक हे एकंदरीत मुलाखत काय असते ? कशी ह्यावी ? याचा वस्तुपाठ तर आहेच, पण लढणाऱ्या माणसांनी लढण्यासाठी दाखवलेली वाट देखील आहे.....अवश्य वाचावे असे.
#असंच_काहितरी
#Book_Review
No comments:
Post a Comment