Friday, July 15, 2022

संसदीय प्रेम.....


बरे झाले आपण प्रेम, संसदेत केले नाही

नाहीतर तु मला

हसत हसत बाल बुद्धी सुद्धा 

म्हणु शकली नसतीस

मलाही दंगा करता आला‌ नसता

यावर तुझ्याशी पंगा घेता आला नसता


असे निवांत नदी किनारी बसुन

धर्माच्या नावावर आपले प्रेम नाकारणार्याला

आपल्याला दलाल सुद्धा म्हणता आले नसते

मनातले मलाल सुद्धा मनात राहिले असते.....


साला नौटंकी समाज

पाहत बसला असता आपल्याकडे

त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे एक जुमला

म्हणुनंच प्रेमवीरांवर वारंवार करतात हमला


आपल्या प्रेमाला भ्रष्ट म्हणणारे ओठही

आपल्याला नष्ट करता आले नसते

त्यांची दादागिरी चालली असती

अन् आपल्यालाच कष्ट झाले असते


आपलेच गद्दार असतात 

तेच आपला उद्धार करतात

बेचारा म्हणुन सोडले नसते

तुला मला असे पाहिल्यावर

माझेही लय हाल केले असते

तुझ्याही घरच्यांनी तुला 

लाल केले असते........


अशा संसदीय लोकशाहीत

आपले प्रेम असंसदीय ठरले असते

आपले सारे स्वप्न हवेत विरले असते

बरे झाले आपण प्रेम, संसदेत केले नाही

आपल्या प्रेमाला संसदेपर्यत नेले नाही.......


एक माञ केले असते, 

जर झालेच असते संसदेत प्रेम 

तर मी सभापती झालो असतो

हवे तसे इतरांना दुर लोटुन

सहज तुझा पती झालो असतो......


#असंच_काहितरी

[ता.क. - यातले शब्द असंसदीय ठरवले गेलेले असतीलही, पण प्रेम माञ संसदीयच आहे...कायम....! आणि हो, असेही हे सगळे मी संसदेबाहेरच लिहिले आहे]

No comments: