जिनं सोसलेला जाळ
जिनं उपसलेला गाळ
जिनं तासलं रं भाळ
हात जोडुनी तिच्या
उभा राहिला रं काळ..........।।
जिच्या काळजात धग
जिचं न्यारंच होतं जग
कधी सोडली ना तग
तिला एकदा बघ................।।
केली शेकोटी दुःखाची
लावली वेदनेला आग
दुर सारुनी वाटेवरचे काटे
तिनं आज फुलविली बाग.....।।
जवा फेकली जगाने
आग तिच्या अंगावर
तिनं शेकली भाकरी
त्याच फेकल्या आगीवर......।।
गोठवणार्या गारव्यात
करुनी गोळा पालापाचोळा
तिनं भरली मातीची रं ओटी
जाळुनी त्यास मग तिनं
पेटवली रं शेकोटी......….....।।
कचपटासारखं जिणं
जिनं कधी स्विकारलंच नाही
तिनं उभं केलेलं आजचं जग
आपोआप साकारलंच नाही...।।
या तिच्या जगामागं
जगावरचा राग होता
लाखोंची माय होण्यासाठी
पोटच्या लेकीचा त्याग होता..।।
शेकताना हात पाय
जवा बघितली सिंधुताई
दिसु लागल्या मला
गोठ्यातुन हंबरणार्या गाई...।।
एक ती मसणातली शेकोटी
अन् आजची ही शेकोटी
किती फरक कोटी कोटी......
घराबाहेर हाकलेली सिंधु
आज किती बिंदुंना जोडते आहे
उत्तरेतली सिंधु असेलही मोठी
पण माझ्या महाराष्ट्रात
एक मायेची सिंधु आज वाहते आहे..।।
पाहिलं असतं कुणी तुला
त्या सरणावर भाकरी शेकताना
विचारलं असतं, सिंधु तु काय झालीस......
पण आज पाहुन इथं तुला शेकताना शेकोटी जवळ
मी सांगु शकतो , ताई तु लाखोंची माय झालीस.....।।
निघालीस घरुन तेंव्हा
तुझ्याकडं काय होतं..?
पोटाशी लेकरु
अन् पोट रिकामं होतं......।।
रिकाम्या पोटासरशी
तु लढलीस सिंधुताई
तवा कुठं लाखोंची माय
तु घडलीस माई ........।।
एका एका दुःखाला आमुच्या
आता आम्हीबी चेतवणार ताई
वेदनेची शेकोटी आमच्या
आम्हीबी करणार माई.......।।
इतरांच्या सुखात सुख
आम्हीबी आता बघणार ताई
स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी
आम्हीबी आता जगणार माई....।।
कवि:- शशिकांत शांताबाई मारोती बाबर
(लिड इंडिया २०२०- जळगाव)
2 comments:
🤘👍👍
हृदयाला थेट जाऊन भिडणारी रचना..
👌👌👍👍
Post a Comment