Sunday, July 31, 2022

परिक्षाच विचारतेय, बघ माझी आठवण येते का ?



परिक्षाच विचारते, बघ माझी आठवण येते का ? तेंव्हा, 👇👇

(कवि‌ सौमिञ यांची माफी मागुन.....)


लायब्ररीत जाऊन खुर्चीत बसुन रहा

बघ माझी आठवण येते का ?


हात लांबव, लांबचं पुस्तक जवळ घे

घेतल्यासरशी उघडुन पहा

बघ माझी आठवण येते का ?


वाचु लाग, समजेल काही उमजेल काही

नाहीच उमजलं तर

डोळे मिटुन घे, चिंतन मनन कर

नाहीच समजलं तरीही तर बाहेर पड, टपरीवर ये

चहा उफाणलेला असेलंच, गर्दीत जागा करुन उभा रहा

चहासोबत आत्ता वाचलेलं आठवुन पहा

बघ माझी आठवण येते का ?


आता परत चालु लाग, गर्दीचे अगणित धक्के खाऊन घे

वाचलेलं आठवेपर्यंत चालत रहा, ते आठवणार नाहीच, रुमवर ये

कपडे बदलु नकोस, डोकं लावु नकोस, पुन्हा खुर्चीत बस

आता दुसरा विषय हाती घेऊन पहा

बघ माझी आठवण येते का ?


दार वाजेल, दार उघड, रुम पार्टनर असेल

त्याला काहीही बोलु नकोस, तो चारपैकीच एक‌ असेल

तुला विचारेल लवकर रुमवर येण्याच कारण,

तु सांग डोकं गरगरतय

मग हळुच आपापल्या खुर्चीत बसा

तो एखादा पीवायक्यु विचारेल, माहित नाही सांग

आता पुन्हा पुस्तक वाचु लाग

बघ माझी आठवण येते का ?


मग राञ होईल, तो लाईट बंद करेल, झोपायचय म्हणेल

तुही तसंच कर, झोपायला जा

विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल

पावसाच्या आवाजासरशी तुला गाव आठवेल

गावातला‌ बापाचा मानमरातब अन् नाव आठवेल

झोप लागणार नाही, एखादं लेक्चर पहा

बघं माझी आठवण येते का ...?


यानंतर सताड डोळ्यांनी स्वप्न पाहायला विसरु नकोस

स्वप्न जागं होईल, झोप मागं जाईल

उशीर झाला असला तरी आता झेपावण्याचा प्रयत्न कर

पुस्तक उशाला घेऊन का होईना, झोपण्याचा प्रयत्न कर

मी अशी तोंडावर आल्यावर तरी, बघ माझी आठवण येते का ?


#असंच काहितरी

Friday, July 29, 2022

खरं खरं सांगा ना....


 

कोण किती नग्न 

यातच देश मग्न

कोण राहिले ब्रह्मचारी

कुणाचे किती लग्न


कुणाच्या मागे ईडी

कुणाच्या हाती सीडी

लाजिरवाणे बरेच इथे

पण‌ लाज नाही थोडी 


राष्ट्रीय चॅनेलवर चालतात

आंतरराष्ट्रीय गप्पा 

कोण कुणासाठी पप्पु

तर कोण कुणाचा पप्पा


लोकशाहीच्या मंदिरातही

हल्ली दिसतो कसा धिंगाणा

हेच का लोकशाहीचे शिलेदार

एकदा खरं खरं सांगा ना ?



#असंच काहितरी.........

मागणी.....


 

Monday, July 25, 2022

चिखलातल्या माणसांच मरण....


 

आम्हीही बंड करणार .......



तुमच्या मोठमोठ्या बॅनरचा आम्हाला

पांघरुणापुरता देखील वापर होत नसेल

आमच्या दुःखावर पांघरुण घालणं सोडा

आमच्याच अंगावरचं‌ पांघरुण काढुन

तुम्ही तुमचाच शिवणार असाल सदरा

दाखवणार माञ तुम्हाला लय आमच्या कदरा

तर आता आमच्या बी तुमच्यावर असतातच नजरा

तेंव्हा आमचं काहीच ओके मंदी नसताना

अन् तुमचं समदं ओके मंदी असताना.......

आमचे डोके गरगरणारंच ना साहेब.....!!

मग तुम्हीच सांगा,

आम्ही थंड कसं राहणार साहेब

आम्हीही बंड करणार साहेब........

आम्हीही बंड करणार साहेब........

आमचं सरकार येईल का सांगता येणार नाही

सरकार आमचं होईल का सांगता येणार नाही........




#असंच काहितरी.....

Sunday, July 24, 2022

माणुस....


 

माणुस पुरता तसा नसतो

जसा कुणी आपल्याला सांगतो

तो ज्याला जसा दिसतो

तो त्याला तसा सांगतो..........


कुणी म्हणते असा आहे

कुणी म्हणते तसा आहे

कुणालाच कळत नाही

तो नेमका कसा आहे...........


माणुस नेमका कसा असतो

हे एक कोडं आहे

माणुस कळण्या प्राण्या

हे आयुष्य थोडं आहे............



#असंच काहितरी........

#माणुस...हे अजब रसायन.....

प्रिये......


 

प्रिये......


माझे साधे बोलणेही 

तुला कविता वाटायची कधीकाळी

तुला भेटले की माझ्याही

गझल गळ्यात दाटायची कधीकाळी


तो काळ तसा होता

ते दिवस मंतरलेले होते

तुझ्या पायघड्यांसाठी 

तेंव्हा काळीज अंथरलेले होते


आता नेमके झाले काय अन् कसे ?

आपण दोघेही झालो का वेडेपीसे ?

मी नसे उमेदवार अन् तुही आयोग नसे ?

मग माझे शब्द तुला दबाव वाटतात कसे ?


आपले संघटन व्हावे एवढाचे हेतु आहे

कसलाच संघटित/असंघटित हा दबाव नाही 

तुला भेटण्यासाठीच लाख केलेत प्रयास

तुला भिडण्याचा माझा कुठलाच डाव नाही


मी काही बोलु की नको

हाच माझा सवाल आहे

माझ्या साध्या मागणीनेही

होतो केवढा बवाल आहे .................


#असंच काहितरी

#अआयोगीय......

Saturday, July 23, 2022

लोकमान्य.....

 


मी शेंगा खाल्ल्या नाहीत,

मी टरफलं‌ उचलणार नाही

असं कुणी म्हणत नाही आता

आता टरफलं सुद्धा खाल्ली जातात

शेंगा खाल्ल्याचा सुगावाच लागु नये म्हणुन

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे

पण त्यातही‌ ज्याचा त्याचा वाटा ठरलेला हे पक्कं आहे

स्वराज्य मिळालंय आता, पंच्याहत्तर वरसं झालेत

पण स्वातंञ्य कंच्च्या गाढवीणीचं नाव आहे ?

असा प्रश्न आजंही कित्येकांना पडतो आहे........

कारण इथे स्वकियंच स्वकियांना नडतो आहे......

तुम्हाला मंडालेच्या तुरुंगात उलगडलं गीतारहस्य

म्हणुनंच पारतंञ्याचं भयान जंगल

तुम्ही सिंहगर्जनेनं जागं केलत......

आता सिंहगर्जना कसली....? 

आश्वासनांची खैरात असते..........

निवडणुकीचा दिवस असतो

पण घडवणुकीची रात असते........

स्वदेशीपेक्षा देशीवर देश चालतो आहे

तेंव्हा वाटतं, 

मीच माझ्या देशाला मातीत घालतो आहे

सत्तेसाठी लाचारी कित्येकांना मान्य आहे

सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का ?

विचारणारा कुठे लोकमान्य आहे.........?



#असंच_काहितरी


भारत मातेच्या ह्या नरकेसरीच्या स्मृतिस त्याच्या जयंतिदिनी विनम्र अभिवादन....🙏

Friday, July 22, 2022

क्लासेसचे जाळे......


जाळं विणलं जातय सभोवताली

नीट लक्ष देऊन बघ एकदा

तुला घेरण्याचा त्यांचा डाव आहे

स्वस्तात नाही काही वेड्या

एका चढ एक त्यांचा भाव आहे


सारं काही कठीण,महाकठीण

तुला नाही जमायचं

आमच्याशिवाय तुझं

काहीच नाही चालायचं

तुझी नौका पार करायला

आम्ही खरे नाविक

आम्हीच तुझा विठोबा

तु साधा भोळा भाविक

अशी काही करतील ते बतावणी

तेंव्हा ओळखुन घे तु त्यांची गाणी


सगळेच असे नसतात पोरा

हे मलाही कळतं रे

पण पै पै भरुन जेंव्हा

प्री-मेन्स-मुलाखतीच्या

संपत नाहीत वार्या

हसं होतं गावात सार्या

तेंव्हा खरं स्पर्धापरिक्षेचं अर्थशास्ञ

कळतं रे......

इतिहास घडवण्याचं स्वप्न पाहणार्यांचं 

स्वप्न इतिहास जमा होताना पाहुन

काळीज जळतं रे........


सगळेच क्लास थर्ड क्लास नसतात

हे जितकं खरं

क्लासच न लावताही क्लास वन होता येतं

हेही तितकंच खरं........


शेवटी ज्याचं त्यानं ठरवावं

मला वाटलं तेच तुला वाटलं पाहिजे असं नाही

मला भेटलं तेच तुला भेटलं पाहिजे असं ही नाही..!!




#असंच_काहितरी....

अभिनंदन राष्ट्रपती....

 21 जुलै 2022 रोजी ऐतिहासिक घटना‌ घडली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झाली. पण इतक्याने हुरळुन‌ जायचे कारण नाही, कारण एवढ्याने सारा आदिवासी समाज विकसित झाला, महिलांचे सगळे प्रश्न मिटले असे होत नाही, याचाही विचार झाला‌ पाहिजे. एकीकडे आदिवासी सर्वोच्च स्थानावर बसवायचे अन् त्यांच्याच सहीने आदिवासींच्या हक्कांवर गदा‌ आणणारा‌ जंगल अधिकार (सुधारणा) कायदा आणायचा.(Forest Rights Act 2006)असे होऊ नये. महिला राष्ट्रपति असेल पण साधारण महिला‌ सुरक्षित नसेल तर हा मोठेपणा‌ उपयोगाचा नाही. अर्थात यातुन एकगोष्ट चांगली झाली. सर्वधर्मसमभाव जपणारा, विविधतेने नटलेला माझा देश खरंच‌ किती मोठीच नव्हे तर महान लोकशाही आहे, हे आपण तुर्तास अधोरेखित केले. राष्ट्रपति हे पद रबरी स्टँम्प म्हणुन बर्याचदा हिणवले जाते, ते तसे नाही हे‌ दाखवुन देण्याचे प्रसंग आपल्या कार्यकाळात नक्कीच येतील अन् आपणंही त्याप्रसंगी सामान्यांचा लोकशाहीवरचा विश्वास दृढ होईल, असेच चिञ आमच्या समोर‌‌ उभे कराल, या अपेक्षसह आपल्याला खुप खुप शुभेच्छा राष्ट्रपति महोदया....!!

खुप खुप अभिनंदन महामहिम‌ राष्ट्रपती साहिबा.....🌹🌹🌹




With Some weightage to Maharashtra #MPSC_Syllabus

मा. आयोगाने (MPSC) राज्यसेवा परिक्षेसाठी नवीन पद्धत व अभ्यासक्रम जाहिर केला, त्याअनुषंगाने .......
#MPSC2023
#NewPatternNewSyllabus




प्रति, DC post.....

 


Friday, July 15, 2022

संसदीय प्रेम.....


बरे झाले आपण प्रेम, संसदेत केले नाही

नाहीतर तु मला

हसत हसत बाल बुद्धी सुद्धा 

म्हणु शकली नसतीस

मलाही दंगा करता आला‌ नसता

यावर तुझ्याशी पंगा घेता आला नसता


असे निवांत नदी किनारी बसुन

धर्माच्या नावावर आपले प्रेम नाकारणार्याला

आपल्याला दलाल सुद्धा म्हणता आले नसते

मनातले मलाल सुद्धा मनात राहिले असते.....


साला नौटंकी समाज

पाहत बसला असता आपल्याकडे

त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे एक जुमला

म्हणुनंच प्रेमवीरांवर वारंवार करतात हमला


आपल्या प्रेमाला भ्रष्ट म्हणणारे ओठही

आपल्याला नष्ट करता आले नसते

त्यांची दादागिरी चालली असती

अन् आपल्यालाच कष्ट झाले असते


आपलेच गद्दार असतात 

तेच आपला उद्धार करतात

बेचारा म्हणुन सोडले नसते

तुला मला असे पाहिल्यावर

माझेही लय हाल केले असते

तुझ्याही घरच्यांनी तुला 

लाल केले असते........


अशा संसदीय लोकशाहीत

आपले प्रेम असंसदीय ठरले असते

आपले सारे स्वप्न हवेत विरले असते

बरे झाले आपण प्रेम, संसदेत केले नाही

आपल्या प्रेमाला संसदेपर्यत नेले नाही.......


एक माञ केले असते, 

जर झालेच असते संसदेत प्रेम 

तर मी सभापती झालो असतो

हवे तसे इतरांना दुर लोटुन

सहज तुझा पती झालो असतो......


#असंच_काहितरी

[ता.क. - यातले शब्द असंसदीय ठरवले गेलेले असतीलही, पण प्रेम माञ संसदीयच आहे...कायम....! आणि हो, असेही हे सगळे मी संसदेबाहेरच लिहिले आहे]

समान नागरी कायदा....


 

कार्यकर्ता....


 

Wednesday, July 13, 2022

एमपीएससी नवीन पॅटर्न आणि आपण...!!


पद्धत बदलली बरे झाले

मार्केटमधल्या अफवांचे खरे झाले 


कुणाला जड जाईल थोडे

कुणासाठी फार बरे झाले


मार्क्स वाढले वाढेल स्पर्धा

MCQ वाल्यांचा जीव होतोय अर्धा


Writing skills ची जोरात चर्चा

Optional पायी वाढेल खर्चा


जो तो आपली लढवतोय शक्कल

आयोगाने केलीये युपीएससीची नक्कल


अभ्यास करुन करुन पडलंय टक्कल

आता लिहायला अजुन लावा अक्कल


कुणाला तयारीला अजुन वेळा हवाय

फायदा तर त्यांनाच जो नवाय 


क्लासवाले पुन्हा जोमात येईल पिक

घरदार विकुन एमपीएससी शिक

करु नको बाबा असलं काही

काही नाही झाले तर मागाय लागेल भिक


एक माञ बरं युपीएससी हातुन गेली तर

एमपीएससी पुर्नवसन करणार

युपीएससी वाल्यांना नक्कीच

काही काळ का होईना हे मदतगार ठरणार


शेवटी एक हेही खरंच,

इथे तोच टिकला, जो परिस्थितीनुरुप वागला 

त्यामुळे एमपीएससी करण्याआधीच, विचार कर चांगला




#असंच काहितरी

गुरुपोर्णिमा विशेष


 

Sunday, July 10, 2022

तर बरं‌ झालं‌ असतं........

तु भेटलीच नसतीस तर बरं‌ झालं‌ असतं
माझंही जगणं इतकं देखणं झालं नसतं

तुझा नकार मान्यंच, तुझं कारण खरं नव्हतं
तु कारणंच दिलं नसतस,
तर बरं झालं असतं ..............

तु भेटुन बोलुया म्हणालीस,
अन् यापुढे भेटायचं नाही एवढंच बोललीस
तु भेटायला बोलावलंच नसतस,
तर बरं झालं असतं ...............

इथुन पुढे आपलं पटणार नाही,
मला हे पटवुन दिलंस तु अन् निघुन गेलीस
मला‌ हे आधीच पटलं असतं,
तर बरं झालं असतं ................

मेंहदी लागल्या हातांना पावसात धरशील तेंव्हा
मनात आग लागल्या शिवाय राहणार नाही 
मी तेंव्हा तुझ्यासोबत पावसात भिजलो नसतो, 
तर बरं झालं असतं ..............

आयुष्याचा नवा डाव रचताना
मला विसरुन जाणारंच तु
मी उद्या मोडणारा डाव, काल रचलाच नसता,
तर बरं झालं असतं ..............

झाले गेले‌ विसरुन‌ जाऊ,
आपापल्या संसारात सुखी राहु
असंच काहितरी बोललीस तु मला मांडवात
मी तुझ्या लग्नाला आलोच नसतो,
तर बरं झालं असतं............….






#असंच काहीतरी

विठोबा - तुकोबा

 


युगे अठ्ठावीस

विठु मुका राहिला आहे

वारीत बोलका

म्या तुका पाहिला‌ आहे !!


विठुराया, खरं खरं सांग

गाथा तरली होती का ?

तुकोबाला जवा, न्याया आले‌ विमान

इंद्रायणी काठोकाठ भरली होती का ?


मला‌ तर वाटते विठोबा

गाथा‌ बुडवली खरी, 

पण अभंग तरला आहे

गाथा गुंडाळुन ठेवणार्यांनीच

तुकोबा वारंवार मारला आहे !!


विठोबा अन्‌ तुकोबा

अतु‌ट अशी जोडी आहे

विठु तुझ्या नामात अन् 

तुकयाच्या अभंगात

खरी आयुष्याची गोडी आहे !!



#विठोबा_तुकोबा

#असंच_काहितरी

एकाकी विठोबा

अठ्ठावीस युगांपासुन ऊभा 

एकटाच.....

कधी एकाकी वाटलं नाही का विठोबा

सारे जग आपले दुःख तुला सांगते

तुला कुणाला सांगावं वाटलं नाही का विठोबा

हे असं रखुमाई पासुन दुर

तुला वाटत नाही का हुर हुर

वाटत असेलंच की म्हणा

पण ऐकतंय कोण ?

सारे सांगायला आलेले...

सांग माझ्या कानात,

तुझा द्यायचा का रखुमाईला निरोप

तुलाही तिच्याशिवाय लागत नाही झोप

नुसते टोळे मिटुन आहेस

पण, सारं बघतोस विठोबा

जगाचा माय बाप तु 

पण, लेकरापरी जगतोस विठोबा



#आषाढी एकादशी

#असंच काहितरी